संरक्षण
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
अमेरिकेतील ट्वीन टॉवरच्या हल्ल्यानंतर दहशतवादाची झळ काय असते याचा प्रत्यय अमेरिकेला आला आणि त्यांचा दृष्टिकोन बदलला! जेव्हा जळतं तेव्हा कळतं!
उत्तर काश्मीरच्या हाजिनमध्ये परिस्थिती आता वेगात पालटते आहे. निवडणुकांच्या धामधुमीमध्ये तिथे सुरक्षादलाने केलेल्या एका मोठय़ा दहशतवादविरोधी कारवाईमध्ये १२ वर्षांचा एक स्थानिक शाळकरी मुलगाही ठार झाला. अतिफ हुसैन मीर या शाळकरी मुलाला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते. या कारवाईमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. लष्कर ए तय्यब या दहशतवादी संघटनेविरोधात त्यानंतर इथले वातावरण आता तापले आहे. ही कारवाई गेल्या महिन्यात २२ मार्च रोजी पार पडली. मात्र दरम्यानच्या काळात देशभरात सर्वत्र लोकसभा निवडणुकांचा माहोल तयार झाल्यानंतर देशाचे लक्ष या महत्त्वपूर्ण अशा कारवाईकडे गेलेच नाही. आजही आपण केवळ पुलवामाच्या हल्ल्याचीच चर्चा करतो आहोत. पुलवामानंतरच्या कालखंडातील ही सर्वात महत्त्वाची अशी कारवाई होती. शाळकरी मुलाच्या मृत्यूनंतर लष्कर ए तय्यबच्या विरोधात या परिसरात जोरदार जनमत तयार झाले आहे.
लष्कर ए तय्यबचे दहशतवादी असलेले अली आणि हुबैब हे दोन महत्त्वाचे दहशतवादी हाजिनमधील या महत्त्वाच्या दहशतवादविरोधी कारवाईत ठार झाले. १९ मार्च रोजी या दोन्ही दहशतवाद्यांनी हाजिनमधील मीर मोहल्ल्यातील मोहम्मद शफी मीर यांच्या घरात घुसखोरी केली होती. यापूर्वी याच जिल्ह्य़ामध्ये सहा काश्मिरींची निर्घृण हत्या झाली होती. गेल्या अनेक महिन्यांमध्ये पोलिसांनी जंगजंग पछाडूनही त्या हत्यांच्या मुळापर्यंत ते पोहोचू शकले नव्हते. या सहा काश्मिरींच्या हत्या जिल्ह्य़ातील दहशतीच्या वाढीस कारणीभूत ठरल्या होत्या. या कारवाईत ठार झालेला ‘तय्यब’चा म्होरक्या अली हाच त्याही हत्यांसाठी कारणीभूत होता. पाकिस्तानस्थित ‘तय्यब’च्या दहशतवाद्यांचा वावर या परिसरात पूर्वीपासूनच आहे. मात्र त्यावेळेस त्यांच्या संदर्भात कुणी फारसे तोंड उघडायला तयार नव्हते. आता मात्र सगळे जण बोलू लागले आहेत, परिस्थिती बदलते आहे. दहशतवादाच्या संदर्भातील आजवरचा अनुभव असे सांगतो की, जेव्हा जळतं तेव्हा कळतं! अमेरिकेतील ट्वीन टॉवरच्या हल्ल्यानंतर दहशतवादाची झळ काय असते याचा प्रत्यय अमेरिकेला आला आणि त्यांचा दृष्टिकोन बदलला!
अतिफचे वडील मोहम्मद शफी मीर कीटकनाशकांच्या विक्रीचा व्यवसाय करतात.
१९ मार्च रोजी दहशतवाद्यांनी त्यांच्या घरात घुसखोरी केली आणि तीन मजली घराचा ताबा घेतला. सर्वात वरच्या मजल्यावर मीर व त्यांचा भाऊ राहतो. पण अशा प्रकारे दहशतवादी येण्याची त्यांच्या घरातील ही काही पहिलीच घटना नव्हती, तर तीन महिन्यांपूर्वीही अली असाच त्यांच्या घरात घुसला होता. मीरच्या मोठय़ा मुलीशी विवाह करण्याची मागणी त्याने केली होती. घाबरलेल्या कुटुंबाने कशीबशी आपल्या मुलीची रवानगी नातेवाईकांकडे सोपोर येथे करून सुटका करून घेतली. त्यानंतर अली आणि इतर दहशतवाद्यांनी अनेकदा घुसखोरी करत कुटुंबातील पुरुषांना बेदम मारहाण केली.
१९ मार्च रोजी दहशतवाद्यांनी पाच महिलांसह एकूण नऊ जणांना ओलीस ठेवले. मीरची भावजय आणि तिच्या मुलीला स्वयंपाक करण्यासाठी त्यांनी मोकळे ठेवले होते. बाकी सर्वाना स्टीलच्या रॉडने मारहाण केली.
२२ मार्च रोजी पहाटेस सुरक्षा दलाने वेढा दिला त्यावेळेस अलीने सर्व महिलांची सुटका केली. मात्र १२ वर्षांचा अतिफ आणि त्याचे काका अब्दुल हमीद यांना ओलीस ठेवून घेतले. हमीद यांनी संधी मिळताच सुटका करून घेतली, मात्र अतिफ अडकला. स्थानिकांनीही लहान मुलाची सुटका करण्याचे आवाहन अलीला वारंवार केले. त्यास त्याने भीकही घातली नाही. अखेरीस रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन खतरनाक दहशतवादी पळून जाऊ नयेत म्हणून सुरक्षा दलाने जोरदार हल्ला चढवला, त्यात अतिफसह दोन्ही दहशतवादी ठार झाले. २००६ ला घडलेल्या ‘ऑपरेशन सुमवली’ची आठवण या निमित्ताने होते. त्यावेळेसही पाकिस्तानातून भारतात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच लागणाऱ्या सुमवली या गावातील शफीच्या घरात दहशतवादी घुसले होते. त्याच्या कुटुंबाला त्यांनी ओलीस ठेवले. मुलासह त्याची बायको आणि त्याने पळ काढला. मात्र तीन महिन्यांची मुलगी घरातच राहिली. फरक इतकाच की, शफीनेच त्या वेळेस भारतीय सैन्याला वर्दी दिली होती. शफी अस्सल भारतीय होता. सुरक्षा दलाने त्याच्या घराला वेढा दिला त्यावेळेस हल्ला करा, या देशासाठी माझ्या मुलीचे बलिदान द्यायला मी तयार आहे, असे लष्कराला सांगणारा शफी होता. दहा खतरनाक दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यासाठी त्या मुलीचा बळी जाऊ द्यावा, याचा निर्णय घेण्यासाठी सुरक्षा दलांनी खूप वेळ घेतला.. अखेरीस आठ क्षेपणास्त्र आठ दिशांनी झेपावली आणि नऊ दहशतवादी ठार झाले आणि शफीची मुलगीही. शफी मुलीच्या बलिदानासाठी तयार झाला, कारण त्यापूर्वी झालेल्या पाकिस्तानी अत्याचारांमधून त्यावेळेस भारतीय लष्कराने संपूर्ण गावकऱ्यांची सुटका केली होती. तो आणि सुमवलीचे गावकरी भारतीय लष्कराचे ऋणाईत होते.
इथे आता २२ मार्चच्या कारवाईनंतर पाकिस्तानी दहशतवादी आणि लष्कर ए तय्यबच्या विरोधात जनमत तयार झाले आहे. निवडणूक प्रचाराला येणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्या बदललेल्या वातावरणाला सामोरे जावे लागते आहे. पण हे जनमत आता बदलले आहे. त्यासाठी अतिफला त्याचे प्राण गमवावे लागले.
..आणि अतिफचे प्राण गेले नसते तर?
जळतं तेव्हा कळतं!