14 July 2020

News Flash

ओळख ठेवा..!

पत्रकारिता आणि लेखन या दोन्हीत सर्वस्व झोकून देणारे ते दोघेजण. एक.. अलीकडेच शंभरीत पदार्पण केलेले खुशवंत सिंग, आणि दुसरे.. नुकतीच अकाली एक्झिट घेतलेले अशोक जैन.

| February 23, 2014 01:18 am

पत्रकारिता आणि लेखन या दोन्हीत सर्वस्व झोकून देणारे ते दोघेजण. एक.. अलीकडेच शंभरीत पदार्पण केलेले खुशवंत सिंग, आणि दुसरे.. नुकतीच अकाली एक्झिट घेतलेले अशोक जैन. दोघंही आयुष्य रसरसून जगणारे. त्यावर प्रेम करणारे. आपला जगण्याबद्दलचा हा उत्साह इतरांत संक्रमित करणारे. त्यांच्या उत्कट असोशीबद्दलचे हे लेख..
अशोक जैन तीन वेगवेगळय़ा टप्प्यांवर भेटले. या तीन टप्प्यांमध्ये बरंच अंतर होतं. दरम्यान बरंच काही बदललं होतं. बदलली नव्हती ती एकच गोष्ट : अशोक जैन यांचा उत्साह.
यातला पहिला टप्पा बरोबर ३० वर्षांपूर्वीचा. १९८४ सालातला. पत्रकारिता शिकत असतानाचा. पुणे विद्यापीठात रानडे संस्थेत अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आठ-दहा दिवसांसाठी दिल्लीला नेलं जायचं. संसद पाहावी, काही निवडक राजकारण्यांच्या भेटी व्हाव्यात, राजधानीतल्या काही प्रमुख संस्थांना या भावी पत्रकारांनी भेट द्यावी, असा त्यामागचा उद्देश. तेव्हा या प्रथेप्रमाणे आमच्या तुकडीचीही दिल्लीवारी चोखपणे आयोजित करण्यात आली होती. त्या वर्षी आमच्या तुकडीतल्या आम्ही दोघा-तिघा उत्साहींनी या कार्यक्रमपत्रिकेत नसलेला एक कार्यक्रम ऐनवेळी करायचं ठरवलं. तो म्हणजे अशोक जैन यांना भेटणं.
तोपर्यंत त्यांचं ‘राजधानीतून’ चांगलंच लोकप्रिय झालेलं. त्यांची बातमीदारी, त्यातली तडफ आणि वेगवेगळे विषय हाताळण्याची हातोटी हे पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून एव्हाना आवडू लागलेलं होतंच. तो काळ २४ तास टीव्हीची चक्की सुरू व्हायच्या आधीचा. त्यामुळे जैन दिसतात कसे, हे काही कोणाला माहीत नव्हतं. मोबाइलही नव्हता. ई-मेलही क्षितिजावर उगवायचं होतं. त्यामुळे जैनांना गाठायचं कसं, हा प्रश्न होता. पण आम्ही सगळेच पत्रकारितेचे विद्यार्थी. त्यामुळे या व्यवसायाला लागतो तो किमान कोडगेपणा सर्वाच्याच अंगात. कोणालाही थेट भिडण्याचं मूलभूत कौशल्य सर्वाच्याच अंगी. त्यामुळे म्हटलं, थेट कार्यालयातच जायचं. असले तर भेटतील.. नसले तर कधी येणार, ते कळेल.. आणि असूनही भेटायचं नसलं तर नाही म्हणतील.. या तीनच शक्यता होत्या. दिल्लीत अभ्यासक्रमाची म्हणून जी काही नियत कर्तव्यं होती ती पार पडल्यावर आम्ही दोघे-चौघे शोधत शोधत थेट टाइम्सच्या कार्यालयात गेलो. जैन भेटणार नाहीत.. हे गृहीतच धरलेलं होतं. त्यामुळे काही नाही तरी वर्तमानपत्रांची कार्यालयं असलेल्या बहादुरशहा जफर मार्गावर हिंडून-फिरून परतायचं असाही विचार होताच.
पण भलतंच झालं. जैन कार्यालयात होते. आणि भेटायलाही तयार होते. कोण, कुठले तुम्ही, वगैरे झालं. हातात दोनेक बातम्या होत्या, त्या संपवतो; मग गप्पा मारू या, म्हणाले. हे असं काही होईल असा काही आम्हाला अंदाजच नव्हता. त्यामुळे टाइम्सच्या कार्यालयातलं ते वातावरण, तळमजल्यावरचा शाईचा वास आम्ही जास्तीत जास्त काळजात भरून घेत होतो. थोडय़ाच वेळात जैनांचं काम संपलं. घरातल्या लहानग्यांना जत्रा पाहायला नेणारा ज्या उत्साहानं म्हणतो.. ‘चला रे..’ त्याच उत्साहात जैन आम्हाला म्हणाले, ‘चला रे.’ त्यावेळी त्यांच्याकडे प्रीमिअर पद्मिनी होती. ती स्वत:च चालवत त्यांनी आम्हाला कुठे कुठे फिरवलं. मग देवरे यांच्याकडे घेऊन गेले. देवरे मला वाटतं त्यावेळी दक्षिण कोरियात भारताचे राजदूत होते. तेव्हा ते दिल्लीत आले होते, किंवा असंच काहीतरी. खरं तर त्यांच्याशी आमची ओळख करून द्यायची जैनांना काहीच गरज नव्हती. पण जैन यांचा उत्साह दांडगा. त्यांना सांगितलं जैनांनी, की आम्ही कशी पत्रकारितो शिकतोय, वगैरे. मग त्यांच्या गप्पा आम्ही ऐकत बसलो. नंतर निघाल्यावर ‘उद्या काय कार्यक्रम आहे?’ वगैरे त्यांनी चौकशी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला शिवराज पाटील यांच्याकडे जायचं होतं. जैनांना ते सांगितलं. ते ऐकलं आणि लगेचच जैन टेबलाच्या दुसऱ्या बाजूला गेले. दरवाजातून नमस्कार करत बाहेर येत असल्याचा अभिनय करत चालत आले. खांद्यावरची अदृश्य शाल त्यांनी उजव्या हातानं डाव्या खांद्यावर टाकली. अगदी अदबीनं बसले. म्हणाले, ‘हं..’ आम्हाला पहिल्यांदा काही कळेचना.. हे असं काय करताहेत? अखेर आमचा गोंधळ पाहून जैनच आपल्या त्या घोगऱ्या आवाजात म्हणाले, ‘उद्या असंच्या असं होईल की नाही बघा..’
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनवाच्या ठोक्याला आम्ही शिवराज पाटील यांच्या बंगल्यावर पोहोचलो. वेळ घेतलेली होतीच. आम्हाला बसायला सांगितलं तिथल्या कर्मचाऱ्यांनं. आणि काही क्षणांत शिवराज पाटील आले. आदल्या संध्याकाळी अशोक जैन आले तस्सेच. जवळ आल्यावर खांद्यावरची शाल उजव्या हातानं डाव्या खांद्यावर टाकली. बसता बसता म्हणाले, ‘हं..’ आम्हाला हसू आवरेना. जैन यांनी इतकी बेमालूम नक्कल करून दाखवली होती शिवराज पाटलांची, की बस्स! जैन असंही म्हणाले होते, ‘तीसेक मिनिटं बोलतील ते तुमच्याशी.. पण हाताला काहीही लागणार नाही.’ तो भागही तसाच्या तसा पार पडला. आमच्या हाती एक ओळीची बातमी लागणार नाही याची पूर्ण काळजी घेत शिवराज पाटील यांनी अर्धा तास आमच्या बरोबर घालवला आणि ते निघून गेले.
त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा जैनांनी बोलावलं होतं. गेलो. पहिला प्रश्न : सकाळी काय झालं? त्यांनी जसं वर्णन केलं होतं तसंच घडलं, हे सांगितल्यावर जैन खूश. त्या आनंदात आणखी एक सिगरेट त्यांनी शिलगावली. मग आम्हाला सांगायला लागले.. चांगल्या बातमीदारानं केवळ शब्दांपुरतं स्वत:ला मर्यादित ठेवू नये. आपण ज्या माणसाला भेटतोय, त्याच्या लकबींची नोंद घ्यावी, तो कसा बोलतो, वागतो, ते टिपावं.. मग बातमीपलीकडचा बराच तपशील आपल्या हाती लागतो. तो वापरता येतो वेगवेगळय़ा निमित्तानं. नंतर त्यांनी त्यांच्या काही गाजलेल्या वार्तापत्रांतला तपशील कसा आणि कुठे मिळाला, ते आम्हाला सांगितलं. निरोप घेताना त्यांनी एक भन्नाट कल्पना पुढे मांडली. म्हणाले, ‘बऱ्याच मराठी वर्तमानपत्रांना दिल्लीत पूर्णवेळ वार्ताहर नेमणं परवडत नाही. तुमच्यासारख्या दोन-पाच मुलांनी एकत्र येऊन एखादी वृत्तसेवा सुरू करायला हवी. दिल्लीसारख्या ठिकाणी इतकं काय काय घडत असतं.. त्यातलं निम्मंसुद्धा येत नाही मराठी वर्तमानपत्रांत. बघा, विचार करा..’
माझ्याबरोबर बाकीचे दोघे पुण्यातले होते. आपली पत्रकारितेची शाई पुण्यातच सांडायचा त्यांचा पण होता. या जैनानुभवामुळे त्यांना घेरीच यायची बाकी होती. पुण्यात वसंत अथवा हेमंत व्याख्यानमालांतून रिकाम्या खुच्र्यासमोर पांडित्य मिरवणाऱ्या ज्येष्ठांचा त्यांना अनुभव. त्यामुळे जैनांइतका लोकप्रिय ज्येष्ठ इतका आपल्या बरोबरीच्या पातळीवर येऊन वागू शकतो, या धक्क्यातून बाहेर यायला त्यांना बराच वेळ लागला. वरिष्ठ इतका मोकळाढाकळा असू शकतो, याचा इतका मोठा धक्का त्यांना बसला, की ते आजतागायत पुण्यातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. असो.
हे जैनांचं पहिलं दर्शन! नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये जैन माझे ज्येष्ठ सहकारी होते. मी लागलो तोपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. ते आले तेव्हा १९८९ सालातल्या निवडणुकांची तयारी सुरू होती. निवडणुकांच्या वार्ताकनाची जबाबदारी साहजिकच त्यांच्याकडे होती. त्या काळात निवडणूक दौऱ्यांचं बरंच प्रस्थ होतं. टी. व्ही. नव्हता. त्यामुळे वर्तमानपत्रांतील शहाणे जी काही निर्माण करतील तीच निवडणुकीची हवा! या चार-आठ दिवसांच्या दौऱ्यांतून आपल्याला बरंच कळतं असा समज पत्रकारांचा व्हायचा; आणि वाचकांचाही तो व्हावा असा प्रयत्न असायचा. त्यावेळी ज्येष्ठांनी मोठमोठी राज्यं पदरात पाडून घेतली. त्यामुळे गोवा वगैरे शिल्लक होतं. मी गोवा मागून घेतलं. माझा तो पहिलाच निवडणूक दौरा. जैनांनी सगळी व्यवस्था करून दिली आणि सगळं झाल्यावर म्हणाले, ‘सो मिष्टर कुबेर, यू आर फ्लाइंग टु गोवा..’ नेहमीच उत्साही असणाऱ्या जैनांच्या उत्साहाची पातळी वाढली की त्यांना व्यक्त व्हायला वाघिणीचं दूधच लागायचं. आणि मग इंग्रजी आणि मराठीच्या संकरातून ते उत्तम पीजे टाकायचे.
नंतर त्यांचा ‘कानोकानी’ स्तंभ गाजायला लागला. त्यावेळी मला वाटतं ज्ञानेश्वर नाडकर्णी एका मुलाखतीत म्हणाले होते, की ‘पुल’ आंतरराष्ट्रीय व्हायचे असतील तर त्यांच्या वाङ्मयाचं इंग्रजीत भाषांतर व्हायला हवं. जैनांनी त्यावर ‘कानोकानी’ लिहिलं आणि ‘पुल’ इंग्रजीत नेण्याचा मुद्दा उचलून धरला. त्यावर बरीच चर्चा झाली होती. मग हा फुगा जयवंत दळवी यांनी फोडला. दळवी म्हणाले, ‘जैनांची इच्छा आहे पुल इंग्रजीत यावे म्हणून. कारण ते इंग्रजीत आले रे आले, की जैन टपूनच बसलेत त्याचा मराठी अनुवाद करायला..’
दळवींचा हा टोमणा खरा असावा. गोव्यात मी तो अनुभवला. त्यावेळी एकदा जैन सुटीवर आले होते. चहापान वगळता त्यांना अन्य कोणत्याच पानात रस नव्हता. अपवाद फक्त वर्तमानपत्रं आणि पुस्तकाची पानं. त्यांच्या गोव्यातल्या वास्तव्यातल्या काही संध्याकाळ तर अशा होत्या, की त्यांना भेटायला काही स्थानिक पत्रकार आलेत.. आणि जैनांच्या नावाखाली त्यांचंच काही अन्य रसपान सुरू आहे आणि जैन मात्र त्याच टेबलावर बसून अनुवादाचं काम करत बसलेत. आमच्या गप्पांचा त्यांना जराही उपद्रव होत नव्हता. त्याबाबत विचारलं तर म्हणाले, ‘मी कुठेही गेलो तरी काम बरोबरच घेऊन जातो.’ नंतर गोव्यात साहित्य संमेलनाला जैन आले होते. त्यावेळची एक संध्याकाळ थोरच होती. गप्पांच्या बैठकीत कोण कोण होते- तर विद्याधर गोखले, नारायण सुर्वे आणि थेट तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी.    त्या सर्वाच्या प्रेमाचा दुवा म्हणजे जैन. वेगवेगळे विषय काढून जैनांनी तो गप्पायज्ञ असा धगधगता ठेवला होता, की रात्रीचे दोन वाजले तेव्हा सगळय़ांना लक्षात आलं, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याचं. पण तोपर्यंत गोखले आणि तर्कतीर्थानी निवृत्ती जाहीर केली होती. मात्र नारायण सुर्वे छान फुलले होते. मग तिथून उठून आम्ही पणजीतल्या अल्तिनो इथल्या सरकारी विo्रामगृहात गेलो आणि भल्या पहाटे सूयरेपासना करूनच घरी परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी काही बरे परिसंवाद होते. संध्याकाळी इंदिरा संत यांचा कार्यक्रम होता. जैनांचा सर्वत्र संचार. हे सगळं काही आहे ते आपल्या घरचं कार्यच आहे, असा. क्वाड्रायची पॅट, हाफ शर्ट, तो जमेल तितका पँटीत खोचलेला आणि डाव्या खांद्यावर शबनम बॅग. तीत पुस्तकं, कोरे कागद आणि वर्तमानपत्रं.
पुढे मी मुंबईला परतलो आणि द इकॉनॉमिक टाइम्समध्ये व्हाया लंडन पोहोचलो. जैन आता भेटेनासे झाले. मंत्रालयात सुनीतीताई अधूनमधून भेटायच्या. अशोकनी तुझं अमुक अमुक वाचलं, वगैरे सांगायच्या. कधी कधी रविवारी सकाळी जैनांचा फोन यायचा.. मिष्टर कुबेर.. यू व्हेअर.. त्यांचा तिसरा टप्पा हा असा दूरस्थ होता. लोकसत्तात मी आल्यावर या फोन्सचं प्रमाण वाढलं. काहीतरी चांगलं वाचलं की वगैरे आवर्जून फोन करायचे. काही लिहावंसं वाटलं तर सांगायचेच सांगायचे. ‘आता इतकं कोणी वाचायला देतच नाही..’ हे न चुकता बोलून दाखवायचे. एखादा विषय त्यांना सुचवलाय आणि त्यांनी लिहायला नाही म्हटलंय, असं एकदाही झालं नाही. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे वाचनिक, लेखनिक वगैरे ठेवून ते सगळं करत होते. त्यांना हे सगळं करता येत होतं ही खरं तर सुनीतीताईंचीच कमाल.
चर्र झालं ते दिवाळी अंकाच्या वेळी. यंदाचं हे निवडणूक वर्ष. तेव्हा दिवाळी अंकात निवडणूक निकालांचं गंमतीशीर भाकित पंचांगसदृश्य त्यांनी लिहावं अशी इच्छा होती. ती ऐकल्यावर ते भलतेच उत्साहात आले. पण नंतर सुनीतीताईंकडून कळत गेलं.. उत्साह हळूहळू मावळत चाललाय. इतका, की ते लिहूच शकले नाहीत. उत्साहाविना जैन ही कल्पनाच अशक्य होती. उत्साह हे अशोक जैन यांचं टोपणनाव होतं. ते गायब होणं हे मूळ व्यक्तिमत्त्व नाहीसं होण्यासारखंच होतं. ते तसंच होतंय, हे सुधीर गाडगीळ, दिलीपराव माजगावकर यांच्याकडून कळत गेलं. अखेर उत्साह नसलेल्या त्या कुडीत राहायला प्राणही कंटाळला असावा. शेवटी मंगळवारी तोही सोडून गेला.
त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांना जैन यांच्या दोन लकबी स्वच्छ लक्षात असतात. एक म्हणजे शब्द- मज्जा. जैन यांच्या शब्दकोशात मजेमधला ‘ज’ कधीच एकटा नसायचा. एकटा ‘ज’ पुरायचाच नाही त्यांना. काहीही झालं तरी जैन आसपासच्या सर्वाना मज्जा वाटेल असाच प्रयत्न करायचे. आणि दुसरं म्हणजे त्यांच्यासमोर कार्यालयातून कोणीही घरी जायला निघालं.. मग ते डाव्या हातात पुस्तकांचा गठ्ठा घेऊन निघालेले गंभीर मुद्रेचे गोविंदराव तळवलकर असोत वा एखादा नवा सहकारी.. आपल्या केबिनमधून जैन अगदी उत्साहानं बाहेर येऊन त्या घरी निघालेल्या व्यक्तीला एक क्षण थांबवायचे आणि  म्हणायचे, ‘ओळख ठेवा.’ कार्यालय सोडताना ती व्यक्ती चेहऱ्यावर स्मित ठेवूनच बाहेर पडायची.
मंगळवारी रुग्णालयातून या जगाचा निरोप घेताना आसपासच्या सर्वाना जैन हेच म्हणाले असतील..
‘ओळख ठेवा..!’                                           

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2014 1:18 am

Web Title: ashok jain said acknowledge me
Next Stories
1 माय मराठी
2 डोकॅलिटी
3 माहितीजाल
Just Now!
X