|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

अनेक पुस्तकं वाचलेला, सावरीच्या कापसासारखे केस पिकलेला तो एक माणूस आणि शेरडीच्या करडाप्रमाणे उत्साहानं सदैव उधाणलेला, नवनव्या कल्पनांनी पालवलेला, लसलसती वासना अन् मोह ल्यायलेला दुसरा एक.. असे दोघे चालत निघाले होते. चढावाचा रस्ता असला तरी शरीरं पुढे ओणवून, श्वास फुलवून दोघे चढत राहिले. पलीकडचं काही दिसत नव्हतं एवढी चढण. अन् ज्याच्या कानात अत्तराच्या फायागत पांढरी बोंडं होती, तो उत्साहात सहज चढून जाईल असं वाटत होतं. तर शेवरीचा कापूस डोक्यावर धरलेला पहिला मात्र गुडघ्यावर हात दाबून मधेच थांबून मागे पडलेला रस्ता न्याहाळेल असंही जाणवत होतं. पण थांबला प्रथम तो दुसरा. दमल्यामुळे नाही, पण कानातलं वाजणारं संगीत बंद पडल्यामुळे. काहीसं चकित होत त्यानं हातातल्या यंत्राशी काहीतरी खुडबूड केली. संगीत सुरू झालं असावं परत; कारण त्याच्या मिशीत हसू फुटलं काही क्षणात. त्याच्या कानीच्या बोंडात संगीत वाजत असावं, हा मात्र पाहणाऱ्याचा केवळ कयासच म्हणावा लागला असता; कारण आसमंतात सगळीकडे केवळ वाऱ्याचा अन चुकार पाखरांचा आवाज भरून राहिला होता. कापूसडोक्याच्या माणसानंही विसावा घेतला. पण रस्ता न न्याहाळता त्यानं लकलक चमकणारी एक रंगीत गारगोटी उचलली अन् तळहाती ठेवून बराच वेळ एकटक तिची रंगीत तकाकी तो पाहत राहिला.

father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
thane theft news, jewellery theft thane marathi news
सुट्टी घेतल्यामुळे सेल्समनची चोरी उघड, १ कोटी ५ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; नौपाडा पोलिसांनी केली सेल्समनला अटक
IIT student to join ISIS
आयआयटीचा विद्यार्थी ISIS च्या संपर्कात? दहशतवादी गटात सामील होण्याआधीच…; आसाम पोलिसांची माहिती
nagpur, 15 year old girl raped
नागपूर : पुजाऱ्यासह चौघांनी केला १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

जो तरुण होता त्यानं दखल न घेतल्यानं दोघांत अंतर पडलं. पुढे गेला होता तो हरवून गेला होता. संगीतात, स्वतत, कल्पनेत किंवा सगळ्यात. पण अजूनही तो दिसत होता. चढणीवर त्याची आकृती स्पष्ट चालत होती. कापूसडोक्याला काहीतरी आठवलं असावं पूर्वीचं- किंवा नवं सुचलं असावं; कारण त्याचे डोळे चमकले. त्यात गारगोटीचं तेज प्रतिबिंबित झाल्यागत ताजेपणा दिसला. तंद्री भंगल्यावर त्यानं पुढे गेलेल्या रस्त्याकडे पाहिलं. त्या पहिल्याची आकृती दिसली. स्वतत हरवल्यासारखी. थांबला नाही तो. सहज विचारायला हवं होतं त्यानं- ‘‘का थांबलात?’’ म्हणून. सहप्रवाशाबद्दलच्या किमान आस्थेतूनही असं घडायला हवं. नसेल कदाचित आस्था. किंवा तो आपल्याला सहप्रवासी मानतच नसेल. हा सहप्रवास नसेलच त्याच्या दृष्टीनं. मी तरी कुठे काय बोललोय त्याला प्रथम पाहिल्यापासून? हसलो एकदा; पण तेही उपचारापुरतं. ओळखही करून घेतली नाही. मग तो गेला पुढे- तर काय त्याचं एवढं? तसंही कुणी भेटेल, सोबत चालेल, काही बोलेल वा ऐकेल आपलं- असं कुठे वाटलं होतं आपल्याला? उलट, इतर कुणाचाही विचार संपवून मगच हा प्रवास सुरू केला आपण. त्यानंही तेच केलं असणार. इथून पुढे एकटय़ानंच चालावं लागणार- ही उपरती त्यालाही झाली असावी. किंबहुना, असं एकटं चालण्याच्या दिवसांतच जन्मलीय त्याची पिढी. मागे राहिलेल्या कशाचबद्दल काहीच वाटू न देण्याइतकं कानातलं संगीत पकड घेणारं आहे. साऱ्या अर्थाचे विलय होताना झालेल्या आवाजानं ते बनलंय. त्यातलं नावीन्य नशीलं आहे आणि लय भवताल विरघळवणारी आहे. चढापलीकडे क्षितीज आहे. त्यावर आता पुढे गेलेल्याची आकृती ठसा उमटवते आहे. थांबलेल्यानं हळुवार गारगोटी जागेवर ठेवली. आणि तोही निघाला. इथलं काहीच बरोबर नेता येणार नाही. वस्तू, पानं, फुलं, माणसं, अनुभव सारं काही मागेच पडणार. या चढणीवर स्वतच्या शरीराचंही ओझं होत असता नवा अतिरिक्त भार नको. पाऊल उचलत त्यानं परत चालायला सुरुवात केली.

पुढे गेलेला अगदीच एकटा नव्हता. यंत्रातली एक बाई त्याला दिशा दाखवीत पुढे नेत होती. मात्र, अचानक काही न सुचल्याप्रमाणे ती गप्प झाली. कानातल्या संगीतातला ठरावीक काळानं होणारा तिच्या बोलण्याचा व्यत्यय बंद झाला. तो लक्षात येईपर्यंत चढाव जवळ जवळ संपला होता. स्वतंत्रपणे रस्ता शोधायचा सराव नसल्यानं तो गडबडला. त्यानं थांबून यंत्राशी खुडबूड केली एक-दोनदा आणि चालत नाही म्हटल्यावर तो भांबावला. त्यानं कानातलं संगीत बंद केलं. प्रथमच सभोवार पाहिलं. दिसणाऱ्या दृश्यातलं सौंदर्य अन् भव्यता त्याच्या नजरेत भरली. एरवी त्यानं चटाचट फोटो काढायला सुरुवात केली असती; पण आता ते सुचेना. त्यानं परत एकदा यंत्राशी खुडबूड करीत पुढची वाट शोधण्याचा प्रयत्न केला. पण चेटूक केल्याप्रमाणे ती यंत्रातली बाई बोलेनाशी झाली होती. यंत्र बंद करून चालू केलं असताही जेव्हा ती बोलेना, तेव्हा मात्र तो चिडला. अनेक संवेदनांना तो हीच प्रतिक्रिया देत असे. आवडती असल्यागत. चिडून झाल्यावरही वेळ उरला. आता वेळ मघाशी संगीत ऐकताना जात होता तसा जात नव्हता. हटवादीपणानं थांबून राहिल्यागत वाटत होता. मग अचानक त्याला कापूसडोक्याची आठवण आली. तो आणखी एक जण चढत होता. हसलाही होता दिसला तेव्हा. थांबला तो मधेच की इतक्या दूर त्याला यायचंच नव्हतं? कदाचित येत असेल मागून. आपण फार वेगाने चालतो. विचारासरशी त्यानं दोन पावलं मागं सरून उतरण न्याहाळली. त्या विस्तीर्णतेत लक्षवेधक दुसरं काही दिसेना. दिसणाऱ्या आसमंताचं काय करायचं ते न कळून तो खाली बसला. पाठीवरच्या पिशवीतून त्यानं एक पिशवीभर खाणं आणि बाटलीभर पाणी बाहेर काढलं. खाल्ल्यानं बरं वाटेल असं वाटून तो खाऊ लागला. अनेकदा काही सुचेनासं होताच तो खात असे. काहीच न सुचणं हे नित्याचं असल्यानं त्याला या अवस्थेचं नवल वाटलं नाही.

आता उतरणीखालून अंधार चढण चढू लागला होता. क्षितिजावरची रंगीत पखरण काळवंडायला लागली होती. पुरेसं सांजावलं तेव्हा विजेवर चालणारे असल्यागत रातकिडे कळ दाबली गेल्यासारखे एकसुरात किरकिरू लागले. खाल्ल्यावर तरतरी आली अन् त्याला पहिली कल्पना सुचली. एरवीही त्याला अनेक कल्पना स्फुरत. त्यातली एखादी निवडून डोक्यात घोळवत ठेवणं त्याला आवडत असे. त्यानं यंत्रातल्या माणसास त्या जागेचे अक्षांश-रेखांश विचारले. आभाळातल्या ताऱ्यांचा फोटो काढून यंत्राला रस्ता विचारला. उपलब्ध खाणं आणि पाणी यांची गणितं मांडून या निर्वाणीशी झगडण्याच्या आपल्या ताकदीचा अंदाज घेतला. उतरण उतरण्याचा मोह मात्र किती काळ मागे सारता येईल याचा त्याला अंदाज येईना.

इतक्यात जवळच हालचाल जाणवली म्हणून चपळाईनं त्यानं यंत्रातला दिवा पेटवून झोत फिरवला. त्या प्रकाशात धपापत चढून आलेला कापूसडोक्या दिसताच त्याला हायसं वाटलं. तो हसला. म्हणाला, ‘‘हाय!’’ कापूसडोक्यानं हात उंचावत प्रत्युत्तर दिलं अन् हुश्श करीत बसकण मारली. पहिल्यानं पाण्याची बाटली पुढे केली. दोन घोट पिऊन पुस्तकं वाचलेला माणूस स्थिरावला. तरुणानं खाण्याची पिशवी पुढे केली. ती नम्रपणे नाकारून तो म्हणाला,

‘‘आपण एकाच दिशेनं आलो.’’

‘‘मी मॅपप्रमाणे चालत आलो.’’

‘‘तसे सगळेच मॅपबरहुकूम चालतात. पण रस्ता चुकण्यातही गंमत आहे.’’

‘‘छे! जोखीम आहे त्यात.’’

‘‘होय. पण मॅपवर विश्वास ठेवण्यातही जोखीम आहे.’’

‘‘मी अनेकदा पडताळून पाहिलंय. त्यात जोखीम वाटत नाही.’’

‘‘मला हा अनुभव नाही. मी कायम सोबतीने चालत आलो.’’

कापूसडोक्याची धाप एव्हाना थांबली होती. तो पुढे म्हणाला,

‘‘तुमची-माझी गाठ पडणं हा नियतीचा भाग असावा. तुमची चाल पाहून मी तुम्हाला गाठण्याचा विचारदेखील करू शकलो नव्हतो. मात्र, तुम्ही चढणीकडे वळलात तेव्हा मला मागे यावंच लागलं. माझा-तुमचा संवाद होईल म्हणून नव्हे; पण कदाचित तुम्हाला माझा उपयोग होईल असं वाटलं. प्रथमदर्शनीच मला तुमच्यातली ऊर्जा, वेगळेपण जाणवलं होतं. मी अनेक पुस्तकं वाचली आहेत. त्यातून अनेक अर्थाची उकल झाली, तशा अर्थहीन कहाण्याही वाचनात आल्या. त्यातलीच एक या चढणीचीही होती.’’

इथे दुसऱ्यानं अंधारात नजर ताणून बोलणारा माणूस पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारात उमटलेली गिजबीज आकृती वगळता काही दिसेना, तशी त्यानं दिवा पेटवण्याकरिता यंत्र उचललं.

त्याला थांबवत कापूसडोक्या म्हणाला, ‘‘यापुढचं कळायला या यंत्रातला प्रकाश पुरेसा नाही ठरणार कदाचित. तेव्हा त्यावर न विसंबता ऐका. मलाही गारगोटय़ा घासून जाळ पेटवता येतो. पण तुमच्या-माझ्यातला फरक ठळक होऊन तुम्हाला ऐकणं अवघड होईल त्यानं.’’ तरुणानं मग यंत्र बाजूला ठेवत पुढे ऐकण्याचा प्रयत्न केला.

‘‘या चढणीशी येऊन अनेक जण वाट चुकले आहेत. कुणी भ्रमिष्ट होऊन पलीकडच्या जंगलात विरून गेले, तर कुणी त्या कडय़ावरून स्वतला लोटून दिलं.. खालच्या अंधारात. मी तुमच्याएवढा असताना आलो होतो इथं. मला एक सावरीच्या कापसाचं डोकं असलेला वृद्ध भेटला खाली. तो हसला तसा मी थांबलो त्याच्यापाशी. वाकून नमस्कार केला. त्यानं माझी विचारपूस केली आणि रात्री पुढे न जाण्याचा सल्ला दिला. मी ऐकेना म्हणून त्यानं मला एक जुनी गोष्ट सांगीतली. मी रमलो त्यात. मग त्यानं मला अनेक पुस्तके असलेल्या खोलीत निजायला जागा दिली. आजवर मी ती पुस्तकं वाचत राहिलो. त्यात अनेक कहाण्या होत्या. माणसांच्या, जनावरांच्या, चमत्कारांच्या, ग्रह-ताऱ्यांच्या, चालीरीतींच्या अन् मानवी कल्पनांच्याही. काही लेखकांनी मानव्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला होता, तर काहींनी या जड विश्वाला कस्पटाहून अधिक किंमत दिली नव्हती. वाचलं ते सारं ज्ञान आहे असं वाटून चढण चढायची गरज सरली. उतरणीवर बसून मग मी केस पांढरे करीत राहिलो. तुमच्याआधी आलेले सारेच खाली निजले आहेत. पुस्तकांच्या खोल्यांतून. माझ्यापाशी न थांबता पुढे येणारे तुम्ही वेगळे आहात. तुम्ही चढण चढली आहे. आता पुढे जाण्याचे कर्तव्य तुमच्या पदरी आले आहे.’’

कापूसडोक्याला धाप लागली. तो श्वासाकरिता बोलायचा थांबला तेव्हा तरुणानं म्हटलं, ‘‘मी निरुद्देश भटकत आलो आहे. मी कोणासही उत्तरदायी नाही.’’

‘‘अशा अश्राप निर्व्याजतेच्या भाळीच अज्ञाताचा अंधार विंचरण्याचे लिखित लिहिलेले असते. तेव्हा तडक निघा.’’

बहरहाल, इतके बोलून तो वृद्ध शांत बसला. त्याच्या पायाशी गोष्ट ऐकत बसलेले शेरडीच्या कोकरागत उधाणलेल्या मनाचे अनेक तरुण अंधारानं भारल्यागत गोठून गेले होते. मग एका अर्धपिकल्या केसांचे डोके असलेल्या माणसाने हलकेच हसून म्हटले, ‘‘चला, गोष्ट संपली.’’

तशी कळ दाबल्यावर चालणाऱ्या यंत्रागत ते तरुण पुस्तकांनी भरलेल्या खोल्यांकडे निजायला गेले.

girishkulkarni1@gmail.com