डॉ. स्वाती कर्वे

इतिहास आणि ऐतिहासिक घटना व व्यक्तींविषयी सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्याच मनात एक प्रकारची कुतूहलपूर्ण ओढ असते. इतिहासातील घटना, व्यक्तिमत्त्वे, त्यांचे संघर्षमय जीवन जाणून घ्यावेसे वाटत असते. प्रत्यक्ष इतिहास वाचण्यापेक्षा ऐतिहासिक कलाकृतींविषयी अधिक आकर्षण असते, याचे कारण काळाच्या पडद्यापलीकडचे वास्तव जीवनानुभव, संघर्षनाटय़ कलाकृतीतून अनुभवता येते, जाणून घेता येते. म्हणूनच आशुतोष गोवारीकरांसारख्या दिग्दर्शकाला ‘पानिपत’ चित्रपट करावासा वाटतो, ‘तानाजी’सारखा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकतो. इतिहास आणि कलात्मक निर्मिती यांचा अनुबंध या कुतूहलातूनच विकसित होत आलेला आहे.

loksatta analysis imd predict india to receive above normal monsoon
विश्लेषण : यंदा दमदार पावसाचा अंदाज का वर्तवला जात आहे?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!

पानिपतचे युद्ध, आग्य््रााहून सुटका, अफजलखानाचा वध इत्यादी इतिहासप्रसिद्ध घटनांमध्ये आणखीन एक महत्त्वाची घटना मोडते.. ती म्हणजे १८५७ चा स्वातंत्र्याचा उठाव किंवा बंड! एकोणिसाव्या शतकाच्या साधारण मध्यावर घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला अनेकानेक पदर होते. कंपनी सरकारची साम्राज्यविस्ताराची अभिलाषा, त्यांचे संस्थाने खालसा करण्याचे धोरण आणि त्याला होणारा विरोध, सैनिकांच्या असंतोषाचा भडका आणि याचवेळी देशभर स्वातंत्र्यासाठीची धडपड सुरू होती. यादरम्यान सुधारणावादी विचारसरणीही विकसित होत होती. अशा परस्परविरोधी घटनाक्रमांतून तत्कालीन असंतोषाचा झालेला स्फोट म्हणजे १८५७ चा उठाव होय. उत्तरेत मिरतला काडतुसांच्या संदर्भातील सैनिकांच्या बंडाने ठिणगी पडली आणि वणवा पेटत गेला. यावर प्रमोद मुनघाटे यांनी केलेले प्रबंधलेखन आता पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहे.

१८५७ च्या उठावाच्या महत्त्वपूर्ण घटनेचे पडसाद मराठी ऐतिहासिक कादंबऱ्यांतून कसे उमटले, ऐतिहासिक घटना, व्यक्ती आणि तत्कालीन संघर्षांचे चित्रण कादंबरीकारांनी कशा प्रकारे केले आहे याचा चिकित्सक वेध घेणे, हे मुनघाटे यांच्या संशोधनाचे सूत्र आहे. ज्या ऐतिहासिक घटनेतून हे कादंबरीलेखन झाले, त्या घटनेचा सविस्तर परामर्श लेखकाने साक्षेपाने घेतला आहे. ‘अठराशे सत्तावन्न : बंड की स्वातंत्र्ययुद्ध’,‘इतिहासाचा मागोवा’ या प्रकरणांतून त्यांनी या घटनेची पाश्र्वभूमी विशद केली आहे. घटनाक्रमाबरोबरच या संघर्षांचे स्वरूप, त्यात सहभागी प्रमुख व्यक्ती- उदा. बहादूरशहा जफर, तात्या टोपे, झाशीची राणी, झीनत महल  व अन्य स्त्रियांचा सहभाग त्यांनी विस्ताराने ग्रथित केला आहे. ‘अठराशे सत्तावन्न आणि साहित्य’ या तिसऱ्या प्रकरणात लेखक मुख्य विषयाकडे वळतो.

१८५७ चा उठाव उत्तरेत झाला खरा, परंतु अनेक मराठी माणसे या बंडात सहभागी झाली होती. असे असताना महाराष्ट्रात उठाव का झाला नाही, महाराष्ट्रात कोणते वातावरण होते, कोणत्या वाङ्मयीन प्रेरणा होत्या, याचा आढावा घेऊन १८६७ च्या मोचनगडपासून मराठी ऐतिहासिक कादंबरीचा प्रवाह वाहता कसा झाला, याविषयी लेखक विस्ताराने विवेचन करतो. १८५७ ते १९५७ या शंभर वर्षांतील १२ कादंबऱ्यांचा चिकित्सक वेध लेखकाने घेतला आहे. व्यक्तिरेखाप्रधान आणि १८५७ च्या काळाच्या पटलावर चित्रित झालेल्या अशा दोन प्रकारच्या ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत. ‘झीनत महल’ (१९०९), ‘झांशीवाली राणी’ (१९१८), ‘सत्तावन्नची समरदेवता’ (१९५७), ‘सत्तावन्नचा सेनानी’ (१९५७) या व्यक्तिरेखाप्रधान कादंबऱ्या आहेत, तर ‘हंबीरराव- पुतळाबाई’ (१८६७), ‘शिक्षक’ (पूर्वार्ध- १८८३), १९५७ साली प्रसिद्ध झालेल्या ‘सत्तावन्नचा सेनानी’ या कादंबऱ्यांतून यातल्या ऐतिहासिक घटना कशा व्यक्त होतात, याबद्दलचे महत्त्वाचे निरीक्षण लेखकाने नोंदवले आहे. ‘सत्तावन्नचा सेनानी’ या कादंबरीची वैशिष्टय़े पाहता नव्या ऐतिहासिक मराठी कादंबरीची सुरुवात या कादंबरीपासून झाली असे म्हणण्यास हरकत नाही. कादंबरीत चरित्रनायकाच्या सापेक्ष समकालीन ऐतिहासिक कालभान आविष्कृत करणे आणि हे सर्व मनोविश्लेषक पद्धतीने साकार करणे, ही नव्या ऐतिहासिक मराठी कादंबरीची सर्वसमावेशक वैशिष्टय़े आहेत.

उपसंहारात लेखकाने तात्त्विक विचार मांडला आहे. ऐतिहासिक मराठी कादंबरीलेखनाचा प्रारंभ कोणत्या प्रक्रियेतून झाला, याविषयी त्यांनी सविस्तर परामर्श घेतला आहे. विषय आणि विवेचनाचे सूत्र कोठेही खंडित न होऊ देता सलगपणे एकाच सूत्रात विवेचन करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. फक्त एक गोष्ट मनात येते की, १८५७ च्या बंडाची ऐतिहासिक घटना, तत्कालीन वातावरण, काळाच्या पडद्यावरची माणसे इत्यादींतून व्यक्त होणारे  चित्र लेखकाने थोडक्यात मांडायला हवे होते. तात्या टोपे, झाशीची राणी इत्यादी व्यक्तिरेखांच्या संदर्भात लेखक काहीएक निरीक्षणे नोंदवतो. लेखक १८५७ चे बंड मानतो की स्वातंत्र्य, याविषयी भाष्य करतो. तथापि १८५७ चा स्वातंत्र्यासाठीचा उठाव यावर आधारित ऐतिहासिक कादंबऱ्यांतून तत्कालीन जीवनपट साकार कसा होतो यावर प्रकाश पडणे आवश्यक होते. अर्थात त्यामुळे फार अपूर्णता येते असे नाही. केवळ २०० पृष्ठांत मोठा अवकाश लेखकाने साकारला आहे.

आज संशोधन क्षेत्रात आंतरशाखीय अभ्यास पद्धती रुजली आहे. समाजशास्त्राकडून साहित्याकडे याप्रमाणेच साहित्याकडून समाजशास्त्राकडे जाण्याची संशोधन पद्धती विकसित होत आहे. यादृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व  निश्चितच आहे. या पद्धतीने अन्य ऐतिहासिक घटनांबद्दलही वाङ्मयीन अंगाने संशोधन करता येईल, हा विचार लेखकाच्या मनात येणे हे महत्त्वाचे आहे.

‘अठराशे सत्तावन्न आणि मराठी कादंबरी’ – प्रमोद मुनघाटे, लोकवाङ्मयगृह, पृष्ठे- २००, किंमत- ३०० रु.