शुभांगी गोखले यांनी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या सहज सुंदर अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र त्यांनी आपली ओळख एका सक्षम अभिनेत्रीपुरतीच मर्यादित न ठेवता आपण एक समर्थ लेखिकाही आहोत, हेही सिद्ध केलं आहे. ‘रावा’ या पुस्तकातील लेखांमधून त्यांच्यात एक संवेदनशील लेखिका दडली आहे हे प्रकर्षांनं जाणवतं.
तालुक्यासारख्या शहरवजा छोटय़ा गावातून मुंबईसारख्या महानगरात आलेल्या या अभिनेत्रीनं महानगरीय जीवनवास्तव संवदनशील मनानं टिपलं. ती या महानगरीचा एक भाग झाली; परंतु इथं वावरत असताना तिनं आपलं संवेदनशील मन कोमेजू दिलं नाही, याचं प्रमाण म्हणजे हे पुस्तक!  यातून ठळकपणे जाणवतं तो तिच्यातील माणूसपण आणि अंतर्मनातील सच्चेपणा! त्या ज्या कार्यक्षेत्रात आहेत तिथले लोक अनेक मुखवटे लावून वावरताना दिसतात. अशा वेळी अनेकदा मुखवटय़ामागचा मूळ माणूस हरवून जातो, असाच अनेकांचा अनुभव असतो. शुभांगी गोखलेंचं मात्र तसं नाही, याची जाणीव या पुस्तकातून होते. एका अभिनेत्रीचं जगणंही आपल्यासारखंच असतं, हे अधिक भावतं. आपल्यासारखंच साधं सरळ असलेलं तिचं जगणं वाचकांच्या मनात अधिक खोल रुजत जातं. या लेखांमधील अनेक अनुभव, घटना वाचकाच्या मनात रेंगाळत राहतात.
त्यांनी आपल्या आजूबाजूची माणसं ही योगायोगानं आपल्या अवतीभोवती वावरत आहेत, अशा समजुतीनं त्यांच्याशी न वागता त्या माणसांमधील विशेष, त्यांच्यातील बरं-वाईटपण संवेदनशीलपणे टिपलं आहे. समोरच्या माणसांना अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यात अगदी रोज न भेटणारी माणसं असोत वा अगदी रोजच आपल्या वाटय़ाला येणारी माणसं असोत. त्या या माणसामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न करतात. ही माणूस शोधण्याची प्रक्रिया लेखिकेच्या नकळत अगदी ओघात होते जाते. लेखिकाही व्यक्ती म्हणून अधिक प्रगल्भ होत जाते, सक्षम होत जाते.
या पुस्तकातील अनुभव वैयक्तिक असले तरी त्यांना सार्वत्रिक परिणाम प्राप्त झालं आहे. त्यामुळेच वाचक या लेखांशी अधिक समरस होतो. हे अनुभव रोजच्या जगण्यातले असले तरीही लेखिका तो अनुभव अधिक व्यापक करते. त्याला संवेदनशीलतेचा, विचारांचा आयाम प्राप्त करून देते. अशा अनेक वैशिष्टय़ांमुळेच एका संवेदनशील मनाची ही भावपूर्ण टिपणं  एक सुखद वाचनानुभव ठरतो. सहज-सोपी, पण मनाला थेट भिडणारी भाषाशैली हे या पुस्तकाचं आणखी एक प्रमुख वैशिष्टय़ म्हणावं लागेल.
‘रावा’ – शुभांगी गोखले, उन्मेष प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १३८, मूल्य- १३० रुपये.