मराठी नवकवितेचे जनक, केशवसुतांचा जन्म नेमक्या कोणत्या तारखेला झाला या विषयी मतमतांतरे आहेत. त्यांच्या जन्माला पुढच्याच वर्षी म्हणजे २०१६ मध्ये दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या जन्मतारखेच्या वादाचा मागोवा-

मराठी नवकाव्याचे जनक केशवसुतांच्या जन्म-मृत्यूविषयी वाद व्हावेत आणि त्यांच्या जन्मतिथी-बाबत विद्वानांनी अनास्था दाखवावी हे मराठी समीक्षेला निश्चितच भूषणावह नाही. त्यांच्या मृत्युदिनाबद्दलचा तसंच जन्मशताब्दी वर्षांतच त्यांच्या जन्मदिनाबद्दलचा झालेला वादही अस्वस्थ करणारा होता. त्यांच्या जन्माला २०१६ मध्ये दीडशे वष्रे होतील. म्हणूनच या वर्षांत केशवसुतांच्या जन्मतारखेची निश्चिती करून अभ्यासकांचा संभ्रम दूर सारणे अतिशय आवश्यक आहे.
१९६६ हे केशवसुतांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्या वर्षांत त्यांच्याच वंशातील दत्तोपंत दामले यांनी केशवसुतांच्या जन्मतिथीचा प्रश्न उपस्थित केला. त्याबाबत अद्यापही एकवाक्यता झालेली नाही. काही समीक्षकांनी १५ मार्च १८६६ ही तारीख मानली तर काहींनी
७ ऑक्टोबर १८६६ ही तारीख मानली. परिणामत: केशवसुतांच्या दोन जन्मतारखा सध्या समीक्षक देतात.
असा सुरू झाला वाद-
या वादाला सुरूवात केली ती द. मो. दामले यांनी. मार्च १९६५ मध्ये ‘मराठा’ या वृत्तपत्राच्या अग्रलेखात ‘१५ मार्च १९६६ हा दिवस जन्मशताब्दी दिवस म्हणून साजरा व्हावा’ अशी इच्छा प्रगट झालेली असल्याचे त्यांच्या वाचनात आले. १५ मार्च ही तारीख वाचून अस्वस्थ झालेल्या द. मो. दामले यांनी ‘सत्यशोधन व्हावे’ या उद्देशाने ‘मराठा’मध्ये या प्रश्नाला तोड फोडले. ते पत्र ३० एप्रिल १९६५ रोजी प्रसिद्ध झाले. द. मो. दामले यांच्या या पत्राने जन्मतिथी वादाला सुरुवात झाली. पण या वादामुळे काही गोष्टींचाही ऊहापोह झाल्याने या वादाची समग्र माहिती नोंदविणे उचित ठरेल.
‘काव्यरत्नावली’तील नोंदी-
केशवसुतांच्या मृत्यूनंतर ‘काव्यरत्नावली’ डिसेंबर १९०५ ‘साल अखेर’ सदरात संपादकांनी ‘यांचा जन्म सन १८६६ मार्च महिन्यात झाला’ असे केशवसुतांचे धाकटे बंधू मोरो केशव दामले यांचा हवाला देत नमूद केले आहे. या माहितीत १५ मार्च ही तारीख नसली तरी मार्च महिन्याचा उल्लेख स्पष्टपणे आलेला आहे.
तर किरात यांनी, मासिक ‘मनोरंजन’ जानेवारी १९०६च्या अंकात लिहिलेल्या श्रद्धांजलीपर लेखात जन्मतिथी ‘फाल्गुन वद्य १४ शके १७८७ तारीख १५ मार्च सन १८६६’ अशी नमूद केली आहे. ‘काव्यरत्नावली’ व ‘किरातांचा लेख’ यांतील नोदी केशवसुतांच्या मृत्यूनंतर लगेच केलेल्या असल्याने व त्याला केशवसुतांचे धाकटे बंधू मोरो केशव दामले यांनी दिलेल्या माहितीचा आधार असल्याने अभ्यासक त्या विश्वसनीय मानतात.
केशवसुतांचे लहान बंधू सीतारामपंत दामले यांनी जून १९२१ मध्ये केशवसुतांच्या कवितांची आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यात केशवसुतांची कुंडली दिली आहे. या संदर्भात सीतारामपंत लिहितात- ‘‘यांचा जन्म मालगुंड नावाच्या गावी शके १७८८ भाद्रपद कृष्ण १४ रविवार रोजी झाला. कृष्णपक्ष असून जवळजवळ अमावास्या येत चालली होती म्हणून कृष्ण असे नाव ठेविले असावे.’’
सीतारामपंतांनी केशवसुतांची म्हणून जी जन्मकुंडली दिली आहे, त्या खाली भाद्रपद कृष्ण १४ रविवार, शके १७८८ सन १८६६ जन्म मालगुंड, जि.रत्नागिरी अशी तिथी दिली आहे. तारीख व इंग्रजी महिना नाही. ‘‘ज्यांना फलज्योतिषाचा नाद असेल त्यांनी कोणत्या ग्रहाच्या उच्चनीचत्वामुळे किंवा बलाबलामुळे किंवा कोणत्या ग्रहांच्या योगामुळे केशवसुत यांना इतके सरस कवित्व करता आले याचा आता यथेच्छ काथ्याकूट करावा’’ असे त्यांनी या कुंडलीखाली नमूद केले आहे.
कुंडलीबाबत शंका
परंतु पुढच्या १९२७ च्या दुसऱ्या आवृत्तीत, सीतारामपंतांनी त्या कुंडलीसंबंधी भाष्य करताना- ‘‘ही कुंडली पाहिल्याबरोबर ती कोणा अत्यंत भाग्यवान माणसाच्या कुंडलीसारखी दिसते. उच्चीचा शनी द्वितीय म्हणजे बलस्थानात आहे. मंगळ दशमात आहे; व गुरु पंचमात आहे. शनी उच्चीचा धनस्थानी असलेल्या माणसाला वडिलोपार्जति स्थावर मिळकत वीसपंचवीस हजारांची तरी मिळावी. गुरू दशमात, नवमात किंवा द्वितीय स्थानामध्ये भाग्यहीनाच्या पत्रिकेत सापडावयाचा नाही असा एक ठोकळ सिद्धान्त आहे. ‘भाग्यहीना न पश्यंति द्विपंचनवमं गुरुम्’ मंगळ दशमात असल्यावर मोठी सरकारी नोकरी म्हणजे अधिकाराची व करडय़ा अधिकाराची म्हणजे लष्करी, पोलिसी किंवा रेव्हेन्यू lp24

(मुल्की) खात्यातील खात्यातील मॅजिस्ट्रेट वगरे मिळणे फारच संभवनीय असते. परंतु जन्मभर भिकारटाकार गावी म्युनिसिपल शाळांमधून १५ ते ३० रुपयापर्यंत रखडणाऱ्या खडतर दैवाच्या माणसाच्या पत्रिकेत या कुंडलीतील शनी, गुरू व मंगळ यांच्याप्रमाणे ग्रह सापडणे शक्य नाही. तेव्हा कोणीतरी चुकीची जन्मवेळ कळविल्यामुळे भलत्याच लग्नावर ही कुंडली रचल्यासारखी दिसते. कारण तिच्यावरून फले कोणतीच जुळत नाही. फक्त ‘दशमोऽगारकोयस्य स भवेत् कुलदीपक’ या सूत्राप्रमाणे पाहिले तर विख्यात कवी म्हणून आता ठरल्यामुळे केशवसुत हे अखेर खरे कुलदीपक निघाले असे म्हणता येईल’’ असे नमूद केले.
त्यामुळे कुंडलीबरोबरच त्यासोबतची तिथीही संशयास्पद ठरली. स्वत: सीतारामपंतच स्पष्ट कबुली देत असल्याने ही कुंडली आणि सोबतची तिथी विचारात न घेता किरातांनी नमूद केलेली तारीखच समीक्षकांनी स्वीकारली होती. परंतु द.मो.दामले यांनी ‘भाद्रपद कृष्ण १४ रविवार शके १७८८’ ही सीतारामपंतांनी दिलेली तिथी स्वीकारली आणि या तिथीला
७ ऑक्टोबर १८६६ ही तारीख येत असल्याने तीच केशवसुतांची जन्मतारीख ठरवून वादाला सुरुवात केली.
प्रा. वाबगावकर यांचे मत
‘‘पण जी कुंडली मुळातच फलितांच्या दृष्टीने अग्राह्य़ आहे तिच्या खालची जन्ममिती व तिची संवादी तारीख तरी कशी प्रमाण मानता येईल?’’ असा प्रश्न उपस्थित करून, किरातांनी दिलेल्या जन्मतारखेनुसार केलेल्या कुंडलीची फले मात्र केशवसुतांच्या चरित्राशी जुळतात असा निर्वाळा प्रा. मधुकर वाबगावकर यांनी दिला आहे. ‘‘सी. कें. नी १९२१च्या आवृत्तीत कुंडलीखाली दिलेल्या भाद्रपद कृष्ण १४ या मितीला १५ मार्च ही तारीख येत नाही, ७ ऑक्टोबर येते, ही साधी विसंगती कुणाच्या लक्षात आली नाही! ती प्रकट केल्याबद्दल दत्तोपंत दामले बहुत धन्यवादास पात्र आहेत!’’ असेही प्रा. मधुकर वाबगावकर यांनी नमूद केले आहे.
केशवसुतांचा जन्मदिन ७ ऑक्टोबर हाच असल्याचे कारण देताना दत्तोपंत दामले स्वत:च्या जन्मतिथीबद्दलची माहिती देतात. कुटुंबातील काही घटनांचा उल्लेख करतात. दत्तोपंतांनी हा वाद उपस्थित करताना दिलेली माहिती तपासून पाहता असे दिसते की, दत्तोपंत निवृत्त झाल्यानंतर स्मरणशक्तीवर विसंबून हे लिहीत आहेत. या मधल्या कालखंडात केशवसुतांच्या जन्मतिथीबद्दल कोणताच वाद निर्माण झालेला नाही. किरातांनी दिलेली तिथी हीच नंतरच्या सर्व समीक्षकांनी स्वीकारली होती. सीतारामपंतांनी कुंडलीखाली दिलेल्या तिथीचा इतर कोण्या समीक्षकांनी उल्लेख केला नव्हता. कारण या कुंडलीच्या फलासंदर्भात खुद्द सीतारामपंत यांनीच शंका उपस्थित करून कुंडलीच्या सत्यतेविषयीची आशंका व्यक्त केली होती.
स्मृतिग्रंथातील लेख
केशवसुतांचे पुतणे प. चिं. दामले यांनी १९५६ मध्ये ‘केशवसुत स्मृतिग्रंथ’ प्रसिद्ध केला. त्यात सी. के. दामले यांचा चरित्रविषयक लेख आहे. त्यात केशवसुतांची म्हणून पहिल्यांदा सीतारामपंतांनी दिलेलीच पत्रिका व तिथी यांचा समावेश आहे. मात्र सीतारामपंतांचे कुंडलीवरील भाष्य वगळण्यात आले आहे. या लेखाबद्दल, संपादकीय निवेदनात, संपादकीय संस्कारांचा उल्लेख असला तरी जन्मतारखेबद्दलचा उल्लेख मात्र नाही.
पक्षपाताचा आरोप
दत्तोपंत दामले यांनी ‘केशवसुतांची भावंडे व त्यांचा परिवार’ या छोटेखानी पुस्तिकेत, प. चिं. दामले यांच्यावर पक्षपाताचा आरोप करीत ‘स्मृतिग्रंथा’तील काही त्रुटींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे; तर ‘सरस्वतीचे लाडके पुत्र’ या ग्रंथात दत्तोपंत दामले यांनी जन्मतिथीबाबत विद्वान पक्षपात करीत असल्याचा आरोप केला आहे.
भ. श्री. पंडितांचे मत
या जन्मतिथीवादाची दखल भ. श्री. पंडितांनीही घेतली. ‘समग्र केशवसुत’च्या दुसऱ्या आवृत्तीच्या (१९७०) प्रस्तावनेत ९ या वादावर भाष्य करताना हा वाद निर्थक असल्याचे स्पष्ट केले, तर दत्तोपंतांनी ‘मराठा’मध्ये लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने विजया राजाध्यक्ष यांनी, मार्च १९६६च्या ‘सत्यकथे’मध्ये ‘केशवसुतांची जन्मतारीख’ ही ‘टीप’ लिहिली. दत्तोपंतांचे मत त्यांना मान्य आहे. टिपेच्या शेवटी त्या म्हणतात-‘‘..पण सध्या तरी आपल्या हाती कुंडलीखेरीज दुसरे काही नाही. ती कुंडली खरे असल्याचा एका प्रख्यात ज्योतिष्याचा आणि मुख्य म्हणजे केशवसुतांच्या कुटुंबीयांचा निर्वाळा आहे. तो आपण मानला पाहिजे.’’
जुल १९६६च्या ‘युगवाणी’च्या अंकात रा. अ. काळेले यांनी, ‘केशवसुत-जन्म-मृत्यू-तिथी’ हा लेख लिहिला. त्यात केशवसुतांच्या जन्मतारखेबाबत ७ ऑक्टोबर ही तारीख ते मानतात. सीतारामपंत कुंडली नाकारत असले तरी विजया राजाध्यक्ष आणि रा. अ. काळेले मात्र ती स्वीकारतात हे विशेष.
प्रा. वाबगावकरांचा निष्कर्ष-
‘सत्यकथे’तील, विजया राजाध्यक्षांच्या ‘टिपे’तील त्रुटींचा समाचार प्रा. वाबगावकरांनी घेतला आहे. ‘युगवाणी’च्या ऑक्टोबर १९६६च्या अंकात ‘केशवसुतांचा जन्मदिन १५ मार्च हाच! ७ ऑक्टोबर नव्हे’ हा लेख प्रा.वाबगावकरांनी लिहिला. नंतर तो त्यांच्या ‘संशोधन व चिंतन’या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला.
नागपूरच्या एका विख्यात ज्योतिष्यांनी, फाल्गुन वद्य १४ गुरुवार शके १७८७, १५ मार्च १८६६ या, किरातांनी दिलेल्या तारखेवरून तयार केलेल्या कुंडलीतील फले केशवसुतांच्या आयुष्यातील घटनांशी तंतोतंत जुळत असल्याचे प्रा. वाबगावकर नमूद करतात; आणि शेवटी ‘‘फाल्गुन वद्य १४ गुरुवार शके १७८७, १५ मार्च १८६६’’ ही, जानेवारी १९०६च्या ‘मनोरंजना’त किरातांसारख्या केशवसुतांच्या अंतरंग मित्राने प्रथम दिलेली व तेव्हापासून आजतागायत अबाधित चालत आलेली तारीख हीच केशवसुतांची खरी जन्मतारीख होय. ती त्याज्य, चुकीची वा असत्य ठरविणारे एक ही बलवत्तर प्रमाण अजून तरी पुढे आलेले नाही’’ असे प्रा. वाबगावकर ठामपणे सांगतात.
संगणकीय कुंडली
सदर अभ्यासकाने संगणकाच्या साहाय्याने केशवसुतांच्या दिल्या जाणाऱ्या ७ ऑक्टोबर १८६६ व
१५ मार्च १८६६ या दोन्ही तारखांवरून जन्म कुंडल्या तयार केल्या. ७ ऑक्टोबर १८६६ या तारखेची, कुंडली तयार केली. तेव्हा सीतारामपंतांनी दिलेल्या कुंडलीशी या कुंडलीतील ग्रहांची स्थाने तंतोतंत जुळतात. (इतर तपशील असा- रविवार दि. ७ ऑक्टोबर १८६६, जन्मवेळ – सकाळी ७ वाजता, शके -१७८७-८८, कृष्ण चतुर्दशी, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र चरण दुसरे, शरद ऋतू, कन्या रास, मनुष्य गण, आद्य नाडी,)
१५ मार्च १८६६ या तारखेची संगणकीय कुंडलीतील ग्रहांची स्थाने व प्रा. वाबगावकर यांनी तयार केलेल्या कुंडलीतील ग्रहांची स्थाने, यामध्ये फरक आढळतो. या कुंडलीतील ग्रहांची स्थाने जुळत नाहीत. (प्रा. वाबगावकरांनी तयार केलेल्या कुंडलीत, जन्मवेळ प्रातकाळ गृहीत धरण्यात आला आहे. मात्र प्रात:काळ ही जन्मवेळ गृहीत धरल्यास यावेळी कृष्ण त्रयोदशी ही तिथी येते. परंतु सकाळी ९ ही जन्मवेळ गृहीत धरल्यास त्यावेळी कृष्ण चतुर्दशी ही तिथी येते. (इतर तपशील असा- दि. १५ मार्च १८६६, गुरुवार, जन्म वेळ- सकाळी ९ वाजता, शके-१७८७-८८, कृष्ण चतुर्दशी, शतभिषा नक्षत्र चरण पहिले, वसंत ऋतू, कुंभ रास, राक्षस गण, आद्य नाडी,)
किरातांनी दिलेल्या जन्मतारखेनुसार केलेल्या कुंडलीची फले मात्र केशवसुतांच्या चरित्राशी जुळतात असा निर्वाळा प्रा. मधुकर वाबगावकर यांनी दिला असला तरी १५ मार्च १८६६ या तारखेची संगणकीय कुंडलीतील फले केशवसुतांच्या व्यक्तित्वाशी जुळत नाहीत, परंतु ७ ऑक्टोबरच्या कुंडलीतील फले केशवसुतांच्या व्यक्तित्वाशी बरीचसी जुळतात असे अभ्यासकांचे मत आहे. (अर्थातच हा ही वादाचा विषय आहे.)
केशवसुतांच्या कवितांच्या पहिल्या आवृत्तीत सीतारामपंतांनी कुंडली दिली आहे. त्याखाली भाद्रपद कृष्ण १४ रविवार, शके १७८८ सन १८६६ जन्म मालगुंड जि. रत्नागिरी अशी तिथी दिली आहे. तारीख व इंग्रजी महिना नाही. सीतारामपंतांनी दुसऱ्या आवृत्तीत कुंडलीतील ग्रहफलांबाबत भाष्य केले नसते तर त्यांनी दिलेली कुंडलीच स्वीकारली गेली असती. परिणामत: त्याबरोबर दिलेली तिथीही स्वीकारली गेली असती. त्या कुंडलीखालील तिथीला तारीख ७ ऑक्टोबर १८६६ ही तारीख येत असल्याचे दत्तोपंतांनी निदर्शनास आणले आणि ते बरोबर आहे.
७ नोव्हेंबर १९०५ रोजी केशवसुतांचे निधन झाले. केशवसुतांच्या निधनानंतर त्यांच्या कवितांच्या हस्तलिखिताच्या वह्य़ा व इतर कागदपत्रे उज्जनला मोरोपंतांकडे पाठविण्यात आल्या. त्या वह्य़ा १९१३ पर्यंत त्यांच्याकडे तशाच पडून होत्या. १९१३ साली मोरोपंतांच्या अपघाती निधनानंतर त्या सीतारामपंतांनी पुण्याला आणल्या. त्यानंतर १९२१ मध्ये सीतारामपंतांनी केशवसुतांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित केला. ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’कार असलेल्या मोरोपंतांची उदासीनता पाहता त्यांचा हवाला देत किरातांनी दिलेली जन्मतिथी तरी कितपत अचूक मानायची हा प्रश्नच आहे.
प्रश्न एवढाच की असले निर्णय हे कुंडली फलावरून ठरविणे हे वस्तुस्थितीला धरून आहे काय?
दत्तोपंतांची खंत
दत्तोपंत दामले यांनी मात्र ७ ऑक्टोबर १८६६ या तारखेचा हट्ट कायम ठेवीत, आपल्यापुरता हा वाद मिटल्याचे जाहीर केले. दत्तोपंतांनी जो पत्रव्यवहार केला त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या उत्सव समितीने ७ ऑक्टोबर १९६६ पासून आठवडाभर उत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्याकडे लक्ष वेधून ‘‘या जन्मतिथीविषयी साधकबाधक चर्चा झाली असली तरी त्याचा निर्णय कोणीच दिला नाही, समितीनेही नाही’’ अशी खंतही दत्तोपंतांनी व्यक्त केली. दत्तोपंत दामले यांची ही खंत खरी आहे. जन्मशताब्दी वर्षांपासून तो आजतागायत केशवसुतांच्या जन्मतारखेबद्दल कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.
यथामूल आवृत्तीतील नोंद-
केशवसुत जन्मशताब्दीनिमित्त केशवसुतांच्या कवितांच्या हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. केशवसुत जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी केशवसुतांच्या कवितांच्या हस्तलिखित यथामूल १४ आवृत्तीला जोडलेल्या प्रास्ताविकात
७ ऑक्टोबर १८६६ ही जन्मतारीख नमूद केली असून, या यथामूल आवृत्तीत समाविष्ट करण्यात आलेल्या केशवसुतांच्या छायाचित्राखालीही, जन्म ७ ऑक्टोबर १८६६ अशी नोंद केली आहे.
केशवसुत जन्मशताब्दीनिमित्त उत्सव समितीने कोणताच निर्णय केला नाही अशी खंत दत्तोपंत दामले यांनी व्यक्त केली आहे. मात्र केशवसुत जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या उत्सव समितीने
७ ऑक्टोबर १९६६ पासून आठवडाभर उत्सव साजरा केला. यथामूल आवृत्तीतील जन्मतारखेचे उल्लेख आणि ७ ऑक्टोबरपासून जन्मशताब्दी उत्सव साजरा करणे याचा अर्थ, केशवसुतांची जन्मतारीख ७ ऑक्टोबर आहे हे समितीला मान्य आहे, असा होतो.
या वादाचा समीक्षेवर परिणाम-
जन्मतारखेविषयीच्या या वादाचा परिणाम १९६६ नंतरच्या लेखनात जाणवतो. रा. श्री. जोग यांच्या सारख्या ज्येष्ठ समीक्षकाची झालेली द्विधा अवस्थाही जाणवते. ‘हरपले श्रेय’ या कवितासंग्रहाला जोडलेल्या ‘केशवसुतांचा चरित्रपट’मध्ये,
१९५६ च्या आवृत्तीत १५ मार्च ही जन्मतारीख दिली आहे; तर १९६४ च्या पुनर्मुद्रित आवृत्तीत ‘७ ऑक्टोबर’ ही तारीख प्रा. जोगांनी नमूद केली आहे. ‘केशवसुत – काव्यदर्शन’ या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत तर केशवसुतांच्या चरित्रपटात जन्मतारीख म्हणून ‘१५ मार्च किंवा ‘७ ऑक्टोबर’ या दोन्ही तारखा रा. श्री. जोग १५ नमूद करतात.
केशवसुतांवर समीक्षात्मक लेखन करणाऱ्या काहींनी ‘१५ मार्च’ तर काहींनी ‘७ ऑक्टोबर’ ही जन्मतारीख मानली आहे. डॉ. अ. ना. देशपांडे लिखित ‘आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास’ यामध्ये जन्म-मृत्यूचे वर्ष तेवढे दिले आहे. मात्र १९९२ मध्ये काढण्यात आलेल्या या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीला जोडलेल्या पुरवणीत, पुरवणी लेखक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे १६ यांनी
‘१५ मार्च १८६६’ या जन्मतारखेचा स्वीकार केला असून दत्तोपंतांनी उपस्थित केलेल्या वादाकडेही लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड पाचवा’ १७ मध्येही जन्म व मृत्यूचे वर्ष तेवढे दिले असून तारखा दिलेल्या नाहीत.
‘अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक’ या ग्रंथातील माधवराव पटवर्धन यांच्या ‘केशवसुत’ या लेखाच्या सुरुवातीला केशवसुतांची जन्मतारीख ‘७ ऑक्टोबर’ ही नमूद केली आहे. तळटिपेत त्याबद्दल खुलासा करताना ‘‘केशवसुतांची जन्मतारीख १५ मार्च की ७ ऑक्टोबर असा वाद झाला असता दामले कुटुंबीयांचे ‘७ ऑक्टोबर’ हे म्हणणे सयुक्तिक वाटल्यामुळे ते स्वीकारले’ असल्याचे संपादक गं. दे. खानोलकर १८ यांनी नमूद केले आहे. तर १९९९मधील ‘अर्वाचीन मराठी काव्यदर्शन’ या ग्रंथात डॉ. अक्षयकुमार काळे १९ यांनी केशवसुतांची जन्मतारीख १५ मार्च १८६६ दिली आहे.
‘संपूर्ण केशवसुत’ संपादित करणाऱ्या शकुंतला क्षीरसागर यांनी फक्त जन्मवर्ष १८६६ दिले आहे. मात्र जन्मतारखेविषयी वाद असल्याचा उल्लेख केला असून ‘..दामले कुटुंबीयांनी एकमुखाने सुचवलेली व समारंभ साजरा करण्यास सोयीची म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या जन्मशताब्दी समारोह समितीने ७ ऑक्टोबर या तारखेपासून उत्सव साजरा केला ’ असे नमूद केले आहे. विविध ग्रंथातील या वेगवेगळ्या नोंदींमुळे अभ्यासकांचा मात्र गोंधळ होतो.
रा. श्री. जोग यांचा अभिप्राय-
‘‘केशवसुतांची जन्मतिथी त्यांच्या काव्याच्या अभ्यासाच्या किंवा आस्वादाच्या दृष्टीने उपयुक्त अथवा आवश्यक आहे असे अर्थात नाही’’, ‘‘केशवसुतांच्या काव्याच्या आस्वादाच्या दृष्टीने त्याला काही महत्त्व नाही’’ असे रा. श्री. जोग यांनी ‘केशवसुत काव्यदर्शन’मध्ये (पृ. ३१,३१) नमूद केले आहे.
प्रभाकर माचवे यांचे विधान
वरवर पाहता जोगांचे विधान सामान्य वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र या जन्मतारखेच्या वादामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आढळते. उदाहरणार्थ प्रभाकर माचवे यांनी केशवसुतांच्या निवडक चौदा कवितांचा िहदीमध्ये अनुवाद केलेला ‘ केशवसुत’ हा संग्रह साहित्य अकादेमी, नवी दिल्ली यांनी प्रसिद्ध केला. या संग्रहात केशवसुतांच्या परिचयात्मक माहितीत पहिल्याच पानावर ‘‘ केशवसुत हाल के कवि है और फिर भी उनकी जन्मतिथी के विषय ने एक मत्य नही है!’’ असे, तर ‘जीवनी’ या शीर्षकाखालील माहितीत ‘‘केशवसुत की जन्मतिथी और जन्मस्थान दोनों विवाद के विषय है’’ असे पहिलेच वाक्य आहे. केशवसुतांचा जन्म मालगुंडला झाला हे स्पष्ट असताना ‘जन्मस्थानाच्या विवादाचा’ उल्लेख चुकीचा ठरतो. याचा विचार केला की या ‘निर्थक वादावर’ तोडगा काढण्याची गरज अधोरेखित होते.
१८८९ ते २००० या कालावधीतील केशवसुतांवरील समीक्षेचा अभ्यास करता असे आढळते की, अनेक बाबतीत समीक्षक मुळापर्यंत जाऊन शोध घेत नाहीत. पूर्वसुरींचा आधार घेत विवेचन करतात. सीतारामपंतांनी कुंडलीखाली दिलेल्या तिथीला १५ मार्च नव्हे तर ७ ऑक्टोबर ही तारीख येते ही बाब १९६५ साली दत्तोपंतांनी निदर्शनास आणेपर्यंत एकाही समीक्षकाच्या लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते.
‘मराठी साहित्याचा इतिहास’ लिहिणाऱ्या व्यक्ती वा संस्थांनी या बाबी इतक्या सहजपणे का घ्याव्यात? केशवसुतांच्या जन्मतारखेविषयी, मराठी साहित्याच्या अभ्यासकांचा संभ्रम टाळण्यासाठी समीक्षकांनी, मराठी साहित्य संस्थांनी याकडे गंभीरपणे लक्ष का देऊ नये?
केशवसुतांच्या जन्माला २०१६मध्ये दीडशे वष्रे होतील. म्हणूनच या वर्षांत केशवसुतांच्या जन्मतारखेबाबत सविस्तर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.
डॉ. सुभाष गढीकर – response.lokprabha@expressindia.com