27 May 2020

News Flash

बगदादी गेला; पुढे काय?

अबु बकर अल् बगदादीच्या मृत्यूनंतर इस्लामिक स्टेट वर्चस्व कसे असेल, याविषयी..

(संग्रहित छायाचित्र)

अविनाश गोडबोले / अंबरीन आगा

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा मुख्य नेता अबु बकर अल् बगदादी अलीकडेच अमेरिकन सन्याच्या लष्करी कारवायांदरम्यानच्या आत्मघातकी स्फोटात मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर इस्लामिक स्टेट वर्चस्व कसे असेल, याविषयी..

आपल्या क्रूर कर्माने इस्लाम विरुद्ध जग अशी लढाई लढणारा आणि इस्लामिक स्टेट (आयसिस) चा मुख्य नेता अबु बकर अल् बगदादी अलीकडेच अमेरिकन सन्याच्या लष्करी कारवायांदरम्यानच्या आत्मघातकी स्फोटात मारला गेला. अमेरिकन सन्याने आपल्याला घेरल्याची खात्री झाल्याने बगदादीनं स्वत:भोवती बांधलेल्या विस्फोटकांच्या पट्टय़ाचा (suicide belt) स्फोट केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या वेळी बगदादी त्याच्या सीरियाच्या उत्तर भागातील छुप्या घरातील भुयारात होता. या विस्फोटात त्याच्यासोबत असलेली त्याची तीन मुलंदेखील मृत्युमुखी पडली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानुसार, गुप्तहेर संघटना त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या आणि मागील दोन आठवडय़ांपासून त्याच्या हालचालींचा पाठपुरावा केला गेला.

बगदादीचा मृत्यू इस्लामिक स्टेट (आयसिस)च्या समस्या वाढवणारा आहे. याआधीच सीरिया अणि इराकमध्ये आयसिसची स्थिती नाजूक झालेली आहे. आयसिस नियंत्रित प्रदेशांची संख्याही आता फारच कमी झाली आहे. २०१४ च्या तुलनेत १० टक्के प्रदेशही आयसिसच्या नियंत्रणात नाही. एके काळी इंग्लंडच्या क्षेत्रफळाएवढी जमीन आयसिसच्या नियंत्रणाखाली होती.

२३ मार्चला पूर्व सीरियातील बाघोजमध्ये आयसिसचा पराभव झाल्यानंतर, सीरियन डेमोक्रेटिक फोस्रेसनं ‘तथाकथित इस्लामिक खिलाफत’ संपल्याचं जाहीर केलं होतं. बाघोजच्या लढाईत आयसिसचे अनेक धर्मयोद्धे/ दहशतवादी मारले गेले होते आणि ते नुकसान भरून काढणं शक्य नव्हतं. आयसिसचा पराभवामागे अमेरिकन, फ्रेंच, ब्रिटिश स्पेशल फोस्रेस यांच्याबरोबरच कुर्दिश आणि सौदी सैन्य यांच्यातील समन्वयही कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे, गुप्तचर यंत्रणांनी आयसिसच्या प्रचारतंत्रावर आता मोठय़ा प्रमाणात नियंत्रण मिळवलेले आहे, ज्यामुळे त्यांना नवीन धर्माध दहशतवाद्यांचा पुरवठा बंद झाला आहे. तसेच आयसिसमध्ये गेल्याने होणारे हाल, हमखास पत्करावा लागणारा मृत्यू.. हे वास्तव आता जगजाहीर आहे. त्यामुळे आयसिसचं आकर्षण आता जवळपास संपलेले आहे. राष्ट्रवादाच्या काळात इस्लामिक खिलाफत ही एक परिकल्पना आहे, हेदेखील स्पष्ट आहे आणि त्यामुळेच आयसिसमध्ये जाणं म्हणजे मरणाला आलिंगन, याशिवाय काहीही नाही हे निश्चितच. मागील काही काळात नियंत्रणाखालील प्रदेश कमी झाल्यामुळे आयसिसच्या हालचाली मंदावल्या होत्या आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांपासून लपून राहू शकत नव्हत्या. त्यामुळे आयसिसच्या सन्यातील लढण्याची स्फूर्ती संपत आलेली आहे.

अल् बगदादीच्या नेतृत्वाखाली आयसिस जगातली सर्वात मोठी अणि क्रूर दहशतवादी संघटना बनली. आयसिसमुळे निर्माण झालेली मुख्य भीती आणि समस्या हीच होती की, आयसिस अतिशय क्रूरपणे, निर्दयीपणे काम करते. त्यामुळे जगातील इतर छोटय़ा दहशतवादी संघटनांना त्यांचे अतिशय आकर्षण होते. या कारणामुळे आयसिसशी संबंध जोडण्यासाठी दक्षिण आशियातील पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील संघटना अग्रेसर होत्या, तर इतर छोटय़ा संघटनाही अशी इच्छा बाळगून होत्या. काश्मीरमध्येही काही वेळा इस्लामिक स्टेटचे झेंडे दिसले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, केरळ अणि कर्नाटकमधील युवकांमध्ये आयसिसचा प्रभाव दिसून आला होता. आफ्रिकेतील ‘बोको हराम’सारख्या दहशतवादी संघटनादेखील आयसिसकडूनच क्रूर आणि निर्दयी कृत्यं करायला शिकल्या होत्या.

आयसिस इंटरनेटच्या काळातली अतिरेकी संघटना आहे आणि त्यांनी इंटरनेट अणि इतर प्रसारमाध्यमांचा वापर करत आपली दहशत प्रस्थापित केली. सूड-हत्या, सामूहिक हत्या, सामूहिक बलात्कार आणि महिलांना बंदी बनवून त्यांच्यावर अत्याचार हे प्रकार आयसिस नेहमीच करत आली आहे.

आता अल् बगदादीचा उत्तराधिकारी म्हणून अबू ओथमान अल्-टुन्सी आणि अबू सालेह अल्-जु-झ्रावी यांची नावे समोर येत आहेत. त्यांच्यापैकी कोणाचेही नाव जाहीर होणे म्हणजे बगदादीच्या मृत्यूची पुष्टी ठरेल. यापैकी एक अल-टुन्सी हा टय़ुनिशियाचा नागरिक आहे आणि ‘आयएसआयएल’च्या शूरा काऊंसिलचा प्रमुख आहे. हे काऊंसिल म्हणजे एक विधानमंडळ आणि सल्लागार मंडळ आहे. दुसरा उत्तराधिकारी सौदी अरेबियाचा नागरिक आहे आणि गटाची तथाकथित प्रतिनिधी समिती आणि कार्यकारी संस्था चालवतो. पण यात प्रश्न एकच उरतो की, हे दोघेही सीरिया किंवा इराकचे नागरिक नाहीत आणि आयसिसच्या दहशतवाद्यांमध्ये इराकी आणि सीरियन यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भविष्यात गटबाजी आणि विभाजनाचा धोका उद्भवू शकतो.

हज अब्दुल्ला हा अल् बगदादीचा साहाय्यक होता. त्याचंही नाव नेतृत्वासाठी समोर आलं आहे. पण त्याचा ठावठिकाणा लागणं कठीण आहे. हज अब्दुल्ला आधीच अमेरिकेच्या निशाण्यावर असल्यामुळे तो समोर येणं अवघड आहे. अब्दुल्लाह कर्दश या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयसिसच्या सामरिक नियोजन अधिकाऱ्याच्या नावाचीदेखील चर्चा होत आहे. कर्दश याआधी बगदादीसोबत कैंप बुक्काच्या तुरुंगात होता आणि तो आयसिसच्या निर्मितीआधी इराकी लष्कराचा अधिकारी होता. पण कर्दशच्याही जिवंत असण्यावरच प्रश्नचिन्ह आहे. २०१७ मध्ये एका लढाईत तो मेल्याचं वृत्त आहे. त्याचे नातेवाईक अणि मित्र त्याला मदत केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. आयसिसने २०१७ नंतर त्याच्या जिवंत अथवा मृत असण्याची खात्री केलेली नाही.

अनेक जाणकारांच्या मते, गेल्या दोन वर्षांत अल् बगदादी आयसिसचं नेतृत्व करण्यापेक्षा त्यांच्यासाठी ओझं बनला होता. त्यामुळे संघटनेची भरपूर शक्ती अल् बगदादीला सांभाळण्यात आणि त्याचं संरक्षण करण्यातच खर्च होत होती आणि लढाया बाजूला पडल्या होत्या. याच काळात आयसिसनं आपलं प्रादेशिक नियंत्रण मोठय़ा प्रमाणात गमावलेलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर लढाईचं काम पुन्हा जोमानं हाती घेतलं जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचप्रमाणे, या प्रकाराने नाराज झालेले अनेक छोटे गट आता पुन्हा एकत्र येऊन नव्यानं आणि धाडसी तसंच नाटय़मयरीत्या काम करू लागतील अशीही शक्यता जास्त वाटते. आता सीरियातील युद्धात अमेरिकेच्या आशीर्वादाने तुर्कस्तानही सहभागी झाले आहे, ज्यामुळे आयसिसची जनमान्यता, खास करून युवा वर्गात वाढू शकेल आणि मतभेद असलेल्या गटांना एकत्र आणू शकेल. ऑक्टोबरच्या सुरुवातीला राक्कामधील बॉम्बहल्ला आयसिसनं घडवून आणल्याचं म्हटलं जातं आणि असे हल्ले पुन: पुन्हा होतील.

जुलै २०१६ मध्ये काबुल मध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ८० हज़ारा-शिया नागरिक मृत्यमुखी पडले होते. हा हल्ला अफगाणिस्तानमधील आयसिसच्या दहशतवाद्यांनी केला होता. आता अफगाणिस्तानमध्ये आयसिस बळकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसं झाल्यास भारताची डोकेदुखी वाढेल.

आजघडीला ९२,००० आयसिस दहशतवादी इराक आणि सीरियातील तुरुंगात कैद आहेत. त्यांना सोडवण्यासाठी नियोजित हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाश्चात्त्य गुप्तचर संघटनांना ही भीती वाटते आहे की, हे नेतृत्व तुरुंगातून निसटल्यास यापैकी काही जण युरोप किंवा इतर देशांत परत येतील आणि लंडन, पॅरिस, बार्सलिोना येथे झालेल्या हल्ल्यांच्या पुनरावृत्तीची योजना आखतील. तुर्कस्तानच्या लढाईतील सहभागानंतर तुर्की विरुद्ध कुर्दिश लढाईला प्राधान्य देऊन आयसिसला पुन्हा (सैन्यदलाची) नव्याने जुळणी करण्यासाठी वेळ मिळेल. तसंच तुर्की विरुद्ध कुर्दशि- विरुद्ध आयसिस या लढाईचा फायदा आयसिसला नक्की होईल.

तुर्की हल्ल्याच्या किती तरी आधी, अशी चिन्हं दिसू लागली की, आयसिस पुन्हा एकत्र येत आहे आणि इराकी सरकारच्या सन्यतळांवर लहानसहान हल्ले सुरू झाले आहेत. एकूणच या प्रदेशाची २०११ पासून सुरू झालेली साडेसाती संपण्याची लक्षणं दिसत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका स्वार्थीपणे काम करत आहे, तसंच रशिया अणि चीन यांच्या अडथळ्यांमुळे संयुक्त राष्ट्रांचंदेखील महत्त्व आणि योगदान संपलेलं आहे.

स्थिरता आणि सुशासन सुरक्षितता देतात अणि अस्थिरता दहशतवाद निर्माण करते. पण आज सगळेच जण लवकरात लवकर विजय घोषित करण्याच्या मागे लागलेले आहेत आणि सीरिया आणि इराकमध्ये अफगाणिस्तानच्या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे, तसं झालं तर दुर्दैवी ठरेल अणि अल् बगदादीचा मृत्यू फक्त एक तळटीप म्हणून नोंदला जाईल.

agodbole@jgu.edu.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2019 2:09 am

Web Title: article on isis abu bakr al baghdadi killed in a suicide bombing abn 97
Next Stories
1 टपालकी : हॉलिडे पेशल
2 बहरहाल : काही असंपादित राजकीय वासऱ्या  
3 दाहक जीवनाचं वास्तववादी चित्रण
Just Now!
X