23 January 2021

News Flash

समाचार.. मेकॉलेच्या ‘मारेकऱ्यां’चा!

‘एखादी असत्य गोष्ट वारंवार सांगितली, की लोकांना ती खरी वाटू लागते.’ हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स याच्या नावावर खपवले जाणारे हे वाक्य. मुळात ते त्याचे नाहीच. पण...

| January 26, 2014 01:01 am

‘एखादी असत्य गोष्ट वारंवार सांगितली, की लोकांना ती खरी वाटू लागते.’
हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स याच्या नावावर खपवले जाणारे हे वाक्य. मुळात ते त्याचे नाहीच. पण आज कोणास ते पटणार नाही. कारण? एखादी गोष्ट वारंवार सांगितली की लोकांना तीच खरी वाटू लागते! लॉर्ड थॉमस बॅिबग्टन मेकॉले (१८००-१८५९) यांच्याबाबतीत नेमके हेच झाले आहे. त्यांच्या भाषणातील एक उतारा आपल्याकडचे इंग्रज आणि इंग्रजीद्वेष्टे, सनातन आर्य संस्कृतीचे प्रचारक आणि िहदुत्ववादी नेते नेहमीच देत असतात.
‘‘मी भारतात खूप फिरलो. उभा-आडवा भारत पालथा घातला. मला तेथे एकही भिकारी, एकही चोर पाहायला मिळाला नाही. हा देश इतका समृद्ध आहे आणि लोक इतके सक्षम योग्यतेचे आहेत की आपण हा देश कधी जिंकू शकू असे मला वाटत नाही. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा या देशाचा कणा आहे आणि आपल्याला हा देश जिंकायचा असेल तर तोच मोडायला हवा. त्यासाठी त्यांची प्राचीन शिक्षणपद्धती आणि त्यांची संस्कृती बदलावी लागेल. भारतीय लोक जर असे मानू लागले की परदेशी आणि विशेषत: इंग्रजी ते सारे चांगले, त्यांच्या संस्कृतीपेक्षा उच्च, थोर आहे, तरच ते त्यांचा आत्मसन्मान गमावून बसतील आणि मग ते आपल्याला हवे आहेत तसे बनतील-  एक गुलाम राष्ट्र.’’
लॉर्ड मेकॉले यांनी २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश पार्लमेन्टमध्ये केलेल्या भाषणाचा हा अंश. तो वाचला की लक्षात येते, की िहदुस्थानात आंग्ल शिक्षणाचा पाया घालणारे हे मेकॉले. त्यांच्या मनात किती ‘पाप’ होते. त्यांना हा देश घडवायचा नव्हता. कसा घडवणार? कारण हा देश आधीच वेदशास्त्रसंपन्न होता! त्यांना तो मोडायचा होता. मोडून तेथे गुलाम मानसिकतेची कारकुनांची फौज तयार करायची होती. काळे इंग्रज निर्माण करायचे होते. आणि ते कशासाठी? िहदुस्थानास ख्रिस्तशरण बनवण्यासाठी!
मेकॉलेनी १८३६मध्ये आपल्या वडिलांना पाठविलेल्या एका पत्राचा हवाला याच्या पुष्टय़र्थ दिला जातो. मेकॉले म्हणतात-‘‘मी आहे त्या दयाघन येशूचा परमभक्त. त्या ईशपुत्राचा दिव्य संदेश या अडाणी देशाच्या गळी उतरवण्यासाठी मी फार वेगळा उपाय योजला आहे. मी भारतीय लोकांच्या हाती गॉस्पेलच्या प्रती कोंबण्याची मुळीच घाई करणार नाही. त्यांनी प्राणपणे जपलेल्या श्रद्धांच्या मुळाशी मी अशी काही विखारी वाळवी पेरणार आहे, की अल्पावधीत ती त्यांच्या स्वाभिमानाचा वृक्ष पोखरून टाकील. एकदा ते खोड तसे पोखरले गेले की त्या क्षुद्र श्रद्धा कोलमडून पडायला कितीसा वेळ लागणार? मग आपले मूíतभंजक तत्त्वज्ञान रुजायला कितीसा विलंब लागणार? आपण देऊ केलेल्या शिक्षणामुळे नि:सत्त्व बनलेल्या भारतीयांना येत्या तीस वर्षांतच गॉस्पेलची सावली हवीहवीशी वाटू लागेल आणि तेच त्यासाठी आपली मिनतवारी करू लागतील याबद्दल मी अगदी नि:शंक आहे.’’
मेकॉलेनी भारतीयांना इंग्रजी नामक वाघिणीचे दूध दिले. ते प्राशन करून भारतीय नि:सत्त्व बनतील आणि फक्त तीस वर्षांत ख्रिस्तशरण जातील, अशी त्यांची योजना होती. पण ती फसली. मेकॉले चुकले. ते म्हणतात तसे काही भारतीय मूíतभंजक झाले. त्यांना सुधारक असे नाव पडले. त्यात जांभेकर, आगरकर अशी कितीतरी नावे सांगता येतील.
पण मेकॉले यांची खरोखरच अशी काही योजना होती? की येथेही गोबेल्सी प्रचारच कार्यरत आहे? डॉ. जनार्दन वाटवे (िवग कमांडर, निवृत्त) आणि डॉ. विजय आजगावकर यांनी संशोधनपूर्वक आणि पोटतिडिकेने लिहिलेल्या ‘मेकॉले : काल आणि आज’ या पुस्तकानुसार हे सगळे आरोप चुकीचे आहेत, उतारे बनावट आहेत. भारतीय आधुनिक भारतीय प्रबोधनाचा अध्वर्यू असा हा पुरुष. त्यांचे हे चारित्र्यहनन आहे. मेकॉले यांना अशा रीतीने बदनाम करून आधुनिक शिक्षणावर घाव घालण्याचे मंबाजींचे प्रयत्न आजही सुरू आहेत. त्यांचे चीरहरण करतानाच मेकॉले यांना न्याय देण्याच्या हेतूने हे पुस्तक साकारण्यात आले आहे. आणि त्यात लेखकद्वय चांगलेच यशस्वी झाले आहेत, हे आधीच नमूद करावयास हवे.
मेकॉले यांच्या नावावर खपवले जाणारे उपरोक्त वरील दोन्ही उतारे त्यांचे नाहीत. मेकॉले हे असा विचार करणारांतले नव्हते. हे त्यांच्या अन्य लेखनावरून दिसून येते. एका उदारमतवादी घराण्यात जन्मलेला हा पुरुष आहे. त्यांचे वडील गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध झगडले होते. त्यानंतर मुक्त गुलामांसाठी आफ्रिकेतील सियारा लिओन येथे स्थापन करण्यात आलेल्या वसाहतीचे गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. मिल आणि स्पेन्सर यांच्या उदारमतवादाचा प्रभावही या घराण्यावर होता. तेव्हा अशा विचारांची सावली मेकॉले यांच्यावर निश्चितच पडली असणार. असा गृहस्थ िहदुस्थानला नि:सत्त्व बनवण्याचे कारस्थान कसे रचेल? की मेकॉले यांच्या बदनामीमागेच काही कारस्थान आहे?
या पुस्तकाची संपूर्ण मांडणी, त्यातील विभाग पाहता, लेखकद्वयास मेकॉले यांच्यावरील किटाळे दूर तर करायची आहेतच, परंतु त्याचबरोबर बदनामीचे कारस्थानही खणून काढायचे आहे हे लक्षात येते. मेकॉले घराण्याचा इतिहास, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि घटना, ब्रिटिश राज्यकर्त्यांची अंकित प्रदेशासंबंधीची भूमिका येथपासून भारतातील राष्ट्रसंकल्पनेच्या उदय आणि विकासापर्यंतचा मोठा पट त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. त्याचबरोबर मेकॉलेप्रणीत शिक्षण पद्धतीत ख्रिश्चन धर्मप्रसाराचा अंतस्थ कुटिल हेतू आहे की आणखी काही वेगळेच आहे याचा छडाही त्यांनी लावला आहे. त्याबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेजही त्यांनी येथे प्रसिद्ध केला आहे. तो म्हणजे मेकॉले यांनी १९३५च्या फेब्रुवारीत गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिक यांना सादर केलेले शिक्षणविषयक टिपण- मिनिट ऑन एज्युकेशन. हे टिपणच मेकॉले हे तमाम सनातनी आणि ढोंगी राष्ट्रवादी यांच्या द्वेषाचे लक्ष्य बनण्यास कारणीभूत ठरले असावे. कारण या टिपणातूनच पुढे भारतात आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मूळ इंग्रजीतील ते टिपण आणि त्याचा मराठी अनुवाद मुळातून, कोणतेही पूर्वग्रह न ठेवता वाचल्यास मेकॉले यांना भारतीय प्रबोधनकाळाचे अध्वर्यू का म्हटले आहे ते समजून येईल. भारतात कारकुनांची फौज तयार करणे हे मेकॉले आणि बेंटिक यांचे उद्दिष्ट होते की भारतीयांना आधुनिक ज्ञान देऊन शहाणे करणे हा हेतू होता, ते नीट लक्षात येईल.
आता राहिला प्रश्न मेकॉले यांच्या नावावर खपवल्या जात असलेल्या उपरोक्त उताऱ्यांचा. त्यातला पहिला इंग्रजी शिक्षणामागील तथाकथित कुटिल हेतूबाबतचा उतारा हा मेकॉले यांचा नाहीच. हा उतारा १९३५चा, पार्लमेन्टमधल्या भाषणातला, असे सांगण्यात येते. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणाऱ्या भाषणांच्या संग्रहाला हॅन्सार्ड असे म्हणतात. त्याच्या कोणत्याही प्रतीतील कोणत्याही तारखेत हा उतारा नाही. कसा असणार? कोईनराड एल्स्ट् हे बेल्जिअन संशोधक-लेखक सांगतात, १९३५ला मेकॉले इंग्लंडमध्ये नव्हतेच. ते भारतात होते. शिवाय या मूळ इंग्रजी उताऱ्यातील विचार तर सोडाच, भाषाही त्यांची नाही. ती फारच अलीकडची आहे. तेव्हा हा उतारा बनावट आहे. मग तो कोठून आला? एल्स्ट यांच्या म्हणण्यानुसार हा उतारा पहिल्यांदा प्रसिद्ध झाला तो अमेरिकेतील ग्नॉस्टिक सेंटर या धार्मिक वाङ्मय प्रसिद्ध करणाऱ्या संस्थेच्या ‘द अवेकिनग रे’ या मासिकात. (खंड ४, क्र. ५). तेथून तो िहदुत्ववादी नियतकालिकांनी उचलला. हे सांगणारे एल्स्ट् हे प्रखर िहदुराष्ट्रवादाची भलामण करणारे लेखक आहेत, हे लक्षात ठेवलेले बरे. जाता जाता या कोईनराड एल्स्ट यांनीही मेकॉले यांचे इंग्रजी शिक्षण देण्यामागचे हेतू शुद्ध होते, असे प्रमाणपत्र दिले आहे. मेकॉले यांचा उपरोक्त दुसरा उताराही असाच त्यांच्या शब्दांची, संदर्भाची मोडतोड करून केलेला सत्याचा अपलाप आहे. लेखकद्वयाने या पुस्तकात तेही दाखवून दिले आहे. पण हे सर्व करण्यामागची वाटवे आणि आजगावकर यांची नेमकी प्रेरणा काय होती? नुसतीच खळबळ माजवून देण्याची, इतिहासातील एका असत्याचा गौप्यस्फोट करण्याची की आणखी काही? मुळात मेकॉलेंबद्दल त्यांना एवढे प्रेम का?
मेकॉले यांना इंग्रजाळलेले भारतीय तयार करून साम्राज्यसत्तेचा काळ लांबवायचा होता हा हेत्वारोप या लेखकद्वयाला मूलत: अमान्य आहे. तो शिक्षणविषयक टिपणातील एका मुद्दय़ावरून प्रामुख्याने केला जातो. मेकॉले  त्यात म्हणतात, ‘‘मर्यादित साधनसंपत्तीमुळे सर्व जनतेला इंग्रजी भाषेतून आधुनिक शिक्षण आपण देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आपला प्रयत्न असा एक गट निर्माण करण्याचा असावा, की जो गट आपण आणि आपली लक्षावधी जनता यामध्ये मध्यस्थाचे काम करील.. असा गट की ज्यातील व्यक्तीचा रंग व रक्त िहदी असेल पण अभिरुची, विचार, नतिकता व बुद्धिमत्ता याबाबत तो इंग्रजी असेल.’’ यापुढे मेकॉले जे म्हणतात ते अधिक महत्त्वाचे आहे-‘‘त्या गटावर देशातील प्रादेशिक भाषा अभिजात करण्याची जबाबदारी आपण सोपवू. त्या प्रादेशिक भाषा पाश्चात्य पारिभाषिक शब्द घेऊन विज्ञानामध्ये संपन्न करण्याचे व अंशाअंशाने त्यांना ज्ञानसंक्रमण करणारे वाहक बनवण्याचे कार्य त्या गटाने करावे.’’
यात कोणता कुहेतू आहे? तसा कुहेतू लादणे हा अन्याय आहे. तो भारतातील एक गट सातत्याने करत आहे. हा गट बुरसटलेल्या परंपरावाद्यांचा आहे. इतिहासाची मोडतोड करून, पुनल्रेखन करून लोकांच्या माथी हितसंबंधी असत्येच सत्य म्हणून लादण्याची लाट अधूनमधून उठते. त्याचा हा भाग आहे. त्याचा प्रतिवाद व प्रतिकार या पुस्तकातून करण्याचा लेखकांचा प्रयत्न दिसतो. पुस्तक, त्यातील भाई वैद्य यांच्या प्रस्तावनेसह वाचून संपवल्यानंतर मेकॉले यांच्याप्रती मनात ज्या भावना निर्माण होतात आणि एकूणच इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी याचे जे मार्गदर्शन मिळते ते पाहता लेखकांना त्यांच्या प्रयत्नात यश आले आहे, असे वाटते. (पुस्तकाची निर्मिती आणि संपादन याकडे अधिक लक्ष पुरविले असते, तर हा प्रयत्न अधिक उजवा ठरला असता.)
‘मेकॉले : काल आणि आज’- डॉ. जनार्दन वाटवे,   डॉ. विजय आजगावकर, प्रकाशक- लेखकद्वय,       पाने- १४८, मूल्य- १७५ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 1:01 am

Web Title: book review 51
टॅग Samiksha
Next Stories
1 पुरस्कार संस्कृतीचा सणसणीत लेखाजोखा
2 कभी खुद पे, कभी हालात पे रोना आया!
3 मार्केटिंग
Just Now!
X