News Flash

गुरुदत्तजींच्या आत्महत्येची बातमी धक्कादायकच होती..

‘वहिदा रहमान : हितगुजातून उलगडलेली’ या नसरीन मुन्नी कबीर लिखित आणि मिलिंद चंपानेरकर अनुवादित रोहन प्रकाशनाच्या आगामी पुस्तकात अभिनेत्री वहिदा रेहमान आणि चित्रपट निर्माते,

| August 2, 2015 01:55 am

‘वहिदा रहमान : हितगुजातून उलगडलेली’ या नसरीन मुन्नी कबीर लिखित आणि मिलिंद चंपानेरकर अनुवादित रोहन प्रकाशनाच्या आगामी पुस्तकात अभिनेत्री वहिदा रेहमान आणि चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते गुरुदत्त यांच्यात एक दिग्दर्शक आणि अभिनेत्री, तसेच परस्परांचे सुहृद म्हणून असलेल्या संबंधावर वहिदा रेहमान यांनी टाकलेला हा प्रकाश..
नसरीन- तुमच्या आणि गुरुदत्त यांच्या संबंधांबाबत आजही अनेक तर्क-वितर्क केले जातात. प्रत्येकानेच असं गृहीत धरलं होतं की, तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आहात. तुम्ही त्यांच्याबरोबर चित्रपट करत असताना या कारणामुळे काही घोटाळेपण झाले का?
lr16वहिदा- त्यांचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की तो एक अपघात होता, याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने त्यांच्या मृत्यूभोवती एक गूढ निर्माण झालं आणि सर्वानाच त्याबाबत एक उत्सुकता राहिली. तसा त्यांचा मृत्यू म्हणजे आम्हा सर्वासाठीच एक धक्कादायक गोष्ट होती. ते तेव्हा अवघे ३९ वर्षांचे होते, म्हणजे खूपच तरुण होते. प्रत्येकजण हाच एक प्रश्न विचारत होता, ‘‘त्यांना अशा प्रकारे मृत्यू का यावा?’’ चित्रपट क्षेत्रातील माझ्या सहकाऱ्यांनी मला आमच्या संबंधांविषयी वैयक्तिक प्रश्न कधीच विचारले नाहीत. मला वाटतं, इतरांना आणि पत्रकारांनाच त्याबाबत उत्सुकता राहिली. आणि आज सहा दशकांनंतरही ती उत्सुकता कायम आहे. आम्ही ‘पब्लिक फिगर’ आहोत याची मला कल्पना आहे. पण माझी अशी ठाम धारणा आहे की, माझं खासगी जीवन हे खासगीच राहायला हवं. सार्वजनिक व्यक्ती असल्याने जगाचा आमचा संबंध आमच्या कार्यापुरताच राहायला हवा. आणि आमच्या कार्यरूपाने आमच्या पश्चात काय उरतं, तेच महत्त्वाचं ठरायला हवं.
नसरीन- गुरुदत्तने पडद्यावर तुमचं चित्रण इतक्या प्रेमभराने केलं असल्यानेच बहुधा लोकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली असावी. इतकी, की ती जायचं नावच घेत नाहीये.
वहिदा- परंतु तसं त्यांनी इतरांबाबतही केलं आहे. मीनाकुमारी ‘साहिब, बीबी..’मध्ये जितक्या सुंदर दिसल्या, तितक्या त्या अन्य कोणत्याही चित्रपटात दिसल्या नाहीत, हे तुम्ही मान्य कराल ना? तुम्हा लोकांना हे माहीत असायला हवं, की सर्वच दिग्दर्शकांची अशी इच्छा असते की, त्यांची आघाडीची नायिका पडद्यावर अगदी विशेष अशी दिसायला हवी. आपल्या नायिकेला जगातील सर्वात सुंदर म्हणून पडद्यावर चितारायचं असलं तर त्या दिग्दर्शकाला तिच्या थोडंसं प्रेमात पडावं लागतं. आणि ज्या प्रकारच्या प्रेमकहाण्या आपण पडद्यावर चितारतो, त्यासाठी जणू हे अत्यावश्यकच ठरतं. गुरुदत्त माझ्याशीच नाही, तर सादिकसाब, जॉनी वॉकर सर्वाशीच खूप चांगले वागायचे. आणि आम्हा सर्वाचीच त्यांनी चित्रपटजगताला ओळख करून दिली. खरं तर आम्हा सर्वाच्याच गरजांबाबत ते अत्यंत संवेदनशील होते. त्यांनी मला अनेक प्रकारे मदत केली आणि मार्गदर्शन केलं. ते माझी काळजी करायचे आणि संरक्षकाचीही भूमिका करायचे. परंतु सत्य हे आहे की, तसं ते प्रत्येकाच्या बाबतीत करायचे.
नसरीन- गुरुदत्तसोबत तुम्ही अखेरचं काम कधी केलं? त्याबाबत काही आठवतं..?
वहिदा- १९६१ किंवा १९६२ ची गोष्ट असेल. मला नक्की तारीख आठवत नाही; पण ‘साहिब, बीबी..’च्या अखेरच्या दृश्याचं चित्रण सुरू होतं तेव्हाची गोष्ट असेल. भूतनाथ हवेलीच्या भग्न अवशेषांचं उत्खनन करत असतो आणि जबा त्याची बाहेर वाट पाहत असते असं ते दृश्य होतं. त्या दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळी आम्ही अखेरचं सोबत काम केलं. ‘साहिब, बीबी..’नंतर त्यांनी मला कधीच कोणती भूमिका देऊ केली नाही.
गुरुदत्तजींचं निधन झालं तेव्हा मी मद्रासमध्ये होते. चित्रपट सिताऱ्यांच्या क्रिकेट संघासोबत एक ‘चॅरिटी’ सामना खेळण्यासाठी मी तिथे गेले होते. दिलीपसाहेबसुद्धा तिथे सोबत होते. अभिनेत्री शम्मी रबाडी ही माझी जवळची मत्रीण आहे. ती माझ्यापाशी आली आणि तिने मला हळूच म्हटलं की, ‘‘एक वाईट बातमी आहे.’’ ती म्हणाली, ‘‘गुरुदत्त या जगात राहिले नाहीत.’’ माय गॉड! मला प्रचंड धक्काच बसला. त्यांनी पूर्वी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं माहीत होतं, तरीही माझ्यासाठी ती एक भयंकर धक्कादायक अशीच बातमी होती. मी त्वरित विमानाने मुंबईला पोहोचले. तो १० ऑक्टोबर १९६४ चा दिवस होता. राज कपूर, देव आनंदसह खूप लोक अंत्ययात्रेला हजर होते. तो खरोखरच मोठा दु:खद असाच दिवस होता.
नसरीन- त्यांना तुम्ही शेवटचं कधी पाहिलं होतं? किंवा त्यांच्याशी तुमचं अखेरचं बोलणं कधी झालं होतं, काही आठवतं..?
वहिदा-  १९६३ मध्ये ‘साहिब, बीबी..’ बíलन चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता. त्यासाठी अबरार, मी आणि माझी बहीण सईदा बíलनला गेलो होतो. गुरुदत्तजीसुद्धा आले होते. २७ जून रोजी तो चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. मात्र, तिथे तो कुणालाच आवडला नाही. खरं तर तिथे त्या चित्रपटाची संक्षिप्त आवृत्ती दाखविण्यात आली होती. तरीही तिथल्या लोकांना तो रटाळ वाटला. महोत्सवाचे जे संचालक होते त्यांनी मला विचारलं, ‘‘इफ छोटी बहू वॉज सो अनहॅपी विथ हर हजबंड, व्हाय डज नॉट शी गो अवे विथ भूतनाथ?’’ (वहिदा हसतात.) मी म्हणाले, ‘‘आमच्या संस्कृतीत तसं घडत नसतं.’’
त्यांची संस्कृती आपल्यापेक्षा पूर्णत: भिन्न आहे. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, त्या काळातील भारतातील जमीनदारांना असं काही सहन करणं शक्यच नव्हतं. त्यांच्या घरातील ‘बहू’ने घराबाहेर पडायचंच नाही अशी परंपरा होती. छोटी बहू घराबाहेर पडून ती परंपरा मोडते तेव्हा ते तिची हत्याच करतात. त्याशिवाय दुसरी गोष्ट अशी की, छोटी बहू भूतनाथच्या प्रेमात पडलेली असते वा तो तिच्या प्रेमात- असं काही नसतं. तिचं दु:ख आणि सौंदर्य यामुळे त्याला तिच्याबाबत अप्रूप वाटत असतं, एवढंच. गुरुदत्तजी स्क्रीनिंगच्या वेळी तिथे होते. परंतु दुसऱ्याच दिवशी ते बíलनहून निघून गेले.
नसरीन- बíलन महोत्सव २१ जून ते २ जुल १९६३ दरम्यान आयोजित केला गेला होता. याचा अर्थ तुमची नंतर वर्षभरात भेट झालीच नाही. आणि नंतर एकदम ऑक्टोबर १९६४ मध्ये गुरुदत्तच्या मृत्यूबाबत तुम्ही ऐकलंत. बरोबर ना?
वहिदा- हो. मी त्यांना शेवटचं पाहिलं ते बर्लिनमध्येच. ‘साहिब, बीबी..’ नंतर आम्ही सोबत काम करण्याचा प्रसंगच आला नव्हता. कुणाला गमावणं ही तशी विषण्ण करणारीच गोष्ट असते. यश चोप्रांचं जरी वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं, तरी माझ्यासाठी ती एक धक्कादायकच घटना होती. अमिताभ बच्चन यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या दिवशी माझी यशजींशी भेट झाली होती- म्हणजे त्यांच्या निधनाच्या केवळ दहा दिवस आधी. त्यांनी निघताना मला वात्सल्याने मिठी मारली आणि म्हणाले होते की, त्यांना खूप थकल्यासारखं वाटतंय आणि त्यामुळे घरी परतणं भाग आहे. खरं तर त्यांची पत्नी पामेला यांची इच्छा होती की, त्यांनी तिथे थोडं अधिक वेळ थांबावं. मला वाटतं, त्यानंतर थोडय़ाच दिवसांनी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. पण नंतर माझ्या कानावर आलं ते हेच, की त्यांनी या जगाचा निरोप घेतलाय. मला खूपच वाईट वाटलं. आता यावरून गुरुदत्तजींचा मृत्यू म्हणजे त्यांच्या परिवारासाठी आणि त्याचप्रमाणे मी आणि त्यांच्या निकट राहून त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्वासाठीच किती मोठा धक्का असेल, याची तू कल्पना करू शकतेस. परंतु त्याचवेळी जगात त्यांच्याबाबत किती आदराची भावना आहे याचाही आपण विचार केला पाहिजे. मला तर वाटतं की, सत्यजित राय यांच्यानंतर चित्रपटसृष्टीत तेच एक अशी व्यक्ती आहेत- ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका सन्मान व कौतुक लाभलं आहे.
नसरीन- ते खरंच आहे. फक्त उपरोधाची गोष्ट इतकीच, की गुरुदत्तजींची प्रसिद्धी त्यांच्या मृत्यूनंतर अधिक वाढत गेली. म्हणजे ‘प्यासा’मध्ये त्यांनी कलाकाराच्या नियतीबाबत जे म्हटलं होतं, तसंच. फार थोडे असे भारतीय चित्रपट निर्माते आहेत, ज्यांच्या प्रतिभेचा प्रभाव इतका दीर्घकाळ कायम राहिला. मला तर असंही वाटतं की, भारतातील लोकप्रिय सिनेमाबाबत १९५० च्या दशकात जर पाश्चिमात्य चित्रपटसृष्टीला अधिक माहिती झालं असतं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गुरुदत्तजींची गणना जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये झाली असती.
वहिदा- मला त्यांच्या चित्रपटात काम करण्याचं सौभाग्य मिळालं, हे मी माझं नशीबच समजते. मला विश्वासपूर्वक वाटतं, की दुनियेला कधीच त्यांचं विस्मरण होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 1:55 am

Web Title: book about waheeda rehman on relationship with guru dutt
Next Stories
1 मुंबई जलप्रलय.. शोध अन् बोध
2 आधुनिक मुंबईचे शिल्पकार
3 चित्रकलामर्मज्ञ कालिदास
Just Now!
X