सुनीता कुलकर्णी

काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात कमालीची बर्फवृष्टी सुरू असताना आपले जवान एका महिलेला स्ट्रेचरवरून वाहून नेत असल्याचा व्हिडिओ आपल्या लष्कराने नुकताच ट्वीटरवरून प्रसारित केल्यानंतर नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रियांची वृष्टी केली आहे.

झालं असं की काश्मीरमध्ये सध्या कमालीची बर्फवृष्टी सुरू आहे. त्यात कुपवाडा जिल्ह्यात राहणाऱ्या फारूख खसाना यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. खूप बर्फवृष्टी होत असल्यामुळे हे बाळ आणि त्याची आई रुग्णालयामध्येच अडकून पडले होते. तिथून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवणं आवश्यक होतं. त्यासाठी मदत केली आपल्या लष्कराच्या जवानांनी. त्यांनी रुग्णालयापासून सहा किलोमीटरवर असलेल्या फारूख यांच्या घरी बाळ बाळंतिणीला सुखरूप नेऊन पोहोचवलं. सुखरूप हा शब्द किती महत्वाचा आहे हे संबंधित व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येतं.

काश्मीरमध्ये सध्या प्रचंड बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे सगळे रस्ते नुसते बर्फमय झालेले नाहीत तर पाय ठेवला तर तो गुडघ्यापर्यंत बर्फात खाली जातो आहे एवढं बर्फ रस्त्यावर साठलं आहे. अशा वेळी त्या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणं शक्यच नसतं. तिथे चालतच जावं लागतं. अशा वातावरणात एका ओल्या बाळंतिणीला आणि तिच्या बाळाला स्ट्रेचरवर ठेवून तो चार-सहा माणसांनी उचलून बर्फात आपला तोल सांभाळत आणि स्ट्रचरवरच्या व्यक्तीला सांभाळत घेऊन जाणं म्हणजे किती दिव्य असेल याची कल्पनाच केलेली बरी.

पण आपल्या जवानांनी हे आव्हान लीलया पेललं आणि एक बाळ आणि त्याची आई सुखरूप आपल्या घरी पोहोचले. हे काम करताना त्या टीममधल्या प्रत्येकाला आपली आई, आपली पत्नी, आपलं बाळं आठवलं असणार आणि त्यांच्यासाठी करावं एवढ्या निगुतीने त्यांनी हे काम केलं असणार. नेटिझन्सनी लष्कराच्या या ट्वीटला अभिनंदनाची सलामी दिली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला कुपवाडा जिल्ह्यातच अशीच बर्फवृष्टी सुरू असताना लष्कराच्या जवानांना मध्यरात्री एक मदतीची मागणी करणारा फोन आला होता. एका गर्भवती महिलेच्या प्रसूतिकळा सुरू झाल्या होत्या. तिला रुग्णालयात हलवणं आवश्यक होतं, पण बर्फवृष्टीमुळे संबंधित कुटुंबाला ते शक्य नव्हतं. तेव्हाही आपल्या जवानांनी याच पद्धतीने स्ट्रेचरवरून त्या महिलेला रुग्णालयात नेऊन पोहोचवलं आणि दोन जीव वाचवले.

अशा कामांमुळेच आपलं लष्कर हे जगातलं अत्यंत वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण लष्कर आहे यात शंकाच नाही. एकतर आपले जवान अतिशय खडतर आणि वेगवेगळ्या हवामानांमध्ये काम करतात. एखाद्या जवानाची पोस्टिंग या वेळी राजस्थानात असते तर पुढच्या वेळी काश्मीरमध्ये असते. एवढ्या टोकाच्या हवामानाला तोंड देण्याची सवय त्यांनी अंगी बाणवलेली असते. दुसरीकडे कोणत्याही नैसर्गिक, सामाजिक आपत्तीने टोक गाठलं की त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात येतं. अतिवृष्टी झाली, लष्कराला बोलवा, दंगल आटोक्यात येत नाहीये, लष्कराला बोलवा… एका बाळ बाळंतिणीला घरी पोहोचवण्यापासून ते देशाच्या सीमांचं रक्षण करण्यापर्यंत कोणतंही आव्हान पेलण्यासाठी आपले जवान समर्थ आहेत.
त्यांना कडकडीत सॅल्यूट…
समाप्त