नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन या माध्यमांतून आपला कलात्मक ठसा उमटविणाऱ्या सई परांजपे यांचे आपल्या कारकीर्दीचे सिंहावलोकन करणारे साप्ताहिक सदर..
पुणे केंद्राच्या ‘बालोद्यान’ या मुलांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी सात-आठ नाटके लिहून झाली होती. ती बहुतेक सगळी मौज प्रकाशनाने प्रकाशित केली. त्यातली चारएक नाटके आकाशवाणी सप्ताहात निमंत्रितांच्या उपस्थितीत मंचावरून सादर करण्यात आली. मात्र, प्रचंड मेहनत घेऊन बसवलेल्या या नाटुकल्यांचा अवघा एकच प्रयोग होई. त्यातून भूमिका करणारी मुले हिरमुष्टी होत. पालक विचारीत, ‘हे काय? महिनाभर तालीम करून एकच प्रयोग..?’ मग मलाही वाटू लागले की, गणित कुठेतरी चुकते आहे!
नाटकाची तालीम हा एक अद्भुत अनुभव होता. मला स्वत:ला सख्खे भावंड नसल्यामुळे की काय, ‘बालोद्यान परिवार’ मला फार जवळचा वाटे. बालकलाकारांची निवड करण्यापासून ते प्रयोगाच्या दिवशी त्यांना सजवण्यापर्यंतच्या सगळ्याच जबाबदाऱ्या आव्हानकारक वाटत. तालमीच्या दरम्यान मुलांमध्ये रोज होणाऱ्या स्थित्यंतरांचा प्रत्यय मोठा विस्मयकारक होता. स्वच्छ शब्दोच्चार, संवादाची अचूक फेक, हालचालींमधला नेमकेपणा, चालण्यातला डौल, भावनांचा संयम, सहकलाकारांबरोबर देवाणघेवाण.. उत्तम नट व्हायला आवश्यक असलेल्या या सर्व कसोटय़ांचे मर्म जाणून ते प्रत्यक्षात उतरवणे हे सोपे नव्हते. पण केवळ उत्साहाच्या जोरावर मुलांनी ते तंत्र आत्मसात केले. मुलं किती भराभर शिकतात, जरा वाव मिळाला की त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे बहराला येते, त्यांचा आत्मविश्वास कसा बळावतो, याचे प्रात्यक्षिक या उपक्रमातून पाहायला मिळाले. नाटकासाठी मुलांकडून जेवढे मागितले, त्याच्या दामदुपटीने त्यांनी दिले. मग त्यांचा हा उन्मेष एका प्रयोगापुरताच मर्यादित ठेवायचा?
पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ या हौशी नाटय़संस्थेत मी अधूनमधून काम करीत असे. तिचे म्होरके प्रा. भालबा केळकर वाडिया कॉलेजात केमिस्ट्री शिकवीत. त्यांचे नाटय़प्रेम सर्वश्रुत होते. भालबा पी.डी.ए.चे सर्वेसर्वा होते. पण त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे वयातले अंतर जाणवत नसे. पी.डी.ए.मध्ये अरुण जोगळेकर आणि अण्णा राजगुरू यांची ओळख झाली. पुढे दोस्ती! ‘एकुलत्या एकच’ प्रयोगाबद्दलची माझी व्यथा मी त्यांच्याजवळ बोलून दाखवली. पुण्यात त्याकाळी मुलांचे नाटय़गुण विकसित करण्यासाठी काहीच तजवीज नव्हती. त्याबद्दल काही करावे.. काय करावे, याबद्दल आमची बरीच चर्चा झाली. त्यातून एक शक्कल निघाली व ‘बालरंगभूमी’ची संकल्पना उगम पावली. हौशी, हुशार आणि उत्साही मुलांना घेऊन पुण्यात मुलांची नाटके नियमितपणे पेश करायची! म्हणजे नाटय़शिक्षण आणि मनोरंजन हे दोन्ही हेतू साध्य होतील. त्या वयात विचार डोक्यात आला की तो कृतीत उतरवायला वेळ लागत नसे. हाताशी शंभरएक मुलं तयार होती. हक्काची नाटकंपण उपलब्ध होती. अरुणने आणि मी आळीपाळीने दिग्दर्शन करायचे आणि अण्णाने व्यवस्था पाहायची असे ठरले. पी.डी.ए.चा व्यवहार तो अतिशय कुशलतेने सांभाळायचा. गोपीनाथ तळवलकर (नाना) आणि भालबांना आम्ही अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होण्याची गळ घातली. ती त्यांनी मान्य केली. मग अण्णा व्यवस्थापक आणि अरुण आणि मी सचिव असे ठरून आम्हा पाचजणांची कार्यकारिणी स्थापन झाली आणि आम्ही मिळून ‘बालरंगभूमी, पुणे’चा संकल्प सोडला.
पहिलेच नाटक ‘पत्तेनगरीत’ करायचे ठरले. एक तर त्यात चित्रविचित्र पोशाख, नाच, गाणी, कटकारस्थान, नाटय़मय घटना, इ. मसाला होता आणि मुख्य म्हणजे वीस-पंचवीस मुलांना त्यात वाव होता. अरुणचा मित्र वसंत नूलकर याचा सदाशिव पेठेमधला आलिशान वाडा तालमींना मिळाला. वासुदेव पाळंदे, अरविंद साने, तारा केळकर, मीरा रानडे असे अनेक मित्रमैत्रिणी मदतीसाठी उभे ठाकले. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अरुणचा मोठा भाऊ अशोक जोगळेकर आणि बाळ सप्रे यांनी उचलली. ते आमचे लक्ष्मीकांत-प्यारेलाल! नूलकर वाडय़ातच त्यांनी दोन झकास गाणी रेकॉर्ड केली. हे इथवर सगळे सुरळीत चालले. पण जेव्हा कपडेपट- म्हणजे ‘पत्ते’ बनवायची वेळ आली, तेव्हा आमचे खाड्दिशी डोळे उघडले. नुसत्या उत्साहाने थोडेच भागणार होते? संस्था चालवायला, नाटक बसवायला आर्थिक पाठबळ नको का? नशिबाने स्टेजवर बावन्न पत्ते अवतरत नाहीत. कथानक बदामनगरीत घडते तेव्हा ते तेरा पत्ते आणि जोकरच काय ते समोर येतात! शेवटी जेव्हा तह होऊन चारी राजांमध्ये समेट घडून येतो तेव्हा मात्र उरलेले तीन राजे आपापल्या राण्या आणि सेवक दुऱ्र्या यांना घेऊन उपस्थित होतात आणि सगळे मिळून गाणे म्हणतात. तेव्हा एकूण बावीस-तेवीस जोडपत्ते (मागचे-पुढचे दोन्हीकडचे) बनवायचे होते. त्यासाठी प्रचंड प्रमाणावर बक्रम (ताठपणासाठी) आणि हरक (झिलईसाठी) लागणार होते. ते आणायचे कुठून? त्या काळात ऊठसुठ स्पॉन्सर गाठायची प्रथा नव्हती. आमचा प्रश्न आम्हीच सोडवायचा होता.
तो प्रश्न आम्ही सोडवला. एका सकाळी लक्ष्मी रोडकडे मी धाव घेतली. नैतिक बळ हवे म्हणून सोबत मीरा.. माझी प्रिय मैत्रीण आली. कापड आणि साडय़ांच्या या बाजारपेठेत एकाहून एक शोभिवंत दुकाने रांगेत उभी होती. धीर करून एका मोठय़ा दुकानात आम्ही शिरलो. मी दुकानमालकाला नाटकाची संकल्पना सांगितली. मग आमची मागणी सांगितली. एका दमात- ‘‘इतके मीटर बक्रम आणि इतके मीटर हरक.. आणि हो, प्रयोग झाल्यानंतरच हिशेब चुकता करू. एका रकमेत.’’ मग गंभीर चेहरा करून मी माझे नाव सांगितले आणि मी रँग्लर परांजप्यांची नात असल्याचा अगदी सहजच उल्लेख केला. माझ्यापेक्षाही गंभीर चेहरा करून दुकानमालक म्हणाले, ‘‘कापड घेऊन जा ना. रँग्लरसाहेबांचं नाव काढल्यावर कोण नाही म्हणणार? दुकान आपलंच आहे. पैसे कुठे पळून जातात?’’ आणि मग त्या भल्या गृहस्थाने ठाणच्या ठाण कापड आमच्या हवाली केले. नाटक चालले नाही तर पैसे कुठून परत करायचे, हा विचारदेखील माझ्या मनाला शिवला नाही.
रंग, टर्पेंटाइन, ब्रश, इ. जमवायला त्रास पडला नाही. जुनी डबडी स्टोव्हवर चढवून त्यात सरस उकळून ‘पक्का गोंद’ करण्याचा आमचा ‘कारखाना’ मात्र सुरू झाल्या झाल्याच बंद पडला. जनावराच्या कातडीचा असा काही दरुगध आसमंतात पसरला, की आमची डब्यांसह पुरुषोत्तमाश्रमातून हकालपट्टीच करण्यात आली. मग आमचा एक ‘पत्ता’ (वसंत पाळंदे- बदाम सत्त्या) मदतीला धावून आला. आमच्या हलाखीचे रसभरीत वर्णन करून त्याने आपल्या आईला आमच्या चळवळीत सामील करून घेतले. पाळंदेवाडय़ाचे दरवाजे आम्हाला खुले झाले आणि सरलताई आमची आश्रयदाती ठरली. मग दिवसा आपापल्या नोकऱ्या, संध्याकाळी तालीम आणि रात्री सरलताईंकडे पत्ते बनविणे- असा क्रम चाले.
आमचे नशीब बलवत्तर म्हणून ‘पत्तेनगरीत’चा शुभारंभाचा प्रयोग दणकेबाज झाला आणि नाटक पुढे छान चालले. भारताचे तेव्हाचे माहिती आणि नभोवाणी खात्याचे मंत्री बाळकृष्ण केसकर प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. पहिल्या प्रयोगाला आप्पा (रॅंग्लर परांजपे) कौतुकाने नातीचे नाटक पाहायला आले. अर्थात तिच्या रंगभूमीच्या सेवेमध्ये आपला केवढा मोठा हातभार आहे, याची त्यांना कधीच कल्पना आली नाही. लक्ष्मी रोडवरच्या दुकानदाराला मानाचे आमंत्रण होते. आभार प्रदर्शनातदेखील त्यांचा अगत्यपूर्ण उल्लेख (तपशील न देता) केला आणि कबूल केल्याप्रमाणे त्यांचे कर्ज एकरकमी फेडले. सुदैवाने आमच्या ‘बालरंगभूमी’ला पुन्हा उधारी करावी लागली नाही. ‘पत्तेनगरीत’च्या एका प्रयोगाला पंडित नेहरू आले होते. त्यांना यशवंतराव चव्हाण आग्रह करून घेऊन आले होते. चाचा नेहरूंच्या स्नेहभेटीमुळे बालरंगभूमीचा खूप बोलबाला होऊ लागला.
‘पत्तेनगरीत’च्या प्रयोगाला जेवढे नाटय़ स्टेजवर होत असे, तेवढेच आत मेकअप् रूममध्येही घडत असे. नाटकातल्या मुलांची वये वेगवेगळी होती. राजा, राणी, एक्का, गुलाम- १४ ते १६ वर्षांचे, तर दुऱ्र्या-तिऱ्र्या ७-८ वर्षांच्या. राजा प्रवेश करी तेव्हा त्याचा सेवक दुव्व्या त्याची लफ्फेदार झूल हातात धरून मागून येई. मोठय़ा थाटात ही एंट्री होत असे. बदाम र्दुीचे काम करणारा छोटा उदय भलताच अचपळ होता. सारखा कुठे कुठे पळून जाई. लपून बसे. त्याला मी बजावलं की, ‘नाटक सुरू होईपर्यंत आपल्या राजाची झूल केप धरून त्याच्याबरोबर राहायचं. केप झूल सोडायची नाही.’ अध्र्या-एक तासाने रडवेला राजा माझ्याकडे आला. मागे झूल पकडलेला दुव्वा होताच. ‘‘अगं ताई, मला बाथरूमला जायचं आहे. काही केल्या हा माझा केप सोडत नाहीए. तू सांगितलं आहेस म्हणतो.’’
नाटकाच्या शेवटी इतर तिन्ही दुऱ्र्या आपापल्या राजांबरोबर येत. त्यांच्यात किती राजकारण चालावे? कारण तिघांना ‘चौकट तर्िी’ व्हायचे असे. लाल शर्ट, लाल टोपी आणि गालाला लाली! तिच्यामुळे इस्पिक आणि किलवर दुऱ्र्या बिचाऱ्या निष्प्रभ वाटायच्या. अनेक वेळा प्रयोगाच्या आधी रुसारुसी, भांडणे, रडारड होत असे. एक-दोन वेळा पालकही या कारस्थानामध्ये सामील झाले. शेवटी आम्ही एक निर्णय घेतला. आळीपाळीने प्रत्येकाला चौकट र्दुीचा मान द्यायचा. एका छोटय़ाने या मखलाशीचे फार सुंदर वर्णन केले- ‘‘ताईने आम्हा तिघांना पिसलं!’’
मुलांसाठी लिहिलेली फार थोडी नाटके तेव्हा उपलब्ध असत. त्यामुळे साहजिकच हाताशी असलेली माझीच बालनाटके बसवली गेली. ‘जादूचा शंख’, ‘शेपटीचा शाप’, ‘झाली काय गंमत!’, ‘सळो की पळो’, ‘भटक्याचे भविष्य’ ही नाटके आम्ही बसवली. या साऱ्या अभियानात केवळ माझीच नाटके मंचावर येत आहेत, याचे कुठेतरी वैषम्य वाटत राहिले. पण बालनाटकांचा तेव्हा प्रचंड अभाव होता. नंतर पु. ल. देशपांडय़ांचे बहारदार ‘वयं मोठं खोटम्’ आणि मालतीबाई दांडेकरांचे ‘सोनेरी नदीचा राजा’ ही बालनाटके करायचा योग जमून आला.
पुण्याला आमचे ‘चिल्ड्रन्स थिएटर’ गाजत होते तेव्हाच मुंबईत सुधा करमरकरच्या ‘लिट्ल थिएटर’चे प्रयोगही जोशात चालू होते. त्यांची संस्थाही मुलांची नाटके बसवीत असे. त्यांच्या नाटकांतून मोठी माणसे काम करीत. प्रेक्षक काय तो बालवर्ग! आमचा ‘बालरंजन’ आणि ‘बालनाटय़शिक्षण’ असा दुहेरी हेतू असल्यामुळे आमच्या नाटकांतून मुलांनाच सामावलेले असे. या दोन्ही संस्थांमधला हा मूलभूत फरक होता. काही हितचिंतकांनी आमच्यात वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही दोघी सुज्ञपणे आपापले काम करीत राहिलो. पुढे तीसएक वर्षांनी सुधाने माझ्या ‘माझा खेळ मांडू दे’ या (मोठय़ांच्या) नाटकात मामीची अप्रतिम भूमिका केली. बरोबर काम करायला आम्हा दोघींना मजा आली.
मुलांना शिकवता शिकवता त्यांच्याकडूनच खूप शिकायला मिळाले. नाटक लिहिताना किंवा ते बसवताना त्यांची निरागस वृत्ती कायम डोळ्यांसमोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला. सतत सहवासामुळे त्यांच्या चैतन्याचा परीसस्पर्श निश्चितच आमच्या सर्व कलाकृतींना लाभला.
‘बालरंगभूमी’च्या रंगमंचावर किती गुणी मुले चमकली त्याची गणती नाही. त्यातल्या कित्येक ‘मुलां’शी आजही माझा संपर्क आहे. सुहास जोशी  (बदाम राणी) हिने पुढे माझ्या ‘सख्खे शेजारी’मधील कृष्णा गाजवली. मोहन आगाशे (लाकडदंडय़ा). त्याने ‘प्याराना’ या माझ्या हिंदी टेलिनाटिकेत राजाचे फर्मास काम केले. बाबा महाडिक (भोपळा) पुढे यशवंत दत्त म्हणून मराठी रजतपटांत चमकला आणि अकाली गेला. ज्योत्स्ना चिटणीसने (किरपेकर) लंगडय़ा निरुपमाची भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकली आणि पुढे बरीच वर्षे मुंबईत दूरदर्शन निवेदिका म्हणून तिने कारकीर्द गाजवली. सुदर्शन आठवलेने (कावळा, बदाम गुलाम) उत्कृष्ट भूमिका करण्यात नाव कमावले. आता तो रिटायर झाल्यावर नावाजलेल्या इंग्रजी ग्रंथांचे मान्यवर प्रकाशकांसाठी मराठी भाषांतर करण्यात गर्क आहे. (गंमत म्हणजे मी पाहुणी संपादिका असलेल्या १७ फेब्रुवारीच्या ‘लोकसत्ता’मध्ये त्याचा छानसा लेख आहे.) सुरेंद्र अकोलकर (बदाम एक्का) याने पुढे स्वत:चा वाद्यवृंद जमवून नाव कमावले. अशी किती नावे आठवावीत? बाबी- ज्ञानदा माडगूळकर, अविनाश बोडस, सुरेंद्र साठे, अनुराधा रानडे, प्रकाश रत्नपारखी, चिऊ विंझे, रश्मी इंगळहळ्ळीकर, उदय कारखानीस.. अधूनमधून बँकेत, बाजारात किंवा एखाद्या कार्यक्रमात कुणी अनोळखी वाटणारा भेटतो आणि मग तो ‘जवळचा’ असल्याचा प्रत्यय येतो. एकदा एअरपोर्टवर एक इसम भेटला. डोळ्याला जाड चष्मा. डोक्याला चकचकीत टक्कल. ‘‘ताई ओळखलं? मी सी.टी.त होतो.’’ खूप धन्य वाटले. (आणि म्हातारेपण!)
‘बालरंगभूमी, पुणे’चे अभियान म्हणजे एक अखंड मेजवानी होती. बालप्रेक्षकांना, बालकलाकारांना आणि अर्थात आम्हालाही! पण क्वचित सुग्रास आंबेमोहोर भातामध्ये एखादा खडा निघतोच. एक कटू आठवण नमूद करते. ‘शेपटीचा शाप’च्या तालमी नूलकर वाडय़ात चालू होत्या. राजा आणि त्याची नवरत्ने यांच्या करामतींवर आधारीत ते नाटक होते. अरुण दिग्दर्शक होता. राजाचे काम करणारा मुलगा अतिशय समर्थ नट होता. त्याचे आजोबा एकेकाळचे विख्यात नट होते. ‘‘थेट आजोबांची आठवण करून देतो,’’ असे जाणकार बुजुर्ग त्याची तालीम पाहून म्हणायचे. गंमत अशी, की तालमीनंतर दोन-तीन दिवस मुलं घाईघाईने त्याच्या घरी जाऊ लागली. मग हळूहळू कळू लागले की, या मुलाचे वडील सगळ्या मुलांची मीटिंग घेत होते आणि त्यांनी ‘बालरंगभूमी’कडे पैसे मागितले पाहिजेत, असा धडा त्यांना देत होते. गंमत म्हणजे या गृहस्थांचे ‘क्लासेस’ असत. एकेक करून मुलांनी या सभांना जाणे बंद केले आणि आमच्याजवळ दिलगिरी व्यक्त केली. प्रयोग दोन दिवसांवर आला होता. राजाचे काम करणारा हा बहाद्दर ऐनवेळी येणार नाही असे आम्हाला कळले. त्यांचे म्हणणे : ‘ताई-दादा टॅक्सी घेऊन आमच्या दारात आले पाहिजेत!’ राजाचे काम सर्वात मोठे आणि महत्त्वाचे होते. त्याखेरीज मुख्य नाटकाच्या जोडीला ‘पक्ष्यांचे कविसंमेलन’ हे छोटे नाटुकलेही ठेवले होते. त्यात त्याचीच घुबडाची भूमिका होती. म्हणजे या एका मुलाच्या दोन भूमिका! मोहन आगाशेने पळापळ करून रवींद्र दामले या आपल्या मित्राला धरून आणले. घुबडाला फारसे संवाद नव्हते. ते मंचावर झोपूनच असे. पण त्याला क्लिष्ट काव्यपंक्ती म्हणायच्या होत्या. रवींद्रने एका दिवसात झकास घुबड- क्लिष्ट पंक्तींसह उभे केले. राजाची भूमिका अरुणने स्वत: केली. The show must go on. मुलांच्या नाटय़क्षेत्रात असे कृष्णकारस्थान घडावे ही खेदाची गोष्ट होती. त्या मुलाला आणायला आमची टॅक्सी काही गेली नाही.
फ्लॅश फॉरवर्ड.. सुमारे दहा-पंधरा वर्षे लोटली.
तेव्हा मी पुण्यातच होते. तोवर माझे थोडे थोडे नाव होऊ लागले होते. दाराची घंटा वाजली. एक गुबगुबीत तरुण दारात उभा होता. म्हणाला, ‘सांगण्यासारखी चांगली आठवण नाही; पण मी ‘शेपटीचा शाप’मध्ये होतो.. म्हणजे नव्हतो!’ झाल्या प्रकाराबद्दल माफी मागून माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा त्याने प्रकट केली. मला त्याच्या वृत्तीचे कौतुक वाटले. त्याला मी काम दिले असते; पण तसा योग आला नाही, हे खरे.
अचानक दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची जाहिरात पाहण्यात आली. मी अर्ज केला. माझी निवड झाली. आणि मी दिल्लीला कूच केले.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”