News Flash

मर्द तेथेचि जाणावा

'लॉरेन्स ऑफ अरेबिया' आणि 'डॉक्टर झिव्ॉगो'सारख्या अजरामर चित्रपटांतून आपल्या अभिनयाची अमीट छाप उमटविणाऱ्या अभिनेते उमर शरीफ यांच्या कलाकीर्दीचा रसीला मागोवा.. शब्दकोशातल्या शब्दांचे अर्थ आणि त्यांचा

| July 19, 2015 01:07 am

‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ आणि ‘डॉक्टर झिव्ॉगो’सारख्या अजरामर चित्रपटांतून आपल्या अभिनयाची अमीट छाप उमटविणाऱ्या अभिनेते उमर शरीफ यांच्या कलाकीर्दीचा रसीला मागोवा..

शब्दकोशातल्या शब्दांचे अर्थ आणि त्यांचा खऱ्याखुऱ्या जीवनातला वावर यांचा मेळ बसतोच असं नाही. जीवनातल्या व्यवहाराच्या खडकांशी टक्कर घेताना त्यांचं मूळचं शुद्ध रूप वेगळंच रूप घेतं. मग त्यांचे अर्थही बदलतात. ही-मॅन, मॅचो मॅन (आपल्या भाषेत मर्द पुरुष), सुपरस्टार (आपल्यातही सुपरस्टारच!) या चंदेरी शब्दांचे आजचे अर्थ वेगळे झाले आहेत. अनर्थ म्हणावे असे विकृत झाले आहेत. टरटरून फुगलेले उघडे दंड आणि मदनिकांच्या वक्षसौंदर्याशी स्पर्धा करणारी छाती (५६ इंची?) दाखवणारा तो ही-मॅन. स्त्रीला जिंकण्यासाठी तिला जास्तीत जास्त अपमानकारक वागणूक देतो तो मॅचो मॅन. कथेच्या खुंटाळ्याला सामाजिक अन्याय-अत्याचाराचा सांगाडा टांगायचा आणि त्याच्यावर चित्तथरारक, पण अविश्वसनीय तंत्रचमत्कृतींचे आणि स्टंट नामक शारीरिक कसरतींची भर्जरी वस्त्रं अन् दागिने चढवले की आजचा ‘सुपर हीरो’ बनतो. खरं म्हणजे ज्याला ‘दर्द’ होतो इतरांची दु:खं व त्यांच्यावरची संकटं पाहून, तोच खरा मर्द. तोच ती दूर करण्यासाठी पुढे सरसावतो. अशा मर्दाला आपली ताकद शब्दांतून वा ‘सिक्स पॅक्स’च्या (कुरूप) रेषांमधून दाखवावी लागत नाही. त्याचा कुणाला धाक वा दहशत वाटत नाही. तो संकटात सापडलेल्या फक्त तरुण, सुंदर स्त्रीलाच नाही, तर कुणालाही मदत करायला तत्पर असतो. तो चारचौघांमधलाच असतो आणि तरीही त्यांच्यापेक्षा वेगळा असतो. मर्दपण हा स्वभाव असतो. चारित्र्य असतं. ते मिरवावं लागत नाही. त्याचं दर्शन आपोआप घडतं.
या सगळ्याचा उमर शरीफशी संबंध काय?
आहे. खूप जवळचा आहे. तो गेल्यावर बहुतेक इंग्रजी वृत्तपत्रांतून त्याचं अलीकडचं दर्शन म्हणून छापलेल्या फोटोमध्ये त्याचे केस जख्ख पांढरे आहेत. पण ते सत्तरी-पंच्याहत्तरी पार केलेल्या वृद्धाचे आहेत. मात्र त्याच्या बसण्यातला डौल, त्याचा आब, त्याच्या अंगावरचा पर्फेक्ट फिटिंग्जचा सूट हा सारा रुबाब एका मर्दाचा आहे.
खरं म्हणजे त्याच्या काळात त्याला सुपरस्टार हे विशेषण कुणी लावलं नाही. अतीव देखणा असूनही नायक म्हणून पडद्यावर येण्याचं भाग्य त्याला लाभलं नाही. ज्या भूमिकेनं त्याला आजवर लक्षात राहील असा नावलौकिक दिला, ती ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’मधली अली नावाच्या अरबी माणसाची भूमिका सहाय्यक- फार तर मुख्य सहाय्यक अभिनेत्याची होती. समांतर नायकाचीसुद्धा नव्हती! चित्रपटाचा नायक होता पीटर ओ’टूल. त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला अत्यंत गुणी अभिनेता. शरीफला दिलेल्या भूमिकेसाठी आधी दिग्दर्शक डेव्हिड लीन यांनी दिलीपकुमारला विचारलं होतं. पण त्यानं नकार दिला होता. दिलीपकुमारला ओळखणाऱ्या भारतीय प्रेक्षकाला याचं आश्चर्य वाटणार नाही. लॉरेन्सची भूमिका असती तर(च) दिलीपकुमारनं विचार केला असता. हॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किंवा लीनसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकाबरोबर काम करण्यासाठीही दिलीपकुमारनं दुय्यम भूमिका स्वीकारली नव्हती. असो.
भारतीय नटश्रेष्ठानं नाकारली म्हणून ती भूमिका कमी महत्त्वाची ठरत नाही. अस्सल कलावंत छोटी भूमिकाही मोठी करतो. त्यातच नटाचं मोठेपण आहे. शरीफनं ते सिद्ध केलंच. अरब जगाचा उद्धारकर्ता लॉरेन्सची भूमिका पीटर ओ’टूल जगला. पण त्याला मदत करणाऱ्या अलीच्या भूमिकेतल्या शरीफची जास्त चर्चा झाली.
शरीफची ती काही पहिली दुय्यम भूमिका नव्हती. इजिप्तच्या चित्रपटसृष्टीतून हॉलीवूडमध्ये आलेल्या शरीफला नायकाची भूमिका मिळवण्याची अपेक्षाही नसावी. इजिप्तमध्ये आठ वर्षांची छोटीच; पण झळझळीत कारकीर्द गाजवल्यानंतरही हॉलीवूडमध्ये सुरुवातीला आपल्याला नायकाची भूमिका मिळणार नाही, या वास्तवाची जाणीव त्याला होती. पुढे आपण ‘हीरो’च्या भूमिका मिळवू, हा आत्मविश्वासही होता. त्याची जी भूमिका बघून रत्नपारखी लीननं त्याची अलीच्या भूमिकेकरिता निवड केली, ती ‘मॅकेनाज् गोल्ड’ चित्रपटातली भूमिका तर तद्दन खलनायकाची होती. तिथेही जो मुख्य खलनायक नव्हताच. खलपात्रांपैकी एक होता. ‘मॅकेनाज् गोल्ड’ हा खजिनाशोधक चित्रपटांचा बाप! आजच्या भाषेत ‘कल्ट मूव्ही’! त्याचाही नायक ग्रेगरी पेक म्हणजे हॉलीवूडचा सुपरस्टार. त्या काळात पेकपुढे शरीफ ज्युनियर आर्टिस्ट होता असंच म्हटलं पाहिजे. पण मुद्दाम सांगितली पाहिजे अशी गोष्ट म्हणजे ‘मॅकेनाज् गोल्ड’मध्येही शरीफची वाहवा झाली. त्याची ती खलभूमिका पाहून त्याला अलीची सहृदय भूमिका देणाऱ्या लीनच्या गुणग्राहकतेची तारीफ करावी तेवढी थोडीच ठरेल. ‘मॅकेनाज्’मध्ये समीक्षकांनी शरीफला तोंडभरून नावाजलं. ‘लॉरेन्स’नं त्याला ‘स्टार’ बनवलं. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला. या चित्रपटानंतर दोनच वर्षांनी तो ‘डॉक्टर झिव्ॉगो’ या रशियन क्रांतिकालावरच्या चित्रपटाचा नायक बनला. डॉक्टर झिव्ॉगो ही त्याची ओळख ठरली.
‘लॉरेन्स’ आणि ‘झिव्ॉगो’ने शरीफला हॉलीवूडचा हीरो अन् इन्टरनॅशनल स्टार बनवलं. अफाट तारीफ, प्रसिद्धी आणि पैसा वाटय़ाला आला. मात्र, ‘ऑस्कर’च्या सन्मानाला तो वंचित राहिला. ‘ऑस्कर’नंतर ज्याचं नाव घेतलं जातं तो ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार त्याला दोन्ही वेळा लाभला. ‘लॉरेन्स’करता साहाय्यक, तर ‘झिव्ॉगो’साठी प्रमुख अभिनेता म्हणून! ‘लॉरेन्स’करता तर अभिनयाबरोबरच सवरेत्कृष्ट पदार्पणाकरताही त्याला हा पुरस्कार मिळाला.
एका पिढीच्या प्रेक्षकांच्या मनात आणि हॉलीवूडच्या चित्र-इतिहासामध्येही त्याला अढळ स्थान मिळवून देणाऱ्या या दोन भूमिकांनी शरीफची मोठी पंचाईत केली. महाकाव्याच्या दर्जाच्या त्या चाकोरीबाह्य़ चित्रपटांमधल्या असामान्य भूमिकांनंतर त्या तोडीच्या भूमिका त्याला मिळाल्या नाहीत. हॉलीवूडच्या पडद्यावर तो चंगीजखान म्हणून दिसला. चे गव्हारा या क्युबाच्या क्रांतिकारक नेत्याच्या रूपातही दिसला. हेही दोन्ही चित्रपट ‘लॉरेन्स’ व ‘झिव्ॉगो’च्याच वर्गातले. त्याच दर्जाचे. पण त्यांना अपेक्षेइतकं यश मिळालं नाही. हॉलीवूडच्या सामाजिक वा लोकप्रिय सदरात मोडणाऱ्या रोमॅन्टिक चित्रपटांसाठीही त्याचा फारसा विचार झाला नाही. ‘फनी गर्ल’ हा रोमॅन्टिक नायक म्हणून त्याचा एकच चित्रपट असावा. तोही नायिकाप्रधान होता आणि त्याकाळी ‘क्रेझ’ असलेली बार्बरा स्ट्रायझन्ड त्याची नायिका होती. त्यामुळे नाही म्हटलं तरी शरीफला त्या चित्रपटात कथेकडून थोडं कमीच महत्त्व मिळालं. ‘फनी गर्ल’ शरीफच्या नावावर जमा झाला नाही.
एकंदरीतच हॉलीवूडनं त्याची लोकप्रियता मान्य केली, त्याची अभिनयसंपदा मान्य केली; पण त्याची स्टार व्हॅल्यू वापरली नाही, वाढवली नाही. त्याचा चेहरा ओतीव, घडीव शिल्प म्हणावा असा होता.  त्याचे काळेभोर डोळे तसेच दाट केस हे रूप ‘स्त्री- प्रेक्षकांना मूच्र्छित करणारं’ म्हणून कौतुकलं गेलं. ‘मिश्या असूनही फार मोठा स्त्री-प्रेक्षकवर्ग काबीज करणारा क्लार्क गेबल या पुरुषोत्तमानंतरचा नायक’ म्हणूनही त्याच्या रूपाचे गोडवे गायले गेले. मात्र, गेबलच्या मर्दानी मिशीत आणि शरीफच्या मिशीत मोठा फरक होता. गेबलच्या फोटोलासुद्धा अहंकाराचा आणि मिजासखोरपणाचा दर्प येतो. शरीफ मात्र मिशीदार असून धाकडबाज दिसला नाही.
त्याच्या उमद्या, स्नेहल, हसऱ्या नजरेनं त्याचं रोमॅन्टिक अपील अबाधित राखलं. तसा तो उंचपुराही नव्हता. चौकोनी शरीरठेवणीमुळे त्याचे रुंद आणि मजबूत खांदे नजरेत भरायचे. पण त्यानंच त्याची उंची कमी भासायची. त्याच्या पुढच्या दोन दातांमध्ये फट होती. पण आपल्या देव आनंदचा एक पडका दातच त्याचा प्लस पॉइन्ट ठरला, तसंच शरीफचं झालं. त्या फटीनं त्याच्या हास्यातली मोहकता एक दातभरही उणावली नाही. शरीफच्या चेहऱ्यावरची आरोग्यसंपन्न झळाळी स्त्रियांनाच काय, पुरुष प्रेक्षकांनाही मोहवणारी होती. रोड आणि जाड यांच्या मधली नेमकी ठेवण त्याला लाभली होती. चित्रपटाच्या पडद्याबाहेर तो बहुधा सूट, बूट, टाय या ‘फॉर्मल ड्रेस’मध्ये दिसायचा आणि तो पोषाख त्याला कमालीचा शोभायचा. जणू तो उमर शरीफकरताच जन्मला होता!
अशा संपूर्ण देखण्या नटाला हॉलीवूडमध्ये रोमॅन्टिक नाही, तरी डझनावारी बनणारे ‘वेस्टर्न’ (दे-मार), गुन्हेगारी किंवा पोलीसपट मिळायला हवे होते. शॉन कॉनरीनं ‘बाँड’पासून फारकत वा स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर ‘बाँड’पट तरी मिळायला हवे होते. हॉलीवूडमध्ये सुपरस्टारपण वैविध्यपूर्ण भूमिका मिळण्याच्या आड येत नाही. कॉनरीलाही ‘बाँड’पट सोडल्यावर ‘अ फाइन मॅडनेस’मध्ये एका कवीची भूमिका करायला मिळाली. शरीफला अशी संधी मिळाली नाही. त्याचं नाव श्रेयनामावलीत अग्रभागी असायचं; पण प्रस्थापित झाल्यावरही सेनाधिकारी, पोलीस अधिकारी आणि क्वचित धर्मगुरू अशा चरित्रभूमिकाच त्याच्या वाटय़ाला आल्या. त्यानं त्यांना पुरेपूर न्याय दिला; पण हॉलीवूडनं त्याला दिला असं म्हणता येणार नाही.
असामान्य देखणं रूप आणि त्याच तोडीचे अभिनयगुण असूनही असं का व्हावं, याचा एकच अंदाज करता येतो. हॉलीवूडकरिता शरीफ भरवशाचा नट; पण उपरा माणूस होता. जन्मानं अमेरिकन नसलेल्या, पण गुणसंपन्न मार्जेल्लो मेस्ट्रियॉनी (इटली) आणि ज्याँ पॉल बेल्मांदो (फ्रान्स) या नटांनाही हॉलीवूडनं अशीच वागणूक दिली म्हणा. उपरेपणाच्या जोडीला नव्या दमाच्या अमेरिकन नायकांनी शरीफची कोंडी केली असावी. गॅरी कूपर, कॅरी ग्रॅन्ट, ग्रेगरी पेक या हॉलीवूडमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्य़ा पुरुषी सौंदर्याच्या अस्सल नमुन्यांची जागा पॉल न्यूमन, रॉबर्ट रेडफोर्ड यांनी घेतली होती. दे-मार (वेस्टर्न) पटांमध्ये ईस्टवूडचं राज्य सुरू झालं होतं. शरीफ सर्व बाजूंनी त्यांच्या तोडीस तोड होता, पण अमेरिकन (किंवा ब्रिटिश) नव्हता; हेच बहुधा त्याचं दुर्दैव ठरलं.
हळूहळू शरीफ स्वत:च हॉलीवूडपासून दूर झाला. पण सुदैवाची दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिक आयुष्यात त्याच्या ‘स्टार’पणाची शान कायम राहिली. अलेक्झांड्रामधल्या एका व्यापारी कुटुंबात जन्मलेला शरीफ शाही थाटात वाढला आणि शेवटपर्यंत तसाच जगला. कॅसिनो, रेसचे घोडे आणि पत्ते हे खानदानी रईसीचे षौक त्याला होते. हॉलीवूड-निवृत्तीनंतर तेच त्याच्या सोबतीला होते. मात्र, पिढीजात श्रीमंतीनं शरीफला निव्वळ खुशालचेंडू बनवलं नव्हतं. तो पत्ते खेळला; पण ‘ब्रिज’च्या बुद्धिमान खेळात रमला. त्यावर त्यानं कॉलम्स लिहिले. त्याची पुस्तकं झाली आणि ती खपलीसुद्धा! त्यानं रेसचे घोडे पाळले आणि त्यांनीही ढीगभर शर्यती न् पुरस्कार जिंकले. शरीफला यश दिलं.
मर्दानी रूपाच्या शरीफला हे साजेसे षौक होते. त्याचं त्यानं व्यसन बनू दिलं नाही. तो मन लावून ‘ब्रिज’ शिकला आणि त्यात तरबेज झाला. त्याच्या मन:पूर्वकतेनं तो इंग्रजी व अरबीसह ग्रीक, इटालियन, स्पॅनिश वगैरे सात-आठ भाषा शिकला. देखण्या चेहऱ्याच्या बळावर चित्रपट मिळवण्याऐवजी त्यानं ‘रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रामा अ‍ॅण्ड आर्ट्स’मध्ये जाऊन अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं. फारशा प्रगत नसलेल्या देशाबाहेर जाऊन त्यानं नाव काढलं. वयाच्या ८३ व्या वर्षी माणूस जगाचा निरोप घेतो तेव्हा मागे पोकळीबिकळी काही निर्माण होत नसते. मग तो माणूस कितीही कर्तबगार असो! मात्र, निवृत्तीनंतर आयुष्यात पोकळी घेऊन जगणारे बरेचजण असतात. शरीफनं तिला व तिच्याबरोबर येणाऱ्या वैफल्याला आपल्या जीवनात स्थान दिलं नाही, हे अधिक महत्त्वाचं. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ हॉलीवूडपासून दूर असलेल्या या कलाकाराच्या निधनाची वृत्तपत्रांनी दोन-तीन कॉलम्स भरून बातमी छापली. उमर शरीफ नावाच्या अस्सल कलावंताची ती पुण्याई होती. तीच त्याची खरी कमाई.. पिढीजात संपत्तीपेक्षाही मोठी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 1:07 am

Web Title: article on hollywood actor omar sharif
Next Stories
1 श्रीजगन्नाथाचे नव-कलेवर
2 देवलांच्या नाटय़लेखनाबद्दलचे वेगळे तपशील
3 सामाजिक वेदनेचा भाष्यकार