आज महाराष्ट्रात हिंदुत्ववादी आणि डावे, निधर्मी असे दोन उभे तट पडले आहेत. त्यांच्या कलह-कोलाहलात सामान्य लोक संभ्रमित झाले आहेत. या गोंधळी परिस्थितीत खऱ्या विचारवंतांचा दुष्काळ आणि तोतयांचा सुकाळ आहे. अशावेळी एकेकाळी महाराष्ट्राचे सक्रीय वैचारिक नेतृत्व करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक दुर्गा भागवत यांच्या समग्र साहित्यसंचिताची चार पुस्तके प्रसिद्ध होत आहेत, ही एक महत्त्वाची सांस्कृतिक घटना होय. या आगळ्या घटितानिमित्ताने अंबरिश मिश्र यांनी भवताल आणि दुर्गाबाईंच्या साहित्यसंचिताबद्दल

केलेलं मुक्त चिंतन..

Ajit pawar on nephews
Video: “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

तर मुख्य सांगायचं म्हणजे महाराष्ट्राचा चेहरा अलीकडे भेसूर दिसू लागलाय. वरवरची साजसजावट तेवढी बघून घ्या. शॉपिंग मॉल्स, सी-लिंक, कोस्टल रोड.. सांस्कृतिक परंपरांचा मात्र आपल्याला साफ विसर पडलाय.

एकोणिसाव्या-विसाव्या शतकात महाराष्ट्रानं दिलेला विचार देशभर कडाडत होता, असं एखाद्या मराठी घरात जाऊन म्हणा तर.. अकरावी-बारावीतली कच्चीबच्ची तर सोडा, घरातले म्हातारे आजोबासुद्धा मख्ख चेहरा करून तुमचं ऐकतील. काळजाचं पान हलणार नाही म्हणजे नाही. आभाळाएवढी माणसं आपल्याकडे होऊन गेली. हिंग लावून कुणी आता विचारत नाहीये त्यांना. ‘मेलेल्या म्हशीला मणभर दूध’ ही म्हणसुद्धा आपण विसरून गेलोय. काही महापुरुषांचं वस्तूकरण झालंय. हे दुर्दैव त्या सत्पुरुषांचं. अन् महाराष्ट्राचंसुद्धा!

विचाराच्या क्षेत्रात तर ठार शुकशुकाट आहे. A great sad peace descends on Thebes… अशी अवस्था

आहे. अँटिगनीला मरणाच्या हाती सुपूर्द केल्यावर क्रियॉन

राजा- र्सवकष सत्तेमुळे एकीकडे क्रूर अन् दुसरीकडे एकाकी, हतबल असा क्रियॉन राजा- शांतपणे अन् अटळपणे राज्यकारभाराकडे वळतो.

हल्लीचे क्रियॉन राजे राज्यसुद्धा धडपणे करत नाहीयेत. सेल्फी काढण्यात मश्गूल असतात. हे भेसूर आहे.

इतिहासातले उन्मादाचे क्षण चिमटीत उचलायचे अन् लोकांवर उधळायचे हा राजकारण्यांचा हातखंडा खेळ. लोकांची माथी भडकवण्याशी मतलब. जात-धर्माच्या जाणिवा कमालीच्या ताणलेल्या. सगळे पटदिशी हातघाईवर येतात. प्रसारमाध्यमांनाही अशाच चकमकींत रस असतो.

हे वातावरण निकोप, शुद्ध विचाराला बरकत आणणारं नाहीये.

आपला हा ऱ्हास आपण कसा करून घेतला? कसं जमलं आपल्याला हे?

नेते नटांप्रमाणे वागताहेत. नट-नटय़ांना विचारवंतांचा मान मिळतो आहे. खरा विचारवंत अडगळीत फेकला गेलाय. तोतये विचारवंत पैशाला पायलीभर झालेत. ते राजकीय कार्यकर्त्यांप्रमाणे वागतात.

वैचारिक क्षेत्रात उजवे-डावे असा धुडगूस सुरू आहे. त्यामुळे आपल्या सार्वजनिक जीवनाला ‘ते आणि आम्ही’ अशी उभी भेग पडलीये. हिंदुत्ववाद आणि निधर्मीवाद या दोन राजकीय तत्त्वप्रणाली आहेत असं भासवलं जातंय. तशा त्या कोणे एकेकाळी होत्या. मतांच्या राजकारणासाठी मुद्दाम स्वीकारलेल्या झापडबंद, हेकेखोर अन् एकांगी भूमिका असं सध्या या विचारसरणींचं विकृत स्वरूप आपल्यासमोर आहे.

हिंदुत्ववादी आपल्या भिंगातून भारताचं वास्तव पाहणार. डावे आपल्या भिंगातून. आंधळ्यांच्या गावात ल्ली-one-eyed Jacks ची राजवट.

सर सिरिल रॅडक्लिफनं भारताची फाळणी निळ्या पेन्सिलीनं केली म्हणतात. तोतया विचारवंतांकडे अशा पुष्कळ पेन्सिली असतात. अनेक रंगांच्या. छान फाळणी करता येते. निळा रंग आर. पी. आय.चा, लाल कम्युनिस्टांचा, भगवा संघवाल्यांचा, हिरवा मुसलमानांचा.

शब्दांचीदेखील चोख वाटणी झालेली आहे. अमुक शब्द ब्राह्मणांचेच, अमुक मराठय़ांचे, किंवा दलितांचे. ‘हो चुकी खासा-ओ-खस की बांट पहले से यहां/ खूश हैं सब दुष्मन के अपना आशियां गिरने को है..’  हेच खरं.

समाज-संस्कृती, भाषा, इतिहास, तत्त्वज्ञान अशी व्यापक बैठक लाभलेला समग्र, स्वायत्त आणि मूलगामी विचार हल्ली कुठं वाचा-ऐकायला मिळत नाही. क्वचित मिळाला तर मिळाला. अगदी क्वचित.

एरवी सगळा रखरखाट.

एकेकाळी इतिहासाचार्य राजवाडे, डॉ. श्री. व्यं. केतकर, शेजवलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेतुमाधवराव पगडी, नरहर कुरुंदकर, गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर यांच्या विचारांचा धार्जिणा असलेला महाराष्ट्र.. एवढी अवकळा यावी आपल्या वैचारिक जीवनाला? सगळं पिळपिळीत, गिळगिळीत करून टाकलंय आपण. चांगल्या गोष्टी नासवण्याचं कसब आपल्याकडे कुठनं आलं?

चर्चा दोनच टोकांमध्ये फिरत असते. हिंदुत्व आणि डावे-निधर्मी. दोघांपैकी एक निवडा. वांधा असा, की एकाची निवड केली की दुसराही मागे मागे येतोच. एक पर एक फ्री.

चर्चा, चर्चा म्हणजे काय? तर तुम्ही कोणत्या बाजूचे आहात ते जाहीर करून टाका अन् कळपात सामील व्हा. या बाजूला, नाही तर त्या बाजूला. मध्यम मार्ग नाहीच. दारांवर फुल्या मारण्याचा धंदा सध्या तेजीत आहे.

आपण डावे-निधर्मी आहोत असं समजा एखाद्यानं सांगून टाकलं की डाव्यांपेक्षा हिंदुत्ववाद्यांना जास्त हायसं वाटतं. शत्रू कळला की काम सोपं होतं.

डाव्यांचं वेगळंच दुखणं आहे. ते प्रत्येक नागरिकाकडे संशयानं पाहत असतात. हा बहुधा संघवाला आहे.. आहे की नाही? मग बसा फुलाच्या पाकळ्या  खुडत- ‘हा संघवाला आहे, हा संघवाला नाही, हा संघवाला आहे, हा संघवाला नाही.. होय, नाही.. नाही, होय.’ म्हणजे स्वत:च्या विचारांचा प्रसार करायचं ते राहिलं बाजूला; संघाची भर कशी होईल ते पाहत बसायचं. डाव्यांच्या हे लक्षात कसं येत नाही?

संघवाले तर तयार आहेतच सगळं गिळंकृत करायला. गौतम बुद्ध अन् चार्वाकही असेच गिळून टाकले ना तेव्हाच्या संघवाल्यांनी.

या दोन्ही भूमिकांच्या पलीकडे, कोलाहल-कलहापासून खूप दूर आहे ‘भारत’ नामक एक संकल्पना. एक एकात्म, सर्वस्पर्शी, अर्थगर्भ विचार. हा विचार काळाला पुरून उरलाय. असंख्य हल्ले अन् आक्रमणं पचवून आपली जीवनसन्मुखता, सदयता सोडत नाहीये. वैदिक संस्कृती आणि लोकसंस्कृती यांच्या मिलाफातून सिद्ध झालेला हा विचार हिंदुत्ववाद्यांना परवडणार नाही. डाव्यांनाही नाही.

भारत नामक हा विचार एका अथांग नदीकाठी उभा आहे. ही नदी संस्कृतीची. हजारो र्वष ती अखंड वाहते आहे. तिचं हृदय विशाल आहे. अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रवाहांना बरोबर घेऊन ती वाहते आहे. म्हणूनच भारताचं अंतर्मन स्वच्छ, नितळ राहिलंय. हे अंतर्मन समजून घेण्याची गरज ना हिंदुत्ववाद्यांना वाटत, ना डाव्यांना.

हिंदुत्ववादी सतत भारताच्या प्राचीन गौरवाचं दळण दळत असतात. दुधाच्या नद्या, फांद्यांवर ‘सोने की चिडिम्या’ वगैरे.

आपण म्हणणार, ‘अहो, तसं नाहीये. त्या काळात आपण खूप घनघोर चुका केल्या. आपल्यातल्याच एका फार मोठय़ा वर्गाला आपण जनावरापेक्षाही वाईट वागवलं.’

तर ते म्हणणार, ‘ते राहू दे. यापुढच्या काळात आपण सुपर पॉवर होणार. आपण चीनला मागे टाकणार.’

हेसुद्धा आपल्याला न पटण्यासारखं. ‘अहो, सुपर पॉवरचं दूर राहिलं. मुंबईत माणसं डासांमुळे मुंग्यांप्रमाणे मरताहेत. फक्त एक लोकल रुळावरून खाली घसरली की माणसं वेडय़ाप्रमाणे रस्त्यावर, ट्रॅकवर वणवण भटकत असतात.’

त्यावर ते ‘उत्तिष्ठ’ म्हणत लोढा किंवा मेहता नामक भूतदयावादी व्यापाऱ्याकडे गायीच्या तुपात शिजवलेली मिठाई खाण्यासाठी जाणार.

डाव्या-निधर्मीवाद्यांची वेगळी तऱ्हा.

ते म्हणणार, ‘तुम्ही जन्माचे भिकारी. पोर्तुगीजांमुळे तुम्हाला मिरची कळली आणि ब्राझीलमधून बटाटा आला. तुमचं स्वत:चं असं काय आहे? मोगल इथं आले म्हणून तुम्ही शिवलेले कपडे घालू लागलात..’

माणसाचा सतत पाणउतारा करणं हा तद्दन असभ्यपणा आहे, हे या समता-बंधुत्ववाल्यांच्या लक्षातच येत नाही. केवढा मूढपणा!

आपण म्हणणार, ‘अहो, हे सगळे लोक आमचा मुलूख लुटत होते त्याचं काय? इंग्रजांनी आमच्याच दौलतीवर तर औद्योगिक क्रांतीचा थाटमाट उभा केला. बटाटे खायला मिळाले नसते तर फार काही बिघडलं नसतं आमचं.’

तर डावे पुन्हा ‘तुम्ही भिकारडे.. तुम्ही भिकारडे..’ असं आपल्याला हिणवत मेणबत्त्या पेटवणार आणि पथनाटय़ सुरू करणार.

अशा या दोन तऱ्हा! ‘जुनूं का दौर है किस किसको समझाएं/ इधर भी अक्ल के दुष्मन, उधर भी दीवाने..’

आपलाच विचार कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी आत्यंतिक टोकाची भूमिका घ्यायची, वस्तुस्थितीचा बिनदिक्कत विपर्यास करायचा असं दोन्हीकडून सर्रास सुरू असतं. चोरबाजारात सगळ्या मापाचे, आकाराचे कपडे मिळतात. इतिहासाचंदेखील असंच असतं. हवं ते सापडतं. पाहिजे ते उचला अन् उसवा, नाही तर चिंध्या करा. आपला माल विका. मुठय़ा आवळा. गर्जना करा. भांडा. एक-दुसऱ्याच्या अंगावर धावून जा. हेत्वारोप करत राहा. खऱ्याचं खोटं करा. संशयाचं जाळं विणा. सतत वरच्या पट्टीत बोलत राहा.

मराठी समाज आपला खर्ज हरवून बसलाय.

आरडाओरडा करायला धैर्य लागत नाही. स्वत:च्या भूमिकेची समीक्षा करणं, स्वत:च्या चुका ओळखणं, त्या दुरूस्त करणं यासाठी धैर्याची गरज असते. ते गांधींकडे होतं.

एक प्रसंग आहे.. नौआखलीच्या मुक्कामात गांधी एकदा रात्री उशिरापर्यंत आपल्या झोपडीत एकटे येरझारा घालत होते आणि ‘माझं काय चुकलं? लोक माझं ऐकत का नाहीयेत?’ असं स्वत:शी मोठमोठय़ानं बोलत होते.

आज परिस्थिती अशी आहे की डावे-निधर्मी प्रतिमा-प्रतीकांमध्ये अडकलेत. तर दुसरीकडे भाजपकडे मॅण्डेट आहे, पाशवी बहुमत आहे; परंतु दोन्हीकडची (केंद्रातलं आणि राज्यातलं) सरकारं ताठ कण्यानं राज्य करत नाहीयेत. सरकारकडे नैतिक अधिष्ठानच नाहीये.

हे भेसूर आहे.

अन् अशा वेळी दुर्गाबाईंची आठवण येते.

आज दुर्गाबाई आपल्यात असत्या तर क्षणाचाही वेळ फुकट न दवडता त्या कचकचून भांडल्या असत्या. सध्याच्या गचाळ, भ्रष्ट व्यवस्थेशी, पुढाऱ्यांशी, प्रशासनाशी; एकेक केसचा निकाल लावायला वीस- वीस र्वष घेणाऱ्या आणि धनिकवणिकांना बिनदिक्कत पॅरोल देणाऱ्या कोर्टाशी.

लेख-पत्रं लिहून, पत्रकं काढून त्यांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला असता. पेपरवाल्यांना भंडावून सोडलं असतं. लेखकरावांना फटके मारले असते. पाहता पाहता एशियाटिकमध्ये विचारांचा आगडोंब उसळला असता. अन् आस्ते आस्ते दुर्गा भागवत नावाच्या तेजाळ भट्टीभोवती सुजाण, संवेदनशील नागरिक जमा झाले असते. ऊब नि तेज मिळवण्यासाठी.

हे सगळं आठवण्याचं खास कारण म्हणजे दुर्गाबाईंची चार पुस्तकं ‘मौजे’च्या छापखान्यातून नुकतीच बाहेर पडलीयेत. ही एक मोठी सांस्कृतिक घटना आहे असं आपण मानलं पाहिजे. बाईंचं १९३५ ते २००० या ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात कुठं कुठं छापून आलेलं स्फुटलेखन ‘विचारसंचित’, ‘भावसंचित’ आणि ‘संस्कृतिसंचित’ अशा तीन खंडांत संकलित करण्यात आलंय. शिवाय ‘दुर्गुआजीच्या गोष्टी’ हे लोककथांचं छोटेखानी पुस्तकही आहेच. गोडधोड म्हणून.

पुस्तकांशिवाय बाई वेगवेगळ्या नियतकालिकांतून, वर्तमानपत्रांतून नियमित लिहीत होत्या.

हे विपुल स्फुटलेखन विखुरलेलं होतं. पेपर अन् मासिकांच्या जुन्या फायलींत अडकून पडलं होतं. ती सगळी कात्रणं मिळवणं, लिखाणाचं शक्यतो कालक्रमानुसार वर्गीकरण अन् संकलन-संपादन करणं हे खरं तर प्रचंड कष्टाचं काम. ज्येष्ठ समीक्षक व लेखक डॉ. मीना वैशंपायन यांनी ते आस्थेनं आणि चिकित्सक वृत्तीनं केलं आहे.

गेली तीसेक र्वष डॉ. मीना वैशंपायन दुर्गाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा, लिखाणाचा धांडोळा घेताहेत. त्यांचा पीएच. डी.चा प्रबंधही याच विषयावर आहे. बरीच र्वष झालेल्या अभ्यासाचं फलित म्हणजे ही चार पुस्तकं. वेळेअभावी दुर्गाबाईंचं समग्र साहित्य वाचणं ज्यांना शक्य नाही अशा नव्या पिढीच्या वाचकांना ही पुस्तकं खास आवडतील. शब्द पब्लिकेशननं जिव्हाळ्यानं ही चार पुस्तकं प्रकाशित केली आहेत.

दुर्गाबाईंचा पैस थक्क करणारा आहे. त्यांच्या लिखाणातून इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान, धर्म, भाषा, लोकजीवन, मानववंशशास्त्र, साहित्य असा एक फार मोठा पट वाचकांसमोर उभा राहतो. व्यासंगामुळे त्यांचे लेखन जडशीळ झाले नाही. मानववंशशास्त्र आणि बौद्धविचारांत खोल बुडी मारणारी त्यांची बुद्धिमत्ता फुलापानांत बहरते, समुद्राच्या लाटांवर खेळते नि पाखरांशीही हितगूज करते.

‘एकीकडे ही पिकली पाने टपाटप गळताहेत. एकीकडे पांढरा मोहोर बारीक हिरव्या काडय़ांना चिकटलेल्या तुऱ्यासारखा अधूनमधून डोकावतो आहे. झाडभर जुन्या बाराचे हिरवे बदाम लटकलेले आहेत. फांद्या काही ठिकाणी उघडय़ा दिसत आहेत. ठिकठिकाणी गळत्या पानांच्या जागी नव्या पानांचे पोपटी लालसर, निरंजनाच्या ज्योतीप्रमाणे दिसणारे मोठमोठे कळे जोरात वर येत आहेत..’ असं बाई सहजपणे लिहून जातात. (‘भावसंचित’)

मुलीनं आपल्या बापावर कृतज्ञतेनं लिहावं तसं दुर्गाबाई निसर्गावर लिहितात. अगदी भरभरून. मुंबईतल्या निसर्गावर बाईंनी ‘अमोप’ (हा शब्द त्यांच्याकडूनच ऐकला. ‘निखोड’ हा शब्दसुद्धा!) प्रेम केलं. पुढे बाईंनी मुंबईत बसून ‘ऋतुचक्र’ लिहिलं.

साध्या साध्या गोष्टींबद्दल बाई मनाला भिडणारं असं लिहितात अन् वाचकाच्या हातावर सत्याचा एक तुकडा अल्लद ठेवतात. ‘गुढी’ या दोन पानी लेखात सावरीवर, पळसाच्या पानांवर, भुईचाफ्यावर लिहिता लिहिता शेवटी बाई म्हणतात- ‘सृष्टीप्रमाणे संस्कृतीतही पडझड व्हावीच लागते. संघर्षांशिवाय क्रांती नाही..’ (‘भावसंचित’)

‘एक नूर आदमी’ या लेखात बाई थेट गौतम बुद्धाकडे जातात. श्रमणवस्त्रात नीटनेटकेपणा असावा असा बुद्धाचा आग्रह असे, असं नमूद करून, ‘तेव्हा वस्त्र कसेतरी नेसावे, ही कल्पना बुद्धालाही अमान्य होती’, असं त्या जाता जाता सांगतात. सीतेविषयी असंच भेदक म्हटलंय त्यांनी : ‘रामाची पत्नी रामाची राहिली नाही. भूमीची मुलगी भूमिमय झाली. ती राममय झाली नाही.’ (‘भावसंचित’)

‘भावसंचित’मध्ये राजारामशास्त्री भागवत, भारतरत्न डॉ. पां. वा. काणे, ए. डी. गोरवाला, शंकर गणेश दाते ही शब्दचित्रं सुरेख वठली आहेत. ‘एक सदेह फँटसी’ हा कमल देसाईंवरचा लेख केवळ अप्रतिम असा आहे. ‘काळा सूर्य’ आणि ‘हॅट घालणारी बाई’ वाचताना एका पॅरोनाईड (म्हणजे स्थिरभ्रम) वृत्तीचे दर्शन घडते आणि ती कमल देसायांमध्ये दिसते, असं सांगून दुर्गाबाई पुढे चार-पाच वाक्यांतच अख्ख्या कमल देसाई वाचकांसमोर मनोज्ञपणे मांडतात :

‘..की तिला जर कुणी त्रास दिला नाही तर बरेच वाटत नाही. नातेवाईकांची दारुण दु:खे त्यांच्याहून अधिक सोसण्यात तिला ‘सुख’ वाटते हे मीही पाहिले आहे. ती दु:खे खरेच दारुण आहेत यात शंका नाही. पण सामान्य माणूस त्यांच्यातून मनाने तरी सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतो, तर कमळी त्यांना गच्च कवळून धरते. तरी कमळी ही व्यक्ती म्हणून साऱ्यांनाच आवडते.’

दिवाकराच्या नाटय़छटांचं सवंग अनुकरण अशक्य आहे. दिवाकरांनंतर हे अनुपम भाग्य कमल देसायांच्या फँटसीलेखनाच्या वाटय़ाला आलंय, असं दुर्गाबाई म्हणतात आणि दोन ठिपके सहज जोडतात.

नीळकंठ फाळक्यांचं शब्दचित्रही छान झालंय. नीळकंठ हा चित्रमहर्षी दादासाहेब फाळक्यांचा मुलगा. वृत्तीनं हूड. अभ्यासात गती नाही. डोळे अधू. मॅट्रिक होणंसुद्धा कठीण होऊन बसलं. पण हा गडी जात्याच हुशार. बाराव्या वर्षी त्यानं उत्तम इंग्रजी बोलण्याचा मनाशी पण केला. राहायला नाशिकला. नीळकंठ तिथल्या गोल्फ कोर्सवर नियमित जायचा. इंग्रज साहेब गोल्फ खेळायला मैदानावर आले की हा त्यांच्याशी इंग्रजी बोलायचा. गोल्फचा चेंडू शोधून आणण्याचं कामही करायचा. इंग्रज साहेब त्याला त्या कामाचे दोन-चार आणे देत. असं करता करता नीळकंठ दोन वर्षांत असली ‘बोल-इंग्रजी’ (स्पोकन लँग्वेज) बोलू लागला.

पुढे नीळकंठनं जर्मन भाषेचा अक्षरश: ध्यास घेतला. बाजारात मिळणारी इंग्रजी-जर्मन पुस्तकं त्यानं मिळवली आणि जर्मनचा अभ्यास सुरू केला. नंतर मुंबईला आल्यावर जर्मन भाषेचे विद्वान प्रा. सु. द. हुदलीकर यांच्याशी बोलून बोलून तो जर्मनमध्ये उत्तम संभाषण करू लागला. इतकंच नव्हे, तर नीळकंठ फाळकेंचं जर्मनज्ञान कैकदा दुर्गाबाईंच्यादेखील कामी आलं. दुर्गाबाईंनी फाळक्यांना ‘माझा गुरू’ असं संबोधलंय.

इंदिरा गांधींनी जून १९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादली. यानिमित्तानं वाणी आणि विचारस्वातंत्र्य, लेखननिष्ठा, लेखक-कलावंतांची सामाजिक जबाबदारी असे अनेक विषय ऐरणीवर आले. बाई तेव्हा वेळोवेळी आपलं म्हणणं मांडत होत्या. यासंदर्भात १९७७ सालचं त्यांचं एक निवेदन महत्त्वाचं आहे. १९७५ सालच्या  कराड साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून बाईंनी ‘साहित्यिक व्यासपीठावर राजकारण्यांची हजेरी असू नये’ अशी भूमिका घेतली. पुढे ७७ चे साहित्य संमेलन झाले. व्यासपीठावर राजकारण्यांची उपस्थिती या मुद्दय़ावर बाई संमेलनाला हजर राहणार नाहीत, अशी चर्चा सुरू झाली. बाईंनी एक निवेदन काढून आपली भूमिका स्पष्ट केली. बाईंचा विचार आजदेखील ताजा वाटतो.

‘राज्यकर्त्यांची ध्येयधोरणे आणि लेखकाची ध्येयधोरणे ही मुळात वेगवेगळी असतात, विरोधीही असू शकतात,’ असं सांगून बाई म्हणतात :

‘..लेखकाची पहिली निष्ठा रक्ताशी असावी. लेखकाची लेखक म्हणून ओळख होते, ती एक मान्यता असते नि ती त्याला लोकांकडून मिळत असते. मी पानांवर पानं लिहिली नि ती जर लोकांपुढे आली नाहीत आणि लोकांनी ते लेखन आहे असं म्हटलं नाही तर मी लेखक आहे, असं मला मनातून कितीही वाटलं तरी मी लेखक होणार नसते. म्हणजे लेखन ही एक बांधिलकी आहे. माझ्या अवतीभवती जी माणसे वावरत असतात त्यांच्याबरोबरची बांधिलकी ही आहे. ऋणानुबंध आहे. ही बांधिलकी जर योग्य प्रकारे माझ्याकडून राबवली जायची असेल, तर त्यासाठी मी स्वतंत्र असणं आवश्यक आहे.

माझं स्वातंत्र्य म्हणजे माझ्या निर्माणशील दृष्टीचं स्वातंत्र्य. माझ्या जीवनदृष्टीचं स्वातंत्र्य.

लेखक लिहून करतो काय? तो फक्त एक गोष्ट करतो. ती म्हणजे ज्या समाजात तो राहतो, त्या समाजाचा काल, आज आणि उद्या यात तो ताण तयार करतो. अधिक सरळ शब्दांत म्हणजे भूत, वर्तमान व भविष्य या अर्थात जो स्वाभाविक ताण आहे, तो त्याला जाणवतो. या ताणातच गतिशीलतेची संवेदना असते. या ताणाला लेखक शब्दांकित करतो नि तो ताण लोकांसमोर ठेवतो. त्याचा हेतू हा, की ज्यांना तो ताण पाहायचा असेल त्यांनी तो पाहावा. हे काम कुणी लेखक चालू परिस्थितीच्या नकारात्मक चित्रणातून करील, कुणी सुखी समाज आणि सुखी-समाधानी माणूस कसा असू शकेल असे उद्याच्या माणसाचं चित्र रेखाटून करील. पण हा ताणतणाव उघडय़ावर आणणं हेच आम्हा लेखकांचं कर्तव्य आहे. ते आम्ही निष्ठेने केलं पाहिजे.’

आणीबाणीत असं काय झालं, की लेखक कर्तव्यभ्रष्ट झाला, असा प्रश्न विचारून बाई उत्तरही देतात : ‘मला वाटतं की गेल्या ३० वर्षांत राज्यकर्त्यांच्या आमच्याविषयीच्या शुभेच्छांवर आम्ही अधिकाधिक राहायला सवकलो. त्यामुळे लेखकाची प्राथमिक बांधिलकी आपल्या समाजबांधवांशी असते हे विसरून गेलो. आमची पहिली बांधिलकी आमच्या पाठीवरून मायेचा हात फिरवणाऱ्या राज्यकर्त्यांशी असते असे आम्ही समजू लागलो.. या खऱ्या-खोटय़ा सहानुभूतीने आम्ही इतके भारले गेलो, की आमच्या दृष्टीने आम्ही स्वातंत्र्य गमावून बसलो. आमच्या द्रष्टेपणावरचा, व्हिजनवरचा आमचा वैयक्तिक छाप नाहीसा होऊन तिथे राज्यकर्त्यांच्या दृष्टीचा ठसा केव्हा उमटला हेदेखील आम्हाला कळले नाही.’ (‘भावसंचित’)

दुर्गाबाईंना कोणताच विषय वज्र्य वाटला नाही. संस्कृतीच्या प्रवासात अनेक सान-थोर गोष्टींना स्वत:चं एक न्यारं महत्त्व असतं हे फार अगोदर लक्षात आल्यामुळे जीविताचं एक व्यापक भान ठेवून बाई लिहीत राहिल्या. हाच त्यांच्या लेखनधर्माचा पीळ होता. दुर्गाबाईंच्या लेखनप्रेरणेबद्दल डॉ. मीना वैशंपायन यांनी ‘संस्कृतिसंचित’च्या प्रस्तावनेत लिहिलंय. त्या म्हणतात : ‘मानवी भावभावना, मानवी प्रेरणा, सुख-दु:खांचे अनुभव हे सर्वत्र सारखेच आहेत, सारखेच असतात. जगाच्या पाठीवर मानवाने निर्माण केलेले समाजजीवन विविध अवस्थांतरांमधून जात असले तरी त्या विविधतेत एकात्मता दिसते. मानवी संस्कृतीत जे जे अंकुरतं, वृद्धिंगत होतं, ते ते सर्व निसर्गाशी सुसंवादी असतं. हे त्यांचं आकलन त्यांनी आपल्यापर्यंत पोचवलं. पण मानवी संस्कृतीची ही एकात्मता हे त्यांचं केवळ बौद्धिक आकलनच होतं किंवा ते तेवढंच राहिलं असं नाही, तर ते आकलन, ती जाणीव म्हणजे त्यांच्या समग्र जीवनदृष्टीचाच आधार बनली.’

म्हणूनच एकीकडे लोकसाहित्यशास्त्राचा व्यासंग सुरू असताना दुर्गाबाईंना कोकणातल्या आठ घडय़ांच्या रुमाली पोळीचंही महत्त्व वाटत राहिलं. मानववंशशास्त्राचे जटिल प्रश्न सोडवत असताना लमाण स्त्रीच्या चोळीवरच्या कशिद्याबद्दलही त्यांना कुतूहल असायचं.

लोकसाहित्यावर अन् दंतकथीय सत्यावर दुर्गाबाईंनी प्रदीर्घ संशोधन केलं. त्यासंबंधीचे काही निवडक लेख ‘संस्कृतिसंचित’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. जगभरातले लोकसाहित्य हा बाईंच्या विशेष आवडीचा विषय. लोकसाहित्यातली म्हातारी असा विषय असेल तर बाई विषयाला अनुरूप कथा निवडतात अन् गोष्टीतली म्हातारी बाळगोपाळांच्या जगात कशी लोकप्रिय झाली आहे, ते सांगतात. अन् हे सांगून झालं की म्हाताऱ्यांविषयी पूर्ण बेफिकीरपणा दाखवणारी ‘म्हातारी मेली तर हरकत नाही, पण काळ सोकावतो’ ही म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे, असंही आवर्जून सांगतात.

मानवी मनाला अद्भुताची ओढ लावणाऱ्या पऱ्या माणसांकडून अनेक गोष्टी उसन्या घेतात. अगदी पीठ-मीठसुद्धा- हे बाईंचं निरीक्षण मजेशीर वाटेल. उत्तर वेल्समध्ये पऱ्यांच्या समूहाला ‘असराई’ (Asrai) या नावानं ओळखलं जातं. महाराष्ट्रात आणि भारतात इतरत्रही काही ठिकाणी सात अप्सरांच्या गटाला ‘आसरा’ म्हणतात हे कळलं की लोकसाहित्याला देश-प्रदेश अन् स्थितीची बंधनं नसतात हे लक्षात येतं.

‘संस्कृतिसंचित’मध्ये दुर्गाबाईंचे आदिवासी समाजजीवनावरचे काही सुरेख लेख वाचायला मिळतात. भरिया, गोंड, कमार जमातींची गाणी, श्रद्धा-समजुती, त्यांचे जीवनव्यवहार असा बराच मजकूर ‘संस्कृतिसंचित’मध्ये  आहे. ‘आदिवासींचे मृत्युंजय तत्त्वज्ञान’ आणि ‘आदिवासींचे आमच्या समाजातील स्थान!’ हे दोन लेख मुळातून वाचले पाहिजेत.

हिंदू पुराणे व सामाजिक चालीरीतींचा आढावा घेतल्यास असे पुष्कळदा आढळून येते की, आमच्या पुष्कळ धार्मिक व सामाजिक आचारविचारांचे मूळ आदिवासींच्या कथांत व रिवाजांत सापडते, असं नमूद करून बाई पुढे म्हणतात की, एकंदर हिंदू समाजाने भिल्ल-शबरांना तुच्छतेने वागवले असले तरीदेखील वन्यजाती या चिरडून टाकण्यायोग्य जाती नाहीत, ही समज हिंदू शासकांनी फार पूर्वीपासून दाखवली.

‘संधी मिळाल्यास क्षत्रियांप्रमाणे जयिष्णु वृत्तीने हे लोक राज्ये काबीज करू शकतात, याचे प्रत्यंतर भिल्ल, मुंडा, गोंड व कोळी लोकांनी आपापल्या प्रांती आपली तुल्यबळ राज्ये निर्माण केल्यामुळे मुसलमान राज्यकर्त्यांसही आले होते आणि म्हणूनच बहुसंख्य हिंदू व मुसलमान समाज आदिवासींना- ते बंड करणारे व सुडाने पुरता बदला घेणारे आहेत असे समजून वचकून असे आणि त्यांना प्रसंगी मानाने वागवीत असे,’ हे बाईंचं निरीक्षण उद्बोधक आहे.

बाईंनी कुणबी आणि महार समाजाच्या काही अतिशय गोड गाण्यांची माहिती दिलीय. त्याचप्रमाणे दैवतशास्त्रावरही तेवढय़ाच अधिकारवाणीनं लिहिलंय. भक्तीच्या तालावर नाचणाऱ्या महाराष्ट्राला भावमधुर, मनाला हुरहुर लावणाऱ्या प्रेमगीतांचे वावडे आहे असा सर्वसाधारण समज आहे. परंतु ‘गाथासप्तशती’चा आधार घेऊन बाई प्राकृतातल्या श्रेष्ठ ललितसाहित्याकडे वाचकांचं लक्ष वेधतात आणि मध्ययुगाच्या आरंभी- म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात महाराष्ट्राच्या रूक्ष मानल्या गेलेल्या भूमीत काव्यकथांचे ‘विविधतेने नटलेले सुंदर फुलबाग’ फुलले होते हे सप्रमाण सिद्ध करतात. (‘प्राचीन महाराष्ट्रातील भावगीते’ : संस्कृतिसंचित)

‘विचारसंचित’मधले बौद्ध धर्मविचाराची चर्चा करणारे लेख अभ्यासकांना अनमोल वाटतील. थोर फ्रेंच मानववंशशास्त्रज्ञ क्लॉड लेव्ही-स्ट्राउस यांच्या कार्य नि विचारांचा परिचय करून देणारा पंचवीस पानांचा लेख म्हणजे ‘विचारसंचित’च्या शिरपेचातला तुरा!

दुर्गाबाईंनी वेळोवेळी लिहिलेली परीक्षणं आणि काही बंगाली कथांचे अनुवाद पुस्तकांत आहेत. ‘भोजन- एक टिपण’ हा पानभर लेख (‘संस्कृतिसंचित’) आमटीचे भुरके या विषयावर आहे. तो वाचून प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. टेबलावर बसून आमटी ओरपता येत नाही, ही खंत बाईंची एकटीची नाही.

विषयांची विविधता, व्यासंगी विवेचन, संदर्भसंपन्नता, तर्कशुद्ध मांडणी आणि अल्पाक्षरी, प्रसन्न लेखनशैली या गुणांमुळे ही तिन्ही पुस्तकं संग्राह्य़ आहेत, हे निर्विवाद. खरं तर बाईंचं साधं, परंतु रसरशीत मराठी या एका कारणासाठी तरी हल्लीच्या पिढीनं ही पुस्तकं वाचली पाहिजेत.

बाईंनी जगण्याला महत्त्व दिलं. ‘माझी प्रतिभा माझ्या लिखाणात नसून माझ्या जगण्यात आहे. लिखाण म्हणजे केवळ काबाडकष्ट,’ असं ऑस्कर वाईल्डनं म्हटलंय. दुर्गाबाईंसुद्धा असंच जगल्या. त्यांच्या जगण्यातलं तेज त्यांच्या लिखाणात उतरलं.

हाडामांसाच्या माणसांच्या जगात आपण राहतो आहोत अन् आपलं लिखाण नि संशोधन सरतेशेवटी आपल्या माणसांसाठी आहे याचं भान ठेवून त्यांनी काम केलं. अन् तरीही त्या सवंग लोकप्रियतेत अडकल्या नाहीत. विचारवंत म्हणून जगल्या. कार्यकर्त्यां झाल्या नाहीत. म्हणूनच त्यांचं लिखाण नितळ व शुद्ध राहिलं. कसलाही अभिनिवेश नाही. घायकुता सोस नाही. फुकाचं पांडित्य नाही. बेगडी विनय नाही.

बटरड्र रसेलनं मॅक्झिम गॉर्कीबद्दल म्हटलंय की,  Gorky has done all that one man could do to preserve the intellectual and artistic life of Russia. दुर्गाबाईंनी हे महाराष्ट्रात केलं.

आपल्या मनोगतात (‘लोकसत्ता’नं ११ फेब्रुवारी २००१ रोजी बाईंचा एक लेख छापला होता. तो लेख म्हणजे तिन्ही पुस्तकांचं समान मनोगत) बाई म्हणतात : ‘आजूबाजूला पाहिलं की वाटतं, काळाची चक्रं उलटी फिरत आहेत. रोजच्या बातम्या वाचून अस्वस्थता येते. काळं सावट पसरल्यासारखं वाटतं..’

आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रामाणिक, संवेदनशील नागरिकाची हीच बेचैनी आहे. यावर उपाय काय? माझ्यापुरतं मी ठरवलंय. आपण परत आपल्या जुन्या दादा मंडळींकडे गेलं पाहिजे. एकोणिसाव्या-विसाव्या शतकांतून किंवा त्याही अगोदरच्या काळातून फेरफटका मारला पाहिजे. दुर्गाबाईंचं बोट धरून. त्या साक्षात आपल्यात नाहीयेत म्हणून काय झालं? त्यांची पुस्तकं आहेत की! तोच तर खरा ऐवज. माणूस मरतो, विचार टिकतो. शुद्ध विचारच आपल्याला मुक्तीच्या प्रदेशात घेऊन जाणार आहे. आरडाओरडा नाही. याकरता आपल्याला आंतरिक बळाची गरज आहे. ते दुर्गाबाईंच्या लिखाणातून आपल्याला मिळेल. ते बळ घेऊ. बाईंच्या पुस्तकांशी बातचीत करू. चला, एशियाटिक सोसायटीच्या त्या विख्यात पायऱ्या चढून जाऊ अन् बाईंना हाक मारू :

अहो, दुर्गाबाई..

-अंबरीश मिश्रा ambarishmishra03@gmail.com