16 January 2021

News Flash

भ्रमयुगातले चतुर मौन!

भोवती वाढणारा कोलाहल बधीर करतो आहे. कोणी म्हणतंय की, आपल्याकडे जरा जास्तच लोकशाही आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भारत सासणे

भोवती वाढणारा कोलाहल बधीर करतो आहे. कोणी म्हणतंय की, आपल्याकडे जरा जास्तच लोकशाही आहे. कोणी म्हणतंय की, हे सगळं तुमच्या भल्यासाठीच चाललेलं आहे. पण काय चाललंय हेच कळत नाहीए. एक भ्रमयुग आणि त्यात आपण केलेला प्रवेश. एक वाचाबंदी. कसलीशी दहशत.. दु:स्वप्नच जणू. आणि सर्वत्र एक ‘चतुर मौन’ पसरून राहिलंय.

१/ सत्य सूर्याला सलाम!

अब्दुल बिस्मिल्लाह नावाच्या हिंदी लेखकाने ‘दंतकथा’ नावाची लघुकादंबरी लिहिलेली आहे. मी या लघुकादंबरीचा मराठीतून अनुवाद केला होता. एक कोंबडा खाटीक मंडळींकडून स्वत:ला वाचवून जीवाच्या आकांताने धावतो आहे आणि धावता धावता तो एका नालीच्या पोकळीमध्ये आतपर्यंत जाऊन बसलेला आहे. त्याला शोधण्यासाठी आणि मारण्यासाठी आलेली मंडळी कोंबडय़ाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि जीवाच्या भीतीने हा कोंबडा पुढे पुढे सरकत राहिलेला आहे. आता पुढे सरकण्याचा रस्ता जवळपास बंद आणि मागे सरकण्याचा रस्ताही बंद. मृत्यू तर केव्हाही उपस्थित होऊ शकतो. आणि रात्र झाली आहे. अशा परिस्थितीत हा कोंबडा वाचकांना विश्वासात घेऊन संवाद करायला लागतो. आपल्या बालपणीपासूनच्या आठवणी सांगायला लागतो. एका कोंबडय़ाने सांगितलेल्या आठवणी म्हणून आपण या निवेदनाकडे पाहायला तर लागतो, पण आपल्या असं लक्षात यायला लागतं की, इथे प्रकटलं जाणारं निवेदन हे सामान्य माणसाच्या आठवणींपेक्षा वेगळं नाही. खुराडय़ातलं जगणं, क्षुद्र अहंकार आणि लढाया, छोटी-मोठी प्रेमप्रकरणं आणि सामान्य पातळीवरचा सामान्य असा संघर्ष.. आणि या सगळ्या जगण्यावर विशाल अशी आतंकाची छाया.. मृत्यूच्या भीतीची सावली. मनुष्याला असाच अनुभव येत असतो आणि त्याचंही जगणं यापेक्षा वेगळं नाही. क्षुद्र जीवन, क्षुद्र जीवनपद्धती आणि सततचं मनावर सावट धरणारं भय.. हा अनुभव माणसाला येत राहिलेला आहे. युद्धातल्या अनुभवाने अस्तित्व संपण्याचं भय प्रदान केलं, फाळणीने माणसाला उद्ध्वस्त केलं, महानगरीय जीवनव्यवस्थेने सर्वसामान्यांच्या वाटय़ाला निर्थक, यंत्रवत, किडय़ामुंगीसारखं आयुष्य दिलं. आणि आता करोनाने बुचकळ्यात टाकणारं भय दिलेलं आहे. या सर्वातून एक विशाल अशी भीतीची भावना माणसाला- अगदी मराठी माणसालासुद्धा व्यापून राहिलीय. पण या लघुकादंबरीच्या अखेरीस- पहाट होता होता हा मरणासक्त कोंबडा निर्भयतेने आरवलेला आहे. त्याचं आरवणं म्हणजे अंधाराच्या चादरीला सत्याच्या लखलखीत सुरीने फाडून टाकणं आहे. आपण कोठे लपलो आहोत हे आपल्या आरवण्यामुळे लक्षात येईल, इत्यादी भयोत्पन्न क्षुद्र सावधगिरी आता मागे पडलेली आहे. उगवत्या सूर्याला सलाम करायचा आहे. क्षुद्र भयावर निर्भयता मात करू पाहते आहे. अशी मात करून नवजीवनाचं स्वागत करायचं आहे. असंच काही हा कोंबडा सांगतो आहे. हा कोंबडा धर्म निभावतो. सत्याला सलाम करतो. आरवतो- उच्चरवाने आणि निर्भयतेने.

अलीकडे बहुतेक कोंबडय़ांचं आरवणं बंद झालं असताना आणि भीतीची काजळी सर्वत्र व्यापून राहिली असताना निर्भयतेने आरवण्याचं महत्त्व ही लघुकादंबरी अधोरेखित करते. प्रस्तुत भ्रमयुगाशी ही लघुकादंबरी जोडली जाते आहे. आपण स्तिमित होतो आहोत.

२/ भ्रमयुग

‘काळ तर मोठा कठीण आला’ असं विषादात्मक विधान काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिंतनशील लेखकाने नोंदवलं आहे. ‘काळ’ ही भव्य संकल्पना आपल्या चिंतन परंपरेमध्ये आपण स्वीकारलेली आहे. भर्तृहरीने असं म्हटलं आहे की, दिवस-रात्रीच्या एकाआड एक असलेल्या काळ्या-पांढऱ्या पटलावर स्त्री-पुरुषांचे विविध मोहरे फेकून त्यांचा चालू असलेला प्रारब्धविषयक खेळ ‘काळ’ स्वत:च पाहत रमत बसलेला असतो. मला स्वत:ला भर्तृहरीची ही कल्पना मोठी भव्य आणि थरारक वाटते आहे. ही संकल्पना आपल्याला अंतर्मुख करते. स्वत: काळच कर्ता आणि भोक्ता असेल तर सामान्य माणूस कोण आहे, असा प्रश्न.

‘काळा’ने आपल्याला बोटाला धरून वेगवेगळ्या कालखंडांतून फिरवून आणलेलं आहे. आपण यंत्रयुग अनुभवलं, तंत्रयुग अनुभवलं, अणुयुग आणि अवकाशयुग अनुभवलं. आता मात्र आपण भ्रमयुगात प्रवेश केला आहे. या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित, संमोहित आणि आतंकित झालेला आहे. मुख्य म्हणजे त्याची वाचा हरवलेली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून, व्यापून पसरायला लागलेला आहे. या भीतीबद्दल साहित्याने, साहित्यिकाने- लेखकाने बोलणं, सांगणं अपेक्षित. माणूस म्हणजे क्षुद्र जीव असं न मानता माणसाच्या जगण्यातली गरिमा साहित्य अधोरेखित करू शकतं. माणूस कोण आहे, हे सांगण्याची जबाबदारी लेखकाची असते.

३/ दहशत

‘द वुल्फ अ‍ॅट द डोअर’ या नावाची माझी कथा नुकतीच प्रकाशित झाली. प्रातिनिधिक असलेल्या बुद्धिवादी विचारवंताच्या घरामध्ये अचानकपणे काळ्या वस्त्राने आच्छादित अशी एक स्त्रीलिंगी आकृती प्रवेश करते. ते संवाद असे-

मी : तू कोण? परवानगी न घेता एकदम आत आलास?

आकृती :   माझं नाव दहशत असं आहे आणि मी स्त्रीलिंगी आहे.. त्यामुळे ‘एकदम आत आलीस’ असं म्हटलं पाहिजे..

मी : म्हणजे आता आम्हाला व्याकरणपण शिकवणार का?

आकृती : मी काही न शिकवताच सगळ्यांना सगळं आपोआपच यायला लागतं.. आता माझं वास्तव्य तुमच्या घरात राहणार आहे.

मी : म्हणजे मी दहशतीबरोबर राहायचं?

आकृती : तुम्हाला पर्याय कोणता आहे मग?

मी : मी नकार दिला तर?

आकृती : तसं तुम्ही करू शकणार नाही.. कोणालाच तसं करता येत नसतं.. दहशतीचं अस्तित्व मात्र असतं..

मी : मग मी काय करावं?

आकृती : खरं तर मी तुम्हाला सांगू नये.. कारण माझं काम फक्त असणं इतकंच आहे.. त्याप्रमाणे मी आता आहे.. इथे, रस्त्यावर, गल्लीत आणि दिल्लीत.. पण मघाशी त्या दोन अधिकाऱ्यांनी तुम्हाला सुंदरशा हिरव्या बाटलीत काही मूग दिले आहेत.. माझा असा सल्ला आहे की तुम्ही ते गिळावेत.. म्हणजे काय करायचं, हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. अलीकडे लेखकांना हा प्रश्न पडत नसतो.. तुम्हालाही तो पडू नये..

दहशत प्रातिनिधिक सामान्य माणसाच्या आणि बुद्धिवाद्यांच्यासुद्धा मेंदूत जाऊन बसली आहे. वर्तनातून, वाचेतून, लेखनातून, चिंतनातून प्रकट होऊ लागली आहे. घराघरांत वावरू लागली आहे.

४/ विदूषक!

मौलाना रूमी यांचा जन्म अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतात सन १२०७ मध्ये झाला. हा एक सूफी रहस्यवादी विचारवंत. तो असं म्हणतो की,

‘एक हजार क़ाबिल आदमी के मर जानेसे इतना नुकसान नहीं होता; जितना, के एक अहमक के साहिबे एख़तियार होनेसे होता है/’

लष्करातलं एक हजार सक्षम माणसांचं बटालियन नष्ट झालं तरी फारसं नुकसान होत नाही. मात्र, एखाद्या विदूषकाच्या अधिकारप्राप्तीनंतर समाजाचं जे नुकसान होतं ते नुकसान भरून निघणारं नसतं असं त्याचं म्हणणं. ‘अहमक’ म्हणजे विदूषक. सर्कशीत काम करणारा विदूषक इथे अभिप्रेत नाही. विदूषक-वृत्तीचा मूढ. ‘साहिबे एख़तियार’ म्हणजे अधिकारप्राप्ती. समाजाने विदूषक-प्रवृत्तीच्या मूढांना अधिकारप्राप्ती करून दिली तर समाजाला अस पीडा सहन करावी लागते, असा या म्हणण्याचा रोख आहे. समाजातील सामान्य स्त्री-पुरुषांना जगत्व्यवहार करण्यासाठी आपल्याभोवती काहीएक व्यवस्था निर्माण करावी लागते. ही व्यवस्था चालविण्यासाठी व्यक्तींची निवड केल्यानंतर सामान्य माणसं पीडित का होतात, दु:ख का भोगतात, आणि वंचनेला का सामोरं जातात, याचं कारण रूमीने वरीलप्रमाणे दिलं आहे.

५/ बाहेर येऊन बसलेला लांडगा!

सध्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेत आहे. कोणतीतरी अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. आपल्या दु:खाचा परिहार कसा होणार, हे त्याला अद्याप समजलेलं नाही. कोणीतरी ‘मसिहा’ येईल आणि परिस्थिती बदलेल, आपली सुटका करेल असं त्याला वाटतं आहे. म्हणून तो ‘कलकी अवतारा’च्या प्रतीक्षेत आहे. पण असा कोणी मसिहा येत नाही, आणि त्याचं वाट पाहणं थांबत नाही. ‘वो सुबहा कभी तो आयेगी’ असं द्रष्टय़ा कवीने म्हटलं असलं तरी, आणि दिलासा दिला असला तरी त्याने तीव्र उपहास नोंदवला आहे. कारण उद्याचा दिवस उजाडणार नसतो. पण वाट पाहणं केवळ सामान्य माणसाच्या नशिबी असतं. चुकीचे विचार समाजामध्ये जाणीवपूर्वक प्रसृत करणं हा प्रमाद आहे हे सामान्य माणसाला कोणी सांगत नाही. राजकारण नावाचा लांडगा सर्वाच्या- अगदी झोपडीच्या दरवाजाच्या बाहेरसुद्धा येऊन बसलेला आहे, हे त्याला कोणी सांगत नाही. हा लांडगा लबाड आहे. त्याचा चेहरा क्रूर नाही; मोहक आहे, हसरा आहे, हे त्याला कोणी सांगत नाही. या सामान्य माणसाला स्वत:ला विचार करण्याची सवड व्यवस्थेने दिलेलीच नाही. पण- द् वुल्फ इज अ‍ॅट द् डोअर!

६/ दु:स्वप्न

भोवती जे अस्वस्थ वर्तमान घडतं आहे त्याचं आकलन माझ्यातल्या सामान्य माणसाला होतंच असं नाही. माझ्याबरोबरीनेच सामान्य माणूस स्तिमित मात्र आहे. भोवती वाढणारा कोलाहल बधीर करतो आहे. कोणी म्हणतंय की, आपल्याकडे जरा जास्तच लोकशाही आहे. कोणी म्हणतंय की, हे सगळं तुमच्या भल्यासाठीच चाललेलं आहे. पण काय चाललंय हेच कळत नाहीए. एक भ्रमयुग आणि त्यात आपण केलेला प्रवेश. आणि एक वाचाबंदी. कसलीशी दहशत.. दु:स्वप्नच जणू. आणि सर्वत्र एक ‘चतुर मौन’ पसरून राहिलेलं आहे. विभाजित होऊन नष्ट व्हायचं की काय, असा प्रश्न.

अन्नदात्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, आणि त्याबद्दल आपलं मत काय, असा सवाल समाजातला सामान्य माणूस हतबुद्ध होऊन एकमेकांना विचारतो. आणि त्याला उत्तर मिळत नाही. कारण उत्तर कोण देणार? मग सामान्य माणसाच्या नजरेसमोर एका थोडय़ाशा वेडसर, पझेसिव्ह, ऑब्सेस्ट आईची प्रतिमा तरळते. ही आई आपल्या अबोध आणि अजाण मुलांच्या मागे एका चमच्यात कडू टॉनिकचं औषध घेऊन पळते आहे आणि मुलं औषध पिण्यासाठी नकार देतायत. आई म्हणते आहे की, तुमच्या भल्यासाठी, चांगल्यासाठीच हे आहे.. तुमच्या लक्षात कसं येत नाही? मुलं या खोलीतून त्या खोलीत सरावैरा धावतायत. त्यांना बळजबरीचं टॉनिक नको आहे. ती आई नवल करते आहे. तिच्या मते, मुलं तर अबोधच आहेत. मुलांचा ‘प्रोटेस्ट’ तिला कळतच नाही. मध्यस्थी तिला नको आहे. त्यातून मध्यस्थी करण्याचं नैतिक धर्य कोणातच नाही.

असंच काहीसं चित्र नजरेसमोर तरळून जातं. हे चित्र स्वप्नवत आहे. भ्रमयुगात सत्य आणि स्वप्न यांमधला भेद नाही तरी नष्ट झालेलाच आहे. अंधारावर मात करीत निर्भय कोंबडय़ाने सत्याला सलाम करण्यासाठी लखलखीतपणे आरवण्याची आपण वाट पाहतो आहोत. म्हणजे हे भ्रमयुगच पुन्हा.. आणि त्यातलं आपलं संमोहित असं जगणं.

bjsasne@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 12:08 am

Web Title: article on clever silence of the delusion abn 97
Next Stories
1 दिशा उजळताना..
2 डाक बंगल्यातलं भूत
3 अरतें ना परतें.. : तुकोबांचा डंख
Just Now!
X