कास पुष्पपठार पाहण्यासाठी आम्ही सप्टेंबरमध्ये मुंबईहून साताऱ्याला गेलो असताना आम्ही थांबलो होतो त्या हॉटेलवर आम्हाला भांबवली वज्राई धबधब्याची व्हिडीओ क्लीप पाहायला मिळाली.

निसर्गाच्या अनामिक ओढीने आम्ही पुष्पपठाराहून धबधब्याकडे कूच केली. भांबवली वज्राई धबधब्याचं विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी साताऱ्याहून कासला जाता येते. कास गावाजवळ धबधब्याकडे नेणारा फाटा फुटतो. तांबीपर्यंत डांबरी रस्ता आहे. तांबी ते धबधबा पायी वाटचाल करावी लागते. तांबी येथून एक किमी खाली उतरून भांबवली गावातून वाटाडय़ा घेऊन आम्ही धबधब्याकडे प्रयाण केले. कारण पुढचा प्रवास घनदाट जंगलाचा असून झाडाझुडपांच्या गर्दीतून सूर्यप्रकाशदेखील पोहोचत नाही, असा हा काहीसा भाग. या गर्द झाडीत शिरून धबधब्याकडे जाण्यासाठी इथे वाटाडय़ा हवाच. आमच्या वाटाडय़ाने वाटेत थांबून एक औषध आमच्या दोन्ही पायांना चोळले. तो म्हणाला की, धबधब्याच्या परिसरात जळू आहेत. त्या पायावर चढून रक्त शोषून घेतात. बरेच पर्यटक घाबरतात, म्हणून त्याने ते औषध लावले आहे. औषधाच्या वासाने जळू पायांवर चढत नाहीत.

काही अंतर चालून गेल्यावर आम्हाला जणू काही जळूंच्या राज्यात आल्यासारखे वाटू लागले. शंकरने सांगितले की, औषधी उपयोगासाठी तिथून बाटल्या भरून जळू नेतात. थोडे पुढे एक किमी गेल्यावर धबधब्याचे विहंगम दृश्य नजरेत भरते. धबधब्याचा आवाज आणि झाडाझुडपांच्या सहवासात आम्ही मंत्रमुग्ध होऊन चालत राहिलो. उतरणीवरून कसरत करीत आपण जसजसे खाली उतरत जातो, तसतसा भव्य धबधबा खुलून दिसायला लागला. मान वर करून पाहिले तर धबधबा नजरेच्या टप्प्यात मावत नाही.

वाटाडय़ाने सांगितलेल्या माहितीनुसार भांबवली वज्राई धबधबा आपल्या देशातला प्रथम क्रमांकाचा धबधबा आहे, असे सांगितले जाते. त्याची उंची ५६० मी. (१८४० फूट) इतकी आहे. तो तीन टप्प्यांत कोसळतो. भांबवलीच्या जंगलात बरेच वन्यजीव आहेत, मुख्यत्वे करून रानगवे, रानडुक्कर, भेकरे, ससे, वानर, इ. आणि क्वचित वाघ, अस्वलेदेखील दिसतात. अनेक प्रकारचे पक्षी, मुख्यत्वे करून मोर-लांडोर यांचे दर्शन होते. फुलपाखरांच्या असंख्य जाती दृष्टीस पडतात. या जंगलात विविध प्रकारची औषधी झाडे असून प्रामुख्याने हिरडा, आवळा, कडुलिंब, अडुळसा, शिकेकाई, पिसा, मरुडशेंग, अश्वगंध, बेडकीचा वेल (डायबिटीससाठी) आणि इतर वनौषधी झाडेझुडपे आढळतात.

भांबवली वज्राई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. कास पुष्पपठारापासून अवघ्या पाच किमी अंतरावर निसर्गाचा हा चमत्कार आहे. या धबधब्यापर्यंत गाडीने जाता येत नाही. त्यामुळे येथील निसर्गसौंदर्य अबाधित राहिले आहे.

नीरव शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, वीणेच्या झंकारासारखा वाऱ्याच्या झुळकेने केलेला आवाज, पाण्याचा खळखळाट असं हे सुंदर, मनमोहक ठिकाण.
रवींद्र बळीराम मोरे – response.lokprabha@expressindia.com