मुकुंद संगोराम

वादनात गायनाची अनुभूती देणारे जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. दामोदर केशवराव तथा डी. के. दातार यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने..

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

पंडित डी. के. दातार हे खरे तर गायकच व्हायचे. वडील केशवराव हे ग्वाल्हेर घराण्यातील कलावंत. हे घराणे म्हणजे भारतीय अभिजात संगीताची गंगोत्री! बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर ग्वाल्हेरला जाऊन तालीम घेऊन परत महाराष्ट्रात आलेच नसते, तर या घराण्याची ओळख व्हायलाही उशीर लागला असता. त्यांचे शिष्य विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी या घराण्याची पताका देशभर फडकवत ठेवली. घराणेदार गायन करत असतानाच त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हे त्यांनी आपले जीवनध्येय मानले. केशवराव दातार हे या विष्णू दिगंबरांचे गुरुबंधू. त्यामुळे घरात गायनकलेचा वारसा आपोआप सुरू राहिलेला असताना डी. के. दातारांनी गाणेच करणे स्वाभाविक होते. तशी तालीम त्यांना मिळायलाही लागली होती. मात्र भविष्यातील एका गायक कलावंताची जडणघडण होत असतानाच्या या काळात अलगदपणे व्हायोलिन हे वाद्य हाती पडले आणि पं. दातार गायक होण्याऐवजी वादक झाले. परंतु गायक म्हणून त्यांनी जी दिगंत कीर्ती मिळवली असती, तेवढीच त्यांना या पाश्चात्त्य वाद्यावरील त्यांच्या कलात्मक हुकूमतीमुळेही मिळाली. त्यामुळे भारतीय अभिजात संगीताच्या दरबारात गर्भश्रीमंतीने नटलेल्या वाद्यवादनाचा प्रांत अधिक समृद्ध झाला आणि या वाद्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोनही प्राप्त झाला.

लहान वयातच त्यांच्या हाती व्हायोलिन सोपवल्याबद्दल पं. दातार यांचे मोठे बंधू नारायणराव यांचेही भारतीय रसिकांनी आभारच मानायला हवेत. परंतु हाती आलेल्या या वाद्याचे काय करायचे आणि कसे करायचे, याचा निर्णय तर स्वत: दातारांनाच घ्यायचा होता. तो त्यांनी घेतला आणि या वाद्यावरचे त्यांचे प्रेम अपार कष्टातून बाहेर येताना लडिवाळपणे रसिकांपर्यंत येऊन पोहोचले.

जगातील सगळ्याच संगीतपरंपरेत गायनालाच प्राधान्य मिळत गेले. लोकसंगीतातून फुलत गेलेले हे संगीत अभिजाततेच्या पायरीपर्यंत पोहोचण्यास बराच कालावधी लागला असणार. परंतु याच वाटेत, गळ्यातून उमटणाऱ्या संगीतालाही काही शारीरिक मर्यादा असल्याचे लक्षात आले. मनातले गाणे बाहेर येण्यासाठी आणखी काहीतरी हवे आहे, याची जाणीव झाल्यामुळे असेल कदाचित, परंतु वाद्यांचा शोध सुरू झाला. गायनाशी समांतर अशी वाद्ये निर्माण होत गेली. भारतीय संस्कृतीच्या अवकाशात असे पहिले नोंद झालेले वाद्य म्हणजे- ‘बासरी’! पूर्णत: नैसर्गिक असलेल्या या वाद्याचा गेल्या काही हजार वर्षांत संगीतालाच विसर पडला आणि ते पुन्हा एकदा भारतीय संगीतात आपल्या मधुरपणासह अवतरले. ‘व्हायोलिन’ हे वाद्यही पाश्चात्त्य संस्कृतीत जन्मलेले. साधारणत: सोळाव्या शतकात. इटली, फ्रान्स ते इंग्लंड असा त्याचा प्रवास होताना, इकडे भारतात त्याच आसपास ‘सारंगी’ हे वाद्य गायनशैलीशी जवळीक साधत होते. भारतीय संगीतातील अतिशय नाजूक बारकावे साध्य होण्यासाठी पस्तीसहून अधिक तारांचे हे वाद्य मैफलीत विराजमान होत गेले. गाणारे वाद्य अशीच त्याची ओळख झाली. परंतु काळाचा महिमा असा अगाध की, या वाद्याच्या वादनातील निपुणता हळूहळू कमी होऊ लागली आणि कुणाच्याही नकळत चार तारांच्या व्हायोलिनने त्याची जागा घेतली. हे सहजसोपे नव्हतेच मुळी. भारतीय संगीतातील स्वरवैविध्य आणि त्यांची मांडणी या वाद्यावर आत्मसात करणे फारच अवघड. परंतु पं. दातार यांचे वेगळेपण असे, की त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. नुसते पेलले नाही, तर त्यामध्ये इतके प्रावीण्य मिळवले, की देशातील बिनीचे कलावंत म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.

ब्रिटिशांच्या भारतातील आगमनाबरोबर व्हायोलिनचा भारतात प्रवेश झाला. ‘हार्मोनिअम’ हेही त्यांनीच बरोबर आणलेले वाद्य. भारतीय संगीतात त्या काळातील कलावंतांनी खरे तर या अशा परदेशी वाद्यांकडे तिटकाऱ्यानेच पाहायचे. परंतु तसे घडले नाही. जणू ही वाद्ये येथेच जन्मलेली आहेत की काय, असे वाटावे इतके प्रभुत्व या कलावंतांनी आत्मसात केले. त्यातही व्हायोलिनचे नशीब असे, की दाक्षिणात्य संगीतातील त्या काळातील बालुस्वामी दीक्षितार यांच्यासारख्या कलावंताच्या हाती हे वाद्य आले. काहीच अवधीत या वाद्याने दाक्षिणात्य संगीतपरंपरेत अतिशय मानाचे स्थान पटकावले. इकडे उत्तर हिंदुस्थानी संगीतात या वाद्याचा सर्जनशीलपणे उपयोग करून घेणारे मोजकेच, पण अतिशय प्रतिभावान कलावंत व्हायोलिनच्या अंगभूत वैशिष्टय़ांचा भारतीय संदर्भात विचार करत होते. त्यामुळे हे वाद्य ज्याला जसे वाटेल तसे स्वररूप धारण करत होते.

अशा काळात पं. डी. के. दातार यांनी व्हायोलिनवर कष्टपूर्वक ताबा मिळवला. या वाद्याच्या वादनाची मूळ शैली बदलत, तिला गायकी अंगाने सादर करण्याची नवी शैली त्यांनी आत्मसात केली. त्यांचे हे वेगळेपण सगळ्यांनाच सुखद धक्का देणारे होते. त्यामागे त्यांची तपश्चर्या होती आणि एक सर्जनाचा कलात्मक दृष्टिकोनही होता. त्यामुळे स्वतंत्र वाद्यवादनाच्या मैफलीतही पं. दातार यांचे वादन गायनाची अनुभूती देणारे असे. अनेक दिग्गज गायक कलावंतांनाही पं. दातार यांच्या साथसंगतीचा मोह न होता तरच नवल! मैफलीतल्या सारंगीची जागा हार्मोनिअमने घेतलीच होती. परंतु त्याबरोबरीने व्हायोलिनने सारंगीची आठवण करून दिल्यामुळे गायनाच्या मैफलीतही एक वेगळाची रंगत येत गेली. पं. कुमार गंधर्व हे तर पंडितजींचे जवळचे स्नेही. त्यांच्याबरोबरच हिराबाई बडोदेकर, नारायणराव व्यास, डी. व्ही. पलुस्कर, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या कलावंतांबरोबर दातारांच्या व्हायोलिननेही रसिकांची वाहवा मिळवली.

व्हायोलिन या वाद्याबरोबर बासरी, सारंगी, सतार या भारतीय वाद्यांशी मैत्र जुळवणारे कार्यक्रम पंडित दातार यांनी सादर केले. हरिप्रसाद चौरसिया, सुलतान खाँ, शाहीद परवेज यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर झालेले हे सहवादन हा रसिकांसाठी एक अपूर्व अनुभव ठरला. पण एवढय़ावरच न थांबता पंडितजींनी व्हायोलिनच्या प्रसाराचे शैक्षणिक कार्यही केले. बनारस हिंदू विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, खैराघर विद्यापीठ, बडोदा विद्यापीठ यांसारख्या ठिकाणी त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. शिष्य घडवण्याबरोबरच हे अध्यापनाचे कार्य शैक्षणिक स्वरूपाचे होते आणि ते करण्यात त्यांनी आनंद मिळवला. देशातील एक नामांकित व्हायोलिनवादक म्हणून प्रसिद्धीच्या वलयात त्यांनी स्वत:ला हरवू दिले नाही. त्यांनी वाद्य हेच आपले सर्वस्व मानले आणि आयुष्यभर त्या वाद्याशी मनापासून इमान राखले. एकदा वरच्या पातळीवर पोहोचल्यानंतर आता करायचे काहीच राहिले नाही, अशी भावना त्यांनी मनाला कधीच शिवू दिली नाही. परिणामी एक अतिशय समंजस, संयत आणि सर्जनशील कलावंत म्हणून त्यांची ओळख राहिली. वाद्यातून व्यक्त होणाऱ्या संगीताच्या सर्जनाच्या शक्यता वाढवत नेण्याची त्यांची क्षमताच त्यांना स्थान मिळवून देणारी ठरली. त्यांचे निधन ही म्हणूनच स्वरांसाठी अतिशय क्लेशदायक घटना ठरली आहे!

mukund.sangoram@expressindia.com