News Flash

आझरबैजानचे अग्नीमंदिर

आझरबैजान हा पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचा भाग असलेला, अवघ्या ९० लाख लोकसंख्येचा संपन्न देश! इराण आणि तुर्कस्थानला खेटून असतानाही आणि ९० टक्क्यांहून अधिक लोक मुसलमान असतानाही

| June 2, 2013 01:01 am

आझरबैजान हा पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचा भाग असलेला, अवघ्या ९० लाख लोकसंख्येचा संपन्न देश! इराण आणि तुर्कस्थानला खेटून असतानाही आणि ९० टक्क्यांहून अधिक लोक मुसलमान असतानाही या देशात वावरताना आपण इस्लामिक देशात आहोत असे क्षणभरही वाटत नाही. अझेरी भाषेत ‘अझेर/ आझर’ याचाही अर्थ ज्वाळा किंवा अग्नी असा होतो. आझरबैजान म्हणजे ‘अग्नीचा प्रदेश’.  अझेरी लोकांचे अग्नीप्रेम अनेक उदाहरणांतून प्रत्ययाला येते. येथील अग्नीमंदिरामुळे भारतीय संस्कृतीचा एक धागा या देशाशी पूर्वापार जोडला गेला आहे.
आ झरबैजानला जायचं ठरलं तेव्हाच मनात योजलं होतं, की, काहीही झालं तरी ‘आतशगाह’ बघायचंच! आझरबैजान हा पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचा भाग असलेला, अवघ्या ९० लाख लोकसंख्येचा संपन्न देश! ‘बाकू’ हे चकचकीत शहर ही या देशाची कॅस्पिअन समुद्राच्या तीरावर वसलेली राजधानी! ‘बाकू’ या आझरी भाषेतील शब्दाचा अर्थच आहे मुळी ‘भरपूर वारा असलेले गाव’! शिकागोसारखीच बाकू ही एक ‘विंडी सिटी’ म्हणावी इतका सोसाटय़ाचा वारा इथं अहोरात्र तुमच्या साथीला असतो. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या मुबलक साठय़ांमुळे आझरबैजानची अर्थव्यवस्था एकदमच मजबूत! ‘मनात’ या तिथल्या चलनाचे मूल्य जवळपास युरोएवढंच आहे. सोव्हिएत रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झालेल्या या देशात लोकशाहीच्या नावाखाली जवळपास एकपक्षीय निरंकुश राजवट आहे आणि तिच्या सूत्रधारपदी ‘अलिएव्ह’ घराणे आहे.
राजधानी असलेलं बाकू हे शहर गेल्या दहा-पंधरा वर्षांत कात टाकून चकचकीत झालं आहे. शक्य होत्या तेवढय़ा सर्व जुन्या इमारती जमीनदोस्त करून सरकारने अनेक नवे टॉवर्स उभे केले आहेत. मुख्य रस्त्यांवरच्या इमारतींचे दर्शनी भाग इटालियन मार्बल्सच्या साहाय्याने पुस्तकाला नवं कव्हर घालावं तसे दिमाखदार केले आहेत. शिवाय सगळीकडे इमारतींच्या बाह्य़ प्रकाशयोजनेत एकसमान डिझाइन वापरून असा काही लखलखाट निर्माण केला आहे, की बाकूत रोजच दिवाळी असावी असे वाटावे. अमेरिका आणि युरोपातल्या महागडय़ा ब्रँडेड कपडय़ांची दुकानं, मोठमोठे मॉल्स, अनोख्या आकारातल्या नव्याकोऱ्या इमारती, समुद्रकाठचा समांतर होत असलेला उद्यान-मार्ग आणि जगभरातल्या सर्व महागडय़ा कार्सची सततची ये-जा.. बाकूचा हा रुबाब प्रथमदर्शनीच डोळ्यांत भरतो.
आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे इराण आणि तुर्कस्थानला खेटून असतानाही आणि ९० टक्क्यांहून अधिक लोक मुसलमान असतानाही या देशात वावरताना आपण इस्लामिक देशात आहोत असे क्षणभरही वाटत नाही. शियापंथी मुसलमानांचे निरपवाद वर्चस्व असलेल्या या देशात ना बुरख्यातल्या महिला दिसत, ना मशिदींचे भोंगे! बाकूत तर अवघ्या दोन-तीन मशिदीच असाव्यात.
या सर्व ‘लिबरल’ वातावरणाचा परिणाम म्हणून की काय, पण आझरबैजानने आपल्या इस्लामपूर्व खुणा पुसून टाकण्याचा माथेफिरूपणा केलेला नाही. सर्वसाधारण कल हा त्या खुणा चांगल्या प्रकारे जपून ठेवण्याचाच आहे. त्याचेच एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे ‘आतशगाह’ हे बाकूच्या जवळच उभे राहिलेले ऐतिहासिक महत्त्वाचे अग्नीमंदिर!
अझेरी भाषेत ‘अझेर/ आझर’ याचाही अर्थ ज्वाळा किंवा अग्नी असाच होतो. आझरबैजान म्हणजे ‘अग्नीचा प्रदेश’ असाही एक अर्थ सांगितला जातो. एकूणच अझेरी लोकांचे अग्नीप्रेम अनेक उदाहरणांतून प्रत्ययाला येते. बाकूत ‘टॉवर्स ऑफ फ्लेम’ हा गेल्या काही वर्षांत उभा राहिलेला इमारतींचा समूह हे त्याचेच उदाहरण! देशाच्या राष्ट्रीय संसदभवनाच्या पिछाडीला फुलांच्या विस्तृत पाकळ्यांच्या आकाराच्या या तीन इमारती आहेत; ज्यांचे बाह्य़ांग जवळपास पूर्णपणे काचेच्या तावदानांचे आहे. दिवसा या काहीशा विचित्र आकाराच्या मनोऱ्यांचा रुबाब जाणवतो; पण त्यांचे प्रयोजन लक्षात येत नाही. रात्री मात्र त्यावर अशी काही नयनरम्य रोषणाई केली जाते, की त्यातून फडफडणाऱ्या ज्वाळांचे सतत बदलते दृश्य साकारते आणि या अग्नीनृत्यावरून नजरच हटवू नये असे वाटत राहते.
आतशगाहचे अस्तित्व इसवी सन पूर्व दहाव्या शतकापासून असल्याचे सांगितले जाते. आझरबैजान हा पर्शियाला जवळचा! त्यामुळे अग्निपूजक पारशी मंडळींनी भूगर्भातील ज्वालाग्राही वायूचे जमिनीवर अवतीर्ण होणे साजरे करण्यासाठी हे मंदिर बांधले असावे अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. बाकूच्या आग्नेयेस सुमारे १५ कि. मी.वर असलेल्या या अग्निस्थळाभोवती १७ व्या शतकात एक प्रकारचे मंदिरसंकुल बांधले गेले ते मात्र रेशीम व्यापारानिमित्ताने भारतातून इथे येणाऱ्या हिंदू व्यापाऱ्यांकडून!
मधोमध मंदिर आणि भोवती पंचकोनी आकाराची बसकी इमारत. इमारतीत यात्रेकरूंना राहण्यासाठी व साधना करण्यासाठी आवश्यक व्यवस्था असलेली जागा.. असा हा आटोपशीर परिसर आहे. साधना करणाऱ्यांना होमहवन वा यज्ञयाग करणं सोपं जावं म्हणून साधना कक्षातूनही आगीचे कोनाडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
इतिहासकाळात भारतीय हिंदू साधुसंत आतशगाहला जात असावेत. काहींच्या मते, हिमाचल प्रदेशातील ज्वालामुखी येथील ज्वालाजी मंदिराची मोठी बहीण म्हणजे आतशगाहची अग्नीदेवता! असेही सांगतात की, या ज्वाला म्हणजे पार्वतीच्या कापून दहा हजार मैल दूर फेकलेल्या जिव्हेचा एक तुकडा होय!
या पौराणिक संदर्भाच्या पलीकडचं सत्य म्हणजे आझरबैजानचा हा सर्व परिसर भूगर्भातील नैसर्गिक वायू आणि खनिजतेलाने संपन्न आहे. आतशगाहला जाताना रस्त्याच्या दुतर्फा उसाची गुऱ्हाळं दिसावीत तशी जमिनीतून कच्चं तेल वर काढणारी ड्रिलिंग मशिन्स अक्षरश: दर सत्तर-ऐंशी फुटांवर एक अशा प्रमाणात दिसत राहतात.
आतशगाहच्या वाटेवरच किंवा बाकूच्या बाहेर पडून वाट थोडी वाकडी करून आपल्याला यानार दागला जाता येतं. यानार दाग म्हणजे अग्नीपर्व! एका विस्तीर्ण टेकडीच्या पायथ्याशी इथे चक्क जमिनीतून वर आलेल्या मोठय़ा शेकोटीच्या वाटाव्यात अशा जिवंत ज्वाळा आपल्याला दिसतात. या ज्वाळा जवळजवळ दहा फूट लांबीच्या व भूगर्भातील एका खाचेतून वर येतात. थंडीच्या दिवसांत तिथेच बसून शेक घेण्याचा मोह व्हावा! या ज्वाळा अगदी हिमवर्षांवातदेखील लोप पावत नाहीत असं तिथल्या गाइडनं सांगितलं.
आतशगाहची हिंदू संस्कृतीशी असलेली नाळ किती पक्की आहे, ते दाखवणाऱ्या अनेक खुणा या पंचकोनी इमारतीत आहेत. या इमारत परिसराच्या मधोमध असलेल्या अग्निकुंडाच्या छतावर त्रिशूळ आहे आणि निदान चार-पाच कक्षांच्या प्रवेशद्वारांवर संस्कृत आणि गुरुमुखी भाषेत काही श्लोक लिहिलेले आहेत. संस्कृत श्लोकांच्या शिलालेखांची सुरुवात तर ‘श्री गणेशाय नम:’पासूनच झाली आहे. भोवतीच्या निवासी कक्षांना कारवा-सराई असं नाव आहे. भारतीय साधुसंत आणि योगी या सरायांमध्ये प्रदीर्घ काळ मुक्काम करत आणि शरीराला सर्व प्रकारचे कष्ट देत, आत्मक्लेश सोसत साधना करत.
पर्यटकांना या भारतीय साधू आणि बैराग्यांच्या जीवनशैलीची कल्पना यावी यासाठी इथे पुरुषभर उंचीच्या पुतळ्यांच्या माध्यमातून प्रसंगचित्रे उभी केलेली आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा सगळा परिसर सध्या डागडुजीच्या प्रक्रियेत आहे. पण तरीही पर्यटकांनी नित्य यावं आणि त्यांना संपूर्ण परिसराच्या वास्तविक स्वरूपाची परिपूर्ण कल्पना यावी असाच इथल्या सरकारी व्यवस्थापकांचा प्रयत्न असतो.
दुर्दैव म्हणजे आतशगाहची ही ऊब भारत-आझरबैजान यांच्या परस्परसंबंधांत राहिलेली नाही. आझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात वादग्रस्त भूभागाच्या मालकीवरून संघर्ष सुरू आहे आणि रशियाने आर्मेनियाच्या बाजूने आपले वजन टाकले आहे. रशियाच्या आग्रहास्तव भारतानेही तसेच केले आणि त्याचा राग आझेरी नेतृत्वाच्या मनात आहे. अर्थात असं असलं तरी ‘भारत’ म्हटल्यावर सर्वसामान्य आझेरी नागरिक हरखून जाताना दिसतो. राज कपूर, मिथुन चक्रवर्ती, शाहरुख खान इ. कलावंत इथे चांगलेच लोकप्रिय आहेत. ‘श्री ४२०’, ‘आवारा हूँ’ अशा सिनेमांच्या आठवणी काढणारेही आहेत. तेव्हा गरज आहे ती या संबंधांवर आणखी उंच मैत्रीचे मनोरे रचण्याची! भूतकाळातून भविष्याकडे जाण्याची! पण ते कसे आणि कोण करणार, हाच खरा प्रश्न आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 1:01 am

Web Title: azerbaijan fire temple
टॅग : Islam
Next Stories
1 कला-कलावंत अद्वैत
2 नेमाडे ७५.. खरंच!
3 ‘कोसला’ची निर्मितीप्रक्रिया
Just Now!
X