News Flash

प्रेरक चरित्र

अनंतरावांना मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र, एका मंत्र्याचा खटला आणि आणीबाणी यात तुरुंगवास झालेला

(संग्रहित छायाचित्र)

जयदेव डोळे

‘इतिहास आपल्या खोलीत येऊन खुर्चीवर बसलाय. ताजी वृत्तपत्रे वाचून काढून आज कोणत्या विषयावर अग्रलेख लिहायचा, ते त्याने ठरवलेय. वर्तमानकाळ त्याच्या तीक्ष्ण नजरेतून चाळण होत भविष्यकाळात पालटतोय. एकेक पान उलटत ठराविक शब्दांत सारे विश्लेषण मांडल्याची जाणीव होताच तो लिहायचे थांबलाय. घंटा वाजवलीय. शिपाई येऊन अग्रलेख घेऊन गेलाय टंकजुळणी करणाऱ्यांकडे. इतिहास थोडासा सैलावत काहीतरी वाचण्यात मग्न झालाय. इतका वेळ उघडेच असलेल्या दारातून कोणी तरी आत आलेय. ‘या’ असं प्रेमळ स्वागत इतिहास करतोय. हळूहळू खोलीत लिखित शब्दांच्या जागी मौखिक शब्द धावपळ करताहेत. विचार, तत्त्वे, हसू, अनुभव, किस्से, चौकशी, संताप अशी कितीतरी रूपे हे शब्द घेतायत. मराठीतलेच हे सारे, पण कसे नम्रपणे इतिहासापुढय़ात वावरताहेत.’

औरंगाबादेतल्या ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक अनंत भालेराव यांच्या कार्यकर्तृत्वाचे यापेक्षा अधिक वर्णन काय करणार? हैदराबाद मुक्ती संग्रामात लेखणी, वाणी आणि पिस्तूल यांनी ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर संपादक म्हणूनही तितकीच जाज्वल्य अन् देदीप्यमान मुद्रा उमटवून गेलेला हा एक लढवय्या. लेखणीची भालेराई कधी करायची आणि लेखणीचे मोरपीस कधी, याची अव्वल जाण असणारी एक हुकुमत. त्यांच्याविषयी ‘ऐकून’ आदर बाळगणाऱ्यांना आता तो एका पुस्तकातून दिसणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे अनंतरावांचे एक स्नेही, मित्राचे चिरंजीव आणि समविचारी. त्यांनी आजवर अज्ञात असलेले अनंतरावांचे असंख्य पैलू महाराष्ट्रासमोर आणले आहेत. एखाद्या परिचित व पितृतुल्य व्यक्तीचे चरित्र लिहिताना पुष्कळदा लेखक अवतार कल्पनेत वा भक्ती संप्रदायात गडप होतो. न्या. चपळगावकर यांनी अनंतरावांचे व्यक्तिमत्त्व त्या-त्या वेळच्या राजकीय व ऐतिहासिक घटनांनी कसे घडत गेले, हे कथन केल्याने मुक्ती लढय़ाचा इतिहासही वाचकाला उलगडतो. त्याग, समर्पणवृत्ती, साहस, नेतृत्व गुण, शिक्षकी मन, साहित्यिक रुची, अभ्यासूपणा, साधेपणा, बंडखोरी असे कितीतरी प्रकारचे अण्णा समोर येत राहतात. महत्त्वाचे म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, आनंद कृष्ण वाघमारे, बाबासाहेब परांजपे, नरहर कुरुंदकर या थोरांपासून अण्णांच्या पत्नी सुशीला भालेराव, अनेक मित्र आणि सहकारीही या चरित्रात येतात. ‘मराठवाडा’ची स्थापना वाघमाऱ्यांनी केलेली. त्यांनी स्वातंत्र्यानंतर अनंतरावांना आपल्याकडे घेतले आणि त्यांच्या क्षमता सिद्ध होताच संपादकपदी बसवूनही टाकले. चळवळीतले साथी एकमेकांचे गुण ओळखून लोकशाही समाजवादाचा विचार कसा पुढे नेता येईल, याची आखणी कशी करीत, याची कित्येक उदाहरणे या एका महनीय व्यक्तीच्या चरित्रातून आपल्याला समजतात.

अनंतरावांना मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र, एका मंत्र्याचा खटला आणि आणीबाणी यात तुरुंगवास झालेला. त्याने त्यांची कारकीर्द आणखी झळाळून निघाली. हा निव्वळ बैठा व उपदेश करणारा संपादक नसल्याचे महाराष्ट्राने जाणले. त्यामुळे ‘मराठवाडा’ वृत्तपत्र सर्वार्थाने दणकट राजकीय प्रकृतीचे आहे, अशीही महाराष्ट्राची ठाम समजूत झाली. वडिलांच्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव म्हणून अनंतराव संत परंपरा व वारकरी यांचा फार मान राखीत. काशिनाथबुवांचे चिरंजीव म्हणून त्यांना कोणी वाकून नमस्कार केला की तेही समोरच्याला तसा करीत. उराउरी भेटीही करीत. व्यक्तिश: ते निरीश्वरवादी, निधर्मी असूनही धर्म व परंपरा यांचा आदर करीत. हैदराबाद स्टेट काँग्रेसमधून बाहेर पडून ‘लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्स’ हे संघटन स्वमीजी व भाईंनी निर्माण केल्यावर हैदराबाद विधानसभेची १९५२ ची निवडणूक अनंतरावांनी बिलोली मतदारसंघातून लढवली. त्यांच्यासकट साऱ्यांचाच या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर अण्णांनी एकही निवडणूक लढवली नाही. प्रचार मात्र खूपदा करीत राहिले. त्यांच्या सभा गर्दी खेचत.

अनंतरावांची लेखनशैली अनेकांना भुरळ घालीत असे. त्याचे कारण त्यांचे वाङ्मयीन वाचन व दृष्टी. जेवढे वैचारिक वा राजकीय लेखन तर्कशुद्ध अन् परखड तेवढेच त्यांचे ललितलेखन व स्मरणरंजन हळुवार आणि भावूक. त्यांनी लिहिलेला हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास तर अभ्यास, चिंतन आणि विश्लेषणाचा अप्रतिम नमुना. अनंतराव व्यक्तिश: व संपादक म्हणून मराठवाडा विकास आंदोलन, बिहारचे आंदोलन यांत सामील होते. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर होऊ नये, असे त्यांचे व ‘मराठवाडा’च्या विश्वस्तांचे मत होते. त्यांनी तीन अग्रलेख लिहून नामांतराला विरोध केला. त्यामुळे ते एकाकी पडले. त्यांचे समाजवादी सच्चेपण संशयास्पद ठरवण्यात आले. त्याने अनंतराव कसे व्यथित झाले, ते लेखकाने नमूद केले आहे.

अनंतरावांच्या आयुष्यातील कितीतरी प्रसंग आपल्या न्यायिक तटस्थ दृष्टीतून चपळगावकरांनी मांडले आहेत. एखाद्याचे आयुष्य इतक्या घडामोडींनी भरलेले असले की ते वाचता वाचता आपण समृद्ध होत जातो. अग्रलेख लिहून संपादकीय मुकादम म्हणून लोकविन्मुख वागणाऱ्यांपैकी अनंतराव नव्हते. त्यांच्यावरील या पुस्तकाने महाराष्ट्राला केवढा अचाट प्रतिभेचा माणूस लाभला होता, याची जाणीव होते. आजच्या मुस्कटदाबीच्या वातावरणात या थोर स्वातंत्र्यसैनिक संपादकांचे चरित्र नक्कीच प्रेरक ठरेल.

‘अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’

– नरेंद्र चपळगावकर

अभंग प्रकाशन, नांदेड

पृष्ठे – १३८, मूल्य – २२० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 4:14 am

Web Title: anant bhalerao by narendra chapalgaonkar book review abn 97
Next Stories
1 दखल : किडनी विकारांचा सामना करताना..
2 सांगतो ऐका : एक विलक्षण कुटुंबत्रयी
3 अफसाना लिख रही हूँ.. : ‘सफर’
Just Now!
X