scorecardresearch

Premium

देखणा हिमालय

नितांतसुंदर हिमालयातली भटकंती म्हणजे आनंदाची पर्वणीच.

Himalaya
हिमालय म्हणजे देशाचा मुकुटमणी.

हिमालय परिसर विशेष विभाग
हिमालय म्हणजे देशाचा मुकुटमणी. पर्यटकांचा, ट्रेकर्सचा आवडता परिसर. हिमालय पर्यटनाचे नियोजन करणाऱ्यांना या परिसराचे विविध पैलू समजून घेता यावेत यासाठी..

नितांतसुंदर हिमालयातली भटकंती म्हणजे आनंदाची पर्वणीच. पण ती करण्याआधी आपल्याला तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांची, हवामानाची, आणखी बऱ्याच गोष्टींची माहिती असायलाच हवी.

Akkalkot-BJP
अक्कलकोटमध्ये घालीन लोटांगण, करीन वंदन..!
A different love story of Lakshman and Urmila
लक्ष्मण आणि उर्मिला यांची रामायणातील वेगळी प्रेमकथा !
south east asian ganesh ganpati
History and culture of Ganesh festival: भारताआधीच आग्नेय आशियातील देशांमध्ये गणपती लोकप्रिय का झाला? तिथे गणपती कसा पोहोचला?
dagdusheth ganpati
भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश आणि पंजाबसह सीमावर्ती भागात करणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

भारताच्या तीन सीमांवरील समुद्र आणि चौथ्या सीमेवर नगाधिराज हिमालयाची पर्वतरांग हे आपले नैसर्गिक रक्षणकर्ते. हिमालय तर केवळ रक्षणकर्ताच नाही तर एक संस्कृतीचा मूलाधार आहे. पर्यटनाने या भागाला वेगळी ओळख दिली आहे. अनेक नवनवीन गोष्टी नित्य येथे उजेडात येत असतात.  हिमालय म्हटले केवळ बर्फाच्छादित डोंगरच डोळ्यासमोर येतो. पण त्यापलीकडे येथे पाहण्यासारखे खूप काही आहे. मात्र त्यासाठी आपल्या पर्यटन आखणीत काही गोष्टींची नोंद ठरवून करावी लागेल. तुलनेने तरुण अशी ही पर्वतरांग, पण उंचीतले सारे विक्रम मोडणारी आहे. गिर्यारोहकांना साद घालणारा, भाविकांना जवळ बोलावणारा, तर कोणत्याही प्रकारच्या पर्यटकाला भटकण्याचा निखळ आनंद देणारा असा हा भूभाग. आपल्या देशाचं नाक सांभाळणारा.

हिमालयातच नाही तर कोणत्याही पर्यटनस्थळी जाताना त्या त्या पर्यटनस्थळाचा हंगाम हा महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर अतिगर्दीचा हंगाम टाळून अन्य कोणता कालावधी योग्य असेल हे पाहणेदेखील गरजेचे असते. अशा जरा ऑफबीट हंगामात सृष्टीचं रूप काही वेगळंच असतं. हिमालयाच्या बाबतीत हे तर अगदी ठळकपणे जाणवते. मुलांच्या परीक्षा, त्यांच्या सुट्टय़ांप्रमाणे आपण पर्यटनाची आखणी करतो. पण तरीदेखील कधीतरी ऑफबीट सिझन अनुभवायला हरकत नाही.

सुट्टय़ांचा सिझन एप्रिलनंतरच्या काळातला असतो. पण तेव्हा एकंदरीतच समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर वातावरणातील उष्मा वाढलेला असतो. विशेषत: लोअर हिमालयात वणवे लागण्याचे प्रमाणदेखील असते. त्यामुळे धूर आणि धुक्याचे असे एक विचित्र मिश्रण हिमालयाच्या पायथ्याला दिसून येते. परिणामी दृश्यमानता कमी होते आणि हिमाच्छादित डोंगररांगांचा आनंद पुरेसा घेता येत नाही. एप्रिल मे महिन्यात असे धुरक्याचे ढग डोंगराला वेढतात. आणि मध्येच एखादं हिमाच्छादित शिखर सूर्यप्रकाशात उजळून जाते. हिमाच्छादित डोंगरांची रांग पाहायला मिळेलच असे नाही. हिमालयीन ट्रेकमध्ये मात्र असे धुरक्याचे ढग फारसे जाणवत नाहीत. कारण तेथे तुम्ही त्या धुरक्याच्या रेषेच्या वर गेलेले असता.

अशा काही बाबींमुळे एखाद्या प्रसिद्ध ठिकाणीदेखील त्याचा आनंद पुरेसा घेता येत नाही. दार्जिलिंगहून कांचनजंगाच्या शिखराची सुवर्णझळाळी पाहण्याची एक विशिष्ट अशी जागा आहे. त्यासाठी पहाटे अडीच-तीन वाजता हॉटेल सोडावे लागते. पण बहुतांश वेळा दार्जिलिंगमध्ये पर्यटकांची गर्दी असते त्या वेळी या धुरक्यामुळे कांचनजंगाची सुवर्णझळाळी दिसतच नाही. पण हे टूर गाइडकडून आधी स्पष्ट केले जात नाही. पहाटे अडीच-तीनला उठून आपण त्या ठिकाणी धडपडत जातो, पण सुवर्णशिखर दर्शनाचा आनंद काही लुटता येत नाही. मग नशिबाला दोष लावला जातो. त्यापेक्षा त्या काळात पाऊस पडला असेल, हवा स्वच्छ असेल तरच हे शिखर पाहायला जावे. अन्यथा भटकंतीतला हा काळ अन्य ठिकाणी वापरावा. कांचनजंगा पाहण्याचा योग्य काळ ऑक्टोबर ते मार्च हा आहे. हवामानाचे असेच गणित सिक्कीममधील रोडोडेंड्रॉन फुलांच्या अभयारण्याला आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सलादेखील लागू पडते.

हिमालयाच्या बाबतीत तर सारेच निसर्गलहरीवर अवलंबून असते. त्यातच ही जगातील तरुण अशी पर्वतरांग. त्यामुळे येथे सतत काही ना काही बदल होतच असतात. हे सारं लक्षात घेऊन हिमालयातील पर्यटनाची आखणी करावी म्हणजे त्याचा पुरेसा आनंद घेता येईल.

काश्मीरच्या एकंदरीत व्याप्तीनुसार आपण तेथे पर्यटनाच्या संधी कशा आहेत हे पाहूया. सर्वसाधारणपणे काश्मीरमध्ये भटकण्याचा काळ हा एप्रिल-मे-जून ते ऑक्टोबपर्यंत विस्तारत जातो. पण तुम्हाला शुभ्र असा बर्फाच्छादित हिमालय अनुभवयाचा असेल तर फेब्रुवारीतच जावे लागेल. नंतर गर्दीच्या काळात बर्फ दिसतो. पण तो काळपट असतो. त्यातील सौंदर्य हरवले असते. शिखरमाथ्यावर तेवढाच छान बर्फ असतो.

काश्मिरात श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग ही महत्त्वाची पर्यटनस्थळं आहेत. सोनमर्ग पूर्णपणे नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे. तेथे तुम्हाला मानवनिर्मित प्रेक्षणीय असं काहीही सापडणार नाही. येथील निसर्गसुंदर प्रचंड अशा दऱ्याखोऱ्यांत काश्मीरचं खरं सौंदर्य दडलेलं आहे. ७०-८०च्या दशकातील यच्चयावत हिंदी चित्रपटांतून हा सारा परिसर आपण पाहिला आहे. बहुतांश गाणी काश्मीरच्या पाश्र्वभूमीवर चित्रित झालेली आहेत. त्या गाण्यातून काश्मीरचे नंदनवन जाणवत राहते. पण आज ही सर्वच ठिकाणं पर्यटनातील अनियंत्रित व्यापारीपणामुळे आणि शासकीय यंत्रणांनी त्याचे योग्य ते नियंत्रण न केल्यामुळे  बोकाळली आहेत. त्यामुळे एप्रिल-मे-जून टाळून गेलात तर काश्मीरचा खरा आनंद घेता येईल.

गुलमर्गमध्ये आकर्षण आहे ते तेथील गंडोलाचे. दरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी केलेला हा रोप वे. आल्प्सच्या पर्वतराजीत असे गंडोला अनेक आहेत. पण मुळातच आल्प्सची उंची सहा-साडेसहा हजार फुटापर्यंतच आहे. त्यामुळे गुलमर्गमधील गंडोला हा जगातील सर्वात उंचीवरील गंडोला आहे. तो दोन टप्प्यांत विभागला आहे. पहिला टप्पा हा नऊ हजार फुटांवर आहे, तर दुसरा टप्पा १३ हजार पाचशे फुटांवर आहे. या उंचीवरून काश्मीरच्या निसर्गाचा आनंद काही औरच आहे.

श्रीनगर हे मध्यवर्ती ठिकाण ठेवून सोनमर्ग-गुलमर्ग आपल्याला फिरता येते. श्रीनगरमधील शंकराचार्य मंदिर आणि ते सोनमर्गच्या वाटेवरील खिरभवानी मंदिर ही दोन हिंदू देवस्थानं आजही टिकून राहिली आहेत. त्याशिवाय पर्यटक जाऊ शकतील अशी काही ठिकाणं सीमेवर आहेत. मात्र त्यामध्ये थोडीशी जोखीम आहे. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटक त्या वाटेला जात नाहीत.  काश्मीरमध्ये ट्रेकिंगचे अनेक पर्यायदेखील विकसित होत आहेत. सोनमर्गपासून सुरू होणारा ग्रेट लेक ट्रेक हा तुलनेने सोपा आहे.

हे सर्व श्रीनगरमध्ये राहून किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे जात सलग करता येते. श्रीनगरमध्ये ७५ चौरस किलोमीटरचे प्रसिद्ध असे दाल लेक हे तेथील जीवनमानाचा आधारच आहे. भाजीपाला, फळफळावळ, तेथील लोकांची जीवनशैली असं सारे काही दाल लेक भोवतीच गुंफलं आहे. अजूनही भाजीफळांचा व्यापार बार्टर सिस्टिमने चालतो. तसेच सकाळी साडेपाच वाजता सुरू होणारा ताज्या भाज्यांचा व्यापार पाहण्यासारखा आहे. श्रीनगरमधील तीनही मुघल गार्डन्स प्रसिद्ध आहेत. पण आता प्रचंड पर्यटकसंख्येमुळे त्यांची रया गेलेली आहे. त्याशिवाय श्रीनगरमधील जामा मशीद, राजा हरिसिंहाचे वास्तव्य असणारा परिमहल (जो मुघल राजा दारो सिखोने १६०३ मध्ये बांधला) पाहण्यासारखे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एप्रिलमध्ये होणारा टय़ुलिप फेस्टिव्हल. हा फेस्टिव्हल जगभरात प्रसिद्ध आहे. हा नक्कीच पाहावा.

साधारणपणे काश्मीर पाहण्यासाठी पाच ते सात दिवस पुरेसे आहेत. सात दिवस असतील तर जम्मूलादेखील जाता येते. जम्मू हे व्यापारी ठिकाण आहे. पर्यटनाच्या दृष्टीने तेथील रघुराज मंदिर हेच काय ते एकमेव आकर्षण म्हणावे लागेल. आणि सध्या प्रचंड प्रसिद्ध असलेले आणि वाहतुकीच्या व इतर यच्चयावत सुविधा असलेले वैष्णोदेवी मंदिर जम्मूपासून ५० किमीवर आहे. त्यासाठी अनेक जण स्वतंत्र सहली करतात.

काश्मीर हे खरोखरच पृथ्वीवरील नंदनवन आहे. पण मध्यंतरी काही काळ दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे एकंदरीतच येथील पर्यटनाला ओहोटी लागली होती. पण गेल्या सात-आठ वर्षांत काश्मीरला जाणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. दर  वर्षी काही ना काही अडचणी येत असतात, पण पर्यटक तेथे जात असतात. पर्यटन व्यावसायिकदेखील नेटाने अनेक टूर आखीत असतात.

हिमालयाच्या या रांगेत नव्याने विकसित झालेले पर्यटन म्हणजे पॅट्रोएटिक टुरिझम. झोजिला पासपासून लडाखची सुरुवात होते. या भागातील कारगिल युद्धानंतर कारगिल, बटालिक आणि द्रास येथे अनेक पर्यटक आवर्जून जातात. कारगिल हे त्या वेळी युद्धाचे मुख्यालय होते. प्रत्यक्ष युद्ध द्रास, बटालिकमध्ये झाले. द्रासमध्ये वॉर मेमोरियल आहे. त्याला आवर्जून भेट द्यावी. कारगिलला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत आपण जाऊ शकतो.

काश्मिरातील दहशतवादामुळे मधल्या काळात लेह-लडाखला पर्यटकांची पसंती वाढू लागली. सध्या तर लडाख हे पर्यटनातील हॉट डेस्टिनेशन आहे. त्याबद्दल माहिती अगदी विनासायास मिळते. फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. लेहची उंची ११ हजार ५०० फूट आहे. अशा उंचीवर पर्यटनासाठी जाताना टप्प्याटप्प्याने उंची गाठावी. त्यासाठी श्रीनगरमार्गे जाणे श्रेयस्कर. विमानाने थेट लेहला जायचेच असेल तर मात्र लेहमध्ये किमान एक ते दोन दिवस त्या उंचीवरील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. बाकी लेह-लडाख येथील पर्यटनाच्या ठिकाणांमध्ये येथे विस्ताराने सांगण्याची आवश्यकता नाही. त्यात एक नावीन्यपूर्ण प्रयोग मात्र आवर्जून करावा असा आहे. तो म्हणजे हिवाळ्यातील लडाख पाहणे. उणे शून्यच्या खाली तापमान गेल्यानंतरदेखील तेथील पर्यटनाला एक वेगळेच परिमाण लाभलेले असते. हिवाळ्यातील स्थानिकांची दिनचर्या बदललेली असते. गोठलेल्या बर्फामुळे आइस हॉकीसारखा खेळ तेथे विकसित झाला आहे. त्याच्या स्पर्धादेखील तेथे आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर सध्या प्रसिद्ध होत असणारा चद्दर ट्रेक. गोठलेल्या झंस्कारवरून हा ट्रेक केला जातो. पूर्वापारपणे हा ट्रेक अनेक पट्टीच्या गिर्यारोहकांकडून केला जायचा. पण आता त्यात व्यावसायिकता आल्यामुळे व्यापारी तत्त्वावरदेखील खूप मोठय़ा प्रमाणात हा ट्रेक आयोजित केला जातो.

लेह-लडाखच्या खालोखाल किंबहुना तेवढेच सृष्टिसौंदर्य असलेला हिमाचल प्रदेशमधील भाग म्हणजे स्पिती व्हॅली. किन्नोर, स्पिती, लाहोल व्हॅली हा सारा परिसर अनेक आश्यर्यकारक आणि विलोभनीय लॅण्डस्केप घेऊन तुमच्यासाठी सज्ज आहे. पण तुलनेने तेथे पर्यटकांचे प्रमाण मर्यादितच आहे.

लेहवरून तांगलांगला पास, सरचू, पांग, बारलाचला पास पार केल्यावर लाहोल व्हॅलीमध्ये आपण प्रवेश करतो. लाहोलमध्ये केलाँग पाहण्यासारखे आहे. युरोपातील पानगळीचा ॠतू जसा नयनरम्य असतो, तसाच पानगळीचा सोहळा सप्टेंबरमध्ये केलाँगमध्ये पाहता येतो. पाने लालपिवळी होऊन खाली पडतात. संपूर्ण धरतीवर एक अनोखी चादरच पसरलेली असते. केलाँगची उंची नऊ हजार फूट असली तरी तेथे प्राणवायूचे प्रमाण पुरेसे आहे. त्यामुळे चांगलीच हिरवाई आहे. पण येथे पाहायचे ते एकापेक्षा एक असे अप्रतिम लॅण्डस्केप.

लाहोल व्हॅलीत उदयपूर आणि त्रिलोकनाथ ही दोन मंदिरे पाहण्यासारखी आहेत. येथून एक नवीन मार्ग नुकताच सुरू झाला आहे, साजपास. त्यामार्गे तुम्ही हिमाचलच्या चम्बामध्ये जाऊ शकता. पण हा रस्ता तुलनेने खराब आहे. बाईक अथवा जीप जाऊ शकते. जरा वेगळं धाडस करायचे असेल, थरारक अनुभव घ्यायचा असेल तर जायला हरकत नाही.

केलाँगला उतरून पुढे कुंझूम पासवरून स्पिती व्हॅलीत जाता येते. स्पिती लिटिल लडाख म्हणून ओळखले जाते.

कुंझूम पासनंतर बारा किलोमीटर आत जाऊन चंद्रताल लेक पाहता येते. तेथून तीन दिवसांचा सूरजताल ट्रेक आहे. पण हा पट्टीच्या ट्रेकर्ससाठीच आहे. सूरजताल हे लाहोल व्हॅलीचे शेवटचे ठिकाण आहे. पुढे बागलाचला पास लागतो तेथून खाली उतरले की हिमाचल प्रदेश संपतो.

या मार्गे न जाता स्पितीमध्ये काझा गाव, की मोनेस्ट्री, किब्बर हे गाव, जगातील सर्वात उंचीवर म्हणजेच १५ हजार २०० फूट उंचीवर असलेले हकीम हे पोस्ट ऑफिस, पिन व्हॅली, धनकर मोनेस्टरी, ताबो मोनेस्ट्री ही सर्वसामान्य पर्यटकांसाठी महत्त्वाची ठिकाणं आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही ठिकाण आजही ऑफबीट आहेत.

शक्यतो सिमला ते चंदीगड मार्गे किन्नोर स्पिती अशी दहा दिवसांची भटकंती करावी. चंदीगड-सिमला-सरहान-सांगला व्हॅली-कल्पा-नाको-काझा-लाहोल-मनाली अशी आखणी करता येते. कल्पा हे खास किन्नोरी सफरचंदांसाठी प्रसिद्ध आहे. या सर्व परिसरात फार महागडी आणि आलिशान अशी सोयीसुविधांनी सज्ज हॉटेल्स नाहीत. पण मूलभूत सुविधा परवडणाऱ्या दरात देणारी हॉटेल्स आहेत. किन्नोरमध्ये रस्त्यांची परिस्थिती तुलनेने चांगली आहे. पण स्पितीतील नाही. भारतातील दोन मोठे विद्युत प्रकल्प सध्या येथे सुरू आहेत. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक येथे बरीच आहे. त्याचा परिणाम रस्त्यांवर होतो.

हिमाचलचा पर्यटनकाळ तसा बराच मोठा आहे. मार्च ते सप्टेंबर ऑक्टोबपर्यंत उन्हाळी सीझन आणि डिसेंबर-जानेवारी असं हिवाळी पर्यटन.

मनालीच्या भटकंतीला सिमल्याची जोड देता येते. सिमला-मनाली-डलहौसी-खज्जियार करून मण्डी मार्गे परत चंदीगडला येऊ शकता. अमृतसर-पठाणकोट- डलहौसी-खजियाल- चम्बा (येथून साज पासहून मनालीला येता येते) किंवा परत धरमशाला-मॅक्लोडगंज-मण्डी मार्गे चंदीगडला जाता येते. याच भागातील कांगला व्हॅलीतून जाणारी अतिशय सुरेख अशी नयनरम्य मार्गक्रमण करणारी रेल्वे सेवादेखील आहेत.

यापुढचा हिमालयाचा भाग म्हणजे कुमाऊँ  आणि गढवाल हिमालय. उत्तराखंड राज्यातील या ठिकाणी सध्या बऱ्याच पर्यटनाच्या संधी आहेत. त्यापैकी गढवाल हिमालय हा धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे उंची बरीच आहे आणि नैसर्गिक अडथळेदेखील भरपूर आहेत.

कुमाऊँमध्ये नैनिताल, मसुरी, मुन्शियारी, अलमोडा ही इंग्रज अमदानीतील वसाहती पद्धतीने हिल स्टेशन म्हणून विकसित केलेली खास पर्यटनस्थळे आहेत. पण नैनिताल, अल्मोडा, मसुरी येथे अतिगर्दीने सध्या बऱ्यापैकी बजबजपुरी झाली आहे. अर्थातच अनियंत्रित पर्यटनाचा हा परिणाम आहे. तुलनेने मुन्शियारी, कसौनी ही आजची ऑफबीट ठिकाणं आहेत.

कुमाऊँ हिमालयात या नेहमीच्या ठिकाणांबरोबरच बिन्सर हे सर्वात महत्त्वाचे आणि त्याच्या अनोख्या वैशिष्टय़ांमुळे अवश्य पाहावे असे पर्यटनस्थळ आहे. बिन्सरचे वैशिष्टय़ म्हणजे येथून हिमालयाची एक सलग अशी ३५० किमीची पर्वतरांग पाहता येते. त्यात कुमाऊँ हिमालयातील २१ हिमशिखरांचा समावेश होतो. अर्थात आधीच सांगितल्याप्रमाणे योग्य काळात गेलात तरच याचा आनंद घेता येतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे येथील रिसॉर्टसमध्ये कुठेही विजेचा पुरवठा बाहेरून होत नाही. एक तर सौर ऊर्जेचा वापर केला जातो किंवा गरज पडेल तसा जनरेटरचा वापर केला जातो. तेथील रिसॉर्ट्सनी स्वत:चे वैशिष्टय़ म्हणून हीच रचना स्वीकारून विकसित केली आहे.

या सर्वाबरोबर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानदेखील पाहता येते. भारतातील ते सर्वात मोठे अभयारण्य आहे. मुन्शियारीपासून मिलाम ग्लेशियर ट्रेकची सुरुवात होते. पूर्वी हा ट्रेक केला जायचा पण आता त्यावर बंदी आहे.

गढवाल हिमालयात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि औली ही दोन स्वतंत्र आकर्षणे आहेत. औली हे भारतातील अत्यंत उत्कृष्ट असे स्किइंग सेंटर म्हणून ओळखले जाते. येथे जगभरातून लोक स्कि इंगसाठी येत असतात. तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पाहायला तर जगभरातील पर्यटक, वनस्पती अभ्यासक येत असतात. व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर. येथे जून ते सप्टेंबर या काळात फुलं असतात. पण खरा बहर ऑगस्टनंतरच येतो.

उत्तराखंडनंतर सिक्कीम-हिमालय हा त्यातील अनेक नावीन्यपूर्ण गुणांमुळे आपल्याला आकर्षित करतो. सिक्कीम राज्याच्या अनेक धोरणांमुळे सध्या येथे पर्यटकांची गर्दी असते. पण या गर्दीचे नेमकं नियोजन, नियंत्रण येथील नियमांनी व्यवस्थांनी केले आहे. त्यामुळे इतर हिमालयीन पर्यटनस्थळांसारखा बजबजाट येथे नाही. गंगटोक हे दार्जिलिंगइतकेच गर्दीचे ठिकाण आहे, पण दार्जिलिंगसारखा गोंधळ तेथे अजिबात नाही.

सर्वसाधारणपणे पर्यटक हे गंगटोक, पेलिंग, कॅलिगंपाँगला जातात. पण खूप कमी लोक रोडोडेंड्रॉन फुलांचे अभयारण्य असणाऱ्या युगथांग व्हॅलीमध्ये जातात. गुरुडोंगमार लेक हे गोडय़ा पाण्याचे सरोवरदेखील असेच दुर्लक्षित आहे. रोडोडेंड्रॉन फुलांच्या अभयारण्याला भेट द्यायची तर मे ते ऑक्टोबर या काळातच जाणे गरजेचे आहे. या काळात हिम वितळून नद्या वाहू लागतात. त्याच काळात ही फुलं बहरात येतात. हा सर्व परिसर निसर्गाच्या अगदी जवळ नेणारा आहे. किमान सुविधा देणारी हॉटेल्स येथे आहेत. पण हिमालयाची एक वेगळी अनुभूती घ्यायची असेल तर येथे जावेच लागेल. पेलिंगमध्ये नोंद घ्यायची बाब म्हणजे येथून कोणत्याही हॉटेलच्या खिडकीतून दिसणारे कांचनजंगा हिमशिखर. या जागेच्या भौगोलिक रचनेमुळे हे शक्य होते. अर्थात पर्यटनासाठी या रचनेचा अगदी समर्पक वापर केला जात आहे.

सिक्किम भेटीतील दुसरे आकर्षण म्हणजे पुरातन असा व्यापारी मार्ग नथुला पास. जो आजही वापरला जातो. भारत-चीनला जोडणारा हा मार्ग पाहण्यासाठी मात्र विशेष परवानगी काढावी लागते. दिवसाला मर्यादित लोकांनाच हा परवाना मिळतो. पण या वाटेवर असणाऱ्या बाबा मंदिरापर्यंत सहजपणे विनापरवाना जाता येते. हे मंदिर म्हणजे एक अख्यायिकाच आहे. बाबा हरभजन सिंग या सैनिकाने युद्धात खूप शौर्य दाखवले. त्याचा आत्मा आजही तेथे येतो असे मानतात. त्यासाठी त्याचे कपडे इस्त्री करून तेथे ठेवले जातात.

पेलिंगच्या खालच्या बाजूस असणारी न्यूऑरा व्हॅली ही खास पक्षिप्रेमींसाठी आहे. एकदम ऑफबीट असे हे ठिकाण पक्षिप्रेमींबरोबरच इतरही पर्यटकांसाठी आकर्षण आहे.

सिक्कीमनंतर हिमालयीन म्हणता येईल असं पश्चिम बंगालमधील एकमेव ठिकाण म्हणजे त्यांचे एकमेव हिल स्टेशन दार्जिलिंग. पण तुमच्याकडे भरपूर वेळ असेल आणि संयम असेल तरच या हिल स्टेशनकडे जावे, अन्यथा तुम्हाला भरपूर त्रास सहन करावा लागू शकतो. एक तर येथे प्रचंड गर्दी आहे. त्यातच रहदारीचे, वाहतुकीचे नियंत्रण नाही, त्यामुळे सगळाच बोऱ्या वाजला आहे. पाचशे मीटरवर तुमचे हॉटेल दिसत असते, पण गाडीतून जायला कितीही वेळ लागू शकतो. दुसरे म्हणजे येथे वर्षभरच सीझन असतो. पण त्यातल्या त्यात मे-जून आणि दिवाळीची सुट्टी सोडून उरलेला काळ ऑफ सीझन म्हणून ओळखला जातो. तेव्हा जायला हरकत नाही.

सिक्कीमवरून पुढे अरुणाचल हे चीन सीमेवरचे राज्य उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून ओळखले जाते, पण ते अधिक प्रकाशात आले १९६२ च्या युद्धामुळे. तेव्हा तवांगमार्गे चिनी सैन्य तेजपूपर्यंत धडकले होते. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे दलाईलामा हे याच तवांगमार्गे भारतात आले. त्यांच्याबरोबर बौद्ध धर्माचा प्रसारदेखील वाढला. तवांगमधील तवांग मोनेस्ट्री ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोनेस्ट्री आहे. पहिली ल्हासामध्ये आहे. तवांगचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे असणारी १०८ तळी. सांगेत्सर लेक हे त्यापैकीच एक. माधुरी दीक्षितने या तळ्याकाठी ‘कोयला’ चित्रपटासाठी नृत्य केले आणि या तळ्याला आता माधुरी लेक म्हणून प्रसिद्धी मिळाली.

तवांगच्या वाटेवरील सेला पास मात्र एका शूर मुलीच्या नावाने ओळखला जातो. जसवंतगड या ठिकाणी जसवंतसिंग रावत या सैनिकाने १९६२ मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करीत एकटय़ाने शत्रू सैन्याला रोखून धरले होते. त्याला सेला या तेथील स्थानिक महिलेने त्याला साथ दिली. तिच्याच नावाने हा पास ओळखला जातो.

गुवाहाटी तेजपूर बोमदिला दिरांग तवांग मार्गे सेला पास पार करून तवांगला जाता येते. पण केवळ अरुणाचल न करता अनेक जण गुवाहाटीवरून आसाममधील काझीरंगा अभयारण्य पाहून अरुणाचलमध्ये जाण्याचा सध्या ट्रेण्ड आहे.

अरुणाचलमध्ये तुलनेने सुविधा मर्यादितच आहेत. दिरांगमध्ये तीनच हॉटेल. तवांगमध्ये बरी हॉटेल्स आहेत. सध्या अरुणाचल प्रदेशचे पर्यटन मंडळ बरेच कार्यरत झाले आहे. जिल्हास्तरावर होम स्टे आणि मूलभूत सुविधा असणारी निवास व्यवस्था करण्याच्या योजना त्यांनी कार्यान्वित केल्या आहेत. अरुणाचलचा कालावधी हा फेब्रुवारी ते मेपर्यंत आहे. सध्या तरी येथे किमान गर्दी आहे. तोपर्यंत याचा आनंद घ्यायला हरकत नाही.

अरुणाचलपाशी हिमालयीन डोंगररांग संपते. नेपाळ आणि भूतान या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये तिचा बराच विस्तार आहे. सर्वोच्च हिमशिखरापासून ते सर्वात मोठी मोनेस्ट्री, आनंदी माणसांचा देश अशा अनेक बाबी तुम्हाला आकर्षित करतात. भूतानसाठी फेब्रुवारी ते जून हा कालावधी उत्तम आहे. पारो, पुनाखा, थिंपू हे साधारण आठ-दहा दिवसांच्या कालावधीत होणारे पर्यटन करता येते. तर नेपाळमध्ये प्रचंड पर्याय आहेत. पट्टीच्या गिर्यारोहकांपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत साहसी खेळाचा आनंद घेण्यापासून ते धार्मिक पर्यटन असं सारं काही येथे आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपातून हा देश आता चांगलाच सावरलादेखील आहे.

नगाधिराज हिमालयात खरे तर आजही अनेक छोटी-मोठी ठिकाणं दुर्लक्षित आहेत. किंबहुना त्या अज्ञात हिमालयात भटकण्याचा मजा काही औरच आहे. पण त्याचबरोबर नेहमीच्या ठिकाणी जरा वेगळ्या काळात गेलो तर हिमालयाचे मनोहारी दर्शन घडू शकते.
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Beautiful himalaya

First published on: 24-02-2017 at 01:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×