संजय बापट

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
Skoda Superb returns to India
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, ९ एअरबॅगसह वर्षभरात पुन्हा एकदा ‘ही’ कार नव्या अवतारात दाखल, किंमत…
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ

श्रीलंकेत मध्यंतरी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमुळे परदेशी पर्यटकांवर परिणाम झाला होता. निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असलेले हे पाचूचे बेट आजही रमणीय आहे. ‘ती’ दुर्दैवी घटना मनाआड करून आता पुन्हा नव्याने पर्यटकांचा ओघ लंकेत सुरू झाला आहे.

‘रम्य ही स्वर्गाहून लंका,

हिच्या कीर्तीच्या सागरलहरी नादविती डंका

सुवर्णकमलापरी ही नगरी

फुलून दरवळे निळ्या सागरी,

त्या कमलावर चंद्र निजकरे करितो अभिषेका!’

कविवर्य ग. दि. माडगूळकर अर्थात गदिमांचे हे अवीट गाणे पुराणकाळातील रावणाच्या लंकेची भव्यता दर्शविणारे. रावणाला आपल्या राजधानीचा किती अभिमान होता याचे यथार्थ वर्णन करणाऱ्या या गीताच्या ओळी गुणगुणताना आपोआपच डोळ्यांसमोर उभी राहते ती सर्वार्थाने रम्य अशी श्रीलंका! अथांग समुद्रात पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे दिसणारा, अलौकिक निसर्गसौंदर्य लाभलेला, ज्याला जे हवे त्याचा आनंद देणारा आणि केवळ भौगोलिकच नव्हे, तर आचार-विचारानेही आपल्या भारताशी साम्य असलेला आपला सख्खा शेजारी म्हणजे श्रीलंका! कधी पुराणातील रामायणामुळे, कधी भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (एलटीटीई)मुळे आठवणारा हा देश अलीकडच्या काळात मात्र तेथील जेम्स-ज्वेलरी आणि स्वर्गीय सुखाचा अनुभव देणाऱ्या निसर्गसौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांचे ‘नवे डेस्टिनेशन’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मुंबईपासून राजधानी दिल्लीपेक्षाही जवळ असलेला हा देश खूप छोटासा असला तरी तेथे जाणाऱ्या अभ्यासकांना, पर्यटकांना मात्र मनमुराद आनंद देणारा आहे.

नऊ प्रांतांत आणि २२ जिल्ह्य़ांत विस्तारलेल्या श्रीलंकेची लोकसंख्या जेमतेम सव्वादोन कोटींच्या आसपास आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ७५ टक्के  जनता ही सिंहली, तर २५ टक्के लोक तमीळ आहेत. त्यातही ६८ टक्के श्रीलंकन हे बौद्धधर्मीय, तर १२ टक्के हिंदू, सात टक्के ख्रिश्चन व मुस्लीमधर्मीय आहेत. कोलंबो, जाफना, कँडीसारख्या दोन-तीन महानगरांचा अपवाद वगळता राजधानी ‘श्री जयवर्धनेपुरा कोट्टी’सह बहुतांश शहरे छोटी छोटीच आहेत. देशाच्या राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडींचे केंद्र असलेल्या कोलंबोसह गॉल, जाफना, त्रिकोमली, बट्टीकल्लोआसारखी निळ्याशार समुद्राच्या काठावर वसलेली शहरे, आपल्या दक्षिणेतल्या उटी, कोडाईकॅनलसारख्या सुंदर डोंगरदऱ्यांमध्ये विसावलेल्या रम्य ठिकाणांची अनुभूती देणारे नुवारा एलिया किंवा कँडीसारखे देखणे प्राचीन शहर, समुद्राच्या काठावरून धावणारी ब्रिटिशकालीन रेल्वे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नजर जाईल तिकडे दिसणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा आणि चहा- कॉफीचे मळे अशी एकूणच पर्यटनाची पर्वणी असलेली अशी ही श्रीलंका!

साधारणत: १९८७-८८ ते २००९ दरम्यान एलटीटीईसोबतच्या रक्तरंजित संघर्षांत पुरता पोळून निघालेला हा देश गेल्या दहा वर्षांत हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा साखळी बॉम्बस्फोटांनी हादरला. हॉटेलपासून सरकारी कार्यालयांपर्यंत आणि सामान्य नागरिकांपासून थेट पंतप्रधानांपर्यंत अनेकांना हल्ल्याचे ‘लक्ष्य’ बनविणाऱ्या दहशतवाद्यांनी यावेळी प्रथमच तेथील चर्चमध्ये घडवलेल्या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो निष्पापांचे बळी घेतले. साहजिकच या हल्ल्यांमुळे श्रीलंकेत जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. प्रत्यक्षात मात्र ‘अगा काही घडलेचि नाही’ असा अनुभव श्रीलंकेत भटकंती करताना येतो. अवघ्या चार महिन्यांत देशातील परिस्थिती पूर्वपदावर आणतानाच पर्यटकांसाठी टाकलेल्या रेड कार्पेटवरून फिरताना दहशत किंवा भीतीचा  कुठेही लवलेश जाणवत नाही.

लौकिकार्थाने कोलंबो ही श्रीलंकेची आर्थिक राजधानी असून विमानतळापासून कोलंबो शहरापर्यंतचा एक तासाचा प्रवास करताना प्रशस्त रस्ता, वाहनांची शिस्त आणि दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या सुंदर इमारती पाहताना कोलंबो हे पाश्चिमात्य शहरांच्या पंक्तीत बसणारे शहर असल्याचे प्रत्यंतर येते. या देशात कुठेही फिरताना- अगदी मोठय़ा शहरांपासून खेडय़ांपर्यंत- सर्वत्र उत्कृष्ट रस्त्यांचे जाळे विणलेले दिसते. शहरात फेरफटका मारताना फूटपाथवर कुठेही अतिक्रमण आढळत नाही. पादचाऱ्याला प्रथम रस्ता ओलांडू देण्यासाठी जागच्या जागी वाहने थांबविण्याच्या श्रीलंकन नागरिकांच्या शिस्तीला तोड नाही. श्रीलंकन नागरिकांचा आणखी एक सद्गुण म्हणजे भारतीयांबद्दल त्यांना असलेली आत्मीयता. या देशात कुठेही फिरताना आपण ‘इंडियन’ असल्याचे कळल्यावर समोरून प्रेमाने प्रतिसाद मिळतो, आपल्याला हवी ती माहिती लगोलग दिली जाते. देशाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घडामोडींचे केंद्र असलेल्या कोलंबोत उभारण्यात आलेले वर्ल्ड ट्रेड सेंटर्स, विस्तीर्ण समुद्रकिनारे, आलिशान शॉपिंग सेंटर्स, मोठमोठे तलाव, बौद्ध मठ, टाऊन हॉल हे सारे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. शहरातील नव्या-जुन्या आलिशान इमारती पाहत संसदभवन परिसरात फिरताना आपण एका आधुनिक शहरात फिरतो आहोत याची जाणीव होते.

भारतीयांशी नाळ जुळलेले कोलंबोतील आणखी एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणजे ‘रेडिओ सिलोन’! या केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या आणि भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘बिनाका गीतमाला’ या अमीन सयानींच्या संगीतमय कार्यक्रमाच्या अनेक आठवणी येथे पाहता येतात. तब्बल १८ स्टुडिओ असलेल्या आणि हिंदी, मराठी, गुजराती, तमीळ अशा भारतीय भाषांतील तीन लाख गाण्यांचा संग्रह असणाऱ्या या आकाशवाणी केंद्रात १९५१ मध्ये सुरू झालेली, हिंदी भाषेत कार्यक्रम प्रक्षेपित करणारी ‘एशिया सव्‍‌र्हिस’ आजही सुरू आहे.

श्रीलंकेत रस्त्यांचे जाळे चांगले असून महामार्गावरील शिस्त वाखाणण्याजोगी आहे. या महामार्गावर कोठेही मधे थांबता येत नाही. वेगमर्यादेतच वाहन चालवणे बंधनकारक असून त्याचे उल्लंघन केल्यास २५ हजार रुपये दंड ठोठावून एक वर्षांसाठी वाहन परवाना निलंबित केला जातो. विशेष म्हणजे महामार्गावर कोठेही टोलनाका नसून महामार्गावर येताना किंवा महामार्गावरून बाहेर पडल्यानंतरच टोलनाके आहेत. लंकेत रेल्वेचे जाळे मात्र फारसे विस्तारलेले नाही. मात्र, ‘कोलंबो ते बद्दुल्ला’ हा तीनशे किलोमीटरचा लंकेतील सर्वात अवघड रेल्वेप्रवास समजला जातो. ब्रिटिशांनी चहा, कॉफी तसेच मसाल्याच्या वाहतुकीसाठी या ट्रेनची उभारणी केल्याचे सांगितले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे कोलंबोत समुद्राच्या काठावरून रेल्वे धावते. तेथील बहुतांश स्थानके समुद्राच्या काठावर असून भरतीच्या वेळी लाटा रेल्वे ट्रॅकवर येतात. नुवारा इलिया या थंड हवेच्या ठिकाणी जाताना एल्ले ते नानूओयादरम्यानचा बोगदा, मोठे डोंगर, जीवघेण्या दरीतून जाणारा जुना रेल्वे मार्ग हे सारे कोकण रेल्वेप्रवासाची अनुभूती देतात. मात्र, हा मार्ग ब्रिटिशकालीन असून त्यावर चार डब्यांच्या जुन्या गाडय़ाच चालवल्या जातात. एल्ले येथील धबधबा पाहण्यासारखा आहे.

कोलंबोपासून काही अंतरावर असलेल्या ‘बेंतोटा’ येथील लुनुगंगा हे निसर्ग उद्यान म्हणजे तर जगभरातील वास्तुविशारदांची पंढरीच! जागतिक कीर्तीचे वास्तुविशारद जेफ्री बावा यांचे हे निवासस्थान. बावा यांनी लुनू गागल नदीच्या काठावर सुमारे पंधरा एकर जागेत कोणतीही तोडफोड न करता उभारलेले हे उद्यान जगभरातील वास्तुविशारदांसाठी अभ्यासाचे केंद्र बनले आहे. बावा यांनी लंकेचे संसदभवन तसेच वीसेक हॉटेल्सची वास्तुरचना केली असून ही सर्व ठिकाणे या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी महत्त्वाची स्थळे मानली जातात. या उद्यानात विविध प्रकारच्या चौदा घंटा असून प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे. पूर्वीच्या काळी या बेलच्या आवाजावरच नाष्टा, जेवण, दुपारचा चहा यांचे निमंत्रण दिले जात असे.

श्रीलंकेत सर्वात उंचीवर- समुद्रसपाटीपासून १८९३ मीटर उंचीवर असलेले ‘नुवारा इलिया’ हे थंड हवेचे ठिकाण आणि त्याखालोखाल असलेले कँडी या दोन्ही ठिकाणचा गारठा रक्त गोठवणारा असतो. नुवारा इलिया म्हणजे रामायणातील अशोकवन. रामायणातील उल्लेखानुसार रावणाने सीतेला ज्या ठिकाणी ठेवले होते त्या लंकापूर जागेवर सीतेचे जुने व नवे मंदिर आहे. बरोबरीने राम-लक्ष्मण-सीतेचेही मंदिर आहे. नदीपलीकडे मोठय़ा खडकावर हनुमान पावले म्हणून मोठे खळगे आहे. या भागातील जमीन काळी असून हनुमानाने लंकादहन केल्यामुळे येथील जमीन काळी पडल्याची येथील लोकांची धारणा आहे. येथून काही अंतरावर रामबोर्ड येथे हनुमानाचे भव्य मंदिर असून सीतेच्या शोधात निघालेला हनुमान प्रथम येथे आला, अशी या मंदिरामागील धारणा सांगितली जाते. याच भागात रामालय ट्रेलचा अनुभव घेता येतो. लंकेत चिलाऊ, मुन्न्ोश्वरम्, मनावेर मंदिर, कोनेश्वरम् मंदिर, त्रिंकोमालीया अशा ५२ ठिकाणी रामायणातील घटनांची साक्ष देणारी स्थळे आहेत. नुवारा इलियामध्ये अतिशय मोठे तळे असून, तेथे अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आहेत. एकूणच हा परिसर अतिशय सुंदर असून नागमोडी वळणाचे रस्ते आणि चहाचे मळे न्याहाळताना पर्यटनाचा मनमुराद आनंद मिळतो.

लंकेत कुठेही नजर टाकली तरी तेथे हत्तीच्या प्रतिकृती दिसतात. एवढेच नव्हे तर उडावाल्लव राष्ट्रीय अभयारण्यात तर पाहाल तिकडे हत्ती आणि मोराचे कळप दिसतात. सुमारे ७६ एकर एवढय़ा विस्तीर्ण जागेत हे अभयारण्य असून, तेथे जखमी हत्तींचे पुनर्वसन केंद्र आहे. या ठिकाणी अगदी चार महिन्यांपासून ते म्हाताऱ्या हत्तीपर्यंत सर्वावर उपचार करून नंतर त्यांना पुन्हा जंगलात सोडून दिले जाते. या अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद घेत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फिरणारे हत्ती अगदी गाडीच्या बाजूला येऊन उभे राहतात. या ठिकाणी एक मोठे सरोवर असून तेथे केवळ हत्तीच नव्हे, तर अन्य प्राणी आणि पक्षीही पाणवठय़ावर पाहायला मिळतात.

कॅँडी ही श्रीलंकेची पहिली राजधानी. जगभरातील बौद्धधर्मीयांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे आणि तब्बल ७४० एकरमध्ये विस्तारलेले ‘टूथ टेंपल’ याच शहरात आहे. याच ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा दात ठेवण्यात आला आहे. हे मंदिर अतिशय देखणे असून येथील शेवटचा राजा विक्रम राजसिंह याच्या राजमहालामध्येच हे मंदिर आणि संग्रहालय आहे. येथे एक भव्य तलाव असून मंदिर परिसरातील टाऊन हॉलही लक्षवेधी आहे. टूथ टेंपलप्रमाणेच कँडी हे जेम्स आणि ज्वेलरीसाठीही प्रसिद्ध ठिकाण आहे. श्रीलंकेत जेम्सच्या खाणी असून जगभरातील अनेक  मोठे व्यापारी येथूनच वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे हिऱ्यांचे खडे खरेदी करतात. त्याचप्रमाणे लाकडी खेळण्यांसाठीही हे शहर प्रसिद्ध आहे. याशिवाय कँडीलेक, बोंगावर जेल, विष्णू मंदिर आदी ठिकाणे पाहण्याजोगी आहेत.

गले किंवा गॉल हे लंकेच्या अगदी दक्षिणेचे टोक. पंधराव्या शतकात ते आयात-निर्यातीचे मोठे केंद्र होते. चायनीज, पोर्तुगीज, अरब येथे मसाल्याच्या पदार्थासाठी येत. डच राज्यकर्त्यांनी १७ व्या शतकात आशिया खंडातला सर्वात मोठा किल्ला येथे बांधला होता. या किल्ल्यावर सन, मून, स्टार असे तीन टेहळणी बुरूज होते. आता येथे फक्त १८३८ मध्ये बांधण्यात आलेले एक लाइट हाऊस आहे. गलेकडे जातानाचा संपूर्ण मार्ग समुद्रकिनाऱ्यावरून जातो. येथील किनारे बऱ्याच ठिकाणी उथळ असल्याने तिथे सर्वत्र वॉटर स्पोर्ट्स आहेत. पण कुठेही गडबड-गोंधळ आढळत नाही. विशेष म्हणजे लंकेत कुठेही कचरा, प्लास्टिक दिसत नाही. सर्वत्र सुंदर स्वच्छता आढळून येते.

sanjay.bapat@expressindia.com