डॉ. बाबा आढाव

बुद्धिप्रामाण्यवादी कलाकार असलेल्या डॉ. श्रीराम लागूंची सामाजिक चळवळींशी घट्ट बांधिलकी होती. परिवर्तनवादी चळवळींतील त्यांच्या भरीव योगदानाविषयी..

नट म्हणून डॉ. श्रीराम लागू श्रेष्ठ होते. मनाला पटल्यानंतर कलाकार म्हणून त्यांनी कोणत्याही भूमिकेला नकार दिला नाही. कोणत्याही व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देणे ही त्यांच्या अभिजात अभिनयाची ताकद होती. बुद्धिवादी विचारांचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू आणि परिवर्तनवादी चळवळी यांचा जैव संबंध होता. कोणत्याही विषयावर भूमिका घेण्यासाठी ते कधी कचरले नाहीत आणि एकदा भूमिका घेतली की शेवटपर्यंत ती निभावण्यामध्ये ते कोणतीही कसूर ठेवत नसत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सामाजिक कृतज्ञता निधी अशा उपक्रमांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहून परिवर्तनवादी चळवळ पुढे जाण्यासाठी डॉ. लागू यांनी दिलेले योगदान कधीही विस्मरणात जाऊ शकणार नाही.

परिवर्तवादी चळवळीमध्ये झोकून देत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रपंच चालविण्याची जबाबदारी समाजाने घेतली पाहिजे, या भूमिकेतून अनेक समविचारी मित्रांनी एकत्र येत सामाजिक कृतज्ञता निधी या नावीन्यपूर्ण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. डॉ. लागू या संस्थेचे विश्वस्त आणि काही वर्षे अध्यक्षही होते. निधी सुरू करण्यासाठी काही रक्कम हाताशी असणे आवश्यक होते. हा पैसा संकलित करण्यासाठी डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी यांसारख्या कलाकारांनी एकत्र येत सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामामध्ये सक्रिय योगदान दिले होते. या कलाकारांची मोट बांधून डॉ. लागू यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे राज्यभरात पन्नास प्रयोग केले. नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर डॉ. लागू आणि निळूभाऊ नाटय़गृहाच्या प्रवेशद्वारापाशी झोळी घेऊन उभे राहत आणि सामाजिक कृतज्ञता निधीला मदत करावी, असे आवाहन प्रेक्षकांना करत असत. यातून हजारो रुपये जमा झाले. ‘लग्नाची बेडी’ नाटकाच्या प्रयोगांमधून १९८९ मध्ये २५ लाख रुपये संकलित झाले आणि निधीच्या कामाला सुरुवात झाली. एखाद्या कामासाठी परदेशातून मदत मिळू शकते. मग, देशामध्ये परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी अशी एखादी संस्था का असू नये, या विचारांतून सुरू झालेल्या ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ या संकल्पनेला आपल्या कृतिशील सहभागातून डॉ. लागू यांच्यासारख्या कलाकाराने योगदान दिले.

डॉ. लागू यांच्या सामाजिक कार्याचे आणखी एक मोठेपण म्हणजे त्यांनी केलेला सत्याग्रह. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमांमध्ये ते नियमितपणे सहभागी होत असत. शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नव्हता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सत्याग्रह करण्याचे ठरविले. सत्याग्रह करताना अटक झाली तर करून घ्यायची असा निर्धार केला गेला. त्यामध्ये डॉ. लागू यांनी पुढाकार घेतला होता. समितीचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील, डॉ. नरेंद्र दाभोलकर, निळू फुले आणि मी; आम्ही सारे जण नगर येथे जमलो. तेथून सत्याग्रहींची तुकडी निघाली. तेव्हा शनी शिंगणापूर येथे पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी नगरमध्येच अटक केली. रात्रभर आम्हाला तिथल्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी आम्हाला न्यायालयात हजर केले जाणार होते. डॉ. लागू तयारीनिशी आले होते. न्यायालयात ते बसून होते. गुन्हा कबूल केल्यामुळे न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत शिक्षा देऊन आम्हाला सोडून देण्यात आले होते. डॉ. लागू यांनी सत्याग्रह करणे ही आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती. सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक जण केवळ सहानुभूती दाखवतात. मायेचा हात फिरवतात. परंतु, प्रत्यक्ष कृतीमध्ये सहभागी होणं आणि शांततामयी सत्याग्रहात भाग घेणं हे तितकं सोपं नाही. त्यामुळे डॉ. लागू यांच्या कार्याची आठवण होते. शबरीमला प्रकरणाचे अजून काही झाले नाही. डॉ. लागू यांच्यासारखी समाजधुरीण कलाकार मंडळी सहभाग घेतील, तेव्हा असे प्रश्न सुटायला मदत होईल. आणीबाणी विरोधात ही कलावंत मंडळी उभी राहिली होती. यांच्यासारखी माणसं जेव्हा कामाला पाठिंबा देतात, तेव्हा बदल होणारच असा विश्वास वाटतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू  यांच्यासारखी माणसे आपल्यातून निघून जाण्यामुळे पोकळी ही जाणवत राहणार. राजकीय पदांपेक्षा सामाजिक बदलांसाठी काम करणं अधिक महत्त्वाचं आहे हे जाणून घेत काम करणाऱ्यांमध्ये डॉ. लागू यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

डॉ. श्रीराम लागू यांचे वडील बा. चिं. लागू हे पुण्यातील काँग्रेसचे पुढारी होते. ते सेवादलामध्ये नियमित येत. त्यामुळे या घराण्याशी माझा परिचय होता. लक्ष्मी रस्त्यालगत चपलाबाई खाडिलकर यांच्या दवाखान्याजवळ असलेल्या लागू यांच्या घरी मी नेहमी जात असे. बा. चिं. लागू विश्वस्त असलेल्या आयुर्वेद महाविद्यालयामध्ये माझे शिक्षण झाले. शिक्षण झाल्यानंतर मी लगेच वैद्यकीय व्यवसाय केला. दवाखाना आणि महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयाचा विस्तार अशा कामांमध्ये मी व्यग्र होतो. तर, डॉ. लागू यांनी ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ (पीडीए) या संस्थेची स्थापना केली. ते नाटकामध्ये रमले. त्यामुळे आमचे मार्ग वेगळे झाले.

विषमता निर्मूलन शिबिराच्या माध्यमातून माझा डॉ. लागू यांच्याशी परिचय झाला. जनमानसात मान्यता आणि काही अंशी प्रतिष्ठा लाभलेल्या विषमतेची मूलभूत पातळीवर चिकित्सा केली जात असे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, इंडियन सेक्युलर सोसायटीचे ए. बी. शहा, इंडियन लॉ सोसायटीचे डॉ. सत्यरंजन साठे यांच्यासह बुद्धिप्रामाण्यवादी मंचाचे कार्यकर्ते या शिबिरांना येत असत. कोणत्याही प्रश्नाचा सर्व अंगांनी सदसद्विवेकवादी दृष्टिकोनातून विचार करण्याची चिकित्सक वृत्ती लागू यांनी जोपासली होती. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांविषयीच्या त्यांच्या संकल्पना तर्कशुद्धतेच्या आधारे सुस्पष्ट होत्या. रंगभूमीवर त्यांच्या नावाला वलय होते. त्यामुळे अशी व्यक्ती परिवर्तनवादी चळवळीशी जोडली जाणे, हे या चळवळीचे भाग्य म्हणावे लागेल. त्यांच्या स्वभावामध्ये उमदेपणा होता.

वैचारिक बांधिलकीतून डॉ. लागू यांनी ‘देवाला रिटायर करा’अशी भूमिका घेतली. या विधानावरून त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. पण बुद्धिप्रामाण्यवादी असलेले लागू आपल्या भूमिकेशी ते ठाम राहिले. शोषण हे केवळ आर्थिक स्वरूपाचे होत नाही तर सांस्कृतिक पातळीवरही होत असते. त्यामुळे डॉ. लागू यांनी सत्यशोधक झाले पाहिजे यासाठी मी आग्रही राहिलो. सामाजिक कृतज्ञता निधीच्या विश्वस्त प्रा. पुष्पा भावे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे त्यांची भावे यांच्याशी नाटक, चित्रपट आणि साहित्य या विषयांवर सातत्याने चर्चा होत असे. आणीबाणीच्या विरोधात लागू आणि निळू फुले यांनी भूमिका घेतली होती. हे दोघे ज्या नाटकात आणि चित्रपटांत एकत्र भूमिका करायचे त्याचे निमंत्रण मला असायचे. मी नाटकवेडा नाही. मला चित्रपट पाहण्यामध्ये फारसा रस नाही. पण, या दोन मित्रांसाठी ते नाटक आणि चित्रपट मी आवर्जून पाहायला जात असे. ‘नटसम्राट’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला मी गेलो होतो. ‘पिंजरा’, ‘सामना’ आणि ‘सिंहासन’ चित्रपट मी पाहिले आहेत. डॉ. लागू आणि निळू फुले यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे आमच्यासाठी आनंदाचे आणि अभिमानाचे असायचे. मुलगा तन्वीर याच्या आकस्मिक मृत्यूनंतर व्यथित झालेले डॉ. लागू मी पाहिले होते. महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठानच्या कामामध्ये ते सदैव सहभागी होत असत.

डॉ. लागू यांनी पुढाकार घेऊन योगदान दिलेल्या सामाजिक कृतज्ञता निधीचे काम उत्तम सुरू आहे. २५ लाख रुपयांपासून सुरू झालेला निधी आता दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ९० कार्यकर्त्यांना गेल्या तीन दशकांमध्ये दरमहा मानधन देण्यात आले आहे. एका कार्यकर्त्यांला दहा वर्षे मानधन दिले जाते. दहा वर्षांनंतर संबंधित कार्यकर्त्यांच्या जागी दुसऱ्या कार्यकर्त्यांची निवड करून त्याला मानधन दिले जाते. सध्या ३८ कार्यकर्त्यांना दरमहा दोन हजार रुपयांचे मानधन दिले जात आहे. सध्याच्या महागाईच्या कालखंडात दोन हजार रुपये फार नाहीत. पण, ही रक्कम त्या कार्यकर्त्यांला आधार देणारी ठरते. ही योजना यशस्वी होण्यामध्ये ज्यांनी मूलभूत स्वरूपाचे काम केले, त्यामध्ये नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. राज्यघटनेतील मूल्ये लागू यांनी प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरणात आणली.

शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी