रेखा देशपांडे

सॅम्युअल स्टोक्स हे अमेरिकन मिशनरी १९०४ मध्ये भारतात आले आणि १९३२ मध्ये भारतीय ‘सत्यानंद’ झाले. पण तत्पूर्वीच ते भारतीय जीवनाच्या रंगांत रंगू लागले होते. आणि ज्या परिसरात जगले त्या परिसराला त्यांनीही आपला एक खास रंग दिला.. रेड डेलिशियस या जातीच्या सफरचंदांचा लालचुटुक रंग! ज्या रंगानं हिमाचल प्रदेशमधल्या सामान्य, गरीब शेतकऱ्यांसाठी समृद्धीकडे नेणारा आणि अभिमानास्पद असा एक उद्योग उभा करून दिला.

‘एन (An) अफेयर टू रिमेंबर’ या चित्रपटातला एक प्रसंग आहे. नायक-नायिका नायकाच्या मालकीच्या बेटावर जातात. तिथे नायकाची वृद्ध आजी एकटी राहत असते. ती प्रसन्न, समाधानी आजी आणि तिचा परिसर बघून नायिका म्हणते, ‘‘असं वाटतं, अशा ठिकाणी येऊन राहावं.’’ त्यावर आजी तिला म्हणते, ‘‘त्यासाठी तुला आधी तुझ्या स्मृती निर्माण करायला हव्यात.’’ कोटगढ-थानेधारमधल्या सफरचंदांच्या झाडांनी आणि अनेकविध वनस्पतींनी नटलेल्या त्या टेकडीवरच्या छोटय़ाशा घरात बसून, खिडकीतून दूर दिसणारी संध्याकाळच्या उतरत्या प्रकाशातली हिमाच्छादित डोंगररांग बघता बघता ७५ वर्षांच्या आशा शर्मा आणि त्यांचे निवृत्त लष्करी अधिकारी पती विष्णुदत्त शर्मा यांच्याशी चाललेल्या गप्पांदरम्यान एकीकडे मनाशी तो प्रसंग येत होता..

..तशी तर मुंबईच्या बाजारात बाराही महिने सफरचंदं मिळतात. पण जुलैपर्यंत मिळणारी सफरचंदं गेल्या वर्षीच्या हंगामातली साठवणीतली असतात, हे माहीत असतं का आपल्याला? ऑगस्ट- सप्टेंबर- ऑक्टोबर हा ताज्या सफरचंदांचा काळ. प्रत्यक्ष झाडावरून लालचुटुक सफरचंद तोडून त्याचा लचका तोडण्यातलं थ्रिल बाजारातली अगदी उत्तम प्रतीची पताका फडकवणारी चिमुकली लेबलं चिकटवलेली, जाळीदार गुलाबी टोपऱ्यात पहुडलेली सफरचंदंसुद्धा देऊ शकत नाहीत. असं थ्रिल अनुभवायला निमित्त झालं ते आशा शर्मा लिखित ‘एन (An) अमेरिकन इन् गांधीज् इंडिया’ हे पुस्तक. हे शीर्षकदेखील विलक्षण वेगळेपण घेऊन आलं होतं. गांधींच्या भारतात रमलेल्या, त्यांच्या विचारांनी भारलेल्या, त्यांचा सहवास लाभलेल्या, खादीचं व्रत आयुष्यभर अंगीकारलेल्या एका अमेरिकन माणसाचं चरित्र आहे हे. सॅम्युअल स्टोक्स हे अमेरिकन मिशनरी १९०४ मध्ये भारतात आले आणि १९३२ मध्ये भारतीय ‘सत्यानंद’ झाले. पण तत्पूर्वीच ते भारतीय जीवनाच्या रंगांत रंगू लागले होते. आणि ज्या परिसरात जगले त्या परिसराला त्यांनीही आपला एक खास रंग दिला.. ‘रेड डेलिशियस’ या जातीच्या सफरचंदांचा लालचुटुक रंग! ज्या रंगानं हिमाचल प्रदेशमधल्या सामान्य, गरीब शेतकऱ्यासाठी समृद्धीकडे नेणारा आणि अभिमानास्पद असा एक उद्योग उभा करून दिला. हिमाचल प्रदेशची ओळख आहे ती सफरचंदांची बाग म्हणून. ही ओळख त्याला मिळवून दिली ती स्टोक्स यांनी. पण तेवढंच नाही; तर भारतीय समाजकारण, राजकारण, कृषी, शिक्षण, अध्यात्म अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी भाग घेतला, त्यांत आपला हातभार लावला. हे सगळं घडत होतं विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून पुढे अर्धशतकभर. ऐन स्वातंत्र्य चळवळीच्या धामधुमीत.

नवल याचं वाटत राहिलं होतं की, स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासासंबंधी आजवर जे जे म्हणून वाचनात आलंय, त्यात कुठे सत्यानंद स्टोक्स या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख कसा आढळला नाही? तसे अनेक ‘अनसंग हीरो’ इतिहासाच्या पाना-पानांत दडलेले असतातच. त्याची कारणं अनेक असू शकतील. पण पहिल्या फळीतल्या नेत्यांच्या सहवासात स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असताना, हिमाचल प्रदेशचा औद्यागिक चेहरामोहरा बदलण्याचं, किंबहुना त्याला कृषी-औद्योगिक चेहरा देण्याचं ठळक काम स्टोक्स यांच्या खात्यात जमा असतानाही त्यांचा इतिहासात उल्लेख आढळू नये याचं आश्चर्य वाटत राहिलं. या चरित्राच्या लेखिका आशा शर्मा म्हणजे सत्यानंद स्टोक्स यांची नात. मुलीची मुलगी. आशा शर्मा यांनी प्रयत्नपूर्वक अनेक संदर्भ गोळा करून आपल्या या विलक्षण आजोबांचं चरित्र सिद्ध केलं. त्याचं सार्थक त्यांच्या बोलण्यात, मुद्रेवर सतत जाणवत राहतं. आता अमेरिकेत राहणाऱ्या, कोलंबिया युनिव्हर्सटिीच्या स्कूल ऑफ जर्नालिझमच्या पदवीधर असलेल्या आशा शर्मा आणि त्यांचे पती विष्णुदत्त शर्मा भारतात वर्षांकाठी एकदा येतात. हिमाचलमधल्या आपल्या त्या टेकडीवरच्या टुमदार, एकाकी घरात राहतात. त्यांच्या खास आमंत्रणावरून त्यांना भेटायची, चरित्रनायकाची कर्मभूमी अनुभवायची संधी मिळाली. पुस्तकातल्या पानांचा जणू माग काढत थानेधार-कोटगढमध्ये विखुरलेल्या स्टोक्स यांच्या आठवणी नातीच्या मार्गदर्शनात वेचण्याची संधी होती ही.

ख्रिस्ती मिशनरी भारतात येतात आणि धर्मप्रसार करतात, हे आपलं एक सामान्यज्ञान. तद्दन अपुरं. १६ व्या शतकात गोव्यात आलेले ब्रिटिश मिशनरी फादर स्टीफन ओळखले गेले ते धर्मप्रसारापेक्षाही मराठी साहित्याला त्यांनी दिलेल्या योगदानामुळे. फादर स्टीफन म्हटलं की लगेच पुढचे शब्द ओठावर येतात. ते म्हणजे- ‘..तसी भाषामाजी साजिरी। भाषा मराठी।’ सॅम्युअल ऊर्फ सत्यानंद स्टोक्स हे विसाव्या शतकातलं असंच उदाहरण.

जगाच्या अगदी दुसऱ्या टोकाकडून २४ वर्षांचा एक तरुण वडिलांचा मोठा व्यवसाय सोडून, त्यांच्या मर्जीविरुद्ध १९०४ साली भारतातल्या कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी मिशनरी म्हणून येतो. भारतीय अध्यात्माकडे आकर्षति होऊन साधू बराग्यासारखा गुहेतही राहतो. पण समाजाचा विचार त्याला त्या एकाकी संन्यासापेक्षा अधिक महत्त्वाचा वाटू लागतो. तो इथल्या लोकांशी संवाद करण्यासाठी हिंदी शिकतो. त्यांच्यातलाच एक होण्यासाठी त्यांचा पोशाख, त्यांचं अन्न अंगीकारतो. परिसरातली आत्यंतिक गरिबी, शिक्षणाचा अभाव, त्यातून उद्भवणाऱ्या अनेक समस्या हा त्याच्या चिंतनाचा विषय होतो. हिमालयीन वातावरणात डोंगररांगांवर तशी गावठी सफरचंदांची झाडं असतातच. पण इथल्या जमिनीत, हवामानात अमेरिकेतली रेड डेलिशियस जातीची उत्तम प्रतीची सफरचंदं होऊ शकतील असं त्याचं मन सांगू लागतं. आणि तो त्या विचाराचा प्रत्यक्ष पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा अमेरिकेत परततो. तिथे दीड-दोन वर्ष राहून सफरचंदांच्या या जाती मिळवतो. त्यांची लागवड करण्याची शास्त्रीय पद्धत शिकून घेतो आणि रोपं घेऊन पुन्हा प्रदीर्घ प्रवास करत भारतात येतो. स्वत: त्यांची लागवड करतो आणि गावकरी शेतकऱ्यांनाही त्याकरता उद्युक्त करतो. सफरचंदांची बाग लावायची म्हणजे झाडं मोठी होईपर्यंत वाट पाहायची. तितकी वर्ष मग खायचं काय? हा मोठाच प्रश्न स्वत:पुरत्या धान्याचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांपुढे! हा त्यांना आग्रह करतो.. ‘बांधावर झाडं लावा.’ हळूहळू त्याच्या चिकाटीला यश येतं. बागा डुलू लागतात. फळं धरतात. हा या फळांना सिमल्याच्या बाजारात पोहोचवण्यासाठी पुन्हा आटोकाट प्रयत्न करतो. फळांचं पॅकिंग, त्यांची वाहतूक, ग्राहकांना आकर्षण वाटावं व दर्जाची हमी मिळावी असं त्यांचं मार्केटिंग.. अशी उद्योगाची सारी तंत्रं तो राबवतो. लोकांना ती शिकवतो. त्या डोंगराळ भागात रस्ते नसतात. मग ब्रिटिश सरकारच्या मागे लागून लागून सिमल्यापर्यंत ट्रक जाऊ शकेल असे रस्ते बांधून घेतो. आजही खोल दरीच्या कडेवरून जाणाऱ्या हिमालयातल्या रस्त्यांवरून गाडीनं प्रवास करताना त्या काळातल्या या प्रवासदिव्याची कल्पनाच केवळ करता येते. कोटगढला सफरचंदांचा मोठा उद्योग उभा राहतो. स्टोक्स यांचा भारतातला प्रवास इथेच थांबत नाही. त्यांनी पुढे पहाडी मुलीशी लग्न केलं. बारूबागच्या टेकडीवर घर बांधलं. संसार थाटला. या प्रदेशातील शिक्षणाचा अभाव त्यांना खटकत होताच. स्वत:च्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा त्यांनी गावासाठी घराच्या आवारात शाळा सुरू केली. त्यावेळपर्यंत सिमला परिसरात ज्या शाळा होत्या त्यांचं माध्यम असायचं इंग्रजी, नाही तर उर्दू. स्टोक्स यांनी हिंदी माध्यमातून शाळा सुरू केली. गुरुकुल पद्धतीनं मुलं आणि शिक्षक सतत एकमेकांच्या सहवातात राहू लागली. स्वत: स्टोक्स तिथे शिकवायचे. तज्ज्ञ शिक्षकांना त्यांनी शाळेसाठी गावात बोलवून घेतलं. वयाच्या दहाव्या वर्षी निधन पावलेल्या आपल्या ताराचंद या मुलाचं नाव त्यांनी या शाळेला दिलं. त्यांनी सुरू केलेल्या तारा स्कूलची मातीची इमारत, लायब्ररी, प्रेक्षागृह, हार्मनी हॉल या गोष्टी बारुबागच्या टेकडीवरच्या त्यांच्या घराच्या आवारात आजही उभ्या आहेत. आणि त्यांचे व्यवसायाने इंजिनीयर असलेले नातू विजय स्टोक्स हे हार्मनी हॉल या त्यांच्या निवासस्थानाचं तसंच शाळेच्या प्रेक्षागृहाचं नूतनीकरण करत आहेत. टेकडीच्या एका टोकाला सत्यानंदांनी बांधलेलं मंदिरही आहे.

देशातल्या राजकीय घडामोडींपासून स्टोक्स दूर नव्हते. पहिल्या महायुद्धात ते ब्रिटिश भारतीय लष्करात भरती झाले. आफ्रिकेतून गांधींचं आगमन झालं. गांधीजींचा प्रभाव वाढू लागला. ज्या देशाला स्टोक्स यांनी आपलं मानलं होतं, त्यावर परकीयांचं आधिपत्य असावं, भारतातील संपत्ती त्यांनी आपल्या देशात न्यावी आणि या समृद्ध देशाला गरिबी व दुष्काळाच्या खाईत लोटून द्यावं, याविषयी या मूळच्या पाश्चिमात्य आणि आताच्या भारतीयाला मनस्वी राग येत होता. गांधींजींचा प्रभाव त्यांच्यावरही पडत होता. हार्मनी हॉल इथे स्टोक्स कुटुंबीयांच्या परदेशी कपडय़ांची होळी पेटली. अपवाद होता फक्त मुलांच्या अमेरिकन आजीनं त्यांच्यासाठी विणलेल्या बाळवस्त्रांचा. स्टोक्स कुटुंबानं खादीचा स्वीकार केला. स्वत: कातलेल्या सुताचे कपडे ते घालू लागले. तरी ते डोळसपणे गांधींच्या चळवळीकडे पाहत होते. गांधींचं असहयोगाचं तत्त्व त्यांना पटत नव्हतं आणि त्याला त्यांनी स्पष्टपणे विरोधही केला होता. जोपर्यंत आपल्याला एक नवी व्यवस्था उभी करता येत नाही, तोवर अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेला तोडून टाकणं योग्य नव्हे, असा त्यांचा व्यावहारिक विचार होता. पण गांधींविषयीचा त्यांचा प्रेमादर गाढ होता. दोघांचा मोकळा पत्रव्यवहार चालत असे. ते काँग्रेसचे सदस्य बनले. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. ब्रिटिशांच्या विरोधात लिहिलं. देशद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्ष तुरुंगवासही भोगला. पाश्चिमात्य म्हणून त्यांना लाहोरच्या तुरुंगात युरोपियन वॉर्डमध्ये राहण्याचा देण्यात आलेला पर्याय नाकारून इतर स्वातंत्र्यसनिकांबरोबर इंडियन वॉर्डमध्ये राहणंच त्यांनी पसंत केलं. दुर्दैवानं स्टोक्स स्वातंत्र्यप्राप्तीचा दिवस पाहू शकले नाहीत. १४ मे १९४६ रोजीच त्यांचं निधन झालं होतं.

एका सर्वथा वेगळ्या भूमीत, वेगळ्या लोकांत, वेगळ्या संस्कृतीत रुजून त्या भूमीला, लोकांना आपलंही मोलाचं योगदान देणं सत्यानंद स्टोक्स यांना जमलं. त्यात त्यांचे जेवढे प्रयत्न होते, जेवढी असोशी होती, तेवढाच मोठा वाटा होता त्यांच्या आयुष्यातल्या दोन स्त्रियांचा. एक त्यांची आई फ्लॉरेन्स स्पेन्सर स्टोक्स आणि दुसरी होती..

सत्यानंद स्टोक्स यांचे पणतू (सावित्री या मुलीचे नातू!) विनय सरकेक यांच्या थानेदारमधल्या घराबाहेर गेटसमोरच एका झाडाच्या खोडावर छोटीशी पाटी आहे- ‘ग्रँडमा स्टोक्स’! २९ नातवंडांच्या या आजीचं मौन कर्तृत्व सत्यानंद स्टोक्स यांच्या सर्व कामगिऱ्यांच्या नसानसांतून वाहतं. मुंबईला परतल्यावर विनय सरकेक यांना धन्यवाद देणारा मेसेज पाठवला. त्याच्या उत्तरादाखल आलेल्या त्यांच्या मेसेजमध्ये ग्रँडमाच्या केलेल्या उल्लेखात पतवंडाचा हा रास्त अभिमान उतरून आला होता.

आपल्या तरुण मुलानं सुखासीन आयुष्य सोडून हजारो मलांवरच्या एका गुलाम देशातल्या कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी जाण्याचा निर्णय घेतला याचा फ्लॉरेन्स स्पेन्सर स्टोक्स यांना साहजिकच धक्का बसला होता. मुलानं त्यांना परोपरीनं समजावलं, पूर्वसुरी मिशनऱ्यांची उदाहरणं दिली. आईला मुलाची असोशी समजली आणि मग पुढे शेवटपर्यंत मुलाच्या प्रत्येक प्रयत्नात तिनं त्याला साथ दिली. आर्थिक मदत तर करतच होती, परंतु स्टोक्स यांनी कोटगढ-थानेधारमध्ये अमेरिकेतल्या रेड डेलिशियस आणि गोल्डन डेलिशियस जातीच्या सफरचंदांच्या लागवडीचा प्रयोग सुरू केला, गावकऱ्यांना लागवड करायला उद्युक्त केलं, तेव्हा या आईनं अमेरिकेतून शेकडो रोपं भारतातल्या त्या दुर्गम पहाडी प्रदेशात पाठवली. ‘‘गोल्डन डेलिशियसची रोपं ही मी तुला ख्रिसमसची भेट म्हणून पाठवते आहे. तुझ्या कामाला आईचा हा हातभार. बाकीच्या रोपांचे पैसे तू पाठवायचे आहेस..’’ असं त्यांनी मुलाला लिहिलं. साल होतं १९२१. पुढे मुलाचं कार्य प्रत्यक्ष पाहण्यासाठी वयाच्या ८० व्या वर्षी बरोबर एका डॉक्टरला घेऊन या माऊलीनं फिलाडेल्फिया ते कोटगढ हा प्रदीर्घ प्रवास केला.

इथल्या समाजाचं अंग व्हायचं तर इथे नातेसंबंध निर्माण करायला हवेत, या विचारानं सॅम्युअल स्टोक्स यांनी एखाद्या पहाडी मुलीशी लग्न करायचं ठरवलं. स्थानिक भारतीय वंशाच्या ख्रिश्चन कुटुंबातील एग्नेस या मुलीशी त्यांचं लग्न ठरलं. तेव्हा तिथल्या मुलींचं शिक्षण फार फार तर तिसरीपर्यंत व्हायचं आणि नंतर त्यांना घरकाम, शेतीची कामं यात गुंतवलं जायचं. वयानंही एग्नेस ही सॅम्युअल स्टोक्स यांच्यापेक्षा खूप लहान होती. हा प्रेमविवाहही नव्हता. हा विवाह कसा टिकेल याची काळजी फ्लॉरेन्स यांना वाटत होती. परंतु एग्नेस पाहता पाहता संसारात रुळली. इंग्रजी बोलू लागली. ही एग्नेस स्टोक्स म्हणजेच ग्रँडमा स्टोक्स! सत्यानंदांच्या सर्व कार्याची धुरा या विलक्षण स्त्रीनं पडद्यामागे राहून वाहिली. घरकाम, सात मुलांचं संगोपन, घरी राहणारी इतरही मुलं, माणसं.. स्टोक्स यांच्या लोकसंग्रहामुळे घरी माणसांचा सततचा राबता, मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष देणं, सफरचंदांच्या बागांतील कामं आणि त्यांचं मार्केटिंग अशा सर्व प्रकारच्या कामांत त्यांनी केवळ हातभारच लावला नाही, तर स्टोक्स यांच्या वेळोवेळच्या प्रदीर्घ अनुपस्थितीत आणि त्यांच्या निधनानंतर हा सगळा कारभार तिने समर्थपणे सांभाळला. स्वातंत्र्य चळवळीत स्टोक्स यांना सहा वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांना जिवावरचं दुखणं झालं तेव्हा ऑपरेशनसाठी व्हिएन्नाला पुरेशा पशांअभावी एकटंच जावं लागलं. तेव्हा ग्रँडमा न डगमगता हा सारा डोलारा पेलत होती.

आर्य समाजाचा प्रभाव, हिंदू तत्त्वज्ञानाविषयीचं आकर्षण, उपनिषदांचा अभ्यास आणि हिंदू समाजाशी अधिक जवळीक निर्माण व्हावी, या व्यावहारिक विचारानं स्टोक्स यांनी १९३२ साली सहकुटुंब हिंदू धर्मात प्रवेश केला, तेव्हाही एग्नेसनं त्यांना साथ दिली. या घटनेचा परिणाम म्हणजे स्थानिक ख्रिस्ती समाज दुरावला. एग्नेसचं माहेर दुरावलं. माहेरच्या माणसांना आता या हिंदू स्वयंपाकघरात प्रवेश नाकारला गेला. ‘या परिस्थितीचा एग्नेसला त्रास झाला असेल, हा विचार आपल्याला नंतर सुचला..’ असं स्टोक्स यांनी लिहून ठेवलंय. म्हणजेच निर्णय घेताना त्यांनी पत्नीचा विचार घेतलेला नव्हता. या घटनेमुळे ज्या सामाजिक, भावनिक वेदना एग्नेस यांना सहन कराव्या लागल्या असतील त्यांची वाच्यताही त्यांच्याकडून झालेली दिसत नाही. ही ताकद या साध्या ग्रामबालेत कुठून आली असेल?

१९४६ साली सत्यानंद स्टोक्स यांचं निधन झालं. त्यानंतर ग्रँडमा स्टोक्स ३७ वर्ष जगल्या, त्या पतीनं घेतलेला वसा पुढे चालवतच.

पुस्तकाच्या लेखिका आशा शर्मा यांच्याशी थानेधार-कोटगढ मुक्कामी सकाळ-संध्याकाळ ज्या गप्पा होत त्यात त्यांच्या या आजीविषयीचं कौतुक सतत व्यक्त होत होतं. त्याचवेळी काही प्रश्नही सतावत होते.

गावात शाळा सुरू करणाऱ्या, समाजात सुधारणा करायला आलेल्या प्रगत पाश्चिमात्य देशातल्या या मिशनऱ्यानं आपल्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ का केली? सुरुवातीला उच्च शिक्षणासाठी शांतिनिकेतनमध्ये मुलांना पाठवायचा विचार करणाऱ्या स्टोक्सनी पुढे तो विचार बदलला, तो पहाडी प्रदेशाबाहेर मदानी प्रदेश मुलांना सोसवणार नाही असा समज करून घेऊन. आणि स्वत: हा पिता दूरवरच्या अमेरिकेतून या दुर्गम भागात येण्याचं धाडस करणारा होता! मुलींचं शिक्षण तर त्यांनी स्थानिक परंपरेनुसार थांबवलंच आणि त्यांनी व्यावसायिक संबंध लक्षात घेऊन त्यांची लग्नं ठरवली. मुलांची आणि मुलींची लग्नं ठरवताना त्यांचं मन त्यांनी  विचारात घेतलं नाही. व्यावसायिक संबंध लक्षात घेऊन पहाडी प्रदेशातच सोयरिकी जुळवण्याचा आपला मानस पुरा केला. चंपावती (आशा शर्मा यांची आई) या मुलीनं आपल्याला पहाडी मुलाशी लग्न करायचं नाही, असं आईकरवी पित्याला कळवण्याचं धाडस केलं तेव्हा काहीशा नाराजीनंच त्यांनी ते मान्य केलं. तर वडिलांनी ठरवलेली सोयरीक नाकारून लालचंद या धाकटय़ा मुलानं स्वत:च्या मर्जीनं विवाह ठरवला, तेव्हा कुटुंबात मोठं वादळच आलं. एकत्र राहणारं कुटुंब विखुरलं गेलं. स्वत: उभं केलेलं हार्मनी हॉलचं आलिशान घर दोन मुलांच्या हवाली करून सत्यानंद पत्नीसह आवारातल्याच आपल्या जुन्या मातीच्या घरात राहू लागले. आपल्या इस्टेटीची वाटणी करतानाही त्यांनी मुलामुलींत भेदभाव केला. समाजाला प्रगतीकडे नेऊ पाहणाऱ्या सुधारकानं स्थानिक प्रथांचंच काटेकोर पालन करत समाजाच्या प्रवाहाबरोबरच पोहायचं पसंत का केलं, हा प्रश्नच होता.

आशाजींनी त्याचं उत्तर एवढंच दिलं की, ‘कोणताच माणूस परिपूर्ण नसतो.’ पहाडी प्रदेशातच आपल्या मुला-नातवंडांनी बहरावं असा आग्रह धरणाऱ्या स्टोक्स यांच्या मुलांची मुलं-नातवंडं आज त्यांच्या मूळ देशात- अमेरिकेत- स्थिरावली आहेत. मुलींच्या मुला-नातवंडांपैकी काहीजणांनी भारतात राहणं पसंत केलंय. हा काव्यात्म न्याय म्हणायचा की काय?

आशाजींना हे प्रश्न पडलेच नाहीत असं नाही. पण त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चिकित्सा न करता जे जे शोधता आलं, ते ते सारं समोर ठेवलं आहे. ना कुठे टीकेचा सूर लावलाय, ना कुणाची बाजू घेतली आहे. वाचकानं हवं तर चिकित्सा करावी. ग्रँडमांचा मौन कर्तबगार वावर तर लक्षणीय आहे. ‘‘ईश्वरानं आयुष्य नव्यानं जगायची संधी दिली तर?’’ या प्रश्नावर सत्यानंद स्टोक्स यांनी दिलेलं उत्तर त्यांनी उद्धृत केलंय- ‘‘तर माझ्या रागीटपणावर नियंत्रण राखता यावं अशी मागणी मी करेन..’’ हे ते उत्तर. यात त्यांचं आत्मभान येतं असं म्हणता येईल.

deshrekha@yahoo.com