scorecardresearch

Premium

फॅमिली डॉक्टर : प्रदूषण, अ‍ॅलर्जीचा खोकला आणि आपण

वाढत्या प्रदूषणाचा दृश्य परिणाम म्हणजे अ‍ॅलर्जीमुळे होणाऱ्या विविध आजारांमध्ये वाढ.

pollution, allergy
खोकला हे कॅन्सरच्या अनेक लक्षणांपकी एक लक्षणही असू शकतो.

वाढत्या प्रदूषणाचा दृश्य परिणाम म्हणजे अ‍ॅलर्जीमुळे होणाऱ्या विविध आजारांमध्ये वाढ. अ‍ॅलर्जी हे तुमची प्रतिकारशक्ती वेगळ्या पद्धतीने काम करत असल्याचे लक्षण आहे.

अलीकडच्या काळात प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यातला एक नेहमी आढळून येणारा आजार म्हणजे खोकला. श्वसनसंस्थेच्या कोणत्याही भागाला झालेला दाह म्हणजे खोकला असे म्हणता येईल. आपल्याला खोकला होतो, कारण श्वसनसंस्थेला नको असलेला पदार्थ बाहेर टाकायचा शरीरसंस्था प्रयत्न करत असते. खोकला हे त्याचे लक्षण आहे. त्यासाठी हवेचा जोर निर्माण करून जोरात श्वास घेऊन तो कोंडून बाहेर फेकला जातो. त्यामुळे आपल्याला खोकला किंवा िशक येते.

Temperature Fluctuations, increasing, Health Issues, Doctors, advise, caring, body parts, pune,
तापमानातील चढ-उतारामुळे आरोग्याला धोका! आरोग्यतज्ज्ञ सांगताहेत कशी काळजी घ्यावी…
Shortage of pulses and the challenge of food inflation
Money Mantra : क कमॉडिटीचा : कडधान्य व्यापाऱ्यांची ‘ऐशीतैशी’; आत्मनिर्भरतेचा चंग
black seed oil benefits
फक्त दोन ते तीन आठवड्यांमध्ये कलौंजीचे तेल त्वचा, केस अन् आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते का?
pune pollution marathi news, pune pollution respiratory disease marathi news, respiratory diseases pune youths marathi news,
बदलती जीवनशैली, प्रदूषणामुळे श्वसनविकाराचा धोका वाढतोय! आरोग्यतज्ज्ञ म्हणतात, वेळीच लस घ्या…

खोकला दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे संसर्गजन्य आणि दुसरा संसर्गजन्य नसलेला. आता हे दोन्ही प्रकार ओळखायचे कसे? तर जंतूंमुळे होणाऱ्या म्हणजेच संसर्गजन्य खोकल्याची लक्षणे वेगळी असतात. त्यात ताप येतो. प्रचंड प्रमाणात घसादुखी होते. छातीच्या मधल्या भागात दाह होतो. ताप हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण असते. संसर्गजन्य खोकल्यामध्ये कफाचा रंग पिवळा, हिरवा किंवा गंजाच्या रंगाचाही असतो. या प्रकारचा खोकला झालेली व्यक्ती साधारण सहा फुटावरून खोकली तरी तिच्यापासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. मुख्य म्हणजे संसर्गजन्य प्रकारातला खोकला हळूहळू वाढतो. अचानक जोरात सुरू होत नाही.

तर खोकल्याचा दुसरा प्रकार आहे, संसर्गजन्य नसलेला म्हणजेच अ‍ॅलर्जीमुळे येणारा खोकला. अ‍ॅलर्जी हे भरकटलेल्या प्रतिकारशक्तीचे लक्षण आहे किंवा असे म्हणता येईल की, अ‍ॅलर्जी हे तुमची प्रतिकारशक्ती वेगळ्या पद्धतीने काम करत असल्याचे लक्षण आहे. म्हणजे असे की, आसपास खूप धूळ असेल तर एखादे शरीर त्याकडे दुर्लक्ष करते, तर एखादे शरीर त्या धुळीशी भांडताना स्वत:च्या पेशींशी भांडते. त्यालाच आपण अ‍ॅलर्जी असे म्हणतो.

या प्रकारातल्या खोकल्याचा संसर्ग होत नाही. या प्रकारच्या खोकल्यामध्ये आपली स्वत:ची प्रतिकारशक्ती आपल्याच पेशींशी लढते. रोग निर्माण झाल्यासारखी स्थिती आपल्या शरीरात निर्माण होते. या खोकल्याच्या प्रकारात ताप येत नाही. कफही सहसा पांढऱ्या रंगाचा आणि अगदी थोडय़ा प्रमाणात असतो. या खोकल्याची सुरुवात घसा दुखून होत नाही. तो थेट सुरू होतो. तो सहसा रात्री वाढतो असे दिसते. या प्रकारच्या खोकल्यात छातीतून च्युंई असा आवाज येत राहतो. श्वसनमार्ग आकुंचन पावल्यामुळे तसा आवाज येतो. हा खोकला हळूहळू वाढत नाही, तर तो एकदम येतो.

अ‍ॅलर्जीमुळे होणारा खोकला असे म्हटले की, आपोआपच पुढचा प्रश्न असतो की, ही अ‍ॅलर्जी नेमकी कशाची असू शकते? तर ती अनेक गोष्टींची असू शकते. वाहनांमुळे होणाऱ्या हवेतल्या प्रदूषणाची असू शकते. परागकणांची असू शकते. धुळीची असू शकते. उदबत्तीच्या धुराची असू शकते. डास पळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉइल्सची असू शकते. कुत्र्या-मांजरांसारखे पाळीव प्राणी, कोंबडय़ा, बदके, कबुतरांसारखे पक्षी यांच्या कोंडय़ामार्फत (अ‍ॅनिमल डेन्ड्रफ) होऊ शकते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे सुरू असतात, त्यातून उडणाऱ्या धुळीमार्फत होऊ शकते. फíनचरचे काम, सुतारकाम, रंग लावण्याआधी भिंती घासल्या जाताना उडणारी धूळ अशा वेगवेगळ्या घटकांची अ‍ॅलर्जी होऊन खोकला होऊ शकतो. अ‍ॅलर्जी होते तेव्हा अनेकदा रक्तातली इयोजिनोफिल नावाची पांढरी पेशी वाढलेली दिसते; पण ती वाढली म्हणजे प्रत्येक वेळेला अ‍ॅलर्जीचा खोकला होईलच असे नाही. ती वाढणे हे खोकल्याचे व्यवच्छेदक लक्षण नाही, पण अनेक लक्षणांपकी एक लक्षण आहे.

टीबी होतो तेव्हाही खोकला होतो; पण टीबीचा खोकलाही एकदम होत नाही. तो हळूहळू वाढत जातो आणि टीबी वाढतो तेव्हा ताप येणे, थुंकीतून रक्त पडणे असे प्रकार घडतात.

खोकल्याचे आणखी एक कारण म्हणजे डस्टमाइट. घरातल्या भिंतींना ओल असते तेव्हा त्यात अतिशय सूक्ष्म किडे तयार होतात. त्यांची विष्ठा अतिशय सूक्ष्म असते. तिच्यातून अनेकांना अ‍ॅलर्जी होऊन खोकला होऊ शकतो. आपण झोपतो तेव्हा ही विष्ठा आपल्या अंथरुणावर, पांघरुणावर पडते. सकाळी अंथरूण आवरून घडय़ा घालताना, झटकताना ती नाकातोंडात जाऊन खूप लोकांना शिंका येतात किंवा खोकला होतो. अ‍ॅलर्जीमुळे खोकला झाला असेल तर त्याच्या रक्ततपासणीत सहसा काहीच सापडत नाही. जंतूमुळे झालेला म्हणजे संसर्गजन्य खोकला असेल तर तो तपासण्यांमधून कळू शकतो. व्हायरल खोकल्यात लिम्फोसाइट्स वाढलेल्या दिसतात. टीबीमध्ये ईएसआर वाढलेला समजतो. इएसआर वाढणे हे सगळ्या शरीरात रोग वाढल्याचे लक्षण असते.

धूम्रपान करणारी व्यक्ती सहसा सकाळी उठल्याउठल्या खोकते. पहिली सिगारेट ओढल्यावर तिचा खोकला कमी होतो, कारण तिच्या  श्वसनमार्ग साफ करणाऱ्या सिलियरी (ciliary) म्हणजे पेशींचे जे आवरण असते त्याचे काम एक सिगारेट ओढल्यावर सहा-सात तास बंद होते. त्यामुळे त्या भागात कफ साठतो. तो खराब होतो किंवा पिकतो असे म्हणू या. सतत सिगारेट ओढल्यावर ते कायमचे बंद होते आणि श्वसनसंस्थेचे होणारे नुकसान भरून येत नाही. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांना वाटते की, सिगारेट ओढल्यावर सहा-सात तास आपल्याला खोकला येत नाही. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते. मुख्य म्हणजे सततच्या धूम्रपानामुळे श्वसनमार्गाची रुंदी हळूहळू कमी होत जाते.

खोकला हे कॅन्सरच्या अनेक लक्षणांपकी एक लक्षणही असू शकतो. त्यामुळे १५ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला सुरू असेल, वय जास्त असेल, धूम्रपानाची सवय असेल, वजन वेगाने कमी होत असेल, भूक कमी झाली असेल तर वेळीच तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरते. पूर्वी आपल्याकडे डांग्या खोकल्याचे रुग्ण आढळायचे. खोकून खोकून उलटय़ा होईपर्यंत रुग्णाची मजल जायची; पण ट्रिपल पोलिओ लसीकरणातील ट्रिपलच्या लसीकरणामुळे हा डांग्या खोकला कमी झाला. कधीकधी रक्तदाब वाढल्यावरही खोकला येतो. तो मात्र तपासून घेणे आवश्यक असते. दुचाकीवरून जास्त प्रमाणात फिरणाऱ्या लोकांना अ‍ॅलर्जीचा खोकला जास्त प्रमाणात होतो, असे आढळून आले आहे. याचबरोबर पोटात जंत असतील तरीही खोकला होतो.

pollution-police

अ‍ॅलर्जीच्या खोकल्याचे वैशिष्टय़ म्हणजे ज्यामुळे तो होतो त्या परिस्थितीपासून रुग्ण दूर गेला, अथवा ती परिस्थिती नाहीशी झाली, की खोकलाही नाहीसा होतो आणि ज्यामुळे तो खोकला होतो ते वातावरण तसेच राहिले तर तो बरा होत नाही. याउलट संसर्गजन्य खोकल्यात औषधोपचार करून तो संसर्ग बरा झाला की खोकलाही बरा होतो.

टीबीमुळेही खोकला होतो; पण टीबीचा विषाणू थोडा दुबळा असतो. तो शरीरात शिरून त्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी व्हायची वाट पाहत राहतो किंवा हळूहळू नष्ट होतो. तो कोरडय़ा हवेतदेखील जिवंत राहू शकतो. टीबी सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर टीबीचा विषाणू थुंकीतून बाहेर पडून फैलावत नाही. रुग्णाने वेळेवर औषधोपचार सुरू केले तर तीन-चार आठवडय़ांत टीबीचे जंतू बाहेर पडून संसर्ग व्हायची प्रक्रिया नियंत्रणात येते.

प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांत सतत होणारी सर्दी हा एक घटक आहे. तिचे लक्षण म्हणजे नाकाला गुदगुल्या होतात. खाज सुटते, डोळ्यांतून- नाकातून पाणी येते. सटासट िशका येतात. सहसा ताप येत नाही. अर्थात प्रदूषणामुळे सगळ्यांनाच अ‍ॅलर्जी होते असे नाही. काहींना होते, काहींना नाही. फेक्सोफेनेडिन (Fexofenadine) किंवा लॅव्होसेट्रिझीन  (Levocetrizine) अ‍ॅलर्जीची सर्दी अथवा खोकला कमी करू शकते. त्याच्या गोळ्या सिरप, लहान मुलांसाठीचे औषध उपलब्ध आहे. अर्थातच ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

लॅव्होसेट्रिझीनमुळे थोडीशी सुस्ती येण्याची शक्यता असते. खोकल्याची दोन प्रकारची औषधे असतात. कोडीनसारखी खोकला दाबणारी औषधे, तर दुसरी कफ पातळ करणारी औषधे. खोकल्याच्या औषधांबाबत लोकांचा असा गरसमज असतो की, औषध घेतले की आपल्या शरीरातला कफ शौचावाटे किंवा उलटीवाटे बाहेर पडतो. माझ्या औषधामुळे कफ शौचावाटे बाहेर पडेल असेही काही डॉक्टर सांगतात; पण ते चुकीचे असते. खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या काही औषधांचा साइड इफेक्ट होऊन जुलाब होतात. ती कफ पातळ होऊन बाहेर पडण्याची प्रक्रिया नसते, तर साइड इफेक्ट असतात. महत्त्वाचे म्हणजे हा असा अ‍ॅलर्जीचा खोकला कधीकधी स्टिरॉइड दिल्याशिवाय जात नाही.

वृद्ध माणसांनाही अनेकदा खोकला होतो. मात्र त्यामागचे कारण म्हणजे त्यांच्या श्वासाची प्रक्रिया दुबळी झालेली असते. त्यांच्या फुप्फुसाच्या खालच्या भागात कफ साठतो आणि त्या कफात जंतूंचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी त्यांनी ज्यायोगे खोलवर श्वास घेतला जाऊ शकतो असे प्राणायामाचे प्रकार करावेत. कफ पातळ करण्यासाठी सगळ्यात साधा सोपा उपाय म्हणजे वाफ घेणे. त्यासाठीच्या पाण्यात कोणतेही औषधे घालण्याची गरज नसते. ज्यांची फारशी हालचाल होत नाही अशा वृद्ध व्यक्तींसाठी ही पद्धत फार उपयोगी ठरते.

प्रदूषणात बाहेर पडावे लागणार असेल तर नाकाला रुमाल बांधून बाहेर पडा. बाहेर पडताना तोंडाला फडके बांधणे हा अ‍ॅलर्जीमुळे होणाऱ्या खोकल्यावरचा एक महत्त्वाचा उपाय आहे. हे फडके विरघळणारे घातक घटक अडवू शकते. त्यासाठी रुमाल किंवा डस्ट मास्क वापरावे. डस्ट मास्कमध्ये एन नाईन्टी फाईव्ह (N  95) हा रासायनिक उद्योगांमध्ये वापरला जाणारा मास्क सगळ्यात चांगला मास्क आहे, कारण त्याची फुप्फुसात जाणारे छोटे कण अडवण्याची क्षमता जास्त चांगली असते. तो तुलनेत थोडा महाग आहे आणि तीन-चार वेळा वापरल्यावर बदलावा लागतो. काही जण तो परत धुऊन वापरतात, पण धुतल्यावर त्याची परिणामकारकता किती टिकते त्याबद्दल सांगता येत नाही.

प्रदूषित हवेत सिग्नलला उभे राहावे लागते तेव्हा तुमचे वाहन तेवढय़ा काळापुरते बंद करा. त्यामुळे तुमच्या वाहनामुळे प्रदूषण फैलावणार नाही. घरात खूप धूळ असेल तेव्हा झाडू मारण्याऐवजी सरळ ओल्या फडक्याने पुसून घ्या. जमीन खणताना आधी त्या जमिनीवर पाणी मारून घ्या. म्हणजे धूळ उडणार नाही. डस्ट माइटसाठी पेस्ट कंट्रोल करून घ्या. घरातल्या चादरी वगरे दर तीन-चार दिवसांनी धुवा. अ‍ॅलर्जी असेल तर पाळीव प्राणी, पक्षी यांना शक्यतोवर दूर ठेवा.

उन्हाळ्यात घ्यायची काळजी

प्रदूषण हे नित्याचे झाले आहे, पण आता त्याबरोबर येणारा उन्हाळा असह्य़ असणार याचे संकेत मिळत आहेत. अशा वेळी आपणच आपली थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात पाणीसाठय़ांमधल्या पाण्याची पातळी कमी होते. या काळात दूषित पाण्यामुळे होऊ शकणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढते. मूत्रसंस्थेचे आजार वाढतात. वयस्कर लोकांना डोळे येण्याचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात पूर्वी मुंबईत मोठय़ा प्रमाणात घाम यायचा; पण मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे आता हवेत बाष्प पुरेशा प्रमाणात टिकून राहात नाही. त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास वाढला आहे. पटकन डीहायड्रेशन होते, थकवा येतो, पायात गोळे येतात. याचा आपल्या शरीरातल्या सगळ्या यंत्रणांवर परिणाम होतो. कडक उन्हामुळे त्वचेला अ‍ॅलर्जी होते. फोटोडर्मटायटिस (fotodermatitis) वाढते.

उन्हाळ्याला तोंड देताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणे. पाणी, िलबू सरबत, ताक, कोकम सरबत यावर उन्हाळ्यात भरपूर भर द्यावा. पाण्याबरोबर साखर आणि मीठ पोटात जाईल असे बघावे. प्रक्रिया केलेली तयार शीतपेये शक्यतो टाळावीत. आरोग्यदायी आहार घ्यावा. त्या काळात मिळणारी फळे खावीत. शक्यतो कडक उन्हात बाहेर पडू नये. अति मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. पाणी पिण्याच्या बाबतीत फ्रिजमधले पाणी पिऊ नये वगरे म्हटले जाते, त्याला फारसा अर्थ नसतो. तेवढय़ा पाच-सहा डिग्री थंड पाण्याने काही त्रास होत नाही. अतिथंड किंवा चिल्ड म्हणतात तशा प्रकारचे पाणी मात्र पिऊ नये.
डॉ. माधव रेगे – response.lokprabha@expressindia.com
(शब्दांकन – वैशाली चिटणीस)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pollution allergy cough

First published on: 10-03-2017 at 01:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×