डॉ. अविनाश कुबल – response.lokprabha@expressindia.com
विश्व पर्यावरण दिवस
सूर्याकडून सतत आणि जवळपास सुनिश्चितपणे पृथ्वीकडे येत असलेला ऊर्जेचा प्रवाह, पृथ्वीवरील नैसर्गिक परिसंस्थांच्या संचालनासाठी आवश्यक असलेले परिचालन बळ पुरवीत असतो. पृथ्वीवरील विविध प्रकारची चक्रे उदा. प्राणवायू-अपानवायू चक्र, जलचक्र, नत्रवायू चक्र, यांचे कार्य त्यामुळे अखंड अव्याहतपणे चालू असते. तिला लागणाऱ्या अपानवायूसाठी वनस्पतिसृष्टी ही प्राणिसृष्टीवर, तर प्राणिसृष्टीला लागणाऱ्या प्राणवायूसाठी वनस्पतिसृष्टीवर अवलंबून असते. वनस्पतिसृष्टी ही तिने शोषून घेतलेल्या अपानवायूचे रूपांतर पुन्हा वस्तुमानामध्ये करते. ज्या वस्तुमानाचा उपयोग प्राणिसृष्टी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी म्हणजे अन्न, चारा मिळविण्यासाठी करते. तसेच मनुष्यप्राणी स्वत:च्या इतर गरजा उदा. वस्त्र, इंधन, औषधे भागविण्यासाठी करतो. हे चक्र पृथ्वीवरील तमाम सजीवसृष्टीसाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. सजीवसृष्टीचे अस्तित्व या चक्रावर अवलंबून आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.
तसेच काहीसे जलचक्राचे आहे. पावसाच्या स्वरूपात, दविबदूंच्या स्वरूपात किंवा बर्फवृष्टीच्या स्वरूपात जमिनीवर आकाशातून येणारे पाणी भूपृष्ठावरील तसेच भूपृष्ठाच्या खालील सजीवसृष्टी म्हणजे वनस्पती आणि प्राणी दोघांच्याही सर्व प्रकारच्या गरजा भागविते. त्यानंतर उर्वरित पाणी हे भूपृष्ठाच्या उताराच्या दिशेने प्रवास करीत परत समुद्र किंवा महासागराला जाऊन मिळते. गोडय़ा आणि खाऱ्या पाण्याचे हे निरंतर चालणारे चक्र सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जलचक्र पृथ्वीचे तापमान नियंत्रण, सजीवसृष्टीचे नियमन आणि अशा इतर अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावत असते. या जलचक्राचे कार्य सुरळीत चालावे यासाठी अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने काही नियम पाळणे आता आपल्यासाठी अनिवार्य झालेले आहे. जलचक्राचे प्रदूषण टाळणे, त्या प्रदूषणाची तीव्रता कमी करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. हेच जलचक्र पृथ्वीवर तापमानाचे नियंत्रण करते आणि या तापमानाच्या नियंत्रणामुळेच पृथ्वीवरील सजीवसृष्टीच्या टिकून राहण्याला मदत करते.
नत्रवायूच्या चक्रामध्ये नत्रवायू हा प्राणिसृष्टी आणि वनस्पतिसृष्टीच्या दरम्यान प्रवास करत राहतो. तो या दोन्हींना जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता करत राहतो. अशाच प्रकारची इतर अनेक चक्रे या सृष्टीच्या अस्तित्वाशी, तिच्या नियमनाशी संलग्न आहेत. प्राणिसृष्टीतील इतर लहानमोठय़ा प्राण्यांसारखेच आपण मनुष्यदेखील एक प्रकारची प्राण्यांची जात आहोत. केवळ काही बाबतीत आपण इतर प्राण्यांपेक्षा जास्त क्षमतावान आहोत, एवढा एकच मुद्दा आपल्याला या पृथ्वीवर इतर सर्व प्राण्यांच्या जातींपेक्षा जास्त वरचढ ठरवतो. आपले हात, पाय आणि हाताची विशिष्ट प्रकारची असलेली संरचना तसेच मेंदूच्या विशिष्ट प्रकारे वापर करण्याची क्षमता आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा वरचढ होण्यास मदतरूप आहे. या दोन्ही गोष्टींचा सुयोग्यरीत्या वापर करून मनुष्यप्राण्याने जगातील सर्वोच्च शिखर आणि सर्वात खोल समुद्राचा तळदेखील गाठला आहे. त्याचप्रमाणे आपण अमर्याद भासणारी वाळवंटे आणि अत्यंत गूढ-गहन असलेल्या अरण्यातसुद्धा लीलया प्रवास केला आहे. आपण सर्वत्र संचार करून तिथल्या आपल्याला सहजपणे ज्ञात नसलेल्या अशा त्या-त्या प्रदेशातील वनस्पती आणि प्राणिसृष्टीला आपल्या आटोक्यात आणून त्यांच्यापासून आपल्याला मिळू शकणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू किंवा आपल्याला आनंद प्रदान करतील अशा इतर बऱ्याच गोष्टी त्यांना फसवून, त्यांच्याकडून हिसकावून आणि ओरबाडून घेतल्या आहेत.
सांप्रतचे हे २०२० चे वर्ष मात्र आपल्यापुढे एक वेगळाच पेच घेऊन अवतरले आहे. निर्जीव आणि सजीवसृष्टी यांच्यामध्ये संचार करणाऱ्या एका अत्यंत सूक्ष्म जीवाने आपल्या जीवनात प्रचंड मोठे वादळ उठवले आहे. आपले समग्र जीवनचक्र त्यामध्ये पूर्णपणे घुसळून निघाले आहे. आपल्या आयुष्याचे चक्र इथेच थांबेल काय इतकी प्रचंड भीतीदायक शक्यता घेऊन तो एवढासा सूक्ष्म जीव आपल्या समोर उभा ठाकला आहे आणि मनुष्याने आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर तयार केलेली सर्व प्रकारची शस्त्र-शस्त्रात्रे हाताशी असूनदेखील त्याचा मुकाबला करण्यास एकदम असमर्थ ठरताना दिसत आहे. त्याच्या आव्हानाकडे हतबलपणे पाहण्याशिवाय मनुष्यप्राण्याकडे सध्या तरी दुसरा कोणताही उपाय असल्याचे दिसून येत नाहीये. त्याने सध्या तरी समग्र पृथ्वीवरील आधुनिक मानवाच्या तमाम हालचाली आणि प्रवृत्तींना लगाम घातलेला दिसून येत आहे.
या पाश्र्वभूमीवर यंदाचा ‘विश्व पर्यावरण दिवस’ आपण साजरा करत आहोत आणि योगायोग असा की, यंदाच्या विश्व पर्यावरण दिवसाचे घोषवाक्य (हे घोषवाक्य ‘यूएनईपी’द्वारा साधारणपणे एक वर्ष आधी जाहीर केलेले असते.) आहे ‘निसर्गासाठी वेळ’. पर्यावरणासाठीचे असे विशिष्ट (उदा. जल-दिन, वन-दिन, वन्यप्राणी-दिन, ओझोन-दिन, वन-महोत्सव दिन वगैरे) दिवस साजरे करणे म्हणजे खरे तर पर्यावरणाच्या त्या विषयाशी निगडित असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांची पुनश्च जाणीव करून घेणे आणि करून देणे होय. तसेच त्या विषयाच्या बाबतीत झालेली किंवा होत असलेली हेळसांड थांबविणे, असा होत असतो. त्याचप्रमाणे त्या घटकाकडे आपली असलेली बांधिलकी समजून घेऊन त्यांच्या प्रति आपली भविष्यातील कृती ठरविण्याचा तो दिवस असतो. पृथ्वीवरच्या सजीवसृष्टीशी निगडित असलेल्या सर्व प्रकारच्या चक्रांच्या सुरळीत फिरण्यामध्ये केवळ मनुष्यप्राण्याची जबाबदारी महत्त्वाची आहे. कारण या चक्रांच्या सुरळीत फिरण्यामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ घडवली असेल तर ती केवळ आणि केवळ आपणच.
तर मग या बाबतीत आपणाकडून झालेल्या हेळसांडीच्या बाबतीत आपण पुढच्या काळात नक्की काय करणे अपेक्षित आहे? आपली भूमिका काय असायला हवी? आपली कृती कशी असायला हवी? काय केले तर झालेल्या या अक्षम्य नुकसानीची भरपाई होऊ शकेल? अशी कोणकोणती कृती असेल की ज्याच्यामुळे भविष्यात पुन्हा असे घडणार नाही आणि ही एकमेवाद्वितीय असेलेली वसुंधरा मानवजातीला अनंत काळापर्यंत टिकवून ठेवेल, याबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ समोर येऊन ठेपली आहे. आता यापुढे पुन्हा दुसरी संधी मिळेल अशी शक्यता नाही. असे सुरू राहिले तर विनाश अटळ आहे, या क्षणापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत.
त्यातला सर्वात पहिला आणि सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आपल्या सध्याच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र प्रकारचे बदल घडविणे. जीवनाच्या प्रत्येक सवयीचे, कृतीचे, पद्धतीचे पर्यावरणीयदृष्टय़ा मूल्यमापन करून त्यामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत असतील असे बदल घडविणे आणि जे शाश्वत नसतील त्यांना ताबडतोबीने कायमस्वरूपी बंद करणे हा आहे. निसर्गाच्या चक्रांशी सुसंगत नसेल असे काहीही करणे म्हणजे आपल्याच अस्तित्वाला नष्ट करण्याचा प्रकार आहे हे मान्य करणे आणि स्वीकारणे. आपल्या अस्तित्वासाठीच्या गरजा आणि आपल्याला होत असलेल्या इच्छापूर्तीच्या गरजा यामधली सूक्ष्म भेदरेषा ओळखून त्यांच्या पूर्ततेबाबतची आपली समाज आणि आपला आग्रह समजून घेणे. याचा परिणाम असा होईल की, पृथ्वीच्या सपाटीवर आणि अंतर्भागात अनावश्यक खाणकाम, अनावश्यक नासधूस तसेच त्यामुळे होणारी पृथ्वीच्या चक्रांमधली अनावश्यक ढवळाढवळ बंद होईल.
तीच बाब आपल्या ऊर्जेच्या गरजेबाबतची. केवळ विविध स्वरूपांतल्या कार्बनच्या वापराद्वारे ऊर्जानिर्मिती करण्यासाठी आपण अंगीकारलेल्या सरधोपट पद्धतीमुळे पृथ्वीच्या पटलावरील आणि पटलाखालील कार्बन मुक्त करून आपण तो पृथ्वीच्या वातावरणात आणून सोडला आहे. त्यामुळे आपली ही कृती जागतिक तापमानवाढ आणि ऋतुबदलाचे प्रमुख कारण ठरली आहे. जागतिक तापमानवाढ आणि ऋतुबदल हे पृथ्वीच्या विविध चक्रांचे संतुलन बिघडविण्यास कारणीभूत ठरले आहेत. पृथ्वीवरील नानाविध प्रकारच्या सजीव सृष्टीच्या परिसंस्था त्यामुळे नष्ट होत आहेत किंवा अत्यंत धोकादायक स्थितीत येऊन पोहोचल्या आहेत. त्याचा परिणाम असा होत आहे की, अशा या विविध प्रकारच्या सजीव सृष्टीच्या परिसंस्थांकडून आपल्याला मिळणाऱ्या पर्यावरणीय सेवांपासून आपण वंचित होत चाललो आहोत. आपल्या अस्तित्वाचा विनाश होण्यासाठी हे अत्यंत सबळ कारण ठरणार आहे.
याची ताबडतोब आणि अत्यंत गंभीर नोंद आपण सर्वानी घेऊन त्यानुसार आपल्या जीवनशैलीमध्ये सामूहिकरीत्या तसेच व्यक्तिगतरीत्या बदल घडवून आणण्याची वेळ आलेली आहे. सजीव सृष्टीची प्रत्येक परिसंस्था ही तापमानाच्या विशिष्ट पातळ्याच्या मध्येच कार्यरत राहू शकते. त्या परिसंस्थेच्या सुचारू आणि कार्यक्षम संचालनामध्ये तापमानामध्ये होणारी वाढ किंवा घट ही त्या परिसंस्थेची कार्यक्षमता कमी करतेच; परंतु बंददेखील पाडत असते आणि त्याचा परिणाम आपल्याला त्या परिसंस्थांकडून मिळणाऱ्या पर्यावरणीय उत्पादनांवरदेखील होत असतो. बंद पडलेली परिसंस्था पुन्हा चालू होणे किंवा ती पूर्वीच्या जोमाने काम करणे जवळपास अशक्य असते. यालाच आपण होत असलेला पर्यावरणीय ऱ्हास या नावाने ओळखतो. असा हा ऱ्हास आपण आपल्या कृतीने पृथ्वीच्या विनाशाच्या जवळ नेऊन ठेवला आहे. सजीव सृष्टीची या प्रत्येक परिसंस्थाच्या सुचारू चालण्यामुळेच आपले आजवरचे जीवन शक्य झालेले होते. आता मात्र त्याला निश्चितपणे धोका निर्माण झालेला आहे. ज्या होडीतून आपण सर्व जण एकत्रितपणे प्रवास करत आहोत त्या होडीलाच आपण छिद्रे पाडून ठेवलेली आहेत असा हा प्रकार आहे.
त्यातला पुढचा प्रकार म्हणजे सजीव सृष्टीच्या काही परिसंस्थावर आपण अनावश्यक ताण निर्माण केलेला आहे. ज्याची या वसुंधरेला माहिती नव्हती अशा प्रकारच्या अनावश्यक अशा टाकाऊ पदार्थानी आपण आपल्या सर्व प्रकारच्या परिसंस्था भरून टाकल्या आहेत. त्यामध्ये पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या यंत्रणेला पचविता येणार नाहीत अशा प्रकारच्या अविघटनशील गोष्टी आणि पृथ्वीच्या अस्तित्वाला नष्ट करू शकतील अशा प्रकारच्या यंत्रणांचा समावेश आहे. परिणामी पृथ्वीवरील परिसंस्थांनी हात टेकले आहेत आणि अशा घटकांकडे आपण पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे.
मानवासाठीचा धोक्याचा इशारा अत्यंत स्पष्ट आहे आणि तो म्हणजे- तुझी अनावश्यक असलेली कृत्ये थांबव आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठीच्या कामाला ताबडतोब सुरुवात कर, अन्यथा तुझ्या विनाश करण्यासाठी तूच जबाबदार ठरशील. अस्तित्वासाठी आवश्यक आणि इच्छापूर्तीच्या गरजा यातला फरक समजून घे आणि त्याप्रमाणे आपली जीवनशैली ताबडतोब बदल, इतरांनादेखील बदलायला भाग पाड. वसुंधरेच्या सजीवसृष्टीच्या परिसंस्थांमधली ढवळाढवळ ताबडतोब थांबव. त्यासाठी आपला वेळ द्यायला शिक आणि वेळ द्यायला लाग आणि म्हणून या वर्षीच संदेश ‘टाइम फॉर नेचर’.