जय जय श्री-नवहिंदध्वज-देवा जय हो
शांतीची; सौख्याची जगीं तू प्रतिमा हो..
वरचा केशरी रंग द्योतक त्यागाचा
धवलोज्वल रंग मध्ये द्योतक धैर्याचा
खाली हिरवा शोभे द्योतक प्रगतीचा
..चक्र निळे संस्कृतीचे दिव्यप्रेरक हो..
नेत्रीं रूप तुझे, तव नाम धरूनी ओठीं.
कित्येकांनी दिधले प्राण तुझ्यासाठी
मान तुझा उंचावे जगताच्या हाटी
..राष्ट्रध्वज-संघी तू सुयशे नेता हो..
शांतीची, सौख्याची वृद्धी कर आता
मानवतेचे लाभो यश-वैभव हातां
विश्वाच्या शांतीचा हो तूच प्रणेता
..राम दिसावा राष्ट्री त्यां तू साधन हो
जय जय श्री-नवहिंदध्वज-देवा जय हो..
या भावपूर्ण आणि अर्थपूर्ण ध्वजगीताचं माझ्या घडणीतलं श्रेय फार मूलभूत आहे. कारण, माझ्या अस्तित्वातील कवी-गीतकार आणि संगीतकार या सर्व भूमिकांची बीजं फार लहानपणातच पेरली गेली, ती याच प्रत्ययकारी शब्द-स्वरातून.. एकूणातच मोघे कुटुंबीय आणि निकटवर्तीय यांच्या भावविश्वांत या काव्याला एक विशेष जिव्हाळ्याचं स्थान आहे.. कारण या ध्वजगीताचे कवी आहेत, आमचे प्रिय वडील, राम गणेश मोघे. भारतीय स्वातंत्र्याचं आणि या गीताचं वय एकच आहे.. कारण या दोघांचाही जन्मदिन एकच आहे.. १५ ऑगस्ट १९४७..  त्या ऐतिहासिक सुवर्णदिनाचा उल्लेख पं. नेहरूंनी आपल्या भाषणात ‘नियतीशी करार’ असा केला होता. त्या दिवसासाठी म्हणूनच आपल्या तिरंगी राष्ट्रध्वजाची ही आरती माझ्या वडीलांनी लिहिली.. आणि त्यामुळेच बहुधा, गीताच्या मुखडय़ात नुसतं ‘हिंदध्वजदेवा’ असं न म्हणता, ‘नवहिंदध्वजदेवा’ असं संबोधन त्यांनी विचारपूर्वक योजलं आहे. हा शब्द – साक्षेप हा त्यांच्या कवित्वाचा एक प्रधान विशेष होता. आमच्या गावच्या शाळेतील गायन-शिक्षक माणगावकरानी त्या काव्याला प्रभावी समर्पक चाल दिली.. १९४७ साली कुमार वयात असलेल्या शालेय विद्यार्थिनींनी ही आरती प्रथम सादर केली.. आणि विशेष म्हणजे .. १९४७ पासून २०१३ पर्यंत आजतागायत उणीपुरी ६५ वर्षे किलरेस्करवाडीत दर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन सोहळ्यात हे गीत आवर्जून गायलं जातं. अभिजात कलाकृती या स्वत:च एक इतिहास बनतात, याचं हे एक जितंजागतं आणि दुर्लभ प्रत्यंतर आहे. या इतक्या प्रदीर्घ काळातील सर्व पिढय़ांच्या गळ्यावर आणि पर्यायानं त्यांच्या मनांवर या गीताच्या शब्द-स्वरांचा किती खोल प्रभाव उमटलेला आहे. याचं एक प्रत्यंतर मी अगदी नुकतंच घेतलं..
अगदी अलीकडे म्हणजे, २०१० साली किलरेस्कर उद्योग – समूह आणि किलरेस्करवाडी या दोन्हींच्या शतकपूर्वीचा सोहळा खूप आनंदाने आणि थाटामाटात साजरा झाला. या एका शतकाच्या दिमाखदार वाटचालीवर एक महत्त्वाकांक्षी अनुबोधपट निर्माण करण्याची भाग्यवान संधी संहिता – दिग्दर्शक म्हणून मला मिळाली. ‘आधी बीज एकले’ या शीर्षकाच्या संपूर्ण लांबीच्या त्या चित्रपटाचा आस्वाद त्यादिवशी किलरेस्करवाडीच्या सोहळ्यात ५,००० आबालवृद्ध प्रेक्षकांनी समरसून घेतला. चित्रपटाच्या शिखर-बिंदूचा तो सगळा सिक्वेन्स मी समूहस्वरांत गायल्या गेलेल्या या ध्वज-गीताच्या पाश्र्वभूमीवर बांधला आहे. ते शब्द आणि स्वर वातावरणात घुमू लागल्यावर त्या शब्द-स्वरांचा थेट साक्षीदार असलेला आणि या प्रदीर्घ काळातील सर्व पिढय़ांचं प्रतिनिधित्व करणारा तो जनमसूह उच्च स्वरात ही ध्वजाची आरती गाऊ लागला.. ती काहीशी अनपेक्षित प्रचीती अनुभवताना माझी जी काही ‘अवस्था’ झाली ती शब्दांत सांगणे अशक्य आहे. रोजच्या दैनंदिन रुक्ष व्यवहारात पावला-पावलावर आपल्या अतित्वाची दाहक आठवण करून देणारा तो ‘अवस्था’ हा शब्द. या क्षणी मात्र ‘अवस्था लावूनी गेला’ हा साक्षात्कारी क्षणाच्या जवळपास कुठेतरी पोचला होता. अशा या अपूर्व ध्वजगीताचं माझ्या कवित्वावरचं ऋण तर मी कधीच मान्य केलं आहे. पण अलीकडेच एका क्षणी ते ऋण पुराव्याने
शाबित होण्याचा अनुभवही मी घेतला. माझ्या ‘स्वतंत्रते भगवती’मध्ये १५ ऑगस्ट १९४७ या आपल्या पहिल्यावहिल्या स्वातंत्र्य-दिनाचा महिमा गाणारं एक आनंदगीत आहे.. ‘आनंदगीत गाई महिमा स्वतंत्रतेचा/ हा परमभाग्यशाली दिस येई सोनियाचा..’ त्यातील एक कडव्यात माझ्याही नकळत मी लिहून गेलो आहे..
डोळ्यांत रुप याचे घेऊन नांव ओठी
शत आहुती विझाल्या ह्य़ाच्यात कीर्तीसाठी
त्यांनाच वाहिलेल्या ओल्या तिलांजलीचा
हा परमभाग्यशाली दिस येई सोनियाचा..
नंतर एका क्षणी जाणवलं, राम गणेश मोघ्यांच्या त्या ध्वजाच्या आरतीतील मूळच्या दोन भावमधुर ओळीच झणू काही वेष बदलून आपल्या लेखणीतून पुन्हा अवतरल्या आहेत. ‘नेत्री रूप तुझे, तव नाम धरूनी ओठी/ कित्येकांनी दिधले प्राण तुझ्यासाठी..’ आणि मग आणखीही एक ऋण लक्षात आलं. ‘शत आहुती विझाल्या’ या विधानातील ‘विझाल्या’ हे व्याकरणाचे संकेत तोडून आलेलं तेजाळ क्रियापदही आपलं नाही. ते श्रेय स्वा. सावरकरांचं आहे. ‘शतजन्म शोधताना शत आर्ति व्यर्थ झाल्या, शत सूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या.’
पण या ध्वजाच्या आरतीतील कवित्वाचा वारसा मान्य करूनही त्यातील आणखी एका मौल्यवान ऋणाची जाणीव मला पुढे मी संगीतकार म्हणून व्यक्त होऊ लागल्यावर एका क्षणी अचानक उमगली. या गीताच्या यशामध्ये ते शब्द प्रवाहित करणाऱ्या प्रभावी स्वरांचा सहभाग तितकाच, किंबहुना कांकणभर अधिक आहे. श्रवणाच्या माध्यमातील अनुभव शब्दांतून देऊ पाहणं, ही महाकर्मकठीण गोष्ट असते.. त्यामुळे इतकंच सांगतो की, ती अत्यंत प्रत्ययकारी, प्रभावी, उन्नत दिशेकडे झेपावणारी चाल हे त्या ध्वजगीताच्या अपूर्व यशाचं खरं शक्ति-स्थान आहे. त्या चालीतील ही जादू जाणून घ्यायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ती चाल ऐकणं.. (त्यासाठी ‘आधी बीज एकले’ ही चित्रकृती पाहणं.) ती वेधक स्वररचना किलरेस्करवाडीतील तत्कालीन गायनशिक्षक माणगावकर यांची होती.
पुढे चित्रपटसृष्टीत गीतकार – संगीतकार म्हणून व्यक्त होऊ लागल्यावर निर्मिती प्रक्रियेचे अनेक रंग-तरंग आतून – बाहेरून अनुभवायला मिळाले.. त्या अनुभव-संपन्नतेतून या ध्वजगीताच्या निर्मितीविषयी एक उत्सुकता अभ्यासक म्हणून मनात जागी झाली. आणि त्याबरोबर काही तर्कही बसल्या जागी बांधले गेले.. साहजिकच त्या चालीकडे पाहताना मूळ गीताइतकंच त्या भावमधुर स्वराकृतीचं स्वयंभूपणही खूप तीव्रपणे जाणवू लागलं आणि म्हणून एके दिवशी वडीलांना मी एक प्रश्न केला.. ही चाल माणगावकर मास्तरांनी आधी बांधली असणार आणि मग तुम्ही त्यावर शब्द लिहेल असणार.. होय ना?’ वडीलांनी सहजपणे सांगितलं.. ‘छे रे.. मी या कवितेला ध्वजाची आरती म्हणतो ना, कारण ही कविता लिहिताना मनात मी आरतीची चाल घोळवीत होतो रे..’ हे उत्तर ऐकून मी शब्दश: उडालो आणि खाली पडलो.. पडलो कसला, आदळलोच.. इथं असं काही घडलं असेल हे माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं. साहजिकच ते गीत त्याप्रकारे म्हणून पाहिलं.. खरोखरच ती सगळी कविता मी ‘सुखकर्ता दुख:हर्ता’च्या चालीवर गाऊ शकत होतो.. (उत्सुक अभ्यासूंनी वाटल्यास म्हणून पाहावी..) आणि मग जाणवलं की सर्वसामान्य धोपट पारंपरिक लयतत्त्वावर आधारलेली ती रचना स्वरबद्ध करताना अगदी वेगळाच लयविचार माणगावकर मास्तरांनी केला होता आणि त्यातूनच त्या गीताचा संपूर्ण कायापालट झाला होता. त्यातून त्या गीताचा आशयही अधिक गहिरा आणि उत्कट झाला होता. संगीतकार नामक अस्तित्वाच्या किमयेचा तो मला सर्वप्रथम झालेला साक्षात्कार म्हणता येईल..
यापूर्वी जेव्हा केव्हा आपल्या संगीतकार होण्यामागची प्रेरणा कोणती, असा प्रश्न मनात उभा राहायचा किंवा कोणीतरी विचारायचं.. तेव्हा माझं ठरलेलं उत्तर एकच असायचं.. मराठी आणि हिंदी भावसंगीत उदंड प्रमाणात रेडिओवरून, चित्रपटांतून किंवा नाटकांतून ऐकताना भेटलेल्या बहुविध प्रतिभाशाली संगीतकारांचं ते श्रेय आहे.. तेही उत्तर खोटं नाहीच.. पण तरीही अधिक खरी गोष्ट अशी, की खूप लहानपणीच संगीत दिग्दर्शन ही काव्यलेखनाइतकीच स्वयंभू प्रतिभेची किमया आहे ही माझ्या अंतरीची खूण बनली आणि त्याचं सर्व श्रेय या ध्वजगीतालाच नि:संशय द्यावं लागेल. म्हणजेच पर्यायानं माणगावक रांनाही..
खूप वर्ष मनात होतं की हे नितांत सुंदर, स्वरसुभग आणि अर्थसघन ध्वजगीत विशाल विस्तीर्ण आकाशात विहरताना बघावं.. त्याला सर्वदूर पसरलेल्या मराठी जनमानसात झळकताना अनुभवावं.. ‘आधी बीज एकले’ या चित्रकृतीतून निदान त्याची पहिली झेप साकार करता आली.. ही झेप भविष्यातील भरारीचा प्रस्थान-बिंदू ठरेल का?..
का नाही ठरणार? कलाकृतीची कुंडली कुणी मांडावी?    
poetsudheer@yahoo.com