नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

पारंपरिक नाटय़संगीत हे १९७० पर्यंत मराठी रंगभूमीवर दिमाखाने वावरत होतं. त्याच सुमारास पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी मराठी संगीत रंगभूमीवर आपली छाप पाडायला सुरुवात केली होती. नाटय़संगीत म्हणजे नुसतं गाणं न राहता अभिव्यक्तीला तेवढंच स्थान असलं पाहिजे, या मतावर अभिषेकीबुवा ठाम होते. त्यामुळे त्यांनी रचलेली गाणी ही शास्त्रीय संगीत आणि भावसंगीत यांचा सुवर्णमध्य गाठणारी होती. ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड जाली’, ‘हे बंध रेशमाचे’ यांसारखी नाटकं त्या काळात मराठी नाटय़संगीतात मोठं स्थित्यंतर घडवून गेली. पण त्याचबरोबर प्रायोगिक नाटय़चळवळीनेही जम बसवायला सुरुवात केली होती. त्यात एक प्रमुख नाव होतं ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’- म्हणजेच पीडीए. पुढे याच संस्थेतून फुटून बाहेर पडलेल्या काही नाटय़वेडय़ा कलावंतांनी एकत्र येऊन स्वत:ची एक नाटय़संस्था घडवली- ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’! पीडीए आणि नंतर थिएटर अ‍ॅकॅडमीने १९७२ साली मराठी रंगभूमीवर अतिशय दिमाखात एक नाटक सादर केलं.. ज्याने मराठी संगीत रंगभूमीला एक अत्यंत नवं आणि लोभसवाणं रूप प्राप्त करून दिलं. ते नाटक होतं विजय तेंडुलकर लिखित आणि डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘घाशीराम कोतवाल’! आणि ‘घाशीराम’च्या संगीताचं शिवधनुष्य उचललं होतं ज्येष्ठ संगीतकार आणि संगीतज्ज्ञ पंडित भास्कर चंदावरकर यांनी.

१९९४ च्या सुमारास माझी आणि भास्करजींची ओळख झाली. ‘घाशीराम कोतवाल’चं  पुनरुज्जीवन करण्याचा बेत पुण्यातील एका नाटय़संस्थेने आखला होता आणि त्या प्रयोगामध्ये हार्मोनियम वाजविण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. नाटकाच्या तालमीदरम्यान मी भास्करजींना खूप जवळून पाहिले. अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्त्व, ज्याला आपण Baritone म्हणतो असा आवाज आणि एकूणच जगभरातल्या संगीतप्रकारांचं, नाटकांचं आणि चित्रपटांचं सखोल ज्ञान असल्यामुळे चेहऱ्यावर आलेलं एक प्रकारचं तेज यामुळे त्यांच्याविषयी थोडीशी पहिल्यांदा भीती वाटली. परंतु नंतर जसजशी ओळख वाढली, तसं हे दडपण कमी झालं आणि जो स्नेहभाव निर्माण झाला, तो पुढील १५ वर्षे कायम टिकला. नंतर त्यांच्याबरोबर मी अनेक चित्रपटांकरता काम केलं. आणि दरवेळी त्यांच्या प्रतिभेमुळे आम्ही सर्व कलाकार अत्यंत अवाक् होत असू.

भास्करजी हे मूळचे सतारवादक होते. पंडित रविशंकर यांच्याकडे त्यांनी सतारीचं शिक्षण घेतलं होतं. त्यांच्या सतारवादनाच्या मैफली मी फार ऐकल्या नाहीत; परंतु रेकॉर्डिगच्या आधी जेव्हा कुठली चाल ऐकायला मी त्यांच्याकडे जात असे तेव्हा ते सतारीवर चाल वाजवून दाखवत. इतर बऱ्याच संगीतकारांबरोबर मी काम केलं, पण ते सर्व हार्मोनियमवर स्वत: गाऊन चाल समजावून सांगत. परंतु भास्करजी सतारीवर चाल वाजवायचे. आणि तेसुद्धा न गाता! मग मीच ते शब्द त्या चालीवर म्हणून बघायचो आणि पुढचं काम सुरू होत असे. या त्यांच्या सवयीची मला खूप गंमत वाटायची. मात्र त्यामुळे संगीत संयोजकाला रेकॉर्डिगच्या आधी पूर्ण गाणं शब्दांसकट आणि चालीच्या बारकाव्यांसकट पाठ असे. रेकॉर्डिगच्या वेळेस या गोष्टीचा खूप फायदा होई.

खरं तर भास्करजी या विषयावर लिहिणं ही अत्यंत कर्मकठीण गोष्ट आहे. माझ्या पाहण्यात एवढा विस्तृत संगीतानुभव असलेला माणूस दुसरा कोणीही नाही. ‘घाशीराम कोतवाल’च्या वेळेस हा अनुभव मी पुरेपूर घेतला. तसं पाहता  ‘घाशीराम कोतवाल’ हे मराठी पाश्र्वभूमी असलेलं, इतिहासातला एक संदर्भ असलेलं नाटक होतं. त्यामुळे या नाटकात मराठी लोकसंगीत पुरेपूर भरलेलं होतं. नाटक आरंभापासून अंतापर्यंत मराठी संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांत गुंफलेलं होतं. संगीत नाटकात संगीत एवढं अर्थवाही असू शकतं, याचं एवढं प्रत्यंतर मला त्याआधी कधीही आलं नव्हतं. ‘श्री गणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी’ या नांदीवजा पदाने या नाटकाची सुरुवात होई आणि अत्यंत लोभसवाणी वळणं घेत हे नाटक आपल्याला संगीताच्या माध्यमातून पूर्ण गुंतवून ठेवत असे. या नाटकाला प्रामुख्याने मराठी संगीताचा कणा असला, तरीही त्यात पाश्चात्त्य हार्मनी आणि विविध ध्वनींचा फार अफलातून प्रयोग भास्करजी आणि आणि डॉ. जब्बार पटेल या जोडीने केला होता. ‘राधे कृष्ण हरी मुकुंद मुरारी’सारखा गजर वेगवेगळ्या चालींत वापरून भास्करजींनी या नाटकाला एक थीम बहाल केली होती. ‘सख्या चला बागामधी’सारखी लावणी ‘मालिक की मोहब्बत को’सारखी कव्वाली, वेगवेगळ्या भारुडाच्या आणि गोंधळाच्या चाली, कोकणातील दशावताराचा केलेला प्रयोग, उत्तर हिंदुस्थानी उपशास्त्रीय ठुमरीचा केलेला चपखल वापर.. हे सगळं अतिशय अजब होतं. परंतु माझ्या मते, या नाटकातील संगीताचा कळसाध्याय काय असेल, तर तो म्हणजे ‘प्रीतीचिया बोला’ आणि ‘रंगमहाली शेज सुकली’ या कीर्तनाचं आणि लावणीचं केलेलं फ्युजन. हास्यरस, बीभत्सरस, शृंगाररस, भय आणि करुणा यांचा संगीताद्वारे केलेला इतका अफाट आविष्कार माझ्या पाहण्यात मराठीमध्ये तरी निदान विरळाच.

‘घाशीराम’बरोबरच भास्करजींच्या अफाट सांगीतिक प्रतिभेचा एक आविष्कार म्हणजे आरती प्रभू यांच्या कवितांवर आधारित रंगमंचीय प्रयोग.. ‘नक्षत्रांचे देणे’! अमोल पालेकर, मोहन गोखले, नरेंद्र पटवर्धन, चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, माधुरी पुरंदरे, रंजना पेठे, आनंद मोडक, श्रीकांत पारगावकर यांच्यासारख्या मातब्बर कलावंतांना सोबत घेऊन ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम सादर झाला होता. हा प्रयोग प्रत्यक्ष बघण्याचं भाग्य मला लाभलं नाही, पण त्याची ध्वनिफीत नंतर मला ऐकायला मिळाली. ती ध्वनिफीत ऐकून आम्ही अक्षरश: वेडे झालो होतो. काव्यगायनाचं इतकं सुंदर आणि सकस सादरीकरण होऊ शकतं यावर आमचा विश्वासच बसेना! पडदा उघडल्यापासून तो पडेपर्यंत फक्त आरती प्रभूंच्या कविता.. बाकी दुसरे काही नाही! कधी गद्यात, तर कधी पद्यात. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, लोकसंगीत अशा सर्व प्रकारांचं केलेलं अभूतपूर्व असं मिश्रण त्या प्रयोगात होतं. हा कार्यक्रम पुन्हा सादर करण्याचा प्रयत्न आम्ही काही मित्रांनी केला. पण काही कारणास्तव तो पूर्णत्वास गेला नाही याची आज राहून राहून रुखरुख वाटते.

भारतातल्या विविध भाषांमध्ये आणि एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध रंगमंचीय प्रयोगांमध्ये भास्करजींनी विपुल संगीतरचना केल्या. हिंदीमध्ये त्यांनी ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूं आता है’, ‘खंडहर’ आणि ‘थोडासा रूमानी हो जाये’ यांसारख्या चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केलं. मराठीतही त्यांनी चित्रपटांकरता मोजकं काम केलं. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा चित्रपट म्हणजे जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’! ‘या टोपीखाली दडलंय काय’सारखं विनोदी पद्धतीचं गाणं या चित्रपटात आहेच; परंतु सगळ्यात नावाजली गेलेली गाणी म्हणजे रवींद्र साठे यांचं ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ आणि लताजी यांनी गायलेलं ‘सख्या रे, घायाळ मी हरिणी..’ एकूणच चालीची धाटणी, त्यावर केलेला वाद्यवृंदाचा अप्रतिम वापर आणि गायकांची केलेली निवड या गोष्टींमुळे ही गाणी त्याकाळच्या इतर गाण्यांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने उठून दिसतात. रवींद्र साठे यांचा आवाज समकालीन मराठी गायकांपेक्षा अतिशय वेगळा वाटतो आणि एक निराळ्या पद्धतीचं भावप्रदर्शन या गाण्यामधून होतं. आरती प्रभूंच्या शब्दांना अजून कुठला आवाज एवढा न्याय देऊ शकला असता असं वाटत नाही.  ‘सख्या रे, घायाळ मी हरिणी’ या गाण्यात तर विविध रागांचा ज्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे तो प्रकारच एकमेवाद्वितीय आहे. क्षणाक्षणाला कल्याण थाटातून पुरिया धनाश्री, पुरिया धनाश्रीतून तोडी आणि तोडीतून परत येणारा कल्याण! हे इतके भिन्न प्रकृतीचे राग एका गाण्यामध्ये आले आहेत. आणि त्यातून जो एक भांबावलेपणाचा मिश्र भाव निर्माण झाला आहे त्याला खरोखरीच तोड नाही. ही दोन्ही गाणी मराठी चित्रपटांमध्ये अढळ पद मिळवून बसली आहेत. इथे ज्येष्ठ संगीत संयोजक एल्लूँ ऊंल्ल्री’२ यांचाही उल्लेख आवर्जून करायला हवा. इतर वेळेस राम कदम यांच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीचं संगीत संयोजन करताना इथे त्यांच्यातला एक वेगळाच पैलू आपल्यासमोर येतो. ‘सामना’ या चित्रपटाबरोबरच ‘गारंबीचा बापू’ या चित्रपटाचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. यातसुद्धा रवींद्र साठे यांनी गायलेलं ‘अजब सोहळा’ हे अतिशय विलक्षण गाणं आहे. परंतु माझ्या मते, खरे भास्करजी अजून कुठल्या गाण्यात आपल्याला दिसत असतील, तर ते सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या ‘सांज आली दूरातून’ या गाण्यामध्ये! विविध कोमल स्वरांचा अचानक केलेला वापर यामुळे या गाण्यात जो परिणाम साधला गेला आहे तो विस्मयकारक आहे. एकूणच या सर्व गाण्यांमध्ये Mandolin आणि String section चा जो परिणाम आहे, तो या गाण्यांना त्याकाळच्या इतर गाण्यांपेक्षा वेगळी उंची प्राप्त करून देण्यास मदत करतो.

भास्करजी यांच्याबरोबर मी पाच-सहा चित्रपटांमध्ये संगीत संयोजक म्हणून काम बघितले. असा जगातला कुठलाही विषय नाही, ज्यातलं ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं. संगीत, नाटक, चित्रपट, पाककला, चित्रकला, शिल्पकला, प्राचीन व अर्वाचीन इतिहास, विविध भाषा आणि त्यातील साहित्य.. असं काहीही! आणि या सगळ्या विषयांवर ते भरभरून बोलत. मात्र, प्रत्यक्ष रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये तिथल्या तांत्रिक गोष्टींमध्ये ते फार रमत नसत. खरं तर त्याच्यातलीही त्यांना भरपूर माहिती होती. पण एकदा चाल झाली की ते पुढचं सर्व काम मलाच करायला सांगत. निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांनाही ते सांगत की, ‘नरेंद्र करतोय ते बरोबर आहे. मी त्यात फारसे बोलणार नाही.’ ते स्टुडिओमध्ये कन्सल्टंटची भूमिका बजावायचे! रेकॉर्डिगच्या वेळेस येणाऱ्या समस्यांच्या trouble shooting मध्ये त्यांना फार रस नव्हता. सतारीवर ऐकवलेली चाल आणि प्रत्यक्ष तयार झालेले गाणे या पूर्ण प्रवासामध्ये ते शांतपणे स्टुडिओमध्ये जे चाललंय ते बघत बसत. आमचं काही चुकत असेल तर तेवढय़ापुरतंच ते बोलत. तशा अर्थाने ते एक जातिवंत शिक्षक होते आणि त्यातच त्यांना पुरेपूर समाधान मिळत असे.

‘श्वास’,‘सरीवर सरी’,‘माती माय’ आणि ‘बयो’सारख्या चित्रपटांकरिता त्यांच्याबरोबर काम करून मला खूप शिकायला मिळालं. आणि एक लक्षात आलं, की भास्करजी हे नुसते संगीतकार नव्हेतच; त्यांच्यामध्ये तेवढय़ाच ताकदीचा दिग्दर्शक, लेखक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जागतिक स्तरावरचा musicologist दडलेला आहे. आणि आता असं वाटतं की, त्यांच्याबरोबर अजून दहा-पंधरा वर्षे काम करायला मिळायला हवं होतं. त्यातून एक संगीतकार म्हणून माझा जो फायदा झाला असता त्याची गणतीच करता येणार नाही. पण तरीही जेवढी वर्षे मला त्यांचा सहवास लाभला तो खूप समृद्ध करणारा होता.. खूप घडवणारा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सुखावणारा होता.