चालणं हा त्यांचा छंद आणि देश बघायचा ही इच्छा.. या दोन्हीची सांगड घालत डोंबिवलीमधल्या या अवलियाने सगळा देश चक्क चालत चालत पायाखाली घातला. त्यांच्या अनोख्या पदभ्रमणाची ही गाथा-

त्यांचा ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ हा प्रवास कोणत्याही विक्रमासाठी नव्हता. देशाबद्दलचे कमालीचे औत्सुक्य, श्रद्धा, वेगवेगळ्या भागांतील लोकांची जीवनशैली, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची इच्छा, निसर्गाचा शोध, राज्याराज्यांतील ‘आम आदमी’ उलगडून पाहण्याचा प्रयत्न, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:च्या चालण्यावरचा कमालीचा विश्वास, या विश्वासातून सुरू झाला एक प्रवास. सुमारे चार हजार किलोमीटरचा, १२ राज्याचा, पाच महिन्यांचा, किमान ६२ लाख पावलांचा, ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ असा विक्रमी पायी प्रवास करून ६२ वर्षांचे विद्याधर भुस्कुटे नुकतेच डोंबिवलीतील आपल्या मूळ घरी परतले. तब्बल पाच महिन्यांचा त्यांचा पायी प्रवास म्हणजे देशातील जनजीवनाचा मुक्तपणे घेतलेला आस्वादच होता.

भुस्कुटे यांच्या प्रवासातील प्रमुख मार्ग…
पहिला टप्पा : श्रीनगर-अवंतीपूर-अनंतनाग-खनाबल-बनिहाल-रामबन-गारमोंड-पटणीटॉप-उधमपूर-नगरोडा-जम्मू-सांबा-कटवा-पठाणकोट-जडवाल-मकरे-चांडा-जालंधर-छेडू-लुधियाना-खन्ना-सरहिंद-सिकंदरा-आंबाला-कुरुक्षेत्र-कर्नाल-पानिपत-कुंडली-अलिपूर-दिल्ली-पलवल-होडला-कोशिकल-मथुरा-आग्रा-धवलपूर-भानपूर-चंबळ-मुराबाद-ग्वालिअर-टेकनपूर-डबरा
दुसरा टप्पा : दकिया-झांसी-सिनोली-ललितपूर-मालथोंड-सागर-गौरधामर-देवरी-परेली-डचई-खापा-बामोरी-गोरखपूर-रुखड-मन्सर-लिहिगाव-नागपूर-पोथली-हिंगणघाट-पवना-करंजी-पांढरकवडा-सुन्ना-मनोर-रोलमांडा-निर्मल-बरगंडी-पद्माजीवाडा-जंगमपल्ली-चिकुंडा-डचल-गंडीभैन्ना-बच्चीपल्ली-गियाँकर-गच्चीबल्ली-हिमायतसागर-थोडापल्ली-शादनगर-जडचरल-कोनीरेड्डी-पल्ली-बिचपल्ली-कोंडापुरम-करमुल-बोमिरेड्डीपल्ली-गरलाबिन-अनंतपूर-आंबापुरम-बालमुद्रम-बागीपल्ली-चिकबल्लपूर-देवनहल्ली-बंगळूर-इलेक्ट्रॉनिकसिटी-होझर-धरमपुरी-शेशमबड्डी-नरलापल्ली-सोलम-बुदाईचंदये-वेलूर-करूर-आदापट्टी-बुथ्थीपुरम-पंडियाराजापुरम-कोईलकुट्टी-सत्तुर-मधुराई-सन्नाडूकडूकोडी-रडियारपट्टी-पनाकुलम-गणेशपुरम-कन्याकुमारी.

विद्याधर भुस्कुटे हे मुळशी सत्याग्रहाचे प्रणेते विनायक महादेव भुस्कुटे यांचे नातू. त्यांचे आईवडीलही स्वातंत्र्यालढय़ात सक्रिय होते. विद्याधर भुस्कुटे यांचा लहानपणापासूनचा एक छंद होता तो म्हणजे चालणे. आपण नेहमी चालतो त्यापेक्षा जास्त चालत राहायचे हा त्यांचा प्रत्येक दिवसाचा नियम. बँकेची नोकरी सांभाळून हा छंद त्यांनी जोपासला. त्यामुळेच त्यांनी आपल्या चालण्याच्या छंदामध्ये विविध प्रयोग केले. ते सुट्टीच्या दिवशी घरातून पहाटे उठून चालण्यास सुरुवात करायचे आणि आसपासच्या दुसऱ्या शहरात पोहचल्याशिवाय चालणे थांबवायचे नाही हा त्यांचा आवडता प्रकार. त्यातून अनेकवेळा अंबरनाथ, बदलापूर, कधी भिवंडी, नवी मुंबई, वाशी अशी त्यांची महिन्यातून एक वारी होत असायची. सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतभ्रमण करायचे असे त्यांना सतत वाटत होते. मात्र हे शक्य होईल की नाही याची त्यांना कोणतीच कल्पना नव्हती. त्यासाठी काय तयारी करायला हवी, याची कल्पना नव्हती. कशाचेच नियोजन नव्हते. फक्त जबरदस्त इच्छा होती. तिचं निश्चयात रूपांतर झाल्यानंतर विद्याधर भुस्कुटे यांनी श्रीनगर गाठलं. तिथे त्यांची सून मेजर शुभदा नाईक भारतीय सैन्यदलात कार्यरत आहे. सुनेसमोर त्यांनी आपला निश्चय व्यक्त केला. भारतभ्रमण करताना भारत पाहावा, त्याचबरोबर समाजाबद्दलची आपली बांधीलकी म्हणून सामाजिक विषयांचा प्रचार, प्रसार आणि जागृती करायची असं त्यांनी ठरवलं होतं. हा प्रवास समाजासाठी शांतता, मानवता, पर्यावरण, खरे शिक्षण, स्त्री भ्रूणहत्या रोखा असा संदेश देणारा असेल असं त्यांनी ठरवलं होतं. त्यांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून ही मोहीम आखली होती. त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांच्या सुनेने तयारी करून देणं, माहिती मिळवून देणं असा मोठा पुढाकार घेतला.
सगळ्यात पहिला टप्पा होता भारतभ्रमणाचा मार्ग निश्चित करण्याचा. उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारा महामार्गाचा ‘नॉर्थ-साऊथ कॉरिडॉर’वरून प्रवासाचा मार्ग ठरवण्यात आला. हा सुमारे चार हजार किलोमीटरचा रस्ता असून देशातील महामार्गाना जोडण्याचे काम सुरू आहे. देशाच्या मध्यातून हा मार्ग जात असून याच महामार्गावरून प्रवास करण्याचे ठरले. शुभदा नाईक यांनी भुस्कुटे यांना गुगल अर्थवरून या महामार्गाची माहिती दिली होती. जम्मू काश्मीरमधील त्यांच्या निवासाची व्यवस्था भारतीय सैन्यदलाच्या शिबिरांमध्ये करण्याचे नियोजन होते. विद्याधर भुस्कुटे यांनी नोव्हेंबर २०१३ रोजी आपल्या भारतभ्रमणास श्रीनगर येथून सुरुवात केली. श्रीनगर-अवंतीपूर-अनंतनाग-खनाबल-बनिहाल-रामबन-गारमोंड-पटणीटॉप-उधमपूर-नगरोडा-जम्मू असा त्यांच्या प्रवासाचा पहिला टप्पा होता. या प्रवासात त्यांच्यासोबत केवळ चार चाकी गाडी, एक ड्रायव्हर आणि एक मदतनीस होते. श्रीनगरमधून सुरू झालेला हा प्रवास बर्फाळ प्रदेश, थंडी, धुक्याची चादर, खड्डे, डोंगर आणि उंच पुलांवरून होत गेला.

विश्रांतीसाठी वाहन…
१४० दिवस-रात्रींचा हा प्रवास होता, त्यात अनेक अडचणी होत्या. रात्रीचा निवारा, जेवणाची व्यवस्था हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्यांच्या पत्नी विंदा यांनी दुसऱ्या टप्प्याच्या प्रवासासाठी एका वाहन, एक आचारी आणि एक काळजीवाहू व्यक्तीची व्यवस्था या वाहनात केली होती. या वाहनावर विद्याधर भुस्कुटे यांची माहिती, त्यांच्या संपूर्ण मोहिमेची संकल्पना लिहिण्यात आली होती. हे वाहन जेवणाच्या आणि रात्रीच्या निवाऱ्याच्या ठिकाणी त्यांना भेटत असे त्या ठिकाणी ते विश्रांती करायचे. सकाळी पुन्हा हे वाहन पुढच्या मुक्कामी रवाना व्हायचे व त्यानंतर विद्याधर यांचा प्रवास सुरू व्हायचा. अनेक वेळा विद्याधर पहाटे चालण्यास सुरुवात करायचे, त्यामुळे वाहनाच्या अगोदरच ते पुढच्या विश्रांतीच्या ठिकाणी पोहोचलेले असायचे.

जम्मू काश्मीरचा प्रवास अनेक नव्या गोष्टी शिकवणारा होता. भारताच्या उत्तरेकडचा देशाचा शिरोमणी म्हणून उल्लेख केलेला. हे राज्य कमालीचे बदलत असल्याचे त्यांना जाणवत होते. घनदाट अरण्यातील
वृक्षतोड करून सपाट जमिनीमध्ये त्याचे रूपांतर करण्याचे काम जोरात सुरू आहेत. रस्ते, लोहमार्ग, मोठे
पुलांची कामे मोठय़ा वेगाने सुरू असून निसर्गसंपन्न प्रदेश विकासाची आणि शहरीकरणाची झालर चढवत आहेत. जम्मू काश्मीरच्या डोंगर उतारांवर तेथील सौंदर्य, न्याहाळत स्थानिक मेंढपाळ लोकांशी संवाद साधत, जनजागृतीचे पत्रक वाटत त्यांनी प्रवास सुरू केला. तेथील मंडळी आपल्या कामात खूपच व्यग्र असायची. एखादी व्यक्ती जवळ येऊन अभिनंदन करायची, विचारपूस व्हायची आणि पुन्हा पुढचा प्रवास सुरू व्हायचा. त्यांच्या निवासाची व्यवस्था भारतीय सैन्यदलाच्या शिबिरात असल्याने तेथील अधिकाऱ्यांकडून सन्मानाने वागणूक मिळत होती. काही ठिकाणी इतक्या पहाटे प्रवास सुरू करू नका, अमूक भाग असुरक्षित आहे असे सांगितले जायचे, मात्र आपले काम चांगल्या ध्येयासाठी असल्यामुळे या ध्येयापासून विचलित न होता त्यांचा प्रवास सुरूच राहत होता. दिवसाला किमान ३० ते ३५ किलोमीटरचा प्रवास करायचाच असा त्यांचा दिनक्रम होता. श्रीनगर ते जम्मू आणि त्यानंतर जम्मू ते डबरा (ग्वाल्हेर) असा सुमारे १५२५ किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी पहिला टप्पा पूर्ण केला.

बालमजुरांसाठी काम करायचंय..
भुस्कुटे यांनी १२ राज्यांतून चालत जो देश पाहिला तो झपाटय़ाने बदलतो आहे, असं ते सांगतात. शहरीकरण वाढतं आहे. जंगलं भुईसपाट होत आहेत. बेरोजगारी सर्वत्र आहे. अनेक तरुणांनी भेटल्यानंतर आमच्या नोकरीसाठी काही तरी करा अशी आर्जव केली. तर धाबे, पेट्रोलपंप, गॅरेजेसमध्ये राबणारे बालमजूर पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. भविष्यात अशा कोवळ्या वयात राबणाऱ्या मुलांसाठी चांगला उपक्रम सुरू करायचा आहे, असे विद्याधर भुस्कुटे यांनी सांगितले.

पहिला टप्पा संपल्यानंतर भुस्कुटे यांनी चार दिवसांची विश्रांती घेत दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली. दुसऱ्या टप्प्याचा प्रवास सुमारे तीन हजार ६८५ किलोमीटरचा होता. शिवाय दुसऱ्या टप्प्यावर चालण्याचा वेग वाढवण्याचा निश्चय त्यांनी केला होता. दिवसाला ३० ते ३५ किमीचे अंतर वाढवून दिवसाला ३५ ते ४० किलोमीटर चालण्याचा वेग त्यांनी या टप्प्यात अवलंबला. उत्साह कमी झाल्यावर वेग कमी होईल असा डॉक्टरांचा समज होता. मात्र विद्याधर यांच्या बाबतीत हा समज खोटा ठरला. शेवटच्या टप्प्यावर त्यांनी वेग अधिकच वाढवला. मोठे महामार्ग, जंगल, डोंगर, दऱ्या, महाकाय नद्यांची पात्रं, छोटी गावं, मोठी महानगरं पार करत त्यांचा प्रवास सुरू होता. भुस्कुटे यांच्या या भारतभ्रमणाची माहिती विविध स्थानिक
वृत्तपत्र आणि माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचत असल्याने त्यांच्या प्रवासाचे स्वागत होत होते. टोलनाक्यांवरून टोलमुक्तपणे त्यांचा प्रवास होत होता; तर विविध राज्यांचे पोलीस सन्मानाने सॅल्यूट ठोकत होते. त्यामुळे या मोहिमेबद्दलचा भुस्कुटे यांच्या मनातील आत्मविश्वास कमालीचा वाढला. जागोजागी सत्कार होत होते. त्यावेळी गावात एखादा योगी आला आहे त्याप्रमाणे लोक श्रद्धेने जवळ येत होते. अनेकजण नकळतपणे चक्क नमस्कार करत होते. काही आपल्या संसारातील अडचणी सांगून त्या सोडवण्यासाठी प्रार्थना करण्याच्या विनंती करत होते. शाळेतील मुले, तरुण, वृद्ध सर्वानाच भुस्कुटेंच्या चालण्याचं कौतुक वाटत होतं. काही जण आग्रहाने घरी घेऊन जात पाहुणचार करत होते. एखाद्या दिवशी सलग गावं लागत होती तर काही ठिकाणी निर्मनुष्य जंगलं होती. मनात भीती नव्हती. फक्त हा प्रवास पूर्ण करायचा हे एक ध्येय समोर होते. प्रवासादरम्यान भेटणाऱ्या व्यक्ती हा ताण कमी करण्यास मदत करत होत्या. पाहुणचार हा भारतीयांचा गुण पदोपदी जाणवत होता. गरीब असो वा श्रीमंत, सर्व प्रकारचे लोक पाहुणचार करताना मात्र हातचं राखून ठेवत नसल्याचा अनुभव विद्याधर भुस्कुटे यांना येत होता.
चंबळच्या खोऱ्यातून प्रवास करताना तेथील गुंडांची दहशत भुस्कुटे यांच्या मनात होती. रात्री थांबणार तरी कुठे, असा प्रश्न पडला होता. त्याच वेळी महामार्गावरून एक दुचाकीस्वार दणकट देहाचा माणूस येताना भुस्कुटे यांना दिसला. त्याला थांबवून भुस्कुटे यांनी आपल्या यात्रेबद्दल सांगून राहण्यासाठी कुठे थांबता येईल का, असा प्रश्न केला. त्या वेळी त्या व्यक्तीने आपल्या घरी येण्याची विनंती करीत तुम्हाला कोणाला भिण्याची गरज नाही. कोणी आला तर कापून टाकू, असे उत्तर देत आपल्या घरी त्यांचा पाहुणचार केला. एका शहरामध्ये काही तरुणांची भेट भुस्कुटे यांच्याशी झाली. त्या वेळी त्यांनी घरी येण्याची विनंती केली.
मुख्य रस्त्यापासून हे घर पाच किलोमीटर लांब असल्याने त्या तरुणाने बाईकवरून घरी येण्याची विनंती केली, मात्र भुस्कुटे यांनी त्यास नकार देत चालत जात त्यांच्या घरी भेट दिली. भुस्कुटे यांच्या या वर्तनाचे त्यांना आश्चर्य वाटले. केवळ आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असल्यामुळेच आपण असे वागलो असे सांगितल्यानंतर त्याचे समाधान झाले.
चालतानाचा मार्ग सुखकर नक्कीच नव्हता. चालताना संघर्षसुद्धा मोठा होता. दुपारच्या उन्हाने जीव कासावीस व्हायचा, सोबतचे पाणी संपून जायचे. सोबतचे वाहनसुद्धा जवळपास नसायचे. अशा वेळी महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना थांबवून ते त्यांच्याकडून पाणी घ्यायचे. अभयारण्यातून हिंस्र प्राण्यांच्या भीतीमुळे खूप सावधपणे प्रवास करावा लागत होता. तामिळनाडूत पोलिसांचे सहकार्य मिळू शकले नाही, अन्यथा आपला बाकी प्रवास खूपच आनंददायी होता, असे भुस्कुटे सांगतात. १२ राज्यांतून प्रवास करीत २५ मार्च रोजी कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद केंद्रामध्ये विद्यार्थाच्या साक्षीने त्यांच्या या भ्रमंतीची सांगता झाली. विद्याधर भुस्कुटे यांच्या पत्नी विंदा, स्वामी विवेकानंद केंद्राचे भानुदासजी, दीपकजी, डोंबिवलीचे नंदनजी ही मंडळी विद्याधर यांच्या मोहीम समारोपाची साक्षीदार होती.