स्वातंत्र्य म्हटल्यावर पहिला विचार येतो तो म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नसावे, तर ते सर्वसमावेशक असावे. ते सांस्कृतिक स्वातंत्र्यदेखील असायला हवे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य आणि त्याचा वापर हा प्रश्न उभा राहतो. ‘बळी तो कान पिळी’ अशी स्थिती होऊ  नये; पण दुर्दैवाने आज तशी परिस्थिती आहे. जो बळी आहे त्याला सारं काही विकत घेता येऊ  शकतं आणि दुर्दैवाने सारं काही विकाऊ  झालं आहे.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य असावं, पण त्याच्या नावाखाली स्वैराचार नसावा, विकृतीकरण नसावं. जे काही सांगायचंय ते समंजसपणे व्यवस्थित मांडता आले पाहिजे. स्वत: अनुभवलेलं, पाहिलेलं मांडायची ताकद त्यामध्ये हवी. पंतप्रधानांच्या चेहऱ्याचा मेमे करणे ही अभिव्यक्ती नाही होऊ  शकत.

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

एखाद्या अभिव्यक्तीबाबत ती आवडणारा आणि न आवडणारा असे दोन मतप्रवाह तयार होऊ  शकतात;. पण अर्थातच दोन्हीही समंजस असणे अपेक्षित आहेत. समाजमाध्यमांवरून हा समंजसपणा सोडून अभिव्यक्तीच्या नावे अनेक कार्यक्रम केले जातात. सर्वाना कळले पाहिजे असा अभिनिवेश त्यामध्ये असतो; पण कोणत्या टप्प्यावर काय समजावून द्यावे याचादेखील समंजसपणा अपेक्षित आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यामध्ये जात, धर्म यांना सर्वानी आपापल्या घरातच बंद करून ठेवायला हवे. तुम्ही समाज म्हणून एकत्रित आल्यानंतर तुमची एकच जात, एकच धर्म असला पाहिजे ती म्हणजे देश. त्याशिवाय जे काही असेल ते समाजामध्ये दुही निर्माण करणारेच ठरेल. श्रेष्ठ-कनिष्ठ अशा वर्गीकरणाची गरज नाही.

स्वातंत्र्याचा आपण समाजात कसा वापर करतो हे पाहताना दिसते की, समाज म्हणून आपण एकत्र आलेलो नाही. नाही तरी आपल्यामध्ये एक नागरी भान रुजले असते, आपण कचरा केला नसता, देश म्हणून आपली एक भावना तयार झाली असती, पण तसे होत नाही. याचाच अर्थ आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ पूर्ण उलगडलेला नाही.

दुसरीकडे समाजात ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांना तत्काळ कठोर उपाय, शिक्षा करायला हवी; पण तसे होत नाही. पूर्वी लाच घेतली तर बदनामीचं भय होतं. आत्ता लाच घेतली नाही तर त्याच्याकडेच मूर्ख म्हणून पाहिले जाते. स्वातंत्र्याचा आपण गैरवापर करतो. सिग्नल तोडतो आणि पाच-पन्नास रुपये देऊन सुटून जातो. यातून साधायचं काय? देशहिताचा भाग येतोच कुठे?

आपल्याकडे जे काही चांगले आहे त्याला ऊर्जितावस्था आणण्याची दुर्दैवाने आपली वृत्ती नाही. जे चांगले चालू आहे त्यात खोडा घालण्याचाच आपला विचार आहे. हे विदारकतेकडे नेणारे आहे. समाज म्हणून आपण सहसंवेदनशीलपणे विचार का करत नाही? एकीकडे वाया जाणारे अन्नधान्य आणि दुसरीकडे अन्नाची कमतरता. ही दरी मिटवण्यासाठी काय होते आपल्याकडे? म्हणूनच स्वातंत्र्याचा पुनर्विचार करावा लागेल.

स्वातंत्र्यानंतर ज्या लोकांना घटनेनुसार सुविधा दिल्या गेल्या त्या खरेच त्यांच्यापर्यंत पोहोचल्या का? की सुविधा दुसऱ्याच कोणी लाटल्या?  त्यावर कारवाई झाली का? याच्या उत्तरांमध्ये दु:खाचे पदरच अधिक दिसतात. आपण समाज म्हणून या सर्वाकडे कशा प्रकारे पाहतो, कशाचे अवडंबर माजवायाचे, आज एक देश म्हणून पाहताना माझा हा देश स्वतंत्र आहे, तर माझ्या बहिणीला फिरण्याचे स्वातंत्र्य असायला हवं. रात्रीदेखील तिला सुरक्षित फिरता आले पाहिजे, पण तसे होते का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. रस्त्यात एका मुलीचा खून होतो आणि लोक तिचे फोटो, व्हिडीओ काढण्यात मग्न असतात. हे माणूस म्हणून लांच्छनास्पद आहे. म्हणूनच एकंदरीतच स्वातंत्र्याचा विचार करायला हवा.

महापुरुषांच्या नावाखाली आपण निव्वळ धिंगाणा घालतो. त्यांच्या जयंतीला काही चांगले काम करण्याऐवजी आपण मिरवणुकांमधून केवळ साजरीकरणाचे स्वातंत्र्य उपभोगतो. स्वातंत्र्याचा गैरफायदा घेण्याचा हा प्रकार उद्वेगजनक आहे. त्यामुळे पुनर्विचार करण्याची गरज भासते. त्यामध्ये झुकते माप तरुण पिढीला द्यावे लागेल, कारण त्यांच्यामध्ये खरी ऊर्जा आहे.

मकरंद अनासपुरे

(शब्दांकन : सुहास जोशी)