27 January 2021

News Flash

लाल टोपीवाला माणूस

एक माणूस रोज सकाळी बरोबर नऊ वाजता एका चौकात यायचा. आपल्या हातातील लाल टोपी हवेत जोरजोरात फिरवायचा.

| June 15, 2014 01:01 am

एक माणूस रोज सकाळी बरोबर नऊ वाजता एका चौकात यायचा. आपल्या हातातील लाल टोपी हवेत जोरजोरात फिरवायचा. बरोबर पाच मिनिटांनी ती टोपी डोक्यावर ठेवून निघून जायचा. एके दिवशी धाडस करून एक पोलीस त्याला विचारतो, ‘‘तू रोज हे असं काय करतोस?’’ तो आश्चर्याने म्हणतो, ‘‘म्हणजे? मी सगळय़ा जिराफांना हाकलतो.’’ पोलीस गोंधळून म्हणतो, ‘‘पण इथे जिराफ आहेतच कुठे!’’ तो माणूस खूश होतो. म्हणतो, ‘‘नाहीत ना? पहा. म्हणजे मी किती चोख काम करतोय ते!’’
हा विनोद वाचून मी खूप हसले. हसता हसता एकदम थांबले. मनात आले, अरेच्चा! आम्हीही असेच करीत नाही काय? मला परवाची गोष्ट आठवली. रात्री दहा वाजता जवळच्या खेडय़ातून एका वर्षांच्या मुलीला ‘ताप चढलाय’ म्हणून मिळेल ते वाहन घेऊन आई-वडील आले होते. ‘‘तुमच्याशिवाय तिला कोणाचाच गुण येत नाही, म्हणून इथपर्यंत आलो!’’ हे वाक्य ऐकल्यावर माझा ‘स्व’ सुखावलाच. मी तिला तपासले. ताप खूपच होता. घसाही लाल झाला होता. मी तापाचे औषध आणि अँटिबायोटिक्स (जंतूनाशक औषध) लिहून दिले. म्हटले, ‘‘आता इतक्या रात्री तुम्हाला औषधे कुठे मिळणार?’’ आई हसली. म्हणाली, ‘‘आम्हाला औषधे घेण्याची गरजच पडत नाही.’’ मी आश्चर्याने विचारले, ‘‘म्हणजे?’’ ती म्हणाली, ‘‘तुमचा हात लागला की तिचा आजार पळतोच. तुम्ही दिलेली कोणतीच औषधे आम्ही कधी घेतली नाहीत.’’ मी चाट! गोंधळून मी फाइलची मागची पाने उलटली. ती मुलगी आत्तापर्यंत पाच वेळा माझ्याकडे आली होती. कधी संडास, उलटी, कधी सर्दी-खोकला, कधी ताप. तीन वेळा मी तिला अँटिबायोटिक्स लिहून दिली होती. आणि कोणतेही औषध न घेता ती मुलगी प्रत्येक वेळी बरी होत होती. या सगळय़ाचा अर्थ काय? मीही हातातली लाल टोपी हवेत जोरजोरात फिरवून ‘नसलेले’ जंतू मारण्यासाठी औषधे देत होते आणि माझ्या ‘हाताला आलेला गुण’ पाहून ‘आपण अगदी चोख काम करतोय,’ अशी स्वत:ची पाठ थोपटून घेत होते.
आजारांची अनेक कारणे असतात. जंतुसंसर्ग हे त्यातील एक मुख्य कारण! हे न दिसणारे जंतू दोन प्रकारचे असतात. एक विषाणू (Virus) आणि दुसरे जिवाणू (Bacteria). गोवर, कांजिण्या, गालगुंड, फ्लू हे विषाणूंमुळे होतात. परंतु त्याचबरोबर स्पष्टपणे न कळणारे इतरही आजार असतात. त्यांची लक्षणे म्हणजे ताप, सर्दी, खोकला, कधी अंग दुखतंय, डोकं दुखतंय, कधी जुलाब-उलटय़ा.. वगैरे वगैरे. विषाणूंमुळे होणाऱ्या आजारावर रामबाण असं औषध नाही. बहुतेक आजार चार-पाच दिवसांत नैसर्गिकरीत्याच बरे होतात. आम्ही गमतीने म्हणतो, ‘‘औषध दिले नाही तर सर्दी सात दिवसांत बरी होते आणि दिले तर आठवडय़ात!’’ ही सर्दी विषाणूंमुळे होणारी!
जिवाणूंमुळेही अनेक आजार होतात- टाइफॉईड, मेंदूज्वर, हगवण, गळू होणे अशासारखे. परंतु त्याचबरोबर वैशिष्टय़पूर्ण लक्षणे नसलेले इतरही अनेक आजार जिवाणूंमुळे होतात. त्यांची लक्षणेही ताप, सर्दी, खोकला, धाप, अंग दुखणे, डोके दुखणे, जुलाब, उलटय़ा अशीच असतात. हे आजार कधी कधी गंभीर स्वरूप धारण करतात आणि मृत्यूलाही कारणीभूत होतात. या आजारांवर अँटिबायोटिक्सचा उपयोग केला तर ते चुटकीसरशी बरेही होतात.

विषाणूंमुळे होणाऱ्या ताप, सर्दीला फक्त पॅरासिटामोल हे तापाचे औषध द्यायचे असते आणि वाट पाहायची असते तर जिवाणूंमुळे होणाऱ्या आजाराला अँटिबायोटिक्स द्यायचे असते, हे समजत नाही असा डॉक्टर नसावा. सरसकट अँटिबायोटिक्सच्या वापराने अँटिबायोटिक्सना दाद न देणारे जंतू निर्माण होत आहेत आणि हा भविष्यात फार मोठा धोका आहे, हेही आम्हाला समजते. कॉन्फरन्समध्ये, पुस्तकांमध्ये अँटिबायोटिक्स जपून वापरा. अँटिबायोटिक्स ही ‘तापाची’ औषधे नव्हेत’, ही आम्हाला अगदी चांगली माहीत असलेली गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाते. तरीही लाल टोपीवाला माणूस जसे रोजच्या रोज जिराफांना हाकलतो, तसे आम्ही डॉक्टर रोजच्या रोज जंतू मारण्यासाठी अँटिबायोटिक्सचा वापर करतो. का?
ताप, सर्दी, खोकला, धाप, जुलाब, उलटय़ा, डोके दुखते अशा प्रकारच्या लक्षणांवरून शिवाय अगदी नीट तपासूनसुद्धा हा आजार विषाणूंमुळे आहे की जिवाणूंमुळे, याचा पत्ता लागत नाही. अगदी रक्त, लघवी, एक्स-रे अशा तपासण्या करूनही नेमके निदान करता येत नाही. नेमके निदान करण्यासाठी ‘कल्चर’ करावे लागते. म्हणजे विशिष्ट पोषक माध्यमात रक्तातील जंतूंची वाढ करून त्यांचे अस्तित्व आणि प्रकार शोधून काढावा लागतो. ही तपासणी खर्चिक असते. त्यासाठी दहा सीसी रक्त द्यावे लागते. त्याचा निर्णय येण्यासाठी चार दिवस वाट पाहावी लागते. इतके करूनही आज तरी आपल्या भागात हे तंत्र फारसे उपयोगी ठरत नाही, असा अनुभव आहे. अशा वेळी करायचे काय? प्रत्येक आजारपणात लहान बाळाचे दहा सीसी रक्त काढणे म्हणजे बोलण्याची गोष्ट नव्हे. ज्याच्या बाळाचे एकदा रक्त काढले आहे, तो जन्मभर ती गोष्ट विसरत नाही. मुले तर दर महिन्याला आजारी पडतात. मग दर महिन्याला रक्त काढायचे? ‘कल्चर’चा  निर्णय घेण्यासाठी चार दिवस वाट पाहायची. ती कोण पाहाणार? सध्या ‘पेशंट’ इतका ‘इम्पेशंट’ झाला आहे की, आजचा ताप उद्या गेला नाही तर तो डॉक्टरांकडे ‘गुन्हेगार’ म्हणूनच पाहतो. गंमत म्हणजे आम्हालाही पेशंट ‘बरे नाही’ म्हणून दुसऱ्या दिवशी आला तर ‘गुन्हा’ केल्यासारखे वाटते. सर्दी सात दिवसांत बरी होते खरी; पण म्हणून औषधाशिवाय सात दिवस-वाट पाहणारा पेशंट आज औषधाला तरी सापडतो का? आमच्यासारख्या तालुका -पातळीवर काम करणाऱ्यांची तर अजूनच अवघड परिस्थिती होते. लहानशा गावातून कसेतरी पैसे गोळा करून, ४०-५० किलोमीटर प्रवास करून पेशंट आमच्यापर्यंत पोहोचतो तेव्हाच त्याची आर्थिक आणि मानसिक शक्ती संपलेली असते. अशा वेळी ‘दोन-चार दिवस वाट पाहू. नंतर तपासण्या करू आणि गरज वाटल्यास अँटिबायोटिक्स देऊ,’ असा विचारसुद्धा आम्ही करू  शकत नाही. ‘असे औषध दिले पाहिजे की आजार बरा झालाच पाहिजे’ अशी जणू त्यांच्यावर आणि आमच्यावरही निर्वाणीचीच वेळ असते. थोडक्यात, आम्ही सगळे कळूनही परिस्थितीशरण असतो. कालांतराने टोपीवाल्या माणसासारखे आपण अँटिबायोटिक्स दिल्यामुळेच बाळे बरी होतात, असे आम्हालाही वाटू लागते.
परवाच बातमी वाचली, ‘३५ अँटिबायोटिक्सपैकी ३४ अँटिबायोटिक्सना दाद न देणारा जंतू (Super bug) सापडला आहे.’ पूर्वी जो न्युमोनिया एका पेनिसिलिनच्या इंजेक्शनने विरघळायचा, तो अनेक प्रभावी औषधांनाही आता दाद देत नाही, हा आमचाही अनुभव आहे. आता मात्र प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे.
जिवाणू-विषाणूंमधील फरक, तापाच्या औषधांची ओळख, अँटिबायोटिक्स म्हणजे काय, त्याचे फायदे-तोटे, कमी-जास्त डोस वापरण्याने होणारे तोटे, अँटिबायोटिक्सना दाद न देणारे जंतू कसे निर्माण होतात, कोणती लक्षणे वाट पाहण्याजोगी आहेत, कोणती लक्षणे गंभीर आहेत, याबाबतची सविस्तर माहिती शालेय पुस्तकांत द्यायला हवी. लोकशिक्षणासाठी याबाबतचे लेख छापून यायला हवेत. सुशिक्षितांनी हे समजून घ्यायला हवे. समाजात ‘धीर धरण्याचे’ महत्त्व बिंबायला हवे. डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना अशी माहिती सांगायला हवी. रुग्ण जवळपासचा असेल तर चार दिवस वाट पाहायचा धोका पत्करायला हवा. ‘‘तुमच्या उपचारांचा उपयोग झाला नाही,’’ हे ऐकण्याची तयारी ठेवायला हवी. समाजात ‘पेशन्स’ वाढायला हवा.
आता वाल्या कोळय़ाच्या बायको-मुलांप्रमाणे आपल्याला कोणालाच हात वर करून पापातून सुटका करून घेता येणार नाही. लाल टोपीवाल्या माणसाचा विनोद फक्त हसण्यावारी नेता येणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2014 1:01 am

Web Title: a man with red hat
टॅग Bacteria,Virus
Next Stories
1 चुका करण्याचे स्वातंत्र्य
2 गोष्ट एका मुक्तिसंग्रामाची!
3 बाळ रडतंय!
Just Now!
X