लोकमान्य टिळकांचे अनुयायी सदाशिव विष्णू बापट यांनी प्रसिद्ध केलेल्या व सध्या दुर्मीळ झालेल्या लोकमान्य टिळकांच्या आठवणींच्या तीन खंडांचे पुनप्रकाशन लोकमान्यांच्या देहावसानास यंदा शंभर वर्षे होत असल्याने ‘परममित्र प्रकाशना’तर्फे करण्यात आले आहे. या पुनप्र्रकाशित ग्रंथप्रकल्पास डॉ. सदानंद मोरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यातील संपादित अंश..

भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाचा एक कालखंड ज्यांच्या नावाने म्हणजे अर्थातच ‘टिळक पर्व’ असा ओळखला जातो, त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना इहलोक सोडून शंभर वष्रे होत आहेत. २०१९-२० हे वर्ष टिळकांच्या स्मृतीची शताब्दी आहे. मानवी कालगणना पद्धतीमध्ये ‘शतक’ हे एक लक्षणीय परिमाण मानले जाते. टिळकांचे हे शतसांवत्सरिक श्राद्ध यथोचित पार पाडणे हे आपणा सर्वाचेच पवित्र कर्तव्य आहे.

अशा प्रकारच्या यथोचित कर्तव्यांपकी सर्वात महत्त्वाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी आमचे मित्र ‘परममित्र प्रकाशन’चे माधव जोशी पुढे सरसावले आहेत. हे कर्तव्य म्हणजेच प्रस्तुतच्या सदाशिव विष्णू बापट यांनी प्रसिद्ध केलेल्या लोकमान्य टिळकांच्या आठवणींच्या तीन खंडांचे पुनप्रकाशन. बापटांनी सिद्ध केलेले आठवणींचे हे तीन खंड आज अत्यंत दुर्मीळ होऊन बसले होते. त्यांचे पुनर्मुद्रण व्हायला हवे असे मला खूप वर्षांपासून- म्हणजे मी जेव्हा ‘लोकमान्य ते महात्मा’ हा ग्रंथ लिहिला तेव्हापासून वाटत होते. परंतु त्यासाठी एखाद्या प्रकाशकाकडे शब्द टाकायचे धर्य होत नव्हते. कारण अर्थातच व्यावहारिक होते. एवढा प्रचंड दस्तऐवज छापण्यासाठी तेवढी गुंतवणूक करणार कोण आणि तो विकत तरी कोण घेणार? अशा परिस्थितीत जोशी यांनी ‘परममित्र’चा हे खंड छापण्याचा संकल्प माझ्या कानी घातला तेव्हा मला बसलेला पहिला झटका आश्चर्याचा होता. आणि दुसरा अर्थातच आनंदाचा. बापटांच्या या त्रिखंडात्मक कृतीची मी अनेक पारायणे केली आहेत. ‘लोकमान्य ते महात्मा’नंतर मला टिळकांचे चरित्र लिहिण्याचाही योग आला. त्यामुळे या खंडांचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले. टिळकांविषयी कोणत्याही प्रकारचे लेखन-संशोधन करणाऱ्या अभ्यासकासाठी हे जणू बायबलच आहे.

टिळक एका बाबतीत भाग्यवान : त्यांना सदाशिवराव बापट हे एक अनुयायी भेटले. अनुयायी कसले, भक्तच म्हणा की! या सदाशिवरावांची टिळकभक्ती इतकी पराकोटीची, की त्यांनी सातारा जिल्ह्यतील आपल्या बोरखळ या गावी टिळकांचे मंदिरच बांधायला काढले. त्या काळात साताऱ्यात ब्राह्मणेतर चळवळ एकदम जोमात होती. या चळवळीत टिळकांचे चित्र समाजसुधारणांचा आणि ब्राह्मणेतरांचा शत्रू असेच रंगवले गेले. त्यामुळे ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी मंदिरात पादुकांची प्रतिष्ठापना करण्याचा समारंभ चक्क उधळून लावला. मोठी दंगल झाली. उभय पक्षांचे लोक जखमी वगरे झाले. एकमेकांवर फिर्यादी दाखल करण्यात आल्या. तर, याच स. वि. बापटांनी टिळकांना चरित्ररूपाने अमर करण्यासाठी टिळकांच्या आठवणी गोळा करण्याचा उद्योग हाती घेतला. टिळकांचा ज्या ज्या व्यक्तींशी संबंध आला- मग त्या व्यक्ती त्यांच्या विरोधक, अगदी सत्यशोधक ब्राह्मणेतर का असेनात- त्यांच्याशी संपर्क साधून बापटांनी त्यांना लिहिते केले आणि त्यांना आलेले टिळकांचे अनुभव त्यांच्याकडून आठवणींच्या स्वरूपात लिहून घेतले. टिळकांचा महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि थोडासा परदेशांतही संचार झाला होता. त्यात अनुयायांसोबत सहकारी, विरोधक इत्यादी विविध नात्यांनी अनेक लोक त्यांच्या सहवासात व संपर्कात होते. त्या सर्वाशी पत्रव्यवहार वगरे करून बापटांनी त्यांच्याकडून टिळकांच्या आठवणी जमवल्या.

बापटांनी टिळकांच्या आठवणी ना कालक्रमाने लावल्या, ना त्यांचे वर्गीकरण केले, ना त्यांना शीर्षके दिली. ते नुसतेच एक संकलन उरले. कितीही महत्त्वाचे व प्रशंसनीय असले तरी ते संकलनच. त्यावर कुठलेच संस्करण नाही. त्यामुळे बापटांच्या या कामाला पुरेशी प्रतिष्ठा लाभू शकली नाही.

लोकमान्य टिळकांच्या पश्चात त्यांचा उत्तराधिकारी कोण, यावर त्यांच्या अनुयायांमध्ये एकमत होणे शक्य नव्हते. स्वत: लोकमान्यांनी तर अशी कोणाची नियुक्ती केली नव्हती. त्यामुळे या पदावर कोणीही दावा सांगितला असता तरी त्याला टिळकांच्याच प्रभावळीतल्या कुणीतरी विरोध केला असताच. पण तरीही टिळकांचे उत्तराधिकारी म्हणवून घेण्यासाठी व म्हटले जाण्यासाठी नरसिंह चिंतामण केळकर यांच्याकडे एक जमेची बाब होती, जी दुसऱ्या कोणाकडेच नव्हती. ती म्हणजे टिळकांच्या ‘केसरी’ पत्राच्या संपादकपदाची गादी. या भांडवलावर कृ. प्र. खाडिलकर, गंगाधरराव देशपांडे, दादासाहेब खापर्डे, चित्रशाळेचे वासुकाका जोशी अशा प्रतिस्पध्र्यावर मात करून केळकर टिळकांच्या गादीवर बसले. ‘केसरी’ व केळकर जे मत मांडणार किंवा टिळकांच्या वचनांचा जो अर्थ लावणार तो प्रमाण अशी सर्वसामान्य टिळकभक्तांची समजूत त्यामुळे झाली असेल, तर ते स्वाभाविकच म्हणावे लागते. ते काहीही असो, केळकरांनी आठवणी जमा करण्यासाठी आणि इतर अनेक बाबतींतही सदाशिवराव बापटांना मदत केली. पण बापटांनी आठवणी गोळा करण्याच्या आधीच केळकरांनी टिळक चरित्र लिहिण्याचा संकल्प स्वत:च सोडला होता.  त्यामुळे केळकरांचे चरित्रलेखन व बापटांचे स्मृतिसंकलन ही दोन्ही कामे जवळपास एकाच वेळी चालू होती. त्याचा एक परिणाम म्हणून केळकरांना चरित्रलेखन करताना बापटांनी जमा केलेल्या आठवणींचा नीट उपयोग करून घेता आला नाही. तसेच बापटांनाही केळकरांच्या वारशाचा उपयोग झाला नाही. याचा परिणाम म्हणून टिळक चरित्रातल्या अनेक बारीकसारीक, परंतु महत्त्वाच्या गोष्टी अज्ञातच राहिल्या. अर्थात तरीही बापटांच्या त्रिखंडात्मक संकल्पाचे महत्त्व अबाधित राहते. केळकर, न. र. फाटक, धनंजय कीर आदी लेखकांनी लिहिलेल्या टिळक चरित्रांमध्ये काही मोकळ्या जागा राहिल्या असतील तर या आठवणींचा उपयोग करून ही पोकळी भरून काढता येते. त्याचप्रमाणे उपरोक्त चरित्रग्रंथांमधील माहिती जिथे अपुरी वाटते, तिथे तिच्यात भर टाकणाऱ्या पूरक माहितीचे साधन म्हणूनही आठवणींच्या या खंडांचा उपयोग होऊ शकतो.

सदाशिवराव टिळकांचे भक्तच होते, पण त्यापलीकडे जाऊन ते टिळकांच्या आसपास सतत वावरणाऱ्यांपकी एक होते. टिळकांच्या सहवासाचा एक परिणाम म्हणजे स्वत: सदाशिवरावांनीच सांगितलेल्या आठवणी. प्रस्तुत खंडांमधील टिळकांच्या आठवणींच्या संख्येचा विचार केला तर जास्तीत जास्त आठवणी सदाशिवरावांनीच सांगितलेल्या दिसून येतात.

लोकमान्यांभोवती नाटकवाल्या लोकांचा वावर असायचा आणि तेव्हाच्या मराठी रंगभूमीने टिळकांचे राजकारण पुढे नेण्यात मोठा हातभार लावला आहे. या विषयाचे सविस्तर विवेचन मी ‘लोकमान्य ते महात्मा’मध्ये केलेले आहे. या प्रक्रियेतील काही हकिगती केवळ बापटांनी नोंदविल्या म्हणून समजातात, एवढे महत्त्व बापटांच्या आठवणींना आहे. कृ. ल. सोमण ऊर्फ ‘किरात’ हे त्या काळातील एक महत्त्वाचे नाटककार होते. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली तेव्हा एकच प्रक्षोभ उसळला. याच दरम्यान बंगालने टिळकांच्या नेतृत्वाचा नि:संकोच स्वीकार केला. किरातांनी या विषयावर ‘वंगभंग प्रकोप’ नावाचे नाटक लिहायचे ठरवले. या संकल्पित नाटकाचा आराखडा त्यांनी टिळकांना दाखवून त्यांची संमती घेतली होती, ही महत्त्वाची बाब आपल्याला बापटांच्या आठवणीतून समजते. १९१६ साली अहमदाबाद येथे प्रांतिक परिषद भरली, तिच्यात टिळकांचे सर्व प्रकारचे आतिथ्य गांधींनी केले. दरम्यान, बापट आणि शंकरराव लवाटे व लक्ष्मणराव गोखले गांधींच्या आश्रमात गेले. ही आठवण सांगताना बापट लिहितात, ‘‘सुमारे तास-दीड तास तेथील सर्व व्यवस्था पाहून आम्ही परत येत असताना निम्म्या अधिक वाटेवर महात्माजी आश्रमाकडे चाललेले आम्हांस भेटले. भगवद्भक्त श्री तुकोबांप्रमाणे ती शांति-वैराग्यमूर्ती डोक्यास पांढरे पागोटे घालून, अंगस्त खादीचा अंगरखा घातलेली व अनवाणी येत असलेली दुरून आम्ही पाहताच भाऊसाहेब किंचित संकोचित झाल्यासारखे दिसले.’’

महात्मा गांधींची तुलना संत तुकाराम महाराजांबरोबर करणारे बापट हे पहिलेच असावेत. बापटांनी ज्या व्यक्तींकडून टिळकांच्या आठवणी मिळवल्या त्यांची कक्षा विस्तीर्ण आहे. त्यांत टिळकांचे अनुयायी व चाहते तर आहेतच; पण टिळकविरोधकांच्या आठवणींचा समावेश करण्यात बापटांची टिळकभक्ती आड आली नाही. वैजनाथशास्त्री राजवाडे यांच्यासारख्यांनी ‘गीतारहस्या’वर केलेल्या जहाल टीकेचाही समावेश बापटांनी कोणत्याही प्रकारची ‘सेन्सॉरशिप’ न चालवता केला आहे. बापटांच्या आठवणींत महाराष्ट्राबाहेरील मान्यवरांच्या आठवणींचाही समावेश होतो. त्यासाठी बापटांना विशेष इंग्रजी विभागाची तरतूद करावी लागली. या विभागात नेताजी सुभाष यांचेपासून बॅ. महम्मद अली जिनांपर्यंत अनेक मातब्बर अवतीर्ण होतात. लोकमान्यांप्रमाणे नेताजींनाही मंडाले येथील तुरुंगातील पाहुणचार प्राप्त झाला होता. वयाने टिळकांपेक्षा तरुण असलेल्या नेताजींना या तुरुंगात खूप त्रास झाला. अशावेळी त्यांनी आपल्यापेक्षा वयाने अधिक आणि व्याधिग्रस्त टिळकांचा आदर्श पुढे ठेवून दिवस काढले होते. बॅ. जिना आणि टिळक यांचे संबंध किती चांगले होते हे जाणकारांना वेगळे सांगायची गरज नाही. वकील जिनांनी टिळकांचे खटले लढवले होते. होमरूल चळवळीतही दोघे बरोबर होते. टिळकांचा अवमान करणाऱ्या लॉर्ड वििलग्डनची गौरवसभा उधळून लावण्याच्या योजनेचे सूत्रधार जिनाच होते. काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांच्यात करार घडवून आणण्यात टिळक आणि जिना अग्रभागी होते. गांधींच्या असहकारितेच्या चळवळीनंतर जिनांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. ‘‘नागपूर काँग्रेसने १९२० मध्ये असहकारितेच्या धोरणाला आणि कार्यक्रमाला मान्यता दिली तेव्हा टिळक जिवंत असते तर त्यांचा दृष्टिकोन काय असता याचा मी नेहमी विचार करीत आलेलो आहे,’’ असे जिना सांगतात, तेव्हा बापटांचा ग्रंथ एका वेगळ्या पातळीवर जातो.

‘आठवणी आणि आख्यायिकां’चे हे तीन खंड एकाच वेळी प्रसिद्ध झाले नव्हते. साहजिकपणे बापटांनी तीन खंडांच्या प्रस्तावना तीन टिळकभक्तांकडून लिहून घेतल्या. या तीन प्रस्तावनांचा एकत्रित विचार केला तर त्या काळातील राजकारणाचे स्वरूप समजून येते. पहिल्या खंडाला न. चिं. तथा तात्यासाहेब केळकर यांची प्रस्तावना लाभली आहे. विशेष म्हणजे याच काळात स्वत: तात्यासाहेबच टिळकांचे त्रिखंडात्मक चरित्र लिहीत होते. चरित्राचा पहिला खंड बापटांच्या आठवणींच्या पहिल्या खंडापूर्वीच प्रकाशित झाला होता. साहजिकच केळकरांना चरित्रलेखनासाठी

या खंडातील आठवणींचा उपयोग होण्यासारखा नव्हताच. केळकरांनी आपल्या प्रस्तावनेत बापटांची मनापासून प्रशंसा केली आहे. तरीही शेवटी अशा आठवणी वा आख्यायिका इतिहासाचे दुय्यम प्रमाण होत, मुख्य प्रमाण नव्हे. म्हणून त्यांचा उपयोग तारतम्यतेने करायला हवा, असा इशारा देण्यासही ते विसरत नाहीत.

स्वत: बापटांना आपल्या कृतीच्या मर्यादा ठाऊक असल्यामुळे ते लिहितात, ‘‘तात्यासाहेब केळकरकृत टिळक चरित्र जरी सर्वागसुंदर झाले असले तरी त्या चरित्रप्रासादाच्या चिरेबंदीतील क्वचित भरावयाच्या राहिलेल्या दरजा आठवणींच्या उत्कृष्ट सनल्याने जर बेमालूम भरल्या गेल्या तर अद्याप बनवावयाचे राहिलेले चरित्रप्रासादाचे उत्तुंग शिखर त्यामुळे अधिकच खुलून दिसावे.’’

आपल्या प्रचंड कामाची सुरुवात बापटांनी ३१ जुल १९२३ च्या ‘केसरी’मधून जाहीर विनंती करून केली होती. बापटांचा पहिला खंड २२ जुल १९२४ ला- म्हणजेच लोकमान्यांच्या जयंतीच्या दिवशी प्रसिद्ध झाला. यावरून त्यांच्या कामाचा उरक आणि लोकांनी त्यांना दिलेल्या प्रतिसादाची कल्पना यावी. विदर्भाचे टिळक मानल्या गेलेल्या माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांनी या जाहीर निवेदनाला लगेचच प्रोत्साहनपूर्वक प्रतिसाद दिला. बापटांनी त्यांच्या आत्मनिवेदनात वापरलेल्या बांधकामाच्या प्रतिमानाचे मूळ बापूजींच्या पत्रात सापडते. अणे लिहितात, ‘‘माझी अशी खात्री आहे की, इतक्या परिश्रमाने लोकमान्यांच्या चरित्राचा भावी भव्य प्रासाद बांधण्याकरिता आठवणींच्या रूपाने लहान-मोठय़ा विटा जमा करून आपण ठेवीत आहां, तोच क्रम असा चालू ठेविल्यास या सर्व सामग्रीचा उपयोग होऊन लोकमान्यांचा चरित्रप्रासाद निर्माण झालेला पाहण्याचे सद्भाग्यदेखील आपणांस लाभेल.’’

अणे यांचा रोख अर्थातच केळकर उठवीत असलेल्या चरित्रप्रासादाकडे होता हे उघड आहे. पण एकाच वेळी जवळपास समांतरपणे चाललेल्या या दोन महाप्रकल्पांमध्ये पुरेसा संवाद असल्याचे दिसून येत नाही. जणू हे दोन डोळे शेजारी असले तरीही! सदाशिवरावांच्या टिळकांविषयीच्या भक्तिप्रेमाचे मूळ त्यांचे वडील भाऊसाहेब यांच्या टिळकभक्तीत असल्याचा उल्लेख आवर्जून करायला हवा. भाऊसाहेब टिळक पुण्यतिथीच्या दिवशी सदाशिवरावांना टिळकांच्या गोष्टी सांगायचा आग्रह करायचे; त्यातूनच सदाशिवरावांना आठवणींचा संग्रह करण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी वयाने टिळकांनाही ज्येष्ठ असलेल्यांपासून वयाने टिळकांची मुले शोभावीत अशा तरुणांपर्यंतच्या विविध क्षेत्रांतील लोकांकडून आठवणी गोळा केल्या. टिळकांच्या पूर्वजांचे वृत्त आणि त्यांचे बालपणसुद्धा या आठवणींच्या कक्षेत येते.

आठवणींचा दुसरा खंड पहिल्याच्या प्रकाशनानंतर एका वर्षांच्या आत प्रसिद्ध झाला. या खंडास पहिल्या खंडाचे स्वागत करणाऱ्या अणे यांची प्रस्तावना लाभली आहे. पहिल्या खंडाची प्रस्तावना लिहिणाऱ्या केळकरांनी दुसऱ्या खंडाला अभिनंदनाची काही पाने लिहून दिली आहेत याचा उल्लेख करायला हवा.

आठवणींचे सार काढताना अणे सांगतात की, ‘‘साम्यदृष्टी व ध्येयकनिष्ठ आचरण ही लोकमान्यांच्या चरित्रातील व त्यांच्या गीतारहस्य प्रतिपादित लोकसंग्रहधर्माची आद्य व अबाधित तत्त्वे आहेत. त्या तत्त्वांचा विविध विलास या आठवणींच्या व आख्यायिकांच्या रूपाने प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या स्वैरकथारूपात मनसोक्त पाहावयास मिळतो.’’

दुसऱ्या खंडातील अणेंच्या प्रस्तावनेपेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत: बापटांनी लिहिलेले आत्मनिवेदन. असे म्हणण्याचे कारण म्हणजे या आत्मनिवेदनात त्यांनी आपले उद्दिष्ट आणि पद्धती स्पष्ट केली आहे, तसेच आठवणी मिळवताना आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांचेही प्रांजल कथन केले आहे. या आत्मनिवेदनात बापटांनी आपण आठवणींचा तिसरा खंड न काढण्याचे ठरविले असल्याचे जाहीर करून टाकले. हे करताना त्यांनी परत एकदा केळकरांच्या चरित्रखंडांचा संदर्भ दिला आहे. ‘‘श्रीयुत केळकरकृत लोकमान्यांच्या चरित्रप्रासादाचे अपूर्ण राहिलेले मजले व त्यावरील शिखर पूर्ण होण्यापूर्वी लोकमान्यांच्या सर्व भक्तांनी आपापल्या जवळची ‘आठवणी आणि आख्यायिकां’ची साधनसामग्री त्यांस वेळेवर नजर केली तर उत्कृष्ट कसबी शिल्पकाराप्रमाणेच त्याचा ते उपयोग करून घेतील आणि महाराष्ट्रास अभिमान बाळगण्यासारखे व चिरकाल टिकणारे लोकमान्यांचे हे देदीप्यमान व अतिमनोहर वाङ्मयस्मारक त्यांचे हातून पूर्ण यशस्वी होईल अशी अपेक्षा करणे स्वाभाविक आहे.’’

बापट जरी नाही म्हणाले तरी त्यांची टिळकभक्ती त्यांना स्वस्थ बसू देणे शक्यच नव्हते. त्यांनी तिसरा खंड काढलाच. खरे तर तिसरा खंड न काढण्याचे जाहीर करून बापटांनी परिस्थिती आजमावून पाहिली होती. ती अनुकूल आहे हे लक्षात आले आणि त्यांनी खंड काढायचे ठरवले. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांनी ‘टिळकसूक्तिसंग्रह’ प्रकाशित केल्यामुळे तिसरा खंड थोडा लांबणीवर पडला. तरीही १९२८ मधील टिळक पुण्यतिथीचा मुहूर्त गाठण्यात ते यशस्वी झाले.

तिसऱ्या खंडाला अमरावतीचे टिळकस्नेही दादासाहेब खापर्डे यांची प्रस्तावना लाभली आहे. वस्तुत: स्वत: बापटांनीच स्पष्ट केल्याप्रमाणे आठवणी प्रसिद्ध करण्याच्या प्रकल्पाचा शुभ प्रस्ताव दादासाहेबांच्या हस्ते अगदी आरंभी जगन्नाथ महाराज पंडित यांच्या वाडय़ात खाजगीरीत्या झालेला होता. याचीही नोंद घ्यायला हवी की, तिसऱ्या खंडाची प्रस्तावना स्वा. वि. दा. सावरकरांनी लिहावी अशी बापटांची इच्छा होती. परंतु खुद्द सावरकरांनीच खापर्डे यांच्या नावाची सूचना केली.

प्रस्तावनेत दादासाहेबांनी बापटांच्या कार्याचे उचित मूल्यमापन केले आहे. अर्थात त्या काळात म्हाइंभट आणि त्यांचे ‘लीळाचरित्र’ प्रकाशात आले नसल्यामुळे त्यांनी बापटांना दिलेले प्रथमतेचे श्रेय बरोबर नाही; तरीही बापट दुसरे ठरतात, हे काही कमी महत्त्वाचे नाही. दादासाहेब लिहितात, ‘‘आपल्या महापुरुषांच्या आठवणी जमा करून त्यांचे स्मारक करणे ही रा. बापटांची कल्पना मराठी वाङ्मयात अभिनव होय. त्यांनी वाङ्मयाची ही एक नवी पद्धत घातली असे म्हणावयास हवे. इंग्रजी वाङ्मयात ही कल्पना असली तरी एवढय़ा प्रमाणावर तिचा आविष्कार झालेला त्या वाङ्मयातही पाहण्यात नाही. असे म्हणतात की त्याच्या प्रत्येक बारीकसारीक कृत्यांत, बोलण्यात व चालचलणुकीत महापुरुषाचे महत्त्व दिसून येते. ते ज्यांस जेथे दिसून आले त्यांजपासून ते वेचून आणून महापुरुषाचे चरित्र बनविण्याची ही एक निराळीच पद्धत आहे. बापटांनी या पद्धतीचा पाया मराठी भाषेत प्रथम व भरभक्कम भरला आहे.’’

केळकर चरित्र लिहीत असताना आणि बापट आठवणी गोळा करण्यात गर्क असताना महाराष्ट्रात टिळकांचे काही अनुयायी नव्याने उदयास आलेल्या महात्मा गांधींच्या आश्रयाला गेले होते. टिळकांचे व गांधींचे विचार परस्परांच्या पूर्ण विरोधात आहेत असा मानणारा एक वर्ग गांधींपासून फटकून राहून त्यांच्या नेतृत्वाला विरोध करीत राहिला. हा वर्ग आणि गांधींकडे गेलेला वर्ग यांच्यात याकाळी जोरदार धुमश्चक्री चालू होती. तिचे प्रतििबब केळकर किंवा अणे यांच्या प्रस्तावनांमध्ये पडलेले दिसत नाही. तिसऱ्या खंडात मात्र दादासाहेब खापर्डे या मुद्दय़ाला थेट भिडलेले दिसून येतात. दादासाहेब असे एकमेव टिळकानुयायी होते की ज्यांनी पहिल्यापासून गांधींना विरोध केला, तोही अत्यंत परखडपणे. या साऱ्या विरोधाचे सारच प्रस्तुत प्रस्तावनेत आलेले आहे. गांधींची प्रतिमा एक बिलंदर व बेरकी, धूर्त व कारस्थानी, कपटपटू अशीच उभी करण्याचा खापर्डे यांचा प्रयत्न दिसून येतो. गांधींच्या वेगळ्या धाटणीच्या राजकारणामुळे टिळकांच्या अनुयायांचे नेतृत्व संपुष्टात आले, या वस्तुस्थितीचा विचार दादासाहेब एक प्रक्रिया म्हणून न करता वैयक्तिक पातळीवरील हेत्वारोपांच्या भाषेत करतात.

दादासाहेबांच्या या प्रस्तावनेच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहिल्या नाहीत. अणे यांनी बापटांना पत्र लिहून दादासाहेबांची हातचे राखून प्रशंसा केली. मुंबईचे काशीनाथ नारायण धारपांनी ‘अपूर्व’ म्हणत तिचे स्वागत केले. गांधींच्या छावणीत गेलेल्या टिळकानुयायी गंगाधरराव देशपांडे यांनी लिहिले की, ‘‘आपल्या नवीन पुस्तकातील विशिष्ट भाग अनिष्ट आहे असे पुष्कळांना वाटते, ही गोष्ट खरी आहे. तो नसता तर बरे झाले असते. निदान हल्लीच्या परिस्थितीत तरी तो नको होता.’’

म. म. दत्तो वामन पोतदार यांनी मात्र तीव्र नापसंती व्यक्त केली. दादासाहेबांचा क्रोध आणि अनुदारपणा पाहून चित्ताला चरका बसतो, असे ते म्हणतात. ‘गांधी यांच्या लोकोत्तर महानुभावित्वाविषयी कुत्सित शंका’ घेतली जाणे पोतदारांना मान्य नव्हते.

ते काहीही असो. सदाशिवरावांनी मात्र आपले काम चोखपणे बजावले याबाबत कोणाचेही दुमत होण्याचे कारण नाही. जाता जाता टिळकांचा निष्काम कर्मयोग बापटांमध्ये कसा उतरला होता हेही सांगायला हवे. स्वत:कडे कर्तृत्व घ्यायचे ते नाकारतात. त्यासंदर्भात ‘फोडिले भांडार धन्याचा हा माल। मी तव हमाल भारवाही॥’ हे वचन ते उद्धृत करतात.