वारसा
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या आयएनएस विक्रांतचे संग्रहालय होणार नाही, ती भंगारात जाणार अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या युद्धनौकेशी जवळून संबंधित असलेल्या सगळ्यांचाच काळजाचा ठोका चुकला. वास्तविक विक्रांत म्हणजे आपला देदीप्यमान इतिहास, मूर्तिमंत शौर्याचं प्रतीक.. हे सगळं जपण्यासाठी पैसे नाहीत असं म्हणणं म्हणजे सरकारचा करंटेपणा नाही तर काय?
आयएनएस विक्रांत असे केवळ शब्द उच्चारले गेले तरी समस्त भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो. ती भारताची सर्वात पहिली विमानवाहू युद्धनौका होती म्हणून नव्हे तर तिने गाजवलेल्या पराक्रमामुळे. केवळ तिच्या पराक्रमाच्या बळावर १९७१ सालच्या युद्धात पाकिस्तानला नामोहरम करत कमीत कमी वेळेत युद्ध जिंकणे शक्य झाले. अन्यथाही युद्धजिंकले असते, पण त्याला वेळ लागला असता.. एक विमानवाहू युद्धनौका युद्धातील पारडे झुकवू शकते, याचा प्रत्यय केवळ भारताने नव्हे तर जगाने घेतला. जगाच्या युद्धेतिहासात एक महत्त्वाची नोंद विक्रांतच्या नावावर आहे. या एका विमानवाहू युद्धनौकेच्या बळावर भारताने हिंदूी महासागर आणि अरबी समुद्रावर आपले सामथ्र्य अबाधित राखले. अगदी चिनी नौदलाचीही त्या वेळेस धमक नव्हती आपल्याकडे वाकडय़ा नजरेने पाहण्याची. अर्थात त्यासाठी कारणही तसेच असते. अलीकडच्या युद्धांमध्ये सर्वाधिक प्रभावी ठरले ते हवाई दल. शत्रूच्या प्रदेशात शिरून त्याची महत्त्वाची ठाणी उद्ध्वस्त करून त्याचा कणा मोडण्याचे सामथ्र्य हवाई दलामध्ये असते. आणि मग कणा मोडलेला शत्रू फार काळ तग  धरू शकत नाही, असे आपल्याला इतिहास सांगतो. १९७१च्या युद्धात बांगलादेशाचा कणा मोडण्याचे काम आयएनएस विक्रांतने केले.
विमानवाहू युद्धनौका म्हणजे काय आणि त्याचा किती फायदा होतो, याचा अनुभव त्या वेळेस पुन्हा एकदा साऱ्या जगाने घेतला. विमानवाहू युद्धनौकेस मूिव्हग बॅटलफील्ड म्हणजेच चालतीफिरती युद्धभूमी म्हटले जाते. एरवी लढाऊ विमानांना उडायचे तर धावपट्टी हवी. विक्रांतवर अशी धावपट्टी तयारच होती. त्यामुळे पूर्व पाकिस्तान आणि आताच्या बांगलादेशाच्या नजीक जाऊन भारतीय लढाऊ विमानांना मारा करता आला. चितगाँग बेचिराख करण्याचे सारे यश आयएनएस विक्रांतवरून केलेल्या कारवाईला जाते. अखेरीस नाक मुठीत धरून पाकिस्तानला हार मान्य करावी लागली. त्यामुळे विक्रांत असे शब्द उच्चारताच हा सर्व इतिहास समस्त भारतीयांना आठवतो. पण आता एक वेगळा इतिहास रचला जातोय तो आहे महाराष्ट्र सरकारच्या कपाळकरंटेपणाचा. यापुढच्या काळात विक्रांतच्या युद्धकामगिरीबरोबर महाराष्ट्राचा कर्मदरिद्रीपणाही आठवेल.
भारतीयांचा अभिमानिबदू असलेली आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका ३१ जानेवारी १९९७ साली भारतीय नौदलातून सन्मानाने निवृत्त झाली. आजही तो दिवस आठवतो. त्या समारंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले होते. त्याहीपूर्वी आयएनएस विक्रांतवर झालेल्या पत्रकार परिषदांना उपस्थिती लावली होती. एकदा युद्ध कवायतींदरम्यान संरक्षणमंत्र्यांसोबत आयएनएस विक्रांतवरून जाण्याची संधीही मिळाली. त्या वेळेस आयएनएस विराट ही दुसरी युद्धनौकाही होती. पण तमाम भारतीयांना अप्रूप होते ते मात्र विक्रांतचे. अर्थात तिच्या गौरवशाली इतिहासामुळे ते तसे साहजिकही होते. केवळ गुण असण्यापेक्षा ते कर्तृत्वाने सिद्ध करणाऱ्याचे अप्रूप समाजाला अधिक असते.
युद्धनौका किंवा पाणबुडय़ांचा नौदलातील समावेश हा पहाटेच्या पहिल्या सूर्यकिरणांबरोबर होतो तर निवृत्ती ही सायंकाळच्या मावळतीच्या किरणांसमवेत. निवृत्तीच्या दिवशी विक्रांत नानाविध रंगांच्या पताकांनी सजविण्यात आली होती. विक्रांतवरचे अनेक माजी अधिकारी खास त्या सोहळ्यासाठी उपस्थित होते. सर्वानीच त्यांच्या मुलाखतींमध्ये भावपूर्णता व्यक्त केली होती. आपल्याच घरातील कुणी तरी दूर निघून जावा, त्या वेळेस उफाळून येणाऱ्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर होत्या आणि डोळ्यांतून वाहत होत्या. अनेकांनी खाली बसून डोके टेकत विक्रांतच्या डेकचे चुंबन घेतले होते. सर्वासाठीच तो दिवस भावनेने ओथंबलेला होता. सूर्य अस्ताला गेल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत अनेक माजी-आजी अधिकारी विक्रांतवर रेंगाळत होते. आजवर अनेक युद्धनौका आणि पाणबुडय़ांच्या निवृत्तीचा सोहळा अनुभवण्याचे भाग्य लाभले. मात्र या सर्वामध्ये आयएनएस विक्रांतचा निवृत्तिसोहळा वेगळा होता तो कायमस्वरूपी मनात कोरला गेला.
आजी-माजी अधिकाऱ्यांनी खूप भावनिक होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण होते. एरवी कोणतीही युद्धनौका निवृत्त झाली की, प्रथम तिच्यावर असलेली आणि वापरता येण्याजोगी यंत्रणा किंवा सामुग्री काढून घेतात आणि त्यानंतर तिचा प्रवास सुरू होतो तो भंगार गोदीच्या दिशेने. तिथे ती मोडून सर्व भाग भंगारात विकले जातात. विक्रांतचा प्रवासही असाच भंगार गोदीच्या दिशेने व्हायचा होता. ज्या युद्धनौकेच्या बळावर देशाला महत्त्वपूर्ण  विजय प्राप्त करून दिला ती भंगारात जाण्याचे शल्य होते अनेकांच्या मनात. ते त्यांनी मुलाखतींमधून व्यक्तही केले होते. पण हे शल्य काही केवळ त्यांच्याच मनात नव्हते तर जनमानसातही असाच सूर व्यक्त झाला होता. म्हणूनच विक्रांत भंगारात न काढता तिच्यावर युद्धसंग्रहालय थाटण्यात यावे, अशी जनतेतून मागणी होऊ लागली. त्या वेळेस महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या सेना- भाजपा सरकारनेही जनतेची मागणी लावून धरण्याचे ठरविले आणि या युद्धनौकेचे रूपांतर संग्रहालयात करण्यासाठी केंद्र सरकारला साकडे घातले.
केंद्र सरकारनेही त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे ठरवून त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सíव्हसेसकडून शक्याशक्यता अहवाल मागविला. २००० साली सप्टेंबर महिन्यात टीसीएसकडून सकारात्मक अहवाल आल्यानंतर या संग्रहालयाच्या संदर्भात ठोस निर्णय घेण्यात आला.
कुटुंबातील ज्येष्ठ किंवा वयोवृद्ध व्यक्तीची घेतली जाते तशीच भारतीय नौदल विक्रांतची काळजी घेत होते ते अगदी कालपरवापर्यंत. ‘ती भंगारगोदीत जाईपर्यंत तिची काळजी घेणार, आम्ही तिचे कृतघ्न नाही. तिचे ऋण आम्ही मान्य करतो’ असे अगदी या विमानवाहू युद्धनौकेवरून अखेरचे विमानोड्डाण करणारे आणि सध्या नौदलाच्या पश्चिम विभागीय मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल शेखर सिन्हा अगदी अलीकडे म्हणाले. यातूनच नौदलाची विक्रांतविषयी असलेली आत्मीयता सिद्ध होते.
२००० साली विक्रांतचे संग्रहालय करण्याचा निर्णय झाला त्याही वेळेस इतर कार्यात्मक बाबींसाठी आलेले पसे नौदलाला विक्रांतवर खर्च करावे लागत होते. कारण एकदा एखादी युद्धनौका किंवा पाणबुडी निवृत्त झाली की, तिच्यावर केला जाणारा अर्थसंकल्पीय खर्च पूर्णपणे थांबतो.. २००० सालीच विक्रांतच्या तळाखाली असलेला भाग गंजून गळती सुरू झाली होती. तसे झाल्यास टायगर गेटजवळच या युद्धनौकेला जलसमाधी मिळण्याची शक्यता होती. राज्य सरकारने किमान त्याच्या देखभालीचा खर्च उचलणे अपेक्षित होते. मात्र पुढे पानच हलत नव्हते. अखेरीस समाजातील काही मान्यवरांनी या संदर्भात शिवसेनाप्रमुखांना साकडे घातले. त्यात डॉ. नीतू मांडके यांचा समावेश होता. ‘विक्रांत बचाव’ आंदोलनाला तेव्हा सुरुवात झाली होती. मग ‘लोकसत्ता’मधील बातमी पाहून त्यांनी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह विक्रांतला भेट दिली आणि महाराष्ट्रासाठी अभिमानिबदू असलेली विक्रांत भंगारात जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. बाळासाहेब म्हणाले, विक्रांतचे युद्धस्मारक करणार. अखेरीस सत्तेत असलेल्या सेना- भाजपा सरकारने त्याच्या देखभालीसाठी भारतीय नौदलास पाच कोटी रुपये देऊ केले.
दरम्यानच्या काळात वाद झाला तो हे विक्रांतवरील म्युझियम नेमके करायचे कुठे यावर. म्हणजे विक्रांत आजवर होती ती टायगर गेटजवळच्या नौदलाच्या धक्क्यावर. (अर्थात आजही ती तिथेच उभी आहे) पण कायमस्वरूप देताना तिच्यासाठी एक जागा निश्वित करणे गरजेचे होते. आर्थर बंदर, रेडिओ क्लब अशा जागा सुरुवातीस ठरविण्यात आल्या, मात्र कोळी बांधवांनी केलेल्या विरोधामुळे त्याचा पुनर्वचिार करण्यात आला आणि अखेरीस ऑयस्टर रॉक या ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली. इथे आणल्यानंतर विक्रांतच्या आजूबाजूने बांध घालून आतील पाणी काढून टाकण्यात येईल, त्यानंतर तिथे खाली सिमेंटचा चौथरा बांधला जाईल. त्यामुळे भविष्यात तळाचा पत्रा गंजणे अथवा लाटांनी युद्धनौका हलणे असा प्रश्नच उद्भवणार नाही. त्यानंतर समुद्रातून तिथपर्यंत जाण्यासाठी एक रस्ता तयार करण्यात येईल, त्याच्या बांधकामाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली. संरक्षण मंत्रालयाने विक्रांत ही युद्धनौका महाराष्ट्र शासनास संग्रहालयासाठी भेट म्हणून देण्याचे निश्चित केले. अटलबिहारी वाजपेयी सरकारने केंद्राच्या वतीने विक्रांतची किंमत तर माफ केलीच शिवाय संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस यांनी संग्रहालयासाठी ४८ कोटी रुपयेही दिले. त्या वेळेस संग्रहालयाच्या उभारणीसाठी केवळ ७५ कोटी रुपये लागणार होते. आता तीच किंमत ५५० कोटींपर्यंत गेली आहे. आणि आता कपाळकरंटे राज्य शासन म्हणते आहे, किंमत वाढली आम्हाला जमणार नाही ! याला नाकर्त्यांचा कपाळकरंटेपणा म्हणणार नाहीतर काय?
ही युद्धनौका हे सारे वाद होईस्तोवर टायगर गेट जवळच्याच नौदलाच्या धक्क्यावर राहिल्याने इतर युद्धनौकांना वापरण्यासाठी ती जागा पूर्णपणे बंद झाली. तिचा काहीतरी वापर होणे गरजेचे होते. त्यामुळे अखेरीस नौदलानेच त्यावर छोटेखानी संग्रहालय थाटण्याचा निर्णय घेतला आणि कामास सुरुवातही केली. अखेरीस २००१ सालच्या नौदल सप्ताहादरम्यान तिचे आयएमएस (इंडियन म्युझियम शिप) विक्रांत असे नामकरण करून हे संग्रहालय नौदलाने जनतेसाठी खुले केले. त्याच्या पहिल्या टप्प्यातच या संग्रहालयाला मिळालेला जनतेचा प्रतिसाद केवळ अभूतपूर्व असा होता. या प्रतिसादामुळे नौदलाचा उत्साह आणखी वाढला. मग हळूहळू नौदलाने या संग्रहालयाच्या आकर्षणात भर घालण्याचेच काम केले. दोन वर्षांनी त्यांनी या कायमस्वरूपी प्रदर्शनात भारत-पाक युद्धाचे लाइव्ह देखावेही उभारले.
अगदी दोन वर्षांपर्यंत उन्हाळी किंवा दिवाळीच्या सुट्टय़ा सुरू झाल्या की, वर्तमानपत्रांतील दूरध्वनी खणखणू लागायचे आणि विक्रांतवरील संग्रहालय खुले आहे काय, याची चौकशी केली जायची. कच्च्याबच्च्यांनाच नव्हे तर अगदी मोठय़ांनाही या संग्रहालयाचे भारी आकर्षण होते. केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर अगदी अरुणाचल प्रदेश, केरळ आणि जम्मू- काश्मीरमधूनही नागरिक विक्रांत पाहण्यासाठी यायचे. विक्रांत पाहण्यासाठी आलेल्यांची खूप मोठी रांग टायगर गेटबाहेर पाहायला मिळायची. त्या भल्या मोठय़ा रांगेचेही कोण कौतुक, त्याचेही फोटो वर्तमानपत्रांत प्रसिद्ध व्हायचे.  
विक्रांतमध्ये असे काय होते की, ज्यासाठी लोक गर्दी करायचे? या आकर्षणाचे मूळ नौदलाच्या कार्यपद्धतीमध्ये दडलेले आहे. लष्कराविषयी लोकांना माहिती असते, कारण लष्करातील जवान काम करताना पाहायला मिळतात. मात्र नौदलाच्या बाबतीत असे होत नाही. नौदलातील नौसनिक व अधिकारी यांचे काम समुद्रावर भूभागापासून दूर चालते, ते लोकांना पाहायला मिळत नाही. शिवाय इतरत्र कुठेही आपण मनात आल्यानंतर भेट देऊ शकतो तशी भेट युद्धनौकांना देता येत नाही. भेट तर दूरच अनेकदा त्या सामान्यांना दुरून पाहायलाही मिळत नाही. त्यामुळे युद्धनौकांच्या भेटीचे वेगळे आकर्षण नागरिकांच्या मनात असते. त्यातही विक्रांतच्या बाबतीत आणखीनही वेगळेपण आहे. एक तर ही आकाराने सर्वात मोठी युद्धनौका. तीदेखील विमानवाहू युद्धनौका. या नौकेवरून विमाने कोणती आणि कशी उडतात इथपासून ते विमाने ठेवतात कुठे इथपर्यंतचे अनेक प्रश्न पाहायला येणाऱ्यांना पडलेले असायचे.
मोठय़ा युद्धनौकेच्या भल्या मोठय़ा नांगरापासून ते विमानांना वर घेऊन जाणाऱ्या अजस्र लिफ्टपर्यंत सारे पाहता यायचे, अनुभवता यायचे. या लिफ्टवरून एकाच वेळेस दीडशे ते दोनशे जण वरच्या बाजूस फ्लाइट डेकवर म्हणजेच धावपट्टीवर जाऊ शकतात. ही लिफ्ट वर जाण्याची पद्धती, नौसनिकांकडून ही लिफ्ट वर जाताना घेतली जाणारी काळजी हे सारे पाहून सामान्य नागरिक अनेकदा थक्क झालेले दिसायचे. युद्धनौकेमध्ये नौसनिक राहतात कसे, त्यांचे जेवण कुठे व कसे केले जाते, त्यांचा गणवेश कसा असतो, कॅप्टनची केबिन किती छोटेखानी असते, विमानांचे नियंत्रण कसे केले जाते, त्याचा नियंत्रण कक्ष कसा असतो, युद्धनौका कशी चालवली जाते असे असंख्य प्रश्न पाहणाऱ्यांच्या मनात असायचे. एक एक विभाग पाहत आपण पुढे जायचो तसतशी त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळायची आणि काही नवे प्रश्नही पडायचे. सोबत नौदल अधिकारी असायचे मग ते माहिती आणि प्रश्नांची उत्तरे द्यायचे.
 तब्बल ७०० फूट लांबीची ही युद्धनौका अर्थात त्यावरील संग्रहालय व्यवस्थित पाहण्यासाठी सुमारे दोन ते अडीच तास लागायचे. त्या काळात आपण काही किलोमीटर्स चाललेले असायचो. केवळ चालणेच नव्हे तर सुमारे तीन मजले आपण वर-खाली चढले आणि उतरलेलेही असायचो. तेवढय़ानेच आपण घामाघूम होऊन पाय थकायचे. तर या नौकेवर प्रत्यक्ष काम करणाऱ्यांचे काय होत असेल या विचारात असतानाच विक्रांतवरील कॅफेटेरिया खुणावायला लागायचा. अनेकांना विक्रांतची ही भेट कायमस्वरूपी स्मरणात ठेवायची असायची , त्यासाठी इथे एक स्मृतिचिन्ह विक्री केंद्रही होते. त्यात टीशर्ट, कीचेन्स आदींची विक्री केली जात असे. मग बाहेर पडताना अनेक जण विक्रांतची कॅप मिरवत बाहेर पडायचे. विक्रांतच्या नौदलातील सन्माननीय निवृत्तीला आता तब्बल १६ वष्रे होत आली. राज्य शासनाकडून अक्षम्य विलंब झाला आहे.
आणि दुर्दैवी बाब म्हणजे विक्रांतबाबतही राज्य शासनाने हात झटकल्याने आता ती भंगारात जाणार याचे शल्य कायमस्वरूपी मनात राहील. यालाच बहुधा म्हणतात दैवं देतं नि कर्म नेतं!