तबस्सुम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीव्ही-रेडिओवर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, निवेदन ही आज अगदी आम गोष्ट झाली आहे. पण ती अगदी नवीन सुरू झाली तेव्हाच्या काळात या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या तबस्सुम यांनी मांडलेली  त्यांच्या काळाची गोष्ट अर्थात त्यांच्या कारकीर्दीची प्लॅटिनम ज्युबिली

मी १९४७ मध्ये बेबी तबस्सूम म्हणून माझं करिअर सुरू केलं, तेव्हा तीन वर्षांची होते. माझ्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं नर्गिस. हिरॉइन होती नर्गिस आणि हिरो होते रेहमान. मी छोटय़ा नर्गिसचं काम करत होते. माझी मोठी आणि चांगली भूमिका होती. तेव्हापासून आजपर्यंत काम करते आहे अशी मी एकमेव स्त्री कलाकार आहे. मी आजपर्यंत सहा माध्यमांमधून काम केलं आहे. अजूनही करते आहे. आज माझं वय आहे ७५ र्वष. मला सिनेमात काम करायला लागूनच ७२ र्वष झाली आहेत. रेडिओवरही काम करायला लागून ७२ र्वष झाली आहेत. १९४५चं आकाशवाणीचं एक मासिक आहे, त्यात मुखपृष्ठावर तेव्हा माझं छायाचित्र प्रसिद्ध झालं होतं. मी तेव्हा ‘फुलवारी’ नावाचा लहान मुलांचा कार्यक्रम करत असे. १९४८ पासून मी ऑल इंडिया रेडिओवर रेडिओ जॉकी म्हणून काम केलं आहे. माझे आईवडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक होते, पत्रकार होते. ते स्वत:चं मासिक काढत. अली सरदार जाफरी, कैफी आझमी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी हे तेव्हा आमच्या मासिकात लिहीत. माझं लहानपण या लोकांच्या अंगाखांद्यावर गेलं आहे. मला तेव्हा शायरीचीही खूप आवड होती. त्यानंतर टीव्ही आला. मुंबई दूरदर्शनवर १९७२ मध्ये ‘फूल खिले है गुलशन गुलशन’ हा सगळ्यात पहिला कार्यक्रम माझाच होता. हा कार्यक्रम १९९३ पर्यंत म्हणजे २१ वर्षे सुरू होता. इतकी र्वष सलग सुरू असलेला कार्यक्रम हा एक विक्रमच आहे. त्याबरोबरच माझे स्टेजवरही कार्यक्रम सुरू होते. लहान असताना मी स्टेजवरून लहान मुलांचे कार्यक्रम करत असे. या कार्यक्रमांनाही आता ७३ वर्षे झाली. कोणीही संगीतकार असा नाही, फिल्म कलाकार असा नाही, ज्याच्याबरोबर मी लाइव्ह शो केलेले नाहीत. सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल ५० वर्षे मी कल्याणजी-आनंदजी यांच्याबरोबर लाइव्ह शो केले. मोठी झाल्यावर मी एक-दोन सिनेमे केले. म्हणजे त्यांची निर्मिती केली, दिग्दर्शन केलं, त्यांची गाणी, पटकथा लिहिली. त्यानंतर माझा मुलगा आणि नातींनी या दोघांनीही मला आजच्या काळातल्या ऑनलाइन माध्यमात काम करायला सुचवलं. त्यांचं म्हणणं होतं की, मी माझ्या काळातल्या सगळ्या माध्यमांमधून काम केलं आहे; पण आजचं माध्यम आहे इंटरनेट. तिथे मी असायला हवं. त्यामुळे मी इंटरनेटवर ‘तबस्सुम टॉकीज’ नावाचं माझं चॅनल तयार केलं आहे. ७० वर्षांचे अनुभव, वेगवेगळ्या गोष्टी तिथे मी लोकांना सांगते. चार-पाच मिनिटांचे छोटे छोटे कार्यक्रम आहेत. आता त्याचे २०० एपिसोड झाले आहेत. या कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

गेली ७० वर्षे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. मी जे बोलते ते ऐकून लोक खात्री करून घेतात. आजचे निवेदक मला सांगतात की, तुमच्या या कार्यक्रमामुळे आम्हाला जुन्या काळातली दुर्मीळ माहिती मिळते. हे मोठं काम आहे. अर्काइव्हमध्ये त्यांच्याकडेही माहिती नाही, ती माझ्याकडे आहे. लहान, मोठे सगळ्यांनाच हा कार्यक्रम आवडतो. मला अनेकदा विचारलं जातं की, आजच्या अँकर्सना, निवेदकांना तुम्ही स्टाईल दिली आहे. आज जे अँकरिंग शिकू पाहतात, त्यांच्यासाठी कोर्सेस असतात. तुमच्या वेळी हे काहीच नव्हतं, तर तुम्ही निवेदक म्हणून स्वत:ला कसं विकसित केलं? अशा वेळी मी सांगते की, अँकरिंग ही मला मिळालेली देवदत्त देणगी आहे. मी हे सगळं शिकण्यासाठी कुठेही गेले नाही. माझं व्यक्तिमत्त्व घडलं ते माझ्या आईवडिलांमुळे. माझे वडील पंजाबी हिंदू होते. ते भगतसिंग यांच्या सहकाऱ्यांपैकी होते, स्वातंत्र्यसैनिक होते. माझी आई मुस्लीम, पठाण होती. तिच्या कुटुंबातले सगळे लोक खूप शिकलेले होते. माझ्या आईवडिलांचं, दोघांचंही असं म्हणणं होतं की, कुणालाही आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर त्याने नीट शिक्षण घेतलं पाहिजे. मी इतक्या वर्षांचं करिअर केलं, त्यामागे माझी शिक्षणाने तल्लख झालेली बुद्धी आहे. त्यात अंध:कार नाही. मी प्रत्येक गोष्ट नीट विचार करून बोलते, करते. माझ्यावर देवाची कृपा असल्यामुळे माझा मेंदू जे बोलतो, ते माझी जीभ लगेच बोलते. मी उर्दू साहित्यात बीए केलं आहे. मी जे उर्दू बोलेन, ते लोकांना समजेल असं सोपं असेल याची मी जाणीवपूर्वक काळजी घेते. मी सोपे सोपे शब्द वापरते, एखादा अवघड शब्द आलाच तर त्याचा हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये अर्थही सांगते. लोकांना हे सगळं फार आवडतं. ते मला सांगतात की, तबस्सुमजी, तुमचा कार्यक्रम बघून बघून आम्हाला उर्दू यायला लागली आहे.

गेली १०-१२ वर्षे टीव्ही एशियावर माझा एक तासाचा एक शो सुरू आहे. त्याचं शीर्षक ‘अभी तो मैं जवान हूं’. हा कार्यक्रमही लोकांना खूप आवडतो आहे. ‘तबस्सुम टॉकीज’ या कार्यक्रमात मी जे पाच-सात मिनिटांत दाखवते, ते या कार्यक्रमात तासभर चालतं. सिनेमासृष्टीतल्या एकेका व्यक्तीचं पूर्ण जीवन या तासाभरात दाखवलं जातं.

मी आजी झाले आहे तरी लोक माझ्या नावाच्या मागे बेबी लावतात, याची मला गंमत वाटते. मला एकच मुलगा. त्याचं नाव आहे होशिंग गोगल. तर सून हेमाली गुजराती ब्राह्मण आहे. माझ्या घरात सगळा भारत एकवटला आहे. राष्ट्रीय एकात्मता माझ्या घरातच आहे. आमच्याकडे खाणंपिणं, धर्म कशावरही सासू-सून- नवरा-बायको यांच्यामध्ये कधीही भांडणं झालेली नाहीत. म्हणूच कदाचित माझं इतकं वय झालं असलं तरी लोकांना मी आवडते. बेबी तबस्सुम हे नाव आजही माझ्याशी जोडलं गेलं आहे. मी एखाद्या कार्यक्रमाला गेले आणि तिथे मला सन्मानचिन्ह मिळालं तर त्यावरही ‘सीनियर सिटिझन बेबी तबस्सुम’ असं लिहिलेलं असतं. मी मोठमोठय़ा कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यात माझं नाव सगळ्यात शेवटी यायचं. म्हणजे दिलीपकुमार, नर्गिस अ‍ॅण्ड बेबी तबस्सुम, मीनाकुमारी, अशोककुमार अ‍ॅण्ड बेबी तबस्सुम.. तर तेव्हा लहानपणी मला वाटायचं की हे अ‍ॅण्ड हा माझ्या नावाचाच भाग आहे. त्यामुळे कुणी मला कधी विचारलं की बेटा तुझं नाव काय, तर मी सांगायचे की अ‍ॅण्ड बेबी तबस्सुम.

(संपूर्ण लेखासाठी वाचा लोकप्रभा दिवाळी अंक २०१९. बाजारात सर्वत्र उपलब्ध)

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokprabha diwali issue 2019 tabassum
First published on: 06-11-2019 at 17:37 IST