बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या नाटय़संमेलनाचा रिपोर्ताज..
१२-१२ -१२! कॅलेंडरमध्ये शतकातून एकदाच येणारी ही दुर्मीळ त्रिरुक्ती. महाराष्ट्रदेशी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोघांच्याही राजकारणाची सूत्रे हलविणारे केन्द्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा वाढदिवसही योगायोगाने याच तारखेला आल्याने यंदाचे नाटय़संमेलन त्यांच्या ‘बारा’मतीत घेण्याचे सर्वानुमते ठरले. त्याचे पडघम गेले वर्षभर वाजत होते. पवारांच्या वाढदिवशी- म्हणजे १२ तारखेलाच ते व्हावे असे आधी घाटत होते. परंतु काही कारणाने ते पुढे गेलं आणि मग संमेलन नाही, तरी त्या दिवसापासून १२ दिवस हा संमेलनोत्सव बारामतीत साजरा करण्यात आला. त्याची सांगता मुख्य नाटय़संमेलनाने झाली.
या संमेलनाची अनेक वैशिष्टय़ं सांगता येतील. कधी नव्हे ते नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांची निवड एकमताने आणि नाटय़ परिषदेच्या तीन-तीन शाखांच्या शिफारशीने झाली. अर्थात त्यामागचं रहस्य नाटय़संमेलनात शरद पवार यांच्या उद्घाटकीय भाषणात उघड झालं. साहित्य आणि नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षांची निवड ही त्यांच्या त्या क्षेत्रातील कामगिरीचा गौरव असल्याने एकमतानेच व्हायला हवी, असं शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितलं. त्याचीच ही परिणती होती. दुसरं म्हणजे गेल्या वर्षीपासून नाटय़ परिषदेनं प्रायोगिक व समांतर धारेतील रंगकर्मीना मुख्य नाटय़प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक जे प्रयत्न चालवले आहेत, त्याचाही हा भाग होता. मात्र, डॉ. आगाशे यांनी, आपल्याला अध्यक्षपदी आपली निवड झाल्याचे लेखी कळविण्यात आलेले नाही, असं सांगून संमेलनात नाराजी व्यक्त केली. पण याच डॉ. आगाशेंनी पत्र न मिळताही अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबईत मध्यवर्ती नाटय़ परिषदेने केलेला सत्कार स्वीकारला होता आणि नाटय़संमेलनाचंही अध्यक्षपद भूषवलं. हे त्यांना कसं काय चाललं? असो.
डॉ. मोहन आगाशे यांनी गेल्या ९२ वर्षांची नाटय़संमेलनाध्यक्षांच्या लिखित भाषणाची परंपरा मोडीत काढून प्रथमच उत्स्फूर्त अध्यक्षीय भाषण केलं, हीसुद्धा एक ऐतिहासिक घटना म्हणता येईल. मात्र, त्यांच्या भाषणात समांतर नाटय़धारेत केलेल्या प्रदीर्घ मुशाफिरीचं आणि त्यातून निर्माण झालेल्या नाटय़विषयक  विचारांचं चिंतन असेल असं वाटलं होतं. परंतु त्यांनी अशा सखोल चिंतनाकडे पाठ फिरवत नाटय़विषयक किस्से, आठवणी आणि त्यातून भौतिक जगण्यात झालेले लाभ कथन करण्यातच धन्यता मानली. मराठी रंगभूमीवर व्यावसायिक आणि हौशी असे दोनच प्रवाह असल्याचं अज्ञानमूलक विधानही त्यांनी बेधडक केलं. त्यांच्या या विधानाचा दुसऱ्या दिवशीच्या एका परिसंवादात प्रा. वामन केंद्रे यांनी खरपूस समाचार घेतला. डॉ. आगाशे यांचे हे म्हणणे आपल्याला बिलकूल मान्य नाही, असे सांगून केंद्रे म्हणाले की, ‘दलित रंगभूमी ही काही हौस नसते, ती शोषितांच्या वेदनेची मांडणी असते. पथनाटय़ ही हौस कशी काय ठरू शकते? तसंच प्रायोगिक-समांतर रंगभूमीवर नाटक करताना ती हौस कशी काय असू शकते? काहीएक ध्यास घेऊन नाटक करणारी ही मंडळी असतात. मराठी रंगभूमीला राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली ती या ध्यासाच्या रंगभूमीनेच! तेव्हा सरसकट सगळ्या नाटय़प्रवाहांचे असे ‘हौसी’करण करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी दिला.
‘शिक्षणामुळे समाजात विघटनाची प्रक्रिया सुरू होते. त्यातून निर्माण होणारे डॉक्टर्स, इंजिनीअर्स किंवा तत्सम व्यावसायिक आपापल्या संस्था-संघटना करून आपल्या हक्कांसाठी कंपूशाही करतात. त्यातून समाजात फूट पडते. पण कला आणि कलाकार हे मात्र लोकांना एकत्र आणण्याचं काम करतात,’ हे डॉ. आगाशे यांचे म्हणणे मात्र कुणालाही पटण्यासारखंच आहे.
संमेलनाचे उद्घाटक शरद पवार यांनी आपल्या भाषणात रंगभूमी आणि नाटक यावरच संपूर्णपणे भर दिला. रंगभूमीवर भरीव योगदान देणाऱ्या नाटय़कर्मीचं कार्यकर्तृत्व पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहचविण्यासाठी ते धडधाकट असतानाच त्यांची प्रदीर्घ मुलाखत आणि त्यांच्या गाजलेल्या भूमिका ध्वनिचित्रबद्ध कराव्यात, राज्यातील विविध विद्यापीठांमधील नाटय़शास्त्र विभागांना शासनाने भरघोस मदत करावी, रंगभूमीवर विनोदी नाटकांबरोबरच गंभीर आणि आशयपूर्ण नाटकंही सादर व्हावीत, कलावंतांनी अल्पसंतुष्ट न राहता आपलं अवकाश अधिक व्यापक करावं, त्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचीही मदत घ्यावी, आदी सूचना त्यांनी केल्या.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या स्वागतपर भाषणात कलावंतांना आणि नाटय़ परिषदेला चांगलंच फैलावर घेतलं. ज्यांच्या जिवावर तुम्ही मोठे होता, त्या रसिक प्रेक्षकांची उपेक्षा करून केवळ पैसा आणि प्रसिद्धी यांच्याच मागे धावणाऱ्या आणि नाटय़संमेलनाकडे पाठ फिरवणाऱ्या कलाकारांना त्यांनी फटकारले. अशा कलावंतांवर नाटय़ परिषदेने कडक कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. नाटय़-व्यावसायिक आणि नाटय़ परिषदेसंबंधातील अनेक तक्रारींना त्यांनी वाचा फोडली. दोन वर्षांमागे रत्नागिरीच्या नाटय़संमेलनात जाहीर केलेल्या पाच कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानाच्या विनियोगासंबंधात नाटय़ परिषदेने अद्यापि कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अनेकांना परिषदेकडून संमेलनाची निमंत्रणे पाठवली गेली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. परिषदेच्या अशा ढिसाळ कारभारावर त्यांनी कोरडे ओढले. त्याचप्रमाणे नाटय़निर्माते प्रयोगाच्या तारखांचा जो काळाबाजार करतात त्याबद्दलही त्यांनी त्यांना खडे बोल सुनवले. शासकीय अनुदानावर किती काळ नाटक तगवणार, असा सवाल करून त्यांनी- गावागावातल्या सामान्य रसिकांपर्यंत जोवर नाटक पोहोचत नाही, तोवर त्यांना लोकाश्रय मिळणार नाही आणि ते स्वत:च्या पायांवर उभे राहू शकणार नाहीत, अशा कानपिचक्याही दिल्या. समारोपाच्या भाषणात मात्र त्यांनी ‘जो जे वांछिल ते तो लाभो’ या उक्तीनुसार मुंबईत गेल्यावर नाटय़-व्यावसायिकांच्या अडीअडचणी आणि समस्यांची तड लावण्याकरता एक बैठक बोलावून आगामी अर्थसंकल्पात त्या सोडविण्यासाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन दिले.
नाटय़ परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात अजितदादांच्या या फटकारण्याचे स्वागत करून, नाटय़ परिषद यातून योग्य तो बोध घेईल आणि आपल्या कार्यपद्धतीत उचित सुधारणा करील, अशी जाहीर हमी दिली.
बारामतीच्या या नाटय़संमेलनाची बारामतीकरांनी जरी जय्यत तयारी केली असली तरी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र समन्वयाचा अभाव असल्याने कलाकार आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना काही अडचणींचा सामना करावा लागला. मुंबईच्या पत्रकारांना संमेलनाची कार्यक्रमपत्रिकाही संमेलन संपण्याच्या दिवशी मिळाली. त्यामुळे कुठल्या सभागृहात वा मंडपात कुठले कार्यक्रम आहेत, त्यात कोण कोण सहभागी होणार आहेत, याचा थांगपत्ता लागत नव्हता. नेहमीप्रमाणेच परिसंवादांतील वक्त्यांनाही आपल्या सहभागाबद्दल नाटय़ परिषदेकडून नीट माहिती न दिली गेल्याने प्रत्येक ठिकाणी गोंधळ होत होता. सगळ्याच परिसंवादांमध्ये निम्म्याहून अधिक वक्ते अनुपस्थित होते. नाटय़ परिषदेने किमान परिसंवादांच्या आयोजनाची तरी जबाबदारी व्यवस्थित पार पाडायची! पण तेही त्यांना धड जमले नाही.
‘मराठी नाटकातील स्त्रियांचे स्थान’ या विषयावरील परिसंवादात सहभागी बहुतेक सर्व स्त्री-कलावंतांनी विहित विषयाऐवजी आपापल्या आत्मकथनाचंच पुराण लावलं.  दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनीच काय तो या विषयाचा सर्वागीण, पण धावता आढावा घेतला. नव्या पिढीतील एकही तरुण स्त्री-रंगकर्मी या चर्चेत वा चर्चेस उपस्थित नव्हती.
तीच रडकथा ‘जुन्या नाटकांची निर्मिती : यशाची खात्री की अपयशाच्या भीतीतून सुटका?’ या परिसंवादाची! ज्यांनी हा ट्रेण्ड सुरू केला, ते सुनील बर्वे आणि निलम शिर्के हे दोघेही या चर्चेला गैरहजर होते. त्यामुळे निर्माते अनंत पणशीकर आणि उदय धुरत यांना आपापसात ही लढाई लढावी लागली. ‘नाटय़संपदा’चे अनंत पणशीकर यांनी ‘आर्थिक यशाची हमी’ या कारणास्तव आपण जुन्या नाटकांची निर्मिती करीत असल्याचे साफ नाकारले. ‘माझ्या घडणीच्या काळात ज्या संगीत नाटकांनी मला आनंद दिला, ती नाटके आपण नव्याने सादर करावीत, या उद्देशाने आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये चांगल्या नाटकांचा अंतर्भाव व्हावा म्हणून आपण ‘लग्नाची बेडी’, ‘वाऱ्यावरची वरात’ आणि ‘लेकुरे उदंड जाली’ या जुन्या नाटकांची निर्मिती केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुन्या नाटकांच्या निर्मितीत यशाची हमखास हमी असते, ही समजूतही चुकीची आहे, हे नीलम शिर्के यांनी काढलेल्या जुन्या नाटकांच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवरून लक्षात येईल, असे ते म्हणाले.
‘एकेकाळी गाजलेली आणि एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचलेली नाटके पुनरुज्जीवित करताना ती त्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाहीत,’ असा आक्षेप घेत निर्माते उदय धुरत यांनी जुन्या नाटकांच्या निर्मितीमागे केवळ आर्थिक यशाची हमी हेच एकमेव कारण असल्याचे ठासून सांगितले. ‘जुन्या नाटकांची निर्मिती करणाऱ्यांना कुठल्याही गोष्टीची रिस्क घ्यायची नाहीए. रंगभूमीवर त्यांनी कुठली तपश्चर्या केलेली नाही. जुन्या नाटकांच्या निर्मितीमुळे मराठी रंगभूमी एक पाऊलही पुढे सरकत नाही. केवळ नाववाल्या कलावंतांना घेऊन जुन्या, यशस्वी नाटकांची पुनर्निर्मिती करण्यात या निर्मात्यांचे कसले आले आहे कर्तृत्व?,’ असा बोचरा सवालही धुरत यांनी केला. जे प्रस्थापित निर्माते अशी जुनी नाटके काढत आहेत, त्यांच्यावरही धुरत यांनी टीका केली. ‘तुम्हाला जर नव्या, चांगल्या संहिता मिळत नसतील तर नाटक काढू नका; थांबा,’ असा सल्लाही त्यांनी दिला. पुनरुज्जीवित नाटके पाहणारे जुने-जाणते प्रेक्षक त्यांच्याबद्दल असमाधान व्यक्त करतात, असेही ते म्हणाले. ‘जुन्या नाटकांच्या निर्मितीत कमी धोका असला तरी धोका नसतोच असे नाही. आणि पूर्वी एखादे नाटक गाजले होते, विशिष्ट उंचीवर गेले होते म्हणून नवीन मंडळींनी ते करूच नये असे नाही. अण्णासाहेब किलरेस्करांचे नाटक त्यांच्या हयातीत एकाच वेळी तीन-तीन संस्था करीत होत्या,’ असा दाखला भरत नाटय़ संशोधन मंदिराचे रवींद्र खरे यांनी दिला. कुठल्याही कारणाने का होईना, जुन्या नाटकांची पुनíनर्मिती होत आहे; त्यामुळे आपला समृद्ध नाटय़वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
‘मराठी रंगभूमी नव्या नाटकाच्या शोधात’ या परिसंवादात अभिनेत्री सविता मालपेकर यांना आयत्या वेळी निमंत्रित करण्यात आल्याने त्यांनी या विषयावर कोणतेही मतप्रदर्शन करण्यास साफ नकार दिला. तर निर्मात्या लता नार्वेकर यांनी चांगल्या नव्या संहिता मिळणे आज दुरापास्त झाले असल्याचे स्वानुभवावरून सांगितले. ‘आज चांगले लेखक पैशांसाठी सीरियल्सकडे वळले आहेत आणि तिथे ते शेंडाबुडखा नसलेले एपिसोड्स लिहित आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या चोखंदळ निर्मात्यांचे वांधे झाले आहेत. या लेखकांनी पैशाचा मोह टाळून रंगभूमीशी बांधीलकी राखावी,’ असे आवाहन नार्वेकर यांनी केले. त्याचवेळी, ‘व्यावसायिक गणिते बांधल्याशिवाय नाटक करता येत नाही,’ याचीही त्यांनी कबुली दिली. ‘रंगभूमी ही मुळात नटाची निर्मिती आहे. लेखक-दिग्दर्शक ही संकल्पना सुरुवातीला अस्तित्वातच नव्हती. परंतु आजचा बेजबाबदार नट हे साफ विसरून गेला आहे,’ असे सांगत नाटककार जयंत पवार म्हणाले की, ‘आज मराठी रंगभूमी स्वप्रेमाच्या कोशातच मग्न झाल्याने ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकलेली नाही. गेल्या पावणेदोनशे वर्षांच्या मराठी रंगभूमीच्या वाटचालीत निरनिराळ्या नाटककारांनी केलेल्या योगदानाचा आणि त्यांच्या नाटय़कृतींच्या दर्जाचा त्यांनी सडेतोड लेखाजोखा मांडला. ‘मराठी नाटक जीवनाभिमुख आहे, असा जो भ्रम आपण कायम जोपासलेला आहे तो साफ चुकीचा आहे. आपले नाटक हे शब्दबंबाळ आणि ‘स्थळ : दिवाणखाना’ या चौकटीतच बंदिस्त झालेले आहे. आपण स्थलरचनाच अशी करून ठेवली आहे, की इथे काही वेगळे ‘प्रयोग’ केले तरीही ते वेगळे वाटत नाही. त्याकरता प्रोसेनियमच्या बाहेर नाटक आणायला हवं. त्याचबरोबर जोवर  आपली आपल्या मातीशी, आपल्या जगण्याशीच नाळ जुळत नाही, तोवर नवे, वेगळे नाटक निर्माण होणार नाही,’ असे परखड मत ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. वामन केंद्रे यांनी व्यक्त केले. ‘आपले नाटक शहरांपुरतेच- म्हणजे शहरी, नागर जाणिवा आणि संवेदनांपुरतेच सीमित झालेले आहे. त्यात आपल्या मातीची संवेदना जोवर प्रकट होत नाही तोवर नवे, जोरकस, सशक्त नाटक निर्माण होणार नाही,’ असे ते म्हणाले. तर नाटककार गिरीश जोशी यांनी ‘पूर्णवेळ उपजीविकेसाठी नाटय़लेखनावरच अवलंबून असणाऱ्याला आपल्या रंगभूमीच्या मर्यादा लक्षात घेऊनच कुठलेही नाटक लिहावे लागते. परिणामी नव्या ‘प्रयोगां’वर काहीशी बंधने येतात. त्यामुळे या बंधनांशी सामना करत वेगळे नाटक लिहिण्याची कसरत माझ्यासारख्या लेखकाला करावी लागते,’ अशी कबुलीही जोशी यांनी दिली. ‘पूर्वी समांतर रंगभूमीवर काही वेगळे ‘प्रयोग’ करणे शक्य होत होते. परंतु आता तिथेही कलावंतांची अनुपलब्धता यांसारख्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे,’ असेही ते म्हणाले.
या सर्व परिसंवादांचा साकल्याने विचार करता ते एक ‘उरकणे’ होते असेच म्हणावे लागेल. बाकी मग बारामतीकरांनी मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह परिसंवादांनाही भरभरून गर्दी केल्याचे सुखद चित्र दिसत होते. निमशहरी आणि ग्रामीण भागांतील लोकांच्या कलेच्या आणि सांस्कृतिक भुकेचा अनुशेष किती तुंबला आहे, हे यावरून लक्षात येते.
नाटय़ परिषदेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यासाठीही काहींनी या संमेलनाचा उपयोग केला. नाटय़ परिषद खुल्या, मोकळ्या विचारांची होत असल्याचे काही अंशी जाणवत असले तरी त्यादृष्टीने अजूनही बरीच वाटचाल करायची बाकी आहे. येत्या काळात नाटय़ परिषदेत सत्तेवर येणाऱ्या नव्या मंडळींकडून हे चक्र अधिक गतिमान होते, की पुन्हा परिषद आपल्या जुन्याच कोशात जाते, ते आता लवकरच कळेल.