अनुवादाचं काम हे दोन भाषांत पूल बांधण्यासारखं असल्याची दाद नेहमी मिळतच असते.. पण द्वैभाषिक लेखक असणं आणखी निराळं. दोन्ही भाषांत अस्सलपणानेच लिहिण्यासाठी पूल नाही वापरता येत. त्या-त्या भाषेची उंची गाठण्यासाठी आपणच घाट शोधावे लागतात आपल्या लिखाणाचे.. शांता गोखले यांनी एक द्वैभाषिक लेखिका म्हणून मुंबईतल्या ‘टाटा लिटलाइव्ह’ साहित्योत्सवात प्रतिष्ठेचा कारकीर्द-गौरव पुरस्कार स्वीकारला, त्यानंतर त्यांनी उलगडलेलं द्वैभाषिकतेचं इंगित, आजच्या ‘इंग्रजी की मराठी?’ या दुविधेपासून दूर नेणारं..

कारकीर्द गौरव किंवा जीवन गौरव अशा स्वरूपाचा हा पुरस्कार स्वीकारताना, माझे जवळचे मित्र सत्यदेव दुबे यांची आठवण येणं अटळ आहे. एका सांस्कृतिक संस्थेनं दुबेंना जेव्हा जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा केली तेव्हा ते अस्वस्थच झाले. उसळून म्हणाले, ‘‘माझं आयुष्यभराचं काम/ जीवनकार्य संपलंय का? त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे?’’

‘‘तसं नाही दुबे, त्यांच्या पुरस्कार देण्याचा हा अर्थ नाही. तुम्ही आयुष्यभर जे काम करत आलात, ते यापुढेही असंच सुरू ठेवा, असं त्यांना म्हणायचं आहे,’’ असं सांगून आम्ही दुबेंना शांत केलं. मला मिळालेल्या या पुरस्काराकडेही मी तसंच पाहते.

मी दोन भाषांमध्ये लेखन कसं करते? द्वैभाषिकता कशी काय जमते? असे प्रश्न मला जेव्हा जेव्हा विचारले गेले, तेव्हा बहुतेकदा मी हसून मोघम उत्तर देऊन विषयांतर केलंय. किंवा उत्तराची गाडी मोठय़ा रस्त्यावर नेऊन, घरची भाषा आणि जागतिक भाषा दोन्ही कशा महत्त्वाच्या आहेत याची कारणं वगैरे सांगण्याकडे वळले आहे. अरुण कोलटकर या पक्क्या मुंबईकर कवीनं हा प्रश्न अतिशय दिमाखात आणि चपखलपणे हाताळला आहे. अत्यंत निर्वकिार चेहऱ्याने ते म्हणत असत, ‘‘त्याचं असं आहे, माझ्याकडे दोन टोकं असलेली पेन्सिल आहे.’’ त्यांचे मित्र वृंदावन दंडवते यांनी एकदा गमतीनं त्यांच्या त्या पेन्सिलचं चित्र काढलं. तिच्या एका टोकाला लिहिलं- ‘इंग्रजी या बाजूने’.. तर दुसऱ्या टोकाला लिहिलं- ‘मराठी या बाजूने.’ खरं तर सहज गंमत म्हणून  काढलेलं हे चित्र आता ‘बॉम्बे मॉडर्न : अरुण कोलटकर अँड बायिलग्वल लिटररी कल्चर’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर झळकतं आहे. एकेकाळी या शहरात खरोखरीच द्वैभाषिक साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण होतं. अरुण कोलटकरांशिवाय माझ्या पिढीतली द्वैभाषिक साहित्यिकांची नावं आठवायची झाल्यास मला चार तरी महत्त्वाची नावं प्रामुख्यानं आठवतात- दिलीप चित्रे, विलास सारंग, गौरी देशपांडे आणि किरण नगरकर. तरीही या द्वैभाषिक साहित्यिक कामगिरीमुळे लोक चक्रावून जातातच. उदाहरणार्थ, ‘‘तुम्ही मराठीत लिहिता तेव्हा इंग्रजीत विचार करून मग त्याचं मराठीत भाषांतर करून लिहिता का?’’ असा प्रश्न मला विचारला गेला होता. इंग्रजी ही माझी नैसर्गिक भाषा आहे आणि मराठी भाषेत लिहिण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागतात, असं गृहीतच धरणारा प्रश्न होता तो!

एक अनुवादक म्हणून भाषांतर करणं हे किती दमवणारं काम आहे, याची मला कल्पना आहे. अशा वेळी सरळ घास घेणं शक्य असताना मी कानामागून घास घेणं का पत्करेन? लेखक जोसेफ कॉनरॅड पोलिश होते. त्यांनी फ्रेंच भाषेवर प्रभुत्व मिळवलं, पण लेखनासाठी मात्र इंग्रजी भाषा निवडली. त्यावेळी ‘‘कॉनरॅडनं पोलिश भाषेत विचार केला, विचारांची जुळवाजुळव फ्रेंचमध्ये केली आणि ते लिहिलं इंग्रजीत.’’ असं निरिक्षण त्यांचे मित्र आणि चरित्रकार ह्य़ु वेलपोल यांनी नोंदवलं. त्यावर व्यथित झालेले कॉनरॅड त्यांच्या ‘विचित्र’ इंग्रजीत म्हणतात, ‘‘ हे विचार करण्यासारखं आहे का? ज्याच्याकडे थोडीशी प्रतिभा असेल त्याने क्षणभर तरी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करण्यासारख्या, पुरती दमछाक करणाऱ्या गोष्टीवर विचार करावा, हे कसं काय जमेल?’’

त्यामुळे मी जेव्हा माझ्या दोनपैकी एका भाषेत लिहिते, तेव्हा त्याच भाषेत लिहीत असते. एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत अनुवादित करण्याची प्रक्रिया मनातल्या मनात समांतरपणे सुरू नसते. दोन्ही भाषांना नेहमीच त्यांच्या त्यांच्या जागी अगदी काटेकोरपणे ठेवते, एकमेकांत मिसळू देत नाही.

एकदा तर मला आणखी एक अतिरेकी प्रश्न विचारला गेला होता- मी दोन भाषांमध्ये लिहिण्याच्या फंदातच कशाला पडते- असा तो प्रश्न माझ्या शाळेतल्या मित्रानं विचारला होता. मी इंग्रजीत उत्तम लिहू शकत असताना आणि लिहिलेलं असतानाही मराठीत का लिहिते? असं त्याला म्हणायचं होतं. ‘‘मराठी ही नोकरांची भाषा आहे,’’ असं तो बेदरकारपणे बोलूनही गेला. अर्थात तो काळ भावना दुखावण्याचा वगैरे नव्हता, त्यामुळे पाचपोच नसलेलं हे त्याचं बोलणं खपूनही गेलं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी माझ्या स्नेह्यंच्या एका किशोरवयीन मुलाशी बोलत होते. हा मुलगा म्हणाला, ‘‘इंग्रजी ही विचारांची देवाणघेवाण करण्याची भाषा आहे, हिंदी ही प्रेम व्यक्त करण्याची भाषा आहे आणि मराठी ही भंकस करण्याची भाषा!’’  त्याच्या पिढीच्या भाषिक उतरंडीची लख्ख कल्पना मला आली. माझ्या शाळा सोबत्याच्या म्हणण्यातला बेदरकारपणाचा भाग सोडला तर त्याच्याही म्हणण्यात काहीएक मुद्दा आहे. लेखकांच्या सर्वसाधारण सवयीबाबत बोलायचं झालं तर असं लक्षात येतं की, विशेषत: इंग्लंड आणि अमेरिकेत स्थलांतरित झालेले लेखक प्रामुख्यानं इंग्रजीतच लिहितात- ती त्यांनी कमावलेली भाषा आहे. मूळ भाषेत लिहिण्यापेक्षा ते इंग्रजीत लिहिणंच पसंत करतात. त्यापैकी बरेच जण त्यांना जे व्यक्त करायचं आहे, ते सगळंच इंग्रजीत लिहावं लागत असल्याने येणारी उद्विग्नताही व्यक्त करतात. त्यांच्या मातृभाषेला घरघर लागलीय, अशा जाणिवेतून मग ते मातृभाषा अधूनमधून वापरतात. कधी तरी स्पॅनिशमध्ये घेतली जाणारी शपथ किंवा बंगाली खाद्यपदार्थाची नावं वापरून त्यांच्या लेखनात रंगत आणतात आणि त्यातून त्यांची सांस्कृतिक- भाषिक मुळं वाचकांनाही कळतात. मात्र अशा लेखकांकडे- त्यांच्या मूळ देशांमध्ये तिथल्या संस्कृतींचे मारेकरी म्हणून पाहिलं जातं, हे यातनादायी आहे. जे मराठी लेखक इंग्रजीत लिहितात त्यांच्या बाबतीत हे महाराष्ट्रातही घडतं. माझ्यासारख्या मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिणाऱ्या लेखकांकडेही साशंकतेने पाहिलं जातं. मला आठवतं की, पुण्यात नाटय़समीक्षकांचं एक महत्त्वाचं चर्चासत्र झालं तिथं मला आमंत्रित केलेलं नव्हतं. त्यावेळी मराठी नाटकांच्या इतिहासावर मी लिहिलेलं संशोधनपर पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं असतानाही निमंत्रण नाही. तसंच, माझं बहुतांश सर्जनशील लेखन मराठीत असूनही मला आजवर कधीही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित केलं गेलेलं नाही. पण तरीही मी मराठीत का लिहिते, याचं उत्तर भाषिक राजकारण किंवा साहित्यिक वर्तुळात आपलं अस्तित्व ठसवणं हेही नाही. मी मराठीत लिहिते, कारण मला ही भाषा आवडते. लेखक शब्दांवर प्रेम करतो. शब्दांचे अर्थ, तसंच त्यांची गुंफण केल्यावर निर्माण होणारा नाद, लय, त्यातली काव्यात्मकता यांच्या एकत्रितपणे होणाऱ्या परिणामामुळे लेखक शब्दांवर प्रेम करतो. प्रत्येक भाषेचे स्वत:चे असे शब्द आहेत, त्या शब्दांना नाद, लय, स्वरांचा उतार-चढाव, ठहराव असतो. त्यामुळे दोन भाषांशी खेळण्याची संधी मला मिळत असताना, मी ती कशी गमावेन? दोन विभिन्न आणि देवाणघेवाण करणाऱ्या संस्कृतींचा भाग आपण होऊ शकतो, याचाही आनंद त्यातून मिळतो. मराठीत मी जे शब्द आणि वाक्प्रचार वापरते, ते सगळे या संस्कृतीतून आलेले असतात.

उदा. ‘माझी आजी नऊवारी नेसते.’ हे वाक्य इंग्रजीत ‘शी विल स्लिक अँड स्लॅप हर नाईन यार्ड सारी इंटु प्लेस’ असं लिहिता येईल. तर मराठीत ‘ती लुगडं चापून चोपून नेसते.’ असं लिहिता येईल. जेव्हा मी ‘लुगडं’ म्हणते तेव्हा माझ्या मराठी वाचकांना या वस्त्राची लांबी, त्याची वीण, विरोधी रंगसंगती असलेले त्याचे काठ, इ. बाबी चटकन समजतील. ‘चापून चोपून’ म्हटल्यावर माझी आजी किती कुशलतेने काम करत असेल, तिची देहबोली कशी असेल, हे वाचकांना कळतं. मोठय़ा कुटुंबातला पंचवीस माणसांचा स्वयंपाकही ती अगदी सहज एकहाती करू शकत असे.. ‘चापून चोपून’ या शब्दातून सूचित होणारे आशयाचे असे किती तरी पदर मराठी वाचकांना कळतील. मराठीमध्ये लिहिताना माझी पात्रं कोणत्या प्रादेशिक, सामाजिक परिवेशातून येतात, ते सांगण्याकरता मी विशिष्ट परिणाम साधणारे शब्द वापरू शकते. हेच सारं इंग्रजीतून लिहिलं तर त्यात सांस्कृतिक- प्रादेशिक अस्मितेच्या अनुषंगाने येणाऱ्या व्यक्ती- घटना विशेष हरवतील.

माझं हे म्हणणं मी लिहिलेल्या ‘रिटा वेलिणकर’ या मराठी कादंबरीच्या प्रवासातून नेमकं उलगडेल. या कादंबरीची सुरुवात करताना मी इंग्रजीत लिहीत गेले, कारण कादंबरी इंग्रजीत लिहिण्याची माझी इच्छा होती. चार प्रकरणंही लिहून झाली. ती वाचली तेव्हा रडकुंडीला येण्याइतकी ती कंटाळवाणी झाल्याचं माझ्या लक्षात आलं. सगळे शब्द रंगहीन, रुचीहीन, गंधहीन वाटत होते. मी कधीही कादंबरीकार होऊ शकणार नाही, असा निष्कर्ष त्यातून काढला आणि ती ३० पानं ठेवून दिली. पण मी जन्माला घातलेली पात्रं आणि त्यांची कथा माझ्या आत धुमसत राहिली. मग कधीतरी एके दिवशी, मी नोकरीनिमित्तानं ग्लॅक्सो कंपनीला जाणाऱ्या बसमधून रोजच्याप्रमाणे प्रवास करत असताना या कथेतली दोन पात्रं एकमेकांशी मराठीत वाद घालू लागली. त्यांना जे म्हणायचं आहे, नेमकं तेच ते बोलत आहेत, असं वाटत होतं. ती त्यांची भाषा होती. मला आश्चर्य वाटलं. घरी परतल्यावर काही मिनिटंच गेली असतील, मी लगेच लिहायला बसले. त्यांचा तो स्वत:कडे खेचून घेणारा संवाद झरझर लिहिताना मध्ये थांबलेच नाही. ही कादंबरी तुकडय़ा-तुकडय़ात लिहिली असली तरी त्यातलं  मराठी सुलभ आणि ओघवतं आहे. हवं तर तिला  इंग्रजीत सुरुवात करून थांबवलेली, नंतर मराठीत पूर्ण केलेली कादंबरी म्हणा. यादरम्यान काही काळ गेला असला तरी इंग्रजीतलं एकही प्रकरण मराठी कादंबरीत आलेलं नाही. त्यातला अगदी साधम्र्य असलेला आशय वेगळ्या प्रकारे मराठी कादंबरीत आला आहे, असंही घडलं नाही.

‘रीटा वेलिणकर’च्या बाबतीत जे झालं, त्यामुळे मला हमखास विचारल्या जाणाऱ्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर मिळतं. ‘‘कोणत्या भाषेत काय लिहायचं, हे मी कसं ठरवते?’’ हा तो प्रश्न. नवोदितांना मी सांगेन, रीटा वेलिणकर लिहिल्यानंतर मी मनाशी ठरवलं की, आपण मराठी कादंबरीकार आहोत- हे बरोबर असो की चूक. मग त्यानंतरची दुसरीही कादंबरी मी मराठीतच लिहिली आणि सध्या तिसऱ्या मराठी कादंबरीवर काम सुरू आहे. नाटकं मात्र मी दोन्ही भाषांमध्ये लिहिलेली आहेत. विषयाची गरज कोणत्या भाषेत लिहिण्याची आहे, यावर ते अवलंबून असे. माझी अलीकडची तीन नाटकं इंग्रजीत लिहिलेली आहेत, कारण ती राजकीय आहेत. आणि नाटय़वेडय़ा मराठी माणसानं भ्रष्टाचार, बलात्कारासारखे प्रश्न असलेल्या आणि खळबळजनक नाटकांशिवाय इतर राजकीय आशय असलेल्या नाटकांबाबत कधीही आस्था बाळगली नाही. सत्तर- ऐंशीच्या दशकात तेंडुलकर, एलकुंचवार, आळेकर यांनी घणाघाती प्रहार करणारी, विवादी नाटकं लिहिली, त्यालाही आता बराच काळ लोटला. आता मराठी माणसाला विनोदी आणि मध्यमवर्गीय दिवाणखान्यात विसावलेली नातेसंबंधांचे ताणेबाणे असलेली नाटकं आवडतात. तसं इंग्रजीतही सध्या राजकीय नाटकांची निर्मिती होत नाही, पण त्यांचे किमान रंगमंचीय अभिवाचनाचे कार्यक्रम तरी होतात. आणि माझ्या एका इंग्रजी नाटकाची प्रत्यक्षात निर्मिती होऊन त्याचे सहा प्रयोगही झाले आहेत.

आत्मकथनाच्या बाबतीत म्हणायचं तर ते मी इंग्रजीत लिहिलं. कारण तशी प्रकाशकांची मागणी होती. मी माझ्या वडिलांबद्दलही इंग्रजीत लिहिलं ते याच कारणामुळे. पण मी जेव्हा कधी आईबद्दल लिहीन, तेव्हा ते मराठीत लिहीन. एका प्रकाशकानं तशी विचारणाही केली आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे, आम्हा दोघींमधल्या संवादाची भाषा मराठी असताना, मी तिच्याबद्दल मराठीत लिहिलं नाही तर ती आमच्या नात्यातली विसंगती ठरेल. मराठीत लिहिल्यानं मला, ती वापरत असलेल्या म्हणींमुळे तिच्यासोबतच्या रोजच्या संवादात येणारा चटकदारपणाही मांडता येईल. एखाद्या केवळ बोलणाऱ्या माणसाचं वर्णन करताना ती सहज म्हणते, ‘हा/ ही कापल्या करंगळीवरही मुतणार नाही’ काहीच कृती न करणाऱ्या वाचाळवीरांसाठी ती वापरत असलेली ही म्हण मी दुसऱ्या भाषेत अनुवादित करणार नाही.

मोकळेपणाने सांगायचं तर, मराठी भाषेतल्या काव्यात्म शक्यतांइतकाच मला तिचा राकटपणा भावतो. भाषा ही- ती ज्या भूूमीतून जन्म घेते, त्याचं प्रतिबिंब असते. कठीण-काळी कुळकुळीत आणि केव्हा तरी कोवळी हिरवीगारही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातले मराठीतले प्रसिद्ध कवी गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी- यांनी लिहिलेल्या महाराष्ट्राच्या गौरवगीतात म्हणतात,

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा..

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा..

तर जन्मभर अशिक्षित राहिलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी जात्यावर पीठ दळताना गात असत-

‘‘फुलामधी समावला

धरत्रीचा परमय

माझ्या नाकाले इचारा

नथनीले त्याचं काय?’’

संत ज्ञानेश्वरांनी तर अमृत आणि मराठी भाषा यांच्या गोडीची स्पर्धा केली तर त्यात माझी मराठी जिंकेल, अशी पज लावली होती. माझी आजी, आई आणि आपल्या मराठी कवींनी निर्मिलेली भाषाच तर माझ्यात रुजली आहे. या भाषेत लिहिलं नाही तर तो नतद्रष्टपणा/ कृतघ्नपणाच ठरेल.

द्विभाषिक असण्याचे अनेक व्यावहारिक फायदे असतात. माझ्यासारख्या द्विभाषिक व्यक्तिमत्त्वांवर अनेक मानसशास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. द्विभाषिक व्यक्ती एक भाषक व्यक्तीच्या तुलनेत आजूबाजूला कितीही गोंगाट असला तरी आपल्या साथीदाराचं म्हणणं सुस्पष्टपणे ऐकू शकतात, असं एका संशोधनपर अभ्यासातून पुढे आलं आहे. तसंच एक भाषा जाणणाऱ्या व्यक्तीपेक्षा द्विभाषिक व्यक्ती नैतिक द्वंद्व सुरू असताना योग्य विचार करू शकतात. तर एकभाषक व्यक्तींच्या तुलनेत द्विभाषिक व्यक्तींना विस्मरणाचा आजार वयोमानानुसार तीन-चार वर्ष उशिराने होऊ शकतो, हे कॅनडातील वैद्यकांनी सिद्ध केलं आहे.

एका अमेरिकन संशोधन अभ्यासानुसार, द्विभाषिक व्यक्ती एकभाषक व्यक्तीपेक्षा वर्षांकाठी ३ हजार डॉलर्स अधिक कमवू शकतात, असंही वाचनात आलं. मला वाटतं, बहिणाबाई चौधरी आज असत्या तर त्यांनी म्हटलं असतं, ‘माझ्या बॅँकेले इचारा, अमेरिकेले त्याचे काय?’

या साऱ्यासह माझ्या सांपत्तिक वा ऐहिक ध्येयांचा विचार करता मी संत तुकारामांच्या बाजूची आहे, ते म्हणतात,

‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने

शब्दांचीच शस्त्रे यत्न करू

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन

शब्द वाटू धन जनलोकां

तुका म्हणे पाहा

शब्दचि हा देव

शब्देचि गौरव पूजा करू’

shantagokhale@gmail.com