सिद्धार्थ खांडेकर – siddharth.khandekar@expressindia.com

येत्या ११ जूनपासून ‘युरो चषक’ फुटबॉल स्पर्धा सुरू होत आहे. जागतिक फुटबॉलमधील ही एक अत्यंत महत्त्वाची स्पर्धा! करोना साथीच्या जागतिक पार्श्वभूमीवर ती होत आहे. या संकटाचे सावट अजून पुरते दूर झालेले नसले तरी यानिमित्ताने जगातील क्रीडाविश्व पुनश्च एकदा सक्रीय होऊ घातले आहे ही निश्चितच सकारात्मक बाब होय. या स्पर्धेचे माहात्म्य विशद करणारा लेख..

Premier League Football Manchester City emphatic win sport news
प्रीमियर लीग फुटबॉल: मँचेस्टर सिटीचा दमदार विजय
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

‘कोविड-१९’च्या हाहाकारातून आशेचे किरण दिसावेत अशा घडामोडी सध्या युरोपात घडताना दिसत आहेत. अमेरिका आणि भारताप्रमाणेच याही खंडात करोनाच्या एकापेक्षा अधिक लाटा आल्या. इटली, ब्रिटन आणि फ्रान्समध्ये मोठय़ा प्रमाणावर मनुष्यहानी झाली. जर्मनी, बेल्जियमसारख्या देशांमध्ये मृत्युदर अधिक होता. परंतु बहुतांश सक्षम सार्वजनिक आरोग्ययंत्रणा आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये झपाटय़ाने झालेले लसीकरण या कारणांस्तव विशेषत: पश्चिम आणि दक्षिण युरोपीय देश आता सावरू लागलेले दिसतात. गेल्या आठवडय़ात लंडन, पॅरिससारख्या मोठय़ा शहरांमध्ये कॅफे, रेस्तराँ सुरू झाले आहेत. पॅरिसमध्ये फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली आहे. इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट सामनेही खेळवले जात आहेत. पुढील काही दिवसांत ग्रीस, स्पेन, इटलीसारख्या उबदार देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येतील अशी स्थिती दिसते. युरोपीयन समर किंवा आल्हाददायी समशीतोष्ण उन्हाळा हा जगभरच्या पर्यटकांना खुणावत असतो. गेल्या वर्षी या संपूर्ण व्यवसायावर करोनाचे सावट आले होते. पण त्याही वेळी करोनाच्या पहिल्या धक्क्य़ातून सावरणारा देश हा जर्मनी होता. तेथील ‘बुंडेसलिगा’ या फुटबॉल स्पर्धेसाठी प्रथम सराव आणि मग सामन्यांना सुरुवात झाली होती. तरीदेखील ‘युरो २०२०’ ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली. कारण अशा स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवणे हे आर्थिक गणितात कुठेच बसणारे नव्हते. म्हणजे करोनामुक्तीचा एक मार्ग खेळाच्या माध्यमातून असेल तर त्याकामी युरोपने पुढाकार घेतला. आता जगातील करोनोत्तर सर्वात मोठी क्रीडास्पर्धाही युरोपातच पुढील आठवडय़ात सुरू होत आहे.

वर्षभरानंतर युरोपातील करोनास्थिती झपाटय़ाने सुधारत असल्यामुळे शिथिलीकरण अनिवार्य ठरले. या शिथिलीकरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा निदर्शक ‘युरो २०२०’सारखी मोठी आणि महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा! ‘२०२०’ हे तिचे लेबल तसेच ठेवायचा निर्णय युरोपीय फुटबॉल महासंघाचा. यंदा ती प्रथमच एक किंवा दोन देशांमध्ये नव्हे, तर चक्क ११ देशांतील ११ शहरांतून खेळवली जातेय. या ११ शहरांमध्ये बाकू (अझरबैजान) आणि बुखारेस्ट (रुमानिया) यांचाही समावेश आहे. पण हे देश प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी नाहीत! अनेक अर्थानी ही स्पर्धा अद्भुत आहे. २०१२मध्ये विख्यात माजी फुटबॉलपटू आणि फ्रान्सचे माजी कप्तान मिशेल प्लॅटिनी यांनी, ‘२०२०मधील स्पर्धा जरा वेगळी असावी,’ असा प्रस्ताव मांडला होता. युरो कप स्पर्धा सुरू झाली १९६०मध्ये. तिच्या हीरकमहोत्सवानिमित्ताने १२ देशांमध्ये १२ मैदानांमध्ये ‘युरो’ खेळवण्याची त्यांची कल्पना! त्यावेळी प्लॅटिनी युरोपीय फुटबॉल संघटना.. अर्थात् ‘युएफा’चे अध्यक्ष होते. शिवाय एकूणच जागतिक फुटबॉलमध्ये त्यांच्या नावाला आणि शब्दाला वजन असे. पण २०१५मध्ये नीतिमूल्यांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर बंदी आणली गेली, तरी त्यांची संकल्पना युएफाने उचलून धरली. १२ देशांचे पुढे ११ देश झाले आणि यजमान शहरेही ११ झाली. हा बदल एका स्पर्धेपुरता असेल नि पुढील ‘युरो २०२४’मध्ये जर्मनीत खेळवली जाईल असे सांगितले जाते. पण बहुराष्ट्रीय यजमानांचा हा फॉम्र्युला यावेळी यशस्वी झाल्यास पुढे तो अमलात येणारच नाही असे नाही. शिवाय २०२३मध्ये प्लॅटिनी यांच्यावरील बंदी अधिकृतपणे संपुष्टात येईल. त्यांच्याकडे पुन्हा युएफाची सूत्रे आल्यास आणखीही बदल अपेक्षित आहेत.

त्यांच्याच प्रभावाखालील युएफाने युरो स्पर्धेतील संघांची संख्या १६ वरून २४ वर नेली, ती स्पर्धा होती गेल्या वेळची ‘युरो २०१६’! ती झाली फ्रान्समध्ये.. म्हणून यंदा एकही यजमान शहर फ्रान्समधील नाही. यावेळची यजमान शहरे आहेत- लंडन (इंग्लंड), म्युनिच (जर्मनी), रोम (इटली), सेव्हिया (स्पेन), अ‍ॅमस्टरडॅम (हॉलंड), सेंट पीटर्सबर्ग (रशिया), कोपनहेगन (डेन्मार्क), ग्लासगो (स्कॉटलंड), बुडापेस्ट (हंगेरी), बुखारेस्ट (रुमानिया), बाकू (अझरबैजान). त्यातही लंडनमधील ऐतिहासिक वेम्ब्ली स्टेडियमला यावेळी मानाचे स्थान आहे. या मैदानात अंतिम लढत, दोन्ही उपान्त्य लढती, दुसऱ्या फेरीचे दोन सामने आणि तीन गटसाखळी सामने खेळवले जात आहेत. त्यामुळे बाद फेरीच्या कोणत्याही सामन्यात इंग्लंडचा संघ खेळला तर त्यांना मोठा पाठिंबा मिळेल. ‘युरो’चे तीव्र स्पर्धात्मक स्वरूप लक्षात घेता ही बाब टॉनिक ठरावी अशीच. त्याची त्यांना गरज आहे, कारण युरोपातील इतर बडय़ा भावंडांप्रमाणे क्षमता असूनही इंग्लंडला युरो स्पर्धेत एकदाही अजिंक्यपद पटकावता आलेले नाही. क्लब फुटबॉलची पंढरी मानल्या जाणाऱ्या इंग्लंडने १९६६ मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते. परंतु विश्वचषक आणि ‘युरो’ यांचा एकत्रित विचार केल्यास इंग्लंडची कामगिरी फिकीच ठरते. जर्मनी (३ युरो, ४ विश्वचषक), स्पेन (३ युरो, १ विश्वचषक), फ्रान्स (२ युरो, २ विश्वचषक), इटली (१ युरो, ४ विश्वचषक) या युरोपातील आणि पर्यायाने जागतिक फुटबॉलमधील खऱ्या अर्थाने महासत्ता ठरतात. त्यांच्या पंक्तीत बसण्याची हीच योग्य वेळ आहे असे इंग्लंडच्या चाहत्यांना वाटत असेल तर त्यात गैर नाही. ‘युरो’ किंवा विश्वचषक किंवा ‘कोपा अमेरिका’ यांपैकी एखादी स्पर्धा जिंकणे याच्यापेक्षा उत्तम फुटबॉल गुणवत्ता प्रमाणपत्र दुसरे नाही. क्लब फुटबॉलचा चाहतावर्ग जगात नि आपल्या देशातही मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यांच्या दृष्टीने इंग्लिश प्रीमियर लीग किंवा स्पॅनिश ला लिगा किंवा युरोपियन चॅम्पियन्स लीग या परममहत्त्वाच्या स्पर्धा आहेत. परंतु क्लब स्पर्धाची असंख्य अजिंक्यपदे एखाद्या युरो किंवा विश्वचषक अजिंक्यपदाची उंची गाठू शकत नाहीत. म्हणूनच लिओनेल मेसीपेक्षा ख्रिस्तियानो रोनाल्डो किंचित उजवा; कारण त्याच्या नावावर आता युरो अजिंक्यपद नोंदले गेले आहे! युरो स्पर्धेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे विजेत्यांच्या बाबतीत विश्वचषकाच्या तुलनेत ही स्पर्धा अधिक बेभरवशाची आणि म्हणूनच अधिक रंजक मानली जाते. गेल्या ८८ वर्षांमध्ये २१ स्पर्धामध्ये विश्वविजेते ठरलेत केवळ आठच संघ. याउलट, गेल्या ६० वर्षांत १५ स्पर्धामध्ये १० संघांनी अजिंक्यपद मिळवलेले आहे. यांतील तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया (१९७६), डेन्मार्क (१९९२), ग्रीस (२००४) यांची अजिंक्यपदे अनपेक्षित अशीच होती. गेल्या खेपेस फ्रान्सच्या भूमीत यजमान संघ अंतिम फेरीत खेळला आणि जेतेपदाचा तो दावेदार होता. पण रोनाल्डोला पूर्ण वेळ न खेळता येऊनही त्या सामन्यात जिंकले पोर्तुगाल. फुटबॉल महासत्ता मानल्या जाणाऱ्या जर्मनीला नवीन सहस्रकात ही स्पर्धा एकदाही जिंकता आलेली नाही.

युरो स्पर्धेसाठी प्रत्येक मैदानात किती प्रेक्षकांना प्रवेश मिळेल याविषयी त्या-त्या देशाचा व शहराचा निर्णय वेगळा आहे. युएफाच्या अधिकृत संकेतस्थळावर याविषयीची माहिती उपलब्ध आहे. किमान प्रमाणात प्रेक्षकांना प्रवेश मिळेल, या हमीवरच यजमानपद देण्यात आले आहे. तशी हमी देता आली नाही यास्तव ब्रुसेल्स (बेल्जियम) आणि डब्लिन (आर्यलड) यांच्याकडून ते काढूनही घेतले गेले. बुडापेस्टच्या पुस्कास एरेनामध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची तयारी सुरू आहे. सेंट पीटर्सबर्ग आणि बाकू या मैदानांत ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी मिळाली आहे. अ‍ॅमस्टरडॅम, बुखारेस्ट, कोपनहेगन, ग्लासगो, रोम आणि सेव्हिया या मैदानांमध्ये मैदानक्षमतेच्या २५ ते ४५ टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल. लंडनच्या वेम्ब्ली स्टेडियममध्ये पहिले काही सामने २५ टक्के प्रेक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. उर्वरित सामन्यांबाबत निर्णय लवकरच अपेक्षित आहे. म्युनिचच्या फुटबॉल मैदानात जवळपास २२ टक्के- म्हणजे साडेचौदा हजार प्रेक्षकांना सध्या परवानगी देण्यात आली आहे. या स्पर्धेदरम्यान कोणत्याही सामन्याआधी करोनाचा प्रादुर्भाव खेळाडूंना वा इतर कोणासही झाल्यास काय करायचे, याविषयी नियमावली ठरवण्यात आली आहे. एरवी अशा स्पर्धासाठी २३ सदस्यीय संघाला खेळवले जाते. यंदा ही संख्या २६ करण्यात आली आहे.

या सर्व देशांमध्ये, शहरांमध्ये करोनाची सद्यस्थिती भिन्न आहे. परंतु ती बरीचशी आटोक्यात असल्याचा विश्वास स्पर्धेचे संयोजक आणि यजमान देशांच्या सरकारांना वाटतो. ११ जून ते ११ जुलै असा स्पर्धेचा कालावधी आहे. ब्रिटनमध्ये करोनाचे भारतीय उत्परिवर्तन (डेल्टा) सध्या काही भागांमध्ये सक्रिय आहे. रशिया, अझरबैजान, हंगेरी येथील करोनाच्या वास्तवस्थितीबाबत पश्चिम युरोपीय देशांना आजही शंका वाटते. जर्मनी, स्पेन, इटलीतील करोना हाताळणीबाबत स्वीडन, फिनलंडसारखे स्कँडेनेव्हियन देश साशंक असतात. परंतु प्रतिकूल परिस्थितीतही मतभेद दूर ठेवून एकत्र येण्याच्या या युरोपीय सामूहिक शहाणपणाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. याच काळात तिकडे ब्राझीलमध्ये ‘कोपा अमेरिका’ स्पर्धा घेण्याचे घाटत आहे. एखाद्या फुटबॉलसारखे या स्पर्धेचे यजमानपद प्रथम कोलंबियाकडे, मग अर्जेटिनाकडे आणि तेथून ब्राझीलकडे आले. त्या खंडातील बहुतेक देशांची करोनाविषयक स्थिती पाहता स्पर्धा रद्द करणे किंवा स्थगित करणे श्रेयस्कर होते. मात्र, जाइर बोल्सेनारो हे ब्राझीलचे अध्यक्ष ही स्पर्धा यशस्वीरीत्या भरवून स्वतची प्रतिमा सुधारण्यात मग्न असल्यामुळे मोठी जोखीम पत्करण्याचे त्यांनी ठरवलेले दिसते. युरोपमध्ये इतकी मोठी जोखीम पत्करण्याची गरज नाही. करोना संपलेला नाही, इतक्यात संपणारही नाही; पण जीवनगाडा मार्गस्थ करावाच लागणार. फ्रेंच ओपनपाठोपाठ युरो स्पर्धेच्या माध्यमातून हा संदेशवजा दिलासा फुटबॉलप्रेमींना मिळत आहे.