मृणाल तुळपुळे

फ्रेंच सरकारने १८८६  मध्ये ‘स्टॅचू ऑफ लिबर्टी’ हा पुतळा अमेरिकेला भेट म्हणून दिला. तो पुतळा बार्थोल्डी या प्रसिद्ध फ्रेंच शिल्पकाराने बनवलेला आहे. कोलमार हे बार्थोल्डीचे जन्मगाव असल्यामुळे त्याला ‘बाथोल्डीचे गाव’ असेदेखील संबोधले जाते. बार्थोल्डीने आपल्या जन्मगावासाठी  बनवलेली सात अप्रतिम अशी शिल्पे आज कोलमारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेली दिसतात.

स्वित्झर्लंडच्या सीमेलगतचे फ्रान्समधील कोलमार गाव ‘लिटिल व्हेनिस’ हे ‘परीकथेतील गाव’ म्हणून ओळखले जाते. हे टुमदार गाव अगदी आपल्या नावाला साजेसे असेच आहे. इतर युरोपियन गावांपेक्षा खूप वेगळे असलेल्या कोलमारने आपले हे वेगळेपण आजही नीट जपून ठेवले आहे.

अनेक शतकांचा इतिहास असलेल्या कोलमारमध्ये कला, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा सुरेख संगम बघायला मिळतो. या गावात एक प्रकारचे ऐतिहासिक सौंदर्य दडलेले आहे. शेकडो वर्षे जुनी चच्रेस, म्युझियम्स, पुनर्जीवित केलेल्या मध्ययुगातील जुन्या इमारती व वेटोळ्या दगडांचे फरसबंदी रस्ते बघितल्यावर त्याची प्रचीती येते. गावातून पायी फिरताना तेथील वेगळ्याच धाटणीच्या इमारती आणि ठिकठिकाणी उभारलेली अप्रतिम कारंजी व पुतळे बघून गाव किती सुंदर आहे ते लक्षात येते. गावातील स्वच्छ सुंदर रस्ते, रंगीबेरंगी फुले तसेच जागोजागी असलेली आगळ्यावेगळ्या प्रकारे सजवलेली आयलंडस् हे सगळे एखाद्या चित्रात असावे तसे आहे.

सोळाव्या शतकापासून कोलमार हे नदीकाठचे महत्त्वाचे बंदर होते, तर नदीवरचे कालवे म्हणजे मासेमारीचे केंद्र होते. हे गाव एका कालव्याद्वारे ऱ्हाईन नदीला जोडलेले असल्यामुळे, पूर्वीपासूनच ते व्यापाराचे मुख्य केंद्र मानले जात असे. त्या काळात श्रीमंत व्यापाऱ्यांनी कालव्याकाठी आपली घरे व वाईन सेलर्स बांधली. ती रंगीबेरंगी कौलारू घरे बाहेरून रॉट आयर्नचे दिवे, वेगवेगळ्या वस्तू तसेच चित्रांनी सजवलेली असून, जिरेनियमच्या फुलांनी लगडलेल्या कुंडय़ा त्या सौंदर्यात भर टाकतात.

गावातून जाणारा कालवा, काठावरचा निवांतपणा, तेथील असंख्य कॅफे  आणि फुलांच्या ताटव्यांनी सुशोभित केलेला कालव्याकाठच्या परिसर अगदी व्हेनिसची आठवण करून देतो. व्हेनिसप्रमाणेच या कालव्यांवरदेखील अनेक पूल बांधले आहेत. त्यामुळेच ही जागा व ओघानेच कोलमार गाव ‘लिटिल व्हेनिस’ म्हणून ओळखले जाते. या कालव्यांकाठच्या रेस्टॉरंटस्मध्ये बसून आजूबाजूची गडबड व सौंदर्य न्याहाळत वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेणे हा एक मस्त अनुभव असतो.

कोलमार हे पर्यटकांचे आवडते गाव असल्यामुळे ते बघण्यासाठी वॉकिंग टूर्स, कॅनॉलमधून गंडोला राईड, पांढरी व हिरवी ओपन ट्रेन, सायकल किंवा बग्गी असे अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. गाव तसे लहान असल्यामुळे बरेच लोक ते पायी फिरून बघणे पसंत करतात. त्यायोगे वेगवेगळी म्युझियम्स व तेथील कलाकृती, चच्रेस, वेगळ्या प्रकारची घरे हे सगळे आरामात बघता येते. हिरव्या ट्रेनमध्ये गाईड असल्यामुळे त्याच्याकडून कोलमारचा इतिहास, तेथील इमारती, शिल्पे व गावातील प्रसिद्ध व्यक्ती याबद्दल खूप माहिती ऐकायला मिळते. त्यायोगे असे कळले की, फ्रेंच सरकारने १८८६  मध्ये ‘स्टॅचू ऑफ लिबर्टी’ हा पुतळा अमेरिकेला भेट म्हणून दिला. तो पुतळा बार्थोल्डी या प्रसिद्ध फ्रेंच शिल्पकाराने बनवलेला आहे. कोलमार हे बार्थोल्डीचे जन्मगाव असल्यामुळे त्याला ‘बाथोल्डीचे गाव’ असेदेखील संबोधले जाते. बार्थोल्डीने आपल्या जन्मगावासाठी  बनवलेली सात अप्रतिम अशी शिल्पे आज कोलमारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेली दिसतात. एका राउंड अबाउटमध्ये बसवलेली बारा फूट उंचीची ‘स्टॅचू ऑफ लिबर्टी’ची प्रतिकृती ही त्यापैकीच एक.

ऐतिहासिक वास्तू, असंख्य कालवे, फुले यांबरोबर वाइन आणि एकाहून एक स्वादिष्ट पदार्थ हीदेखील कोलमारची खासियत आहे. वाइनमध्ये मुरवलेले तीन प्रकारचे मीट, वाइनमध्ये शिजवलेले बटाटे, ऱ्हाईन स्टय़ू आणि फ्रेंच क्रेप्स हे कोलमारचे खास पदार्थ आहेत. ते खाण्यासाठी तसेच तेथील उत्कृष्ट फ्रेंच वाईनचा आस्वाद घेण्यासाठी वाईनची राजधानी समजल्या जाणाऱ्या कोलमारला लोक मुद्दाम भेट देतात.

पर्यटक म्हटले की ओघाने खरेदी ही आलीच. गावात मोठी दुकाने असली तरी गल्ल्यांमध्ये असलेली लहान-लहान दुकाने व तिथे भरणारा बाजार हा लोकांचा जास्त आवडीचा आहे. अँटिक्स, काच सामान, लेदरच्या वस्तू व कपडे या तेथील बाजारात मिळणाऱ्या खास गोष्टी.

प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी, वेगवेगळ्या उत्सवाच्या वेळी आणि नाताळच्या दिवसात गावात विद्युत रोषणाई केली जाते. मुळातच सुंदर असलेले कोलमार रंगीबेरंगी दिव्यांनी झगमगून गेल्यामुळे आणखीनच सुंदर भासते. या गावातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे दर मंगळवारी बाजूच्या गावातील गायक, वादक व इतर कलाकार कोलमारला येतात व तिथल्या मुख्य चौकाच्या परिसरात आपली कला पेश करतात. त्यावेळी गायन- वादनाच्या जोडीने सुंदर पेंटिंग्ज्, भरतकाम, विणकाम तसेच पॉटरीचे विविध नमुने बघावयास मिळतात.

या सगळ्या गोष्टींची मजा लुटण्यासाठी या परीकथेतील गावात निदान दोन दिवस तरी मुक्काम पाहिजे. तेथील छान छान अनुभव घेण्यासाठी आमच्याकडे असलेला वेळ फारच अपुरा पडला अशी मनात रुखरुख वाटत राहिली.

mrinaltul@hotmail.com