उत्तर महाराष्ट्र म्हणजे- जळगांव, धुळे, नंदुरबार व नाशिक हे जिल्हे. इथली जमीन समृद्ध व सुपीक आहे. त्यामुळे हा परिसर ज्वारी, बाजरी, डाळी, फळे, दूधदुभते यांची खाण आहे. शेती हा येथील पारंपरिक व्यवसाय. साहजिकच पावसाला इथे कमालीचे महत्त्व आहे. पावसाळ्यात येणारा श्रावण महिनाही तेवढाच महत्त्वाचा आहे. श्रावणात सर्वत्र पावसाची रिमझिम असते. त्यातच येतो शेतकऱ्याचा मित्र असलेल्या नागदेवतेचा पहिला सण, नागपंचमी. ‘नागपंचमी’च्या दिवशी काही कापत नाहीत, भाजत किंवा तळत नाही. चुलीवर तवा ठेवत नाहीत. म्हणून नागदिवे, कानवले- खीर असे उकडलेले पदार्थ बनवतात. कापणे, किसणे आदल्या दिवशीच करून ठेवतात.

भाविकांना ‘श्रावण सोमवाराचे’ विशेष महत्त्व असते. शिवशंकराचे दर्शन, जप, शिवामूठ आणि उपवास या दिवशी होतो. या दिवशी सायंकाळी वरणबट्टी करून उपवास सोडतात. या बट्टय़ा गोवऱ्यांच्या निखाऱ्यावर भाजतात किंवा वाफवून तळतात. मंगळवारी मंगळागौरी पूजन व खेळ यांची धमाल, तर श्रावण शनिवारी ‘संपत शनिवार’चे व्रत असते. हे व्रत बहीण आपल्या भावाच्या कल्याणासाठी करते. रानातून केणी- कुर्डूची भाजी आणून बनवते. पूजा करून त्या भाजीसोबत भाकरी खाऊन उपवास सोडते.  या दिवसात रानात वेलीवर करटुले येतात, त्यांची भाजी खूपच चविष्ट औषधी गुणांनी युक्त असते.

‘कृष्णजन्माष्टमी’ सोहळ्याला ‘सुंठवडा’ प्रसाद म्हणून बनवात. दहीहंडीला गोपाळकाल्याचा नैवेद्य असतो. घरोघरी सत्यनारायण पूजन, तसेच विविध पूजाअर्चा सुरू असतात. नारळी पौर्णिमा आणि बहीणभावाचे नाते घनिष्ठ करणारी राखी पौर्णिमा गोडाधोडाने साजरी झाल्यावर शेतकऱ्याला वेध लागतात पोळ्याचे. अन्नदात्या शेतकरी आपल्या खऱ्या  सोबत्याविषयी, बैलाविषयी या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो! या दिवशी लेकीबाळी माहेरी येतात. बैलांना नवे दागिने घालून सजवतात. पूजा करून पुरणपोळी- खीर किंवा गव्हाची खीर- उडीद डाळीचे वडे खाऊ घालतात. आणि श्रावणाला निरोप देऊन गणरायाची वाट पाहू लागतात.

करटुले भाजी

प्रकार १-

साहित्य :-  कोवळी ताजी करटुले धुऊन, कापून बारीक फोडी दोन वाटी, दोन चमचे तेल, चार-पाच मिरच्या कापून, जिरे एक चमचा, मोहरी अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, हळद अर्धा चमचा, लसूण पाच-सहा पाकळ्या सोलून कापून, नारळाचा चव दोन चमचे, मीठ.

कृती – कढईत तेल घालून जिरे, मोहरी, हळद, हिंग, लसूण घालून फोडणी करावी. मिरच्या घालाव्या. करटुले फोडी घालून पाण्याचा हबका देऊन झाकण ठेवावे. मंद गॅसवर मीठ घालून शिजू द्यावे. खूपच चवदार अशी ही भाजी आहे. वरणभात, आमटी, पोळीसोबत वाढावी. वाढताना भाजीवर नारळाचा चव घालून वाढावी.

प्रकार २-

साहित्य :-करटुल्याच्या लांब चिरलेल्या फोडी दोन वाटी, जिरे अर्धा चमचा, तेल दोन चमचे, एक कांदा, खोबरे किसून अर्धी वाट्री, आले अर्धा इंच, लसूण पाकळ्या सोलून पाच- सहा पाकळ्या, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट एक चमचा, मीठ.

कृती :- प्रथम कढईत एक चमचा तेल घालून जिरे घालून त्यावर करटुल्याच्या फोडी घालाव्या, वर झाकण ठेवून त्यात पाणी घालून करटुले शिजवून घ्यावी. शिजताना चिमूटभर मीठ घाला.

कांदा कापून भाजावा, खोबरे भाजून घ्यावे. आले, लसूण, कांदा, खोबरे वाटून पेस्ट करावी. पातेल्यात तेल घालून ही पेस्ट परतावी. गरम मसाला, लाल तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतावी. करटुले व गरम पाणी घालून हवे तसे पातळ ठेवून मीठ घालून उकळी आणावी. पोळी, भाकरीसोबत वाढावी. ज्यांना कांदा, लसूण चालत नाही त्यांनी तो न घालता भाजी करावी. ही औषधी गुणधर्माची भाजी आवर्जून खावी.

नागपंचमी – नागदिवे

साहित्य :- ज्वारी सहा वाटय़ा, गहू तीन वाटय़ा, दीड वाटय़ा गूळ, एक चमचा वेलची पावडर, चिमूटभर मीठ, तीन चमचे खोबरे कीस, तीन चमचे खोबरे- काप, तुकडे, एक चमचा तूप.

कृती – ’ पीठ बनवणे – ज्वारी व गहू मंद गॅसवर वेगवेगळे थोडे भाजून गार झाल्यावर जाडसर दळून आणणे.

’ वरील पिठातील दोन वाटय़ा पीठ घ्यावे. पातेल्यात दोन वाटी पाणी व गूळ घालून उकळी आणावी. त्यात खोबरे कीस व काप घालावे. वेलची पूड घालून पीठ घालावे, मीठ चिमूटभर घालून, उकड काढून पातेले झाकून ठेवावे.

पाच मिनिटांनी उकड परातीत काढून तुपाचा हात लावून नीट मळावी. हातात मावेल असा गोळा घेऊन त्याला खोलगट वाटीचा आकार देऊन तळाला बोटाने भोक पाडावे. असे सर्व उकडीचे दिवे घडून घ्यावेत. चाळणीला तूप लावून किंवा स्टीमरमध्ये वाफवून घ्यावेत.

कोमट असतानाच तांदळाच्या किंवा गव्हाच्या खिरीसोबत वाढावे.

* शेतकरी हे पीठ ज्वारीची कणसे (हुरडा) उकडून, व गव्हाच्या ओंब्या भाजून, वाळवून पीठ बनवतात. काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवतात.

गव्हल्यांची खीर

साहित्य – हाताने बनवलेले गव्हले किंवा बोटवे एक वाटी, दूध तीन वाटी, सुकामेवा (काजू – बदाम – पिस्ता काप) दोन चमचे, वेलची पूड अर्धा चमचा, साखर एक वाटी.

कृती – प्रथम गव्हल्यांमध्ये दुप्पट पाणी घालून कुकरमध्ये एक शिटी काढून शिजवून घ्यावे. गार होऊ द्यावे. पातेल्यात दूध उकळत ठेवा. थोडे आटल्यावर त्यात सुकामेवा साखर घालून उकळा. नंतर त्यात शिजवलेले गव्हले घाला. वेलची घालून हलवून दोन मिनिटांनी गॅस बंद करा.

कानवले

साहित्य – दोन वाटी कणीक, दोन चमचे तेल, मीठ.

कृती –  कणीक एक चमचा, तेल व चिमूटभर मीठ घालून घट्ट मळून घ्यावी. दहा मिनिटे ओल्या फडक्याने झाकून ठेवावी. नंतर लिंबाएवढा गोळा घेऊन पातळ पोळी लाटून घ्यावी. त्याला तेल लावून चौपदरी घडी घालून ठेवावी. अशा सर्व पोळ्या लाटाव्या. नंतर गाळणीत तेल लावून गाळणीत एकच थर येईल अशा सर्व पोळ्यांच्या घडय़ा ठेवून उकडून घ्याव्यात.

हे कानवले गरम किंवा गार खिरीसोबत वाढावे. गव्हल्यांची खीर- कानवले खूप छान लागतात. गव्हले नसल्यास शेवयांची खीर करतात.

दहीहंडी – गोपाळकाला

गोपाळकाला –

साहित्य :- ज्वारीच्या लाह्य चार वाटय़ा, एक वाटी मुरमुरे, अर्धी वाटी जाड पोहे, अर्धी वाटी घट्ट दही, अर्धा लिंबू, एक चमचा साखर, दोन चमचा काकडी कीस, दोन चमचे गाजर कीस, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, दोन चमचे चिरलेली कोथिंबीर, एक चमचा साखर, अर्धा इंच आले, एक मिरची, मीठ पाव चमचा, जिरे अर्धा चमचा, कढीपत्ता पाचसहा पाने, चिमूटभर हिंग, दोन चमचे तेल.

कृती :- आले, मिरची, दही, साखर, मीठ, लिंबाचा रस मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पोहे भाजून गार करावे. लाह्या पाण्याने धुऊन निथळत ठेवाव्या. एका मोठय़ा वाडग्यात लाह्या, शेंगदाणे, मुरमुरे, काकडी कीस, गाजर कीस, कोथिंबीर, पोहे मिसळावे. त्यात मिक्सरमध्ये एकजीव केलेले मिश्रण घालून नीट मिसळावे. जिरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करून वरून ओतावी. नीट मिसळावी. गोपाळकाला तयार! लगेच खायला द्यावा.

(यात लाह्य, दही, मुरमुरे मुख्य असून बाकी पदार्थ आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकतो. फळेही घालता येतात.)

गोकुळाष्टमी प्रसाद – सुंठवडा

साहित्य :- एक चमचा ओवा, दोन चमचे खोबरा कीस, दोन चमचे धणे, एक चमचा तीळ, दोन इंच सुंठ तुकडा, पाच- सहा मिरी, तीन चमचे गूळ.

कृती :- गूळ सोडून सर्व पदार्थ हलके वेगवेगळे भाजून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करावे. नंतर गूळ घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. प्रसादाचा सुंठवडा तयार!

(काहीजणांकडे फक्त सुंठ खडीसाखर व सुकामेवा घालून ही करतात.)
आशालता पाटील – response.lokprabha@expressindia.com