पर्यटन विशेष
कोकणची भटकंती हा तसा काही आता नवीन प्रकार राहिला नाही. पण कोकणात सागरी किनारपट्टी मार्गाने चक्क रिक्षाने मांडवा ते सावंतवाडी प्रवास कोणी केला नसेल. न ठरवता सहज घडून गेलेली ही तीन चाकांची सफर म्हणूनच अविस्मरणीय ठरते.

दरवर्षी किमान ३०-४० दिवसांचा वेळ काढायचा आणि देश भटकायला जायचे हा गेल्या कित्येक वर्षांचा माझा परिपाठ. पण पर्यटन कंपनीच्या नियोजनानुसार धावतपळत साइटसीइंग करणे मला कधीच रुचले नाही. त्यामुळे दरवेळी एखादे राज्य निवडायचे, त्या संदर्भातील पुस्तकं आणायची, त्यांच्या अधिकृत पर्यटन महामंडळाचे ऑफिस गाठायचे आणि संपूर्ण भटकंतीचे नियोजन करायचे. त्यातूनच आज जवळपास ८० टक्के देश भटकून झाला आहे. कोकणात यापूर्वी दोन-चार दिवसांच्या सहली केल्या होत्या. पण सलग किनारपट्टी पाहिली नव्हती. सागरी किनारपट्टी मार्गाबद्दल ऐकले होते. २०१६ च्या नोव्हेंबरात ठरवले की कोकणात मोठय़ा भटकंतीला जायचे. माझे स्नेही आप्पाजी आपटे यांनी मला ‘साद सागराची’ ही किनारपट्टीच्या सहा जिल्ह्यंवरील पुस्तकं आणून दिली. ती वाचून काढली आणि प्रवासाची तयारी केली.

Additional fare EFT is being allowed for passengers traveling in reserved coaches on ordinary tickets
आरक्षित डब्यांत रेल्वेच्या कृपेने ‘साधारण’ प्रवाशांचा सुळसुळाट
pune ranks among the forgetful passengers
विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…
trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा

मी स्व:ला टुरिस्ट म्हणजे पर्यटक म्हणवून घेत नाही, तर मी ट्रॅव्हलर म्हणजे भटक्या प्रवासी आहे. त्यामुळे काय पाहायचे हे मी आधी ठरवलेले असते, पण कुठे राहायचे याचे कसलेही बुकिंग मी आधी करायच्या फंदात पडत नाही. धावतपळत एखादे ठिकाण पाहायचे आणि मुक्कामाचे ठिकाण गाठण्यासाठी पुन्हा धावाधाव करायची हे मला पटत नाही. वाटेत एखादे ठिकाण आवडलेच, नवीन काही समजलेच तर एखाद दिवस जास्त घालवावा वाटला तर बिनधास्त थांबायचे. या वेळी कोकण पाहायचा तर एसटीने प्रवास करू किंवा त्या त्या ठिकाणी स्थानिक खाजगी वाहन भाडय़ाने घेऊन पुढे जाऊ असा विचार होता. मुलगा मागे लागला होता की कार घेऊन जा, ड्रायव्हर सोबत घ्या. पण ते टाळून मी आणि माझी बायको दोघे निघालो. आधी आमचा बेत होता पुणे ते अलिबाग एसटीने प्रवास करून मग सासवणेहून टूर सुरू करण्याचा. पण बायकोच्या सल्ल्यानुसार आम्ही सुरुवात केली ती गेटवे ऑफ इंडियापासून.

गेटवेहून कॅटामरानने मांडव्याला दुपारचा पोहोचलो. सासवणेला रात्रीचा मुक्काम करायचा होता. आणि तोपर्यंत सायंकाळी तेथील संग्रहालय आणि स्थानिक स्थलदर्शन. त्यासाठी मांडवा जेटीवरूनच एक रिक्षा केली. हे सगळे फिरताना मी रिक्षावाल्याशी गप्पा मारत होतोच. त्याला सहजच विचारले की, उद्या मला किहीमला जायचे आहे, पण वाटेत थळ पाहायचे आहे, खांदेरीचा किल्लाही पाहायचा. त्यासाठी वेळ लागणार. तेवढा वेळ थांबावे लागेल. मांडव्याच्या त्या रिक्षावाल्याने होकार दिला आणि आमची रिक्षातून कोकण सफर खऱ्या अर्थाने सुरू झाली.

मांडवा ते किहीम प्रवास करेपर्यंत माझ्या डोक्यात पुढील प्रवासदेखील रिक्षानेच करेन याची कसलीही कल्पना नव्हती. किंबहुना रिक्षा इतक्या सुलभतेने उपलब्ध होईल याची खात्रीदेखील नव्हती. किहीमला जाताना लक्षात आले की रिक्षाचा प्रवास सोयीस्कर तर आहेच, पण त्याचबरोबर लाभदायीदेखील. कारण आम्ही जी रिक्षा घेतली होती त्या रिक्षावाल्याला खांदेरी किल्ल्यापर्यंत बोट घेऊन जाणाऱ्या माणसाची माहिती होती. त्याने त्याच्याशी फोन करून बोलणे केले होते. मुख्य रस्त्यापासून पाचेक किमी आत गेल्यावर आम्ही त्या बोटवाल्याकडे पोहोचलो. आता आम्ही दोघेच आणि बोट मोठी. संपूर्ण बोट केली तर किमान दोन-तीन हजार रुपये लागले असते. पण त्या बोटवाल्यानेच थोडा वेळ थांबायला सांगितले. त्या किल्ल्याशी संबंधित बीपीटीचे काही लोक तिकडे जाणार होते, त्यांच्याबरोबर आम्हाला नेले. खांदेरी पाहिला. किल्ला सुंदरच आहे पण तो बीच काही सुंदर नाही, त्यात परतीला ओहोटी होती, त्यामुळे बरेच अंतर चिखलातून यावे लागले. परत त्या गावात मासे सुकवण्याचे प्रमाण खूप. त्यामुळे बायको खूपच वैतागली, पण खांदेरीच्या प्रवासासाठी हे सहन करावे लागले.

सोबत रिक्षा असल्याने आमच्या नेहमीच्या दोन बॅगा रिक्षातच होत्या. रिक्षावाल्याबरोबर एक विश्वास निर्माण झाला होता. त्याने नंतर किहीमला सोडले. किहीमचा बीच सगळा खडकाळ. पण मला अलिबागपेक्षा इकडे राहून मग कुलाबा किल्ला, वर्सोली पाहायचे होते. त्यासाठी किहीमच्या हॉटेलमध्ये रिक्षा ठरवली. ओहोटीच्या वेळी अलिबाग बीचवरून टांग्याने जाऊन कुलाबा किल्ला पाहिला. येथे एक सागांयला हवे, अलिबागचा बीच खूपच स्वच्छ ठेवलाय तेथील लोकांनी.

दुसऱ्या दिवशी नागावला शित्रेवाडीला पोहोचलो. तिकडे मला िहगळुजा मंदिर, बिर्ला मंदिर पाहायचे होते. माझ्या वाचनातून मी जेथे जेथे लोकेशन भन्नाट आहे अशी मंदिरे शोधून ठेवली होती. िहगळुजा टेकडीवरचे मंदिर. आम्ही वर गेलो, पण मंदिराची निगा मात्र राखलेली नव्हती. खूपच वाईट हालत होती. मात्र बिर्ला मंदिर एकदम उत्तम होते. तिकडून मला कोर्लई किल्ला पाहायचा होता. पण किल्ल्याची वाट गावातून जाते आणि त्या वाटेवर सगळीकडे मासे सुकवायला ठेवलेले असतात, त्यामुळे जाता येत नाही असे कळले. मग तो प्लान रद्द केला आणि परत आलो.

शित्रेवाडीला हॉटेलच्या मॅनेजरला आमचा पुढचा प्लान सांगितला तर तो स्वत:च त्याची कार काढून आम्हाला रिक्षा स्टॅण्डपर्यंत सोडायला आला. त्या दिवशी एसटीचा काही तरी गोंधळ होता, पण आम्हाला रिक्षा मिळाली. काशिदला एका रिसॉर्टमध्ये मुक्काम केला. येथे फार भटकंती नव्हती. येथून पुढे मुरुडला जायचे होते, पण वाटेत मला फणसाड अभयारण्यदेखील पाहायचे होते. जंगल भटकंती, पक्षीनिरीक्षण ही माझी आवड. त्यामुळे नेहमीच्या पर्यटनस्थळांपासून जरा वेगळेच काही तरी करणे आवडते. आमचा रिक्षावाला त्याच भागातला असूनही फणसाड अभयारण्यात आला नव्हता. मग तोदेखील आमच्याबरोबर फणसाड फिरला. रिक्षावाल्यांशी अशी दोस्ती झाल्यामुळे ते चांगले हॉटेल, होम स्टे दाखवायचे. मुरुडच्या अलीकडेच जेथून थोडासा घाट उतरून आपण मुरुडमध्ये जातो त्या घाटाच्या बाजूलाच एक हॉटेल त्या रिक्षावाल्याने सुचवले. या हॉटेलच्या खिडकीतून संपूर्ण मुरुड बीच दिसतो. सायंकाळी समुद्रावर भटकंती आणि दुसऱ्या दिवशी मुरुड किल्ला वगरे पाहून घेतले.

आता आम्हाला जायचे होते दिवेआगारला. एक तर राजापुरीवरून रस्त्याने जाता आले असते किंवा मग खाडी पार करून बोटीने दिघीला जायचे. किनारपट्टीच्या प्रवासात हा एक चांगला फायदा होता. खाडीतून छोटय़ा बोटीतून किंवा लाँचने गेले की खूप मोठा फेरफटका वाचतो. हे सगळे आधीच्या रिक्षावाल्यानेच सांगितले आणि दुसऱ्या दिवशी तो बोटीपर्यंत सोडायलादेखील आला.

बोटीतून उतरलो ते दिघीला. येथून लगेच दिवेआगारला जायचे नव्हते. त्यापूर्वी मला नानावलीचे लाइट हाऊस पाहायचे होते. तेथे काही रिक्षा वगरे मिळाली नाही. मग जवळच्याच एका दुकानात चौकशी केली. आमची एकंदरीत भटकंती ऐकून तो दुकानदार त्याची नॅनो घेऊन आम्हाला नानावलीला दाखवायला आला. या प्रवासातील अतिशय सुंदर लाइट हाऊस होते ते. फोटो काढायला परवानगी नव्हती. पण आतून पाहता येते. त्यासाठी पॅन किंवा आधारकार्ड गरजेचे आहे. तो सारा परिसरच एकदम भन्नाट आहे. ते पाहून त्यानेच आम्हाला दिवेआगारच्या एमटीडीसी रिसॉर्टला सोडले.

आम्ही या प्रवासात कसलेच अ‍ॅडव्हान्स बुकिंग केलेले नव्हते. एक तर आम्ही फिरत होतो तो सीझन दिवाळीनंतरचा होता, सुट्टय़ा संपल्या होत्या आणि त्यातच निश्चलनीकरणानंतर एकूणच हॉटेल्स शांत होती. पण आम्ही कायमच अशा ऑफ सीझनला फिरत असतो. परिणामी कोणत्याही रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये चालून येणारे गिऱ्हाईक म्हणजे राजाच असतो. तर दिवेआगारचे लोकेशन खूपच सुंदर, भन्नाट आहे. उत्तम अ‍ॅम्बिअन्स, लश ग्रीन म्हणावा असा परिसर आहे तो. सकाळी उठल्यावर समुद्रकिनाऱ्याला समांतर जाणारा एक रस्ता आहे. त्यावरून फिरताना पक्ष्यांचे इतके आवाज ऐकायला येतात की सगळे जग विसरून जाते. कायमस्वरूपी लक्षात राहावा असा हा अनुभव होता.

पुढचा टप्पा होता श्रीवर्धन. पण वाटेत पाहण्यासारखे खूप काही होते. दिवेआगार ते श्रीवर्धन रूट काय भन्नाट आहे. या सागरी किनारपट्टी मार्गाने फिरताना परदेशात फिरतोय असेच वाटत राहते. श्रीवर्धनच्या वाटेवर मुंबई बॉम्बस्फोटातील स्फोटके उतरवली ते शेखाडी लागते. ती पाहिली. मध्यंतरी सावित्री नदीच्या पुरात वाहून गेलेली एसटी येऊन अडकली होती ते ठिकाणही रिक्षावाल्याने दाखवले. रिक्षाच्या प्रवासामुळे ही ठिकाणे सहज समजत होती. वाटेत हवे तेथे थांबून फोटोग्राफी करता येत होती. श्रीवर्धनला आम्हाला एक होम स्टे मिळाला. उत्तम व्यवस्था होती. श्रीवर्धनचा बीचदेखील चांगला मेन्टेन केला आहे.

दुसऱ्या दिवशी हरिहरेश्वरला जायचे होते. साइट सीइंगसाठी जो रिक्षावाला होता तोच सोबत आला. तेथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. पण आम्हाला जरा उंचावरचे एक रिसॉर्ट रिक्षावाल्याने दाखवले. तेथील मॅनेजरबरोबर गप्पा मारताना आमची रिक्षा सफर ऐकून तो चाटच पडला. त्याने मग खूप मदत केली.

हरिहरेश्वराची मोठी प्रदक्षिणा मला करायची होती. वाटेवरील रॉकी पॅचेस, त्यांच्या विविधांगी रचना हे सारेच विलोभनीय होते. त्यानंतर मग अगस्ती गुहा. डोंगरातील ही गुहा, त्याची ती दगडाधोंडय़ातून जाणारी वाट, तेथे वाहणारे पाणी सगळेच नयनरम्य होते. या ठिकाणी एकही पर्यटक येत नाही.

नंतर आम्हाला केळशीला जायचे होते. तर रिसॉर्ट मॅनेजरनेच त्यांच्या जीपने आम्हाला बाणकोट खाडीपर्यंत सोडले. बोटीतून खाडी पार केली. बोटीवर एक मुसलमान गृहस्थ त्यांच्या कुटुंबीयांना बाणकोटला लग्नासाठी घेऊन जात होते. त्यांच्याकडे मारुती व्हॅन होती. आम्ही सहज गप्पा मारत होतो. तर ते म्हणाले की बाणकोटला उतरल्यावर मी यांना सोडून येतो, मग तुम्हाला पुढे नेऊन सोडतो. आता रिक्षेच्या जागी मारुती व्हॅन आली. बाणकोटचा किल्ला, मस्जिद पाहिली. परिसराचा सुंदर नजारा तेथे पाहायला मिळतो. नंतर वेळासला गेलो. अतिशय शांत सुंदर अशी ही जागा आहे. तेथे मुक्काम करायलाही हरकत नाही. पण आम्ही मुक्कामाला केळशीला गेलो. खाडी पार करून केळशीत उतरल्यावर समोर कोणी माणूसच दिसेना, ना कोणी रिक्षावाला. जवळच एक होम स्टे होते, पण ते हाऊसफुल्ल झाले होते. मग अर्धा किमीवर एक दुकान दिसले. तिकडे रिक्षावाल्याची चौकशी केली. त्या बाईचा नवराच रिक्षावाला होता. तो लगेच आला. एक चांगला होम स्टे त्याने शोधून दिला. दुसऱ्या दिवशी केळशीचा याकुब बाबा दर्गा पाहिला. आणि आंजल्रेला जायला निघालो. रिक्षावाला तोच. फक्त वाटेत मला सुवर्णदुर्ग पाहायचा होता. तेवढा वेळ त्याला थांबायला लागणार होते. सुवर्णदुर्गला नाव लगेच मिळाली. ते पाहून मग आंजल्रे गाठले.

आंजल्रेला होम स्टे घेतला. ठरवून जागा घ्यावी असे ते ठिकाण होते. खोलीच्या बाहेर मस्त मोठी गच्ची आणि त्यापलीकडे अथांग समुद्र. पावसाळ्यात येथे काय भन्नाट मजा येत असेल या कल्पनेनेच मला आनंद झाला. सूर्यास्ताला कडय़ावरच्या गणपतीला गेलो. ते लोकेशनदेखील अप्रतिम असे आहे. आम्ही मंदिरात अगदी बिनधास्त फिरायचो. आम्ही बोहरी. बायको बोहरी परिवेशात असायची. लोक दोन मिनिटे आमच्याकडे पाहायचे, पण कधी त्याचा त्रास झाला नाही.

दुसऱ्या दिवशी कर्दे मुक्कामी जायचे होते. त्यापूर्वी मुरुडच्या बीचला जाऊन आलो. कर्देला समुद्राकडे उघडणाऱ्या खिडक्या असणारी खोली मिळाली. संध्याकाळ खूप छान गेली. हर्णेला जाऊन मी ताजी कोळंबी आणली आणि हॉटेलमध्ये दिली. झक्कास जेवण झाले. पुढचा लाडघराचा मुक्कामदेखील अशाच सुंदर हॉटेलमध्ये होता. शांतपणे सरणारी संध्याकाळ असेल तर प्रवासात एक वेगळाच आनंद मिळतो. असा आनंद या दोन्ही ठिकाणी होता. नंतर कोळथरे येथे एका रिसॉर्टला गेलो तर ते अख्खं रिसॉर्ट रिकामं होतं. झाडांच्या मध्ये असलेली कॉटेजेस, त्यामुळे रात्री भणाणणारं वारं वाहू लागलं. त्या वाऱ्याच्या आवाजाने भीतीच वाटली.

दुसऱ्या दिवशी मला दाभोळला राहायचं होतं आणि वसिष्ठी नदीत बोटिंगही करायचे होते. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक अण्णा शिरगावकरांना भेटायचे होते. खाडी पार करून दाभोळात आलो. अण्णांना भेटलो. आमची भटकंती ऐकून अण्णा चाट पडले. दाभोळला तसे अजून पर्यटनासाठी विकसित झालेले नाही. पण येथील लोक चांगले आहेत. अण्णांनी एक बोटवाला मिळवून दिला. दुसऱ्या दिवशी चार-पाच तासांचे बोटिंग. वसिष्ठीच्या प्रवाहात पक्ष्यांचे आवाज अगदी स्पष्ट येत होते. तो बोट प्रवास इतका सुंदर होता की वेळ असता तर तशीच बोट घेऊन मी चिपळूणलादेखील गेलो असतो. तो बोट प्रवास आवरता घेतला.

दुसऱ्या दिवशी त्या बोटवाल्याने खाडी पार करून वेलदूरला सोडले. सुदैवाने रिक्षा मिळाली. आम्हाला वाटेत गोपाळगड आणि तारकेश्वरचे लाइटहाऊस पाहून मग पुढे जायचे होते. रिक्षावाला तयार झाला. हे दोन्ही स्पॉट अतिशय सुंदर आहेत. गुहागरला आम्ही सी फेसिंग जागा शोधत होतो. एक रिसॉर्ट मिळाले. त्यांच्या काही कॉटेजेस मूळ हॉटेलपासून अध्र्या किमीवर होत्या. रात्री जेवायला हॉटेलमध्ये येऊन परत जाताना त्या किर्र अंधाऱ्या वाटेवर एक मिणमिणता टॉर्च घेऊन आम्ही चालत जायचो. भीती वाटली, पण तेथे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. गुहागरला मासे चांगले मिळतात. पण हॉटेलचालक हे शक्यतो ज्या दिवशी माशांचा दर कमी असतो तेव्हा ते विकत घेऊन डीप फ्रिजमध्ये ठेवतात. मग मीच बाजारात जाऊन मस्त मासे आणले. हॉटेलमालकाने त्यात अजिबात काही काढून न घेता झक्कास जेवण तयार केले.

पुढचा मुक्काम होता वेळणेश्वर. अर्थातच एमटीडीसी. संध्याकाळी बीचवर भटकून आलो. खरी मजा दुसऱ्या दिवशी सकाळी होती. थेट समुद्राकडे तोंड असणाऱ्या बाल्कनीत मी बसलो होतो आणि समोर समुद्रात डॉल्फिनचा खेळ ऐन रंगात आला होता. अगदी हवेत उंच उडय़ा मारणारे डॉल्फिन मनसोक्त पाहायला मिळत होते. अनेकदा लोक बोटी घेऊन डॉल्फिनसाठी समुद्रात चकरा मारत असतात. पण येथे मी बसल्याजागीच हा आनंद घेऊ शकलो.

दुसऱ्या दिवशी हेदवीला गेलो. रिसॉर्टमध्येच रिक्षा मिळाली. हेदवीचे लोकेशनही छान आहे. मला तिकडे बोटिंग करायचे होते. जोगळेकर हा खूपच चांगला माणूस, त्यांनी सर्व व्यवस्था केली. रोहिले आणि तवसाळचे वर्णन पुस्तकात खूप छान असे केलेय, पण प्रत्यक्षात ते काही इतके छान नाही. येथे शास्त्री नदीत बोटींग केले. तवसाळहून रिक्षाने जयगडला गेलो. जयगड आणि तेथील लाइट हाऊस पाहून मुक्कामाला गणपतीपुळे गाठले.

गणपतीपुळे हे तसे गर्दीचे ठिकाण. पण त्या बीचवरील स्वच्छता पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी वाचलेल्या पुस्तकानुसार गणेशगुळे आणि आंबोळगडपर्यंत सगळीकडे राहण्यासाठी भक्त निवासाचे पर्याय दिले होते. पण गणपतीपुळेच्या हॉटेलमध्ये मला रत्नागिरी, गणेशगुळेचे चांगले पर्याय मिळाले. रत्नागिरीला थिबा पॅलेसजवळच एका मुंबईच्या पारशाचे हॉटेल आहे. तिकडेच मुक्काम केला. किल्ला, लाइट हाऊस पाहिले. तिकडून मग हाथिस पाहायला रिक्षाने गेलो. हा रस्ता खूप सुंदर आहे. हिरवाईने नटलेला घाटाचा रस्ता. हाथिसला दर्गा आणि दत्त मंदिर पाहायचे होते. दत्त मंदिराला बोटीने जाता येते. पण सध्या ती सोय राहिलेली नाही. जवळच पानवळचा कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल पाहायला गेलो. वर चढून पाहिले. खालून फोटो काढले. आम्ही गेलो तेव्हा रेल्वेही दौडत गेली. विशेष म्हणजे रिक्षावाल्यानेही हे पाहिले नव्हते. त्यामुळे तोही बरोबर आला. पूर्वी येथे जायला कच्चा रस्ता होता असे लिहिले आहे, पण आता चांगली वाट झाली आहे.

दुसऱ्या दिवशी गणेशगुळेच्या वाटेवर पावसला जाऊन मग पुढे गेलो. गणेशगुळेचे रिसॉर्ट अत्यंत रमणीय आहे. तिकडे एक ट्री हाऊस आहे. आणि त्याचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग वगरे नसते. त्यातच आम्ही ऑफ सीझनला होतो. अगदी सहजच आम्हाला त्या ट्री हाऊसमध्ये राहता आले. आणि हे सर्व समुद्रकिनाऱ्याकडे तोंड करून असलेल्या जागी होते. ट्री हाऊसमध्ये राहण्याचा अनुभव हा अविस्मरणीय होता. आणि असे राहायला मिळेल अशी आम्ही अपेक्षाही केलेली नव्हती.

दुसरा दिवस पूर्णगड आणि कशेळीच्या गुहा पाहण्यात गेला. स्थानिक माणसानेच आम्हाला तिकडे नेले. वाळूच्या गुहा या खरे तर आपला नसíगक वारसा आहे. पण तेथे फारशी निगा राखलेली नाही.

यापुढचा टप्पा होता आंबोळगड. सर्वोत्तम ठिकाण. समुद्रकिनारी असलेला तो मठ, खडकांवर फुटणाऱ्या लाटा सारेच विलोभनीय. येथून देवगडला जायचे होते. हा पल्ला मोठा होता. तीन तासांचा प्रवास. आजवर आमचा प्रवास ३०-४० किमी इतकाच असायचा. पण हा आजवरचा मोठा स्ट्रेच होता. रिक्षाने फिरताना इतका मोठा प्रवास नव्हता झालेला कधीच. वाटेत विजयदुर्ग पाहून आम्ही देवगडला पोहोचलो. होम स्टे अगदीच प्राथमिक होता. मात्र खाडीजवळ होता. खोलीत डोकावून पाहिले तर अगदीच अस्वच्छता होती. त्याच वेळी आमच्या प्रवासाचे वर्णन तो मालक ऐकत होता. ते ऐकल्यावर त्याचा नूरच पालटला. त्याने पटापट नोकरांना कामाला लावले आणि खोली एकदम चकाचक करून दिली. संध्याकाळी खाडीत तीनेक तास बोटिंग केले. मनमोहक सूर्यास्ताचा आनंद लुटला आणि दुसऱ्या दिवशी कुणकेश्वरला गेलो. तेव्हा रिक्षावाल्याने तांबळडेग बीच पाहायला सांगितले. ते अद्भुत होते. येथे जवळच खाडीत दोन बेट आहेत. पाणखोल जुवा या बेटाला जाण्यासाठी आता रस्ता झाला आहे. शाळेतल्या दोन पोरांनी आम्हाला तिकडे फिरवून आणले.

दुसऱ्या दिवशी आम्ही तारकर्लीला गेलो. तिकडे मला तीन दिवस तरी थांबायचे होते. मालवण, सिंधुदुर्ग किल्ला असे सारे भटकून झाले. चवदार मच्छीचा आस्वाद घेतला. आम्ही ज्या हॉटेलात राहिलो होतो तेथील कूक बंगाली होता. त्याने खाडीतले मासे खाऊ घातले.

तीन दिवस मुक्काम करून मग आम्ही धामापूरला गेलो. येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. पण खासगी व्यक्ती चालवते. एखाद्या पुरातन हवेलीसारखी ती वास्तू आहे. आम्हाला तेथे सोडायला आलेला रिक्षावालादेखील हे पाहून घाबरला होता. पण तेथील केअरटेकर आणि व्यवस्थापक चांगलेच सहकार्य करणारे होते. आणि येथील सकाळ तर अविस्मरणीय. भरपूर पक्ष्यांच्या किलबिलाटात सकाळ अनुभवणे कधीही उत्तमच. आता पुढचा मुक्काम वेंगुल्र्याला. या रिसॉर्टमध्ये एक धम्माल अनुभव आला. ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केले होते त्यांना मागील भागात जागा मिळाल्या होत्या आणि आम्ही आयत्या वेळी गेलो तर आम्हाला समुद्राकडे तोंड करून असलेले कॉटेज मिळाले. येथील कॉटेजही भन्नाट आहेत. गवताने शाकारलेले आणि पुढे मस्त हिरवळ. वेंगुल्र्यात चर्च, लाइट हाऊस असे पाहून मग टेराकोटकडे मोर्चा वळवला. येथे एक हेरिटेज हॉटेल आहे. ख्रिसमस सुट्टय़ा जवळ येत असल्याने त्यांचे रेट अवाच्या सवा वाढले होते. दहा हजार रुपये एका खोलीला. आम्ही घासाघीस केली, पण खोली बघून दोन हजारांत राहता आले. टेराकोट येथे रिक्षापेक्षा टॅक्सीचा वापर अधिक आहे. गोव्याला जवळ असल्याचा परिणाम. पण आधीच्याच रिक्षावाल्याने येथे रिक्षा मिळवून दिली होती. त्याने आम्हाला सावंतवाडीला सोडले. एक दिवस मुक्काम करून ३८ व्या दिवशी अखेरीस स्लीपर व्होल्वोने पुण्याचा प्रवास सुरू केला.

आजवर भरपूर भटकलो. पण असे एकच एक वाहन पकडून वेगवेगळ्या भागात सलग फिरत राहणे झाले नव्हते. रिक्षाने जायचे का हे काही आधी ठरले नव्हते. सहज घडत गेले आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना रिक्षा मिळत गेली. एक रिक्षावाला दुसऱ्या गावच्या रिक्षावाल्याशी जोडून द्यायचा. कधी हॉटेलचालक रिक्षा मिळवून द्यायचे. अंतर फार मोठे नसायचे, पण वाटेत थांबे असायचे. त्यामुळे थोडेफार पसे जास्त द्यावे लागले. पण या ३८ दिवसांत रिक्षासाठी तीस हजार रुपये खर्च झाले. आजवर असे कोणी काही केल्याचे ऐकिवात नव्हते. त्यामुळे काही ठोकताळे नव्हते. सहज होत गेले आणि कोकणची ही तीनचाकावरची सफर घडून गेली. काही गोष्टी ठरवून होत नसतात, त्या अशाच आपसूक व्हाव्या लागतात, हे पटले.
मोहम्मद बँकवाला – response.lokprabha@expressindia.com
शब्दांकन – सुहास जोशी