व्यक्तिचित्रण म्हटल्यावर थोरामोठय़ांच्या आयुष्याचा पट उलगडणारं काहीसं एकसुरी धाटणीच्या पुस्तकांची आठवण येते. पण वामन वाईकर या मराठवाडय़ातील अध्यापक लेखकांचे ‘सलगी’ हे पुस्तक त्याबाबतील वेगळी वाट चोखाळणारे आहे. हे छोटेखानी पुस्तक तसे त्यांच्याच प्रसिद्ध झालेल्या अनेक लेखांचे संकलन तर आहेच, पण अनेक नव्या व्यक्तीचित्रणांचादेखील त्यात समावेश आहे. काहींबरोबर त्यांची थेट सलगी झालेली, तर काहींच्या कार्याशी सलगी ठेवलेली. त्यामुळे यात गदिमा, वसंत बापट, नरहर कुरुंदर, ग्रेस द.भि. कुलकर्णी अशी मोठी नावं तर येतातच; पण आपल्याच परिसरात वावरणाऱ्या अनेक स्थानिकांचादेखील त्यात समावेश असतो. परभणी जिल्ह्य़ातील चारठाण या ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेल्या गावातील स्वातंत्र्य संग्रामाशी निगडित लेक, तर परभणी, औरंगाबाद, नांदेड अशा जिल्ह्य़ांच्या ठिकाणी विविध साहित्य, संगीत चळवळी करणारे धडपडे, सामाजिक कार्यकर्ते अशांची ओळखदेखील यातून होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द. भि. कुलकर्णीचा आणि त्यांचा चांगलाच स्नेह असल्यामुळे द. भि.वरील तीन वेगवेगळ्या लेखातून द.भि. उमजणे सहज झाले आहे. थोरामोठय़ांशी थेट संबंध आला नसला तरी त्यांच्या कार्याचा एकंदरीतच लेखकावर झालेला परिणाम त्यांच्या लेखात उमटतो. चारठाण्याचे विनायक  चारठाणकर यांच्या बैठकीत त्यांना अशी अनेक माणसे सापडली. त्यांच्याशी स्नेह जडला. अष्टपैलू विनायकराव चारठाणकर, चित्रकर्मी भगवान भालेराव, गायक हरिभाऊ, ललिक कला मंडळातील डॉ. गुलाम रसूल, दादासाहेब चारठाणकर, हैद्राबाद मुक्तीसंग्रामाची पाश्र्वभूमी लाभलेले लढवय्ये व खवय्ये डॉ. किशनराव चारठाणकर अशा अनेक विविधांगी व्यक्ती या पुस्तकातून भेटतात. मराठवाडय़ातील परभणी, नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्य़ातील अनेक छोटी मोठी व्यक्तिमत्त्वे आपणास उमगतात. मूळ प्रवाहात अशा लोकांना पूर्णत: स्थान मिळतेच असे नाही. ती उणीव या पुस्तकाने भरून निघाली आहे.
‘सलगी’, लेखक – वामन वाईकर, प्रकाशन – रेणुका प्रकाशन, पृष्ठसंख्या – १३६, मूल्य  – रु. १३०/-, 

२६/११ चा दस्तऐवज
मुंबईवर झालेला हा दहशतवादी हल्ला अनेक कारणांनी गाजला. त्यावर वृत्तपत्रांतून, मासिकांमधून लिहिले गेले. तर अनेक पुस्तकंदेखील आली. अर्थातच ही घटनाच इतकी  थरारक होती त्याचा असा सर्वागाने वेध घेणे आपोआपच झाले. अशोक बेंडखळे यांचे ‘२६/११ ची शौर्यगाथा’ हे पुस्तक याच घटनेचा वेगळ्या पद्धतीने वेध घेणारे आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ हल्ला कसा झाला, काय झाले हे सांगत नाही तर त्यानिमित्ताने आलेल्या वेचक बातम्या आणि लेखांचे संकलन करणारे आहे. हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी खूप काही छापून आले. त्यातील नेमकं लेखन त्यामुळे एकाच ठिकाणी वाचण्यास मिळते. पोलीस दलाची ओळख तर होतेच, पण त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नजरेतून एक त्यांचे विश्व पाहावयास मिळते. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर या तीन पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच या हल्ल्यात शहीद झालेल्या १३ सहकाऱ्यांबद्दलची थोडक्यात माहिती हा महत्त्वाचा भाग म्हणावा लागेल.

अशा प्रकारच्या पुस्तकांची आपल्याकडे कमतरता असते. त्यामुळे हा प्रयोग स्तुत्य आहे, पण त्यात अजूनही माहितीची आणि थोडी चिकित्सक वृत्तीची आवश्यकता होती हे मात्र नमूद करावे लागले.
‘२६/११ ची शौर्यगाथा’, लेखक – अशोक बेंडखळे, प्रकाशन – संधिकाल प्रकाशन, पृष्ठसंख्या – ९२,  मूल्य – रु. ९०/-

कथा रुग्णप्रवासाची आणि रुग्णव्यवस्थेचीदेखील
साधारणपणे एखाद्या रोगाचे निदान ते त्यावरील उपाचार असा प्रवास ही त्या रुग्णाची वैयक्तिक घटना. पण तीच जर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञाने रेखाटली असेल तर त्याला अनेक वेगळे कंगोरे असतात. ‘द पेशंट’ हे पुस्तक असेच एका रुग्णाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाच्या आरोग्यव्यवस्थेचा प्रवास घडवून आणणारे आहे. डॉ. मोहम्मद खाद्रा या सिडनी येथील सर्जरीच्या प्राध्यापकांनी लिहिलेले हे पुस्तक थेट फर्स्ट हॅण्ड अनुभव कथन म्हणावे असेच आहे. ऑस्ट्रेलियातील एका सार्वजनिक रुग्णालयात लघवीच्या तक्रारीसाठी तपासणीसाठी आलेला रुग्ण, त्याच्या आजाराचे निदान, त्यावरील शस्त्रक्रिया हे सारं मांडताना त्या देशातील एकूणच रुग्णव्यवस्थेचा लेखाजोखा उभा राहतो. डॉ. खाद्रा यांची लेखनशैली उत्तम तर आहेच, पण अनेक घटनांची मांडणी या एका रुग्णाभोवती करत त्यांनी सत्यकथा चांगलीच चित्तरकथा केली आहे. मुळात ते स्वत:च डॉक्टर असल्यामुळे साऱ्या खाचाखोचा अगदी तपशीलवार पण रटाळ न होऊ देता येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील अनेक बदलांशी त्या जोडल्या जातात. गोपनीयतेचा नियम जपण्यासाठी नावात केलेला बदल सोडल्यास ते काहीच लपवत नाहीत. अगदी स्वत:चा कर्करोगदेखील. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे केवळ एक सनसनाटी न राहता अंर्तमुख करणारे लेखन म्हणून वाचावे असेच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पुस्तकाचा अनुवाद हादेखील एका डॉक्टरांनी केला असल्यामुळे तो मूळ लिखाणाइतकाच प्रभावी झाला आहे.
‘द पेशंट’, लेखक – डॉ. मोहम्मद खाद्रा, अनुवाद – डॉ. देवदत्त केतकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठसंख्या- १८०, मूल्य रु. १९०/-
response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book review
First published on: 11-03-2016 at 01:17 IST