News Flash

पुस्तक परीक्षण : सामान्यांचे जीवनचित्र

बोकील यांच्या कथालेखनात या व्यक्ती- त्या ज्या समाजाचा घटक असतात त्याच्यासह येतात. याचा अर्थ त्या प्रातिनिधिक स्वरूपात येतात असा मात्र नाही.

|| बाळकृष्ण कवठेकर

मिलिंद बोकील हे आजच्या काळातील मराठी साहित्यातील आघाडीचे कथात्म साहित्य प्रसवणारे लेखक. ‘झेन गार्डन’ हा कथासंग्रह व ‘शाळा’ ही कादंबरी या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या. या दोन्हींमुळे बोकील यांना मराठी साहित्यविश्वात प्रसिद्धी व प्रतिष्ठा या दोन्हींची यथार्थ प्राप्ती झाली. ‘रण’, ‘दुर्ग’, ‘समुद्र’ या त्यांच्या लघुकादंबऱ्याही चर्चेचा विषय ठरल्या. ‘पतंग’मध्ये विषयांची- खरे तर या संग्रहातील कथांमधील अनुभवांची विविधता हा या कथांचा महत्त्वाचा विशेष सहजच लक्षात येणारा आणि उल्लेखनीय असा आहे. विविध क्षेत्रांतील जीवनानुभव या संग्रहातील कथांमधून चित्रित झालेले आहेत. सामान्यत: नागर कथालेखक या अशा अनुभवांचे चित्रण करताना सहसा दिसत नाहीत. रिक्षाचालक व त्याची पत्नी- जिचा कामगार नवरा लाईटच्या खांबावरून खाली पडल्यामुळे अपंग झाला आहे व त्यामुळे कुटुंबाला जगवण्यासाठी अनोळखी भागात जाऊन देहविक्रय करून पैसे मिळवण्याचा मार्ग पत्करावा लागलेली एक कुटुंबवत्सल स्त्री, धुणीभांडी करणाऱ्या बायकांची भिशी व ती चालवताना त्यांना आपुलकीने मार्गदर्शन करणारी व एखादीच्या हातून गैर कृती घडली तर तिला सहानुभूतीने समजून घेणारी, सांभाळून घेणारी कौशल्याबाई, रंगकामाचे कसब असणारा, वेश्यावस्तीत जाणारा, त्याच्या ठरलेल्या बाईला तिच्या आजारपणात आर्थिक मदत करणारा पेंटर, ‘भेटायला’ येणाऱ्या त्याची येण्याची वेळ झाली तरी मुलगा घराबाहेर जात नाही हे पाहून अस्वस्थ होणारी आई, भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहातून शिक्षकाला चुकवून बाहेर पडून आपल्या पालाकडे जाऊ पाहणारा, पण तेथे गेल्यावर पालेच उठून कोणालाही माहिती नसणाऱ्या गावी गेल्याचे पाहून कमालीचा बेचैन झालेला व अखेरीस शिक्षकाबरोबर वसतिगृहाकडेच परतावे लागणारा मुलगा.. असे चाकोरीबाहेरचे अनुभवविश्व बोकील यांच्या कथांमधून जिवंतपणे चित्रित झालेले दिसते. हे या कथालेखनाचे उल्लेखनीय वैशिष्टय़.

एका व्यक्तीच्या जीवनचित्रणातून साकार होणाऱ्या या कथा त्या व्यक्तीला तर साकार करतातच, पण त्या ज्या जगण्याचा भाग असतात, ते जगणेही बारीकसारीक तपशिलांसह साकार करतात. रिक्षावाल्यांचे जग, कुंटणखाना, त्याची मालकीण, तेथे येणारे लोक, देहविक्रय करणाऱ्या बायका, त्यांचे प्रश्न, त्यांची अगतिकता, कुटुंब व पैसे मिळवण्यासाठी द्यावा लागणारा वेळ यांत त्यांची होणारी धावपळ, मानसिक ओढाताण यांचे संवेदनशील वाचकांना अस्वस्थ करणारे दर्शन बोकील या कथांमधून घडवतात. बोकील यांच्या समाजजीवनाच्या सूक्ष्म निरीक्षणक्षमतेचे दर्शन या कथांमधून पदोपदी घडते.

बोकील यांच्या कथालेखनात या व्यक्ती- त्या ज्या समाजाचा घटक असतात त्याच्यासह येतात. याचा अर्थ त्या प्रातिनिधिक स्वरूपात येतात असा मात्र नाही. त्या स्वत:चे असे एक व्यक्तिमत्त्व असणाऱ्या आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांचेच असे व्यक्तिमत्त्व प्रकट होते, हेदेखील बोकील यांच्या कथालेखनाचे उल्लेखनीय वैशिष्टय़ आहे.

‘लिंबू-मिरची’ ही या संग्रहातील अशीच आतापर्यंत मराठीत न आलेले जीवनचित्रण साकारणारी कथा. आजच्या प्रगत मानल्या जाणाऱ्या समाजात अंधश्रद्धा कशा मूळ धरून आहेत हे तर ही कथा दाखवून देतेच, पण त्याबरोबरच दर शनिवारी वा अमावास्येला लिंबू-मिरची विकणे हा काहींची उपजीविका चालवणारा व्यवसाय कसा असतो, तोही लहान वयाच्या मुलामुलींच्या हातून कसा चालवला जातो याचे अस्वस्थ करणारे चित्रण या कथेत करण्यात आले आहे. या संग्रहातील उत्तम कथांपैकी ही एक कथा आहे. मराठी कथालेखनात हा विषय बोकील यांनीच चित्रित केला असावा असे वाटते.

‘नोंद’ हीदेखील अशीच एक वेगळी कथा. समाजसेवी संस्थेबरोबर काम करणारा एक तरुण आणि एक स्वावलंबी तरुणी विवाह करण्यासंदर्भात एकमेकांना भेटतात. त्यांची होणारी चर्चा, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न, मुलगी ‘दाखवणे’, ‘पाहणे’ याला पर्याय.. तरुणी बुद्धिमान, समाजकार्याविषयी आस्था असणारी, पण ते करणारा तरुण नवरा म्हणून नको अशा मताची. संवाद, संभाषणातून साकार होणारी ही कथाही लक्षणीय. ती तरुणी लग्न करणे नाकारते, पण सेवाकार्याला आर्थिक मदत मात्र करते. हा सारा नाटय़पूर्ण प्रसंग बोकील यांनी अत्यंत संयमाने, पण या कथेतील आशयाच्या नाटय़पूर्णतेला कुठेही धक्का न लागू देता कथेत साकार केला आहे.

आणखी एका गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे, ती म्हणजे या कथांची भाषा. ती त्या- त्या आशयविश्वाची भाषा जशी असते, तशीच ठेवण्यात बोकील यशस्वी झाले आहेत. देहविक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या बायकांची भाषा त्या व्यवसायाच्या वस्तीत असणाऱ्या भाषेसारखीच. धुणीभांडी करणाऱ्या बायकांची- त्यांची असावी तशीच. त्या- त्या व्यवसायाच्या भाषा त्यांच्याच व्यवसायाची अस्सल भाषा असावी असे वाचकांना वाटणे, हेही बोकील यांचे मोठेच यश मानावे लागते.

आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे या कथांतील अगतिक होऊन अनैतिक मार्ग स्वीकारावा लागणाऱ्या स्त्रिया वा अन्य व्यक्तींविषयीचीही घृणा, चीड, तिरस्कार इत्यादी न वाटता त्यांच्याविषयी उलट करुणा वाटू लागते, हे बोकील ज्या वृत्तीने व जसे त्यांचे चित्रण करतात त्याचे यश मानावे लागते. वाचकांच्या मनातील करुणा जागवणं, हेही बोकील यांच्या कथालेखनाचं यश मानावं लागतं.

‘पतंग’ संग्रहातील बोकील यांच्या या कथा नेहमीपेक्षा वेगळे जीवनानुभव चित्रित करणाऱ्या असून, चांगल्या कथालेखनाच्या कसोटीवर पूर्णपणे उतरणाऱ्या आहेत, हे मान्य करूनही या कथा वाचताना मला तरी परिपूर्ण आनंद देऊ शकल्या नाहीत. असे का, याचा विचार करू जाता असे लक्षात आले की, याच प्रतीच्या कथा बोकील यांनी यापूर्वीही लिहिलेल्या आहेत. ‘झेन गार्डन’ या व अन्य संग्रहांतील कथा याच प्रतीच्या आहेत. अशाच बारीक बारीक तपशिलांतून व्यक्ती व समाजजीवन यांचं चित्र साकार करणं, असेच चाकोरीबाहेरचे विषय कथालेखनासाठी निवडणं, असंच कलात्मक यश प्राप्त करणं.. हाच धागा या कथांमध्येही आहे. प्रश्न हा आहे की, बोकील यांच्या पूर्वीच्या कथालेखनापेक्षा या कथा वरच्या पातळीवर गेल्या आहेत का? आणि या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागतं. मागील यशाची पुन्हा एकदा प्राप्ती करणं, कथांचा कलात्मक स्तर पूर्वीच्या तुलनेत खाली न जाऊ देणं हेच बोकील यांचं या संग्रहातील कथालेखनाचं यश मानावं लागतं. आणि मग श्री. पु. भागवत यांनी विद्याधर पुंडलिक यांना विचारलेला प्रश्न मिलिंद बोकील यांनाही विचारावा लागतो. तो असा- ‘बोकील, तुम्ही चांगले खूप लिहिलेत.. खूप चांगले कधी लिहिणार?’

‘पतंग’- मिलिंद बोकील,

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- १९६, मूल्य- २०० रुपये.  ६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 12:02 am

Web Title: biography of book examination commons akp 94
Next Stories
1 चवीचवीने.. : खार खुवा ओखोमिया
2 सदाबहार..
3 बुरा न मानो होली है..
Just Now!
X