13 December 2019

News Flash

निरंतर

रँडम हाऊस प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये तिच्या टेबल-खुर्चीवर बसली होती ती. रँडम हाऊसची ती पहिली कृष्णवर्णीय महिला संपादक होती.

|| डॉ. आशुतोष जावडेकर

टोनी मॉरिसन. नोबेलविजेती कृष्णवर्णीय लेखिका. रॅण्डम हाऊस या प्रकाशन संस्थेत संपादनाचं काम करता करता एके दिवशी तिला आपल्यातल्याच लेखिकेचा शोध लागला. खूप उशिरा. परंतु एकदा या कस्तुरीचा गंध हुंगल्यावर तिने मागे वळून पाहिलंच नाही. वर्णसंघर्षांचं चित्रण करतानाच ती त्याहीपलीकडे गेली.. चिरंतन माणूसपणाकडे!

रँडम हाऊस प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये तिच्या टेबल-खुर्चीवर बसली होती ती. रँडम हाऊसची ती पहिली कृष्णवर्णीय महिला संपादक होती. तिथे संपादक म्हणून काम करताना अभिजन साहित्यवर्तुळात तिच्या ओळखी होत असल्या आणि काहीसा अधिकार मिळू पाहत असला तरी पगार मात्र बेताचाच होता तिला. दोन मुलं वाढवायची होती. कुटुंबातल्या अन्य नातेवाईकांच्या या ना त्या जबाबदाऱ्या होत्या. कुठे विद्यापीठात तात्पुरती व्याख्याने देऊन पसे मिळव, कधी दुसरी सटरफटर साहित्यविश्वातली कामे मिळव.. हे असं खर्च भागवण्यासाठी ती करत होतीच.

एका उदास, उद्विग्न संध्याकाळी ती तिच्या खुर्चीवर बसली होती. पुढय़ात संपादन करायचं पुस्तक समोर असणार तिच्या.. पण तिला दिसलं नसणार. सगळ्या चिंता, आव्हाने तिला घेरत होत्या. बाकीचे लोक निघून जायला लागले तेव्हा ती निघाली खरी; पण तिला उठताच येईना तिच्या खुर्चीवरून! त्या मूढ अवस्थेत तिने मग समोरचा कागद ओढला. आपण आपले प्रश्न लिहिले तर सुटतील असं तिला वाटलं. एक पान झालं, दुसरं झालं. आणि मग तिला कळलं आपण अंतर्बाह्य़ लेखिका आहोत! आणि या क्षणानंतर जन्मभरासाठी! पुढे आपण पुलित्झर पुरस्कारच काय, नोबेल पारितोषिकही मिळवू असं तिला वाटलं नाहीच तेव्हा. पण ते दोन्ही आणि अन्य अनेक पुरस्कार तिला मिळाले. तिच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. आणि नुकतंच अठ्ठय़ाऐंशी वर्षांचं संघर्षमय, पण समृद्ध आयुष्य जगून ती मनात आत तशीच उत्साही, तरुण राहिलेली मुलगी इथून निरोप घेऊन निघून गेली. ती बातमी माझ्या कानावर पडली तसा मी दोनेक मिनिटं स्तब्ध राहिलो. टोनी मॉरिसन.. मी मनात नाव घोळवलं आणि डोळे मिटून शांतपणे नमस्कार केला. लेखक आणि वाचक यांचं असं अद्भुत नातं असतं ना? कधी भेटले नसले प्रत्यक्ष- तरी शब्दांमुळे त्यांची आतून ओळख झालेली असते. घरची आजीबाई जावी असं दु:ख माझ्यासारख्या अनेक जगभरच्या वाचकांना झालं. बातम्यांवर बातम्या आल्या. टोनीच्या मुलाखती सर्वत्र फिरू लागल्या. मला मात्र तिची एक जुनी मुलाखत आठवली. (आणि हे असं एकेरीत मी आपल्या आजीला म्हणावं तसं प्रेमादरानेच म्हणतो आहे.) जाना वेन्टने घेतलेल्या तिच्या मुलाखतीचे दोन प्रश्न मला तसेच्या तसे आधी उतरवू दे.

जाना : तू गोऱ्या माणसांना तुझ्या साहित्यात कधीच ठळकपणे आणणार नाहीस का?

टोनी : आणलंय मी.

जाना : ठळकपणे?

टोनी : you can’t understand how powerfully racist that question is! हा प्रश्न किती सशक्त वर्णद्वेषी आहे, हे तुला बाळा कधीच समजणार नाही! तू गोऱ्या लेखकाला हे कधीच विचारणार नाहीस- की काळ्या माणसांना तुझ्या साहित्यात तू कधी आणणार?

आजही मला ते संवाद ऐकताना टोनी मॉरिसनच्या चिंतनशीलतेची प्रखरता अंगावर काटा आणते. काय कमाल उत्तर आहे. प्रश्नाला नुसतं पलटवणं नसून ते प्रगल्भ चिंतन आहे. ही मुलाखत काहीशी जुनी. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत संदर्भ होता अल्पवयीन कृष्णवर्णीय मुलांनी दंगाधोपा केल्यावर पोलिसांनी त्यांच्या पाठीत गोळ्या मारल्या त्याचा.

टोनी सांगत गेली : ‘‘पोलीस म्हणाले की स्वसंरक्षणार्थ त्यांनी गोळ्या घातल्या. पण मुलांची पाठ होती म्हणजे ती पळून जात होती. ती घाबरली होती! असं मारणं हे पोलिसांचं भेकड कृत्य होतं.’’ आणि मग एक विराम घेऊन टोनी म्हणाली, ‘‘जगातली सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे शस्त्र हाती असलेला भेकड माणूस.’’

मला एकदम आठवला तिच्या ‘दि ब्लूएस्ट आय’ या अफाट कादंबरीतला प्रसंग : कॉली हा काळा इसम प्रेयसीसोबत शेतात संग करताना मागून अचानक दोन गोरे पोलीस येतात. घाईत कॉली बाजूला होतो. पण छद्मी हसत ते पोलीस त्याला कृत्य सुरू ठेवायला सांगतात. त्याच्या शरीरावर मागून पोलिसांच्या टॉर्चचे प्रकाशझोत अधेमधे पडत राहतात आणि मागून पोलिसांचं खिदळणंही ऐकू येतं.

ही कादंबरी आहे त्या कॉलीच्या मुलीची- पिकोलाची. ती नुसती दरिद्रीच नव्हे, तर प्रेमाचा अभाव असलेल्या घरात जन्मलेली अभागी मुलगी आहे. आणि तिने आता ध्यास घेतलाय निलोत्तम डोळे मिळवण्याचा! तिला वाटतं की वर्गातल्या मौरीसचं कौतुक हे तिच्या गोरेपणामुळे होतं आणि निळ्या डोळ्यांमुळे. निदान आपण निळे डोळे मिळवू या! तिच्या त्या स्वप्नाचा शेवटी वेडापर्यंत झालेला प्रवास या कादंबरीत आहे. ती कहाणी सांगते फ्रीडा. तीही कृष्णवर्णीय आहे. पण तिला घरात रांगडं का असेना, प्रेम आहे आणि आपल्या काळ्या परंपरांची संचितेही नकळत तिला मिळत आहेत. फ्रीडाच्या निमित्ताने टोनीने सौंदर्यावर किती मूलभूत चिंतन केलेलं आहे! फ्रीडाला वाटतं, वर्गातल्या गोऱ्या मौरीस पिलकडे जर सौंदर्य आहे- आणि ते आहे- तर आपल्याकडे ते का नाही? म्हणजे आपण अधिक स्मार्ट आहोत, चांगले आहोत; पण  कुठेतरी कमी आहोत बहुदा. यामागचं रहस्य काय? काय नाहीये नक्की आमच्यात? ते का मोलाचं आहे? आणि तसं असेल तरी काय? पण अशा प्रश्नांतून फ्रीडाला अखेर उत्तरे मिळतात, खंबीरपण येतं. पिकोला मात्र हरवत जाते- निळ्या डोळ्यांच्या शोधात. फ्रीडाने स्वत:चे काळे केस, त्वचा जशी स्वीकारली तसं पिकोलाला जमत नाही. अखेर तिचा बापच तिचा दोनदा उपभोग घेतो. (त्याचं आयुष्य सभोवतालाने आणि त्याने स्वतही नासवलं  आहेच.) तो बलात्कार आहे हे समजण्याची स्थिरताही पिकोलाकडे आता नसते. अखेर पिकोला गावाच्या कचरापेटीच्या आसपास विमनस्कपणे वेड लागून फिरताना, फ्रीडाला दिसते. तिच्या पोटातलं बाळही जगलं नसतंच. फ्रीडा सांगते, काही जमिनींमध्ये सूर्यफुलं उगवतच नाहीत! आत्ता हे लिहितानाही माझ्या गळ्यात आवंढा आहे. अद्भुत लेखणी बाईंची!

पण टोनी ‘गोरा विरुद्ध काळा’ असं ढोबळ चित्र चितारत नाही. ती खोल जाते आणि माणसांना त्यांच्या समूहांसकट आणि समूहविरहित अशा दोन्ही तऱ्हांमध्ये तपासते. बिल क्लिंटन हा गोराच आहे. पण त्याच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारवेळेस टोनी म्हणाली होती की बिल हा जवळजवळ कृष्णवर्णीयच आहे. गरीब, एकटय़ा पालक असलेल्या घरात जन्मलेला. सॅक्सोफोन वाजवणारा. मॅक्डोनाल्डचं खाणं आवडणारा. अर्कान्सासच्या मजूरवर्गातला हा मुलगा!

काळा-गोरा या भेदाची, टोनी मॉरिसन असं म्हणताना पूर्ण उचलबांगडी करीत असते. आणि मुळात त्यामागे सम्यक विचार असतो. अन्यायाला तिने मुखरीत केलं. पण जखमा कुरवाळत बसण्यात तिची लेखणी अडकली नाही! आणि म्हणूनच तिने जाना वेन्टच्या त्या मुलाखतीत अजून एका प्रश्नाला उत्तर द्यायला हवं होतं. जानाने विचारलं होतं, ‘‘टोनी, तू आता स्वत: काही परिघावरची राहिलेली नाहीस. तूही  प्रस्थापित आहेस. मग तू कुठलं लेखन करणार? परिघावरचं का प्रस्थापित जगावरचं?’’

हा प्रश्न मोलाचा आहे. जगभरच्या रेसिस्टन्ट साहित्याला, दलित साहित्याला तो तसाच्या तसा लागू होतो. आणि त्याचं उत्तर एकमुखी नाही.. सोप्पंही नाही!

पण टोनी मॉरिसनकडून प्रस्थापित आणि परिघावरच्या दोन्ही लेखकांना शिकण्यासारखं काय असेल, तर तिचा लेखनविचार! ‘ब्लूएस्ट आय’च्या प्रस्तावनेत तिने शब्दांची निवड मी कशी केली, कथानक कसं उलगडत नेलं, काय मला साधलं आणि काय हुकलं, हे सर्व अप्रतिम तऱ्हेने सुस्पष्टपणे सांगितलं आहे. स्वत:च्या निर्मितीकडे अशा तऱ्हेने बघणं सोपं नाहीच. तिच्या भाषेतच एक अंत:संगीत आहे. त्याचं नातं निग्रो स्पिरिच्युअल संगीतापासून ते एकंदर ब्लॅक म्युझिकशी आहे. जॅझमधलं उपज अंग तिच्या लेखनशैलीत नकळत उतरलं आहे. तिच्या भाषेला नादवत्ता आहे, काव्यात्मक जाणीव आहे. तिचं गद्य हे कवितेहून अधिक कविता असल्यासारखं आहे. एक छान प्रसन्नता या टोनीआजीकडे असणार. ती तिच्या शब्दांतही उतरते. बराक ओबामांच्या हस्ते जेव्हा अमेरिकेचं सर्वोच्च राष्ट्रीय मेडल तिला मिळालं तेव्हा ते स्वीकारतानाचा तिचा व्हिडीओ मी बघत होतो. एकदम वाटलं, की काहीशी स्थूल शरीरयष्टी असलेल्या वृद्ध टोनीच्या हालचालींत एक मोहकपण आहे. तरुणाई रेंगाळली आहे तिच्या आत! ‘वयाच्या ऐंशीव्या वर्षांला तुला काय महत्त्वाचं असतं असं वाटतं?’ असं ओप्रा विन्फ्रेने विचारल्यावर टोनी हसून म्हणालेली.. ‘‘स्वत:ची अशी हक्काची जागा असणं- जिथं तुम्ही असता आणि तुमचं संवेदन असतं, ती पवित्र जागा असते. मग ती बागकाम करताना मिळेल, नाही तर संगणक वापरताना.’’

टोनी मॉरिसनला तिची हक्काची पवित्र जागा अफाट संघर्षांनंतरच मिळाली. तिने ‘ब्लूएस्ट आय’च्या उपसंहारात लिहिलं आहे.. ‘‘पिकोलासारखीच गत या कादंबरीची सुरवातीला झालेली. दुर्लक्षित, अव्हेरलेली आणि सामान्य समजली गेलेली ही कादंबरी. आता पंचवीस वर्षांनंतर तिला तिच्या हक्काची जागा मिळत आहे.’’

हा झाला एका पुस्तकाचा प्रवास. अशी अनेक पुस्तके, स्फुटलेखन, भाषणे, व्याख्याने, चर्चासत्रे.. एकूणच केवढा संयम असेल, उतावीळपणा किती लांब ठेवला असेल तिने! ही लेखिका या प्रवासात कडवट झाली नाही, हे विशेष. तिच्यातली धार मिटली नाही, हेही तितकंच विशेष. एक मधली सम्यक रेष तिने पकडली आणि वाचकांचं प्रेम मिळवलं. तिचंच वाक्य आहे : Love is never any better than the lover. जसा प्रेमिक, तसं त्याचं प्रेम. ही लेखिकाच मुळात इतकी समृद्ध होती, की तिने दिलेलं आणि तिच्या वाटय़ाला उलट आलेलं प्रेमही समृद्ध, भरभरून आलेलं असं होतं. ती आता गेली. आता ती पुन्हा हसताना, बोलताना, लिहिताना दिसणार नाही. संघर्ष, तडजोड आणि अनुकंपा यांचा त्रिकोण साधून ती रँडम हाऊसमधली तरुणी लांब प्रवासानंतर शांतपणे दूर निघून गेली आहे. मागे तिचे शब्द आहेत आणि आपण आहोत. ती नसली तरी तिचे शब्द निरंतर राहणार आहेत हे माहीत आहे. तरी असं तुटल्या-तुटल्यासारखं का बरं वाटतं आहे? का बरं?

ashudentist@gmail.com

First Published on August 11, 2019 2:32 am

Web Title: american novelist toni morrison mpg 94
Just Now!
X