News Flash

गीता विरुद्ध धम्मपद!

धम्मपद आणि गीता यांची तुलना हा एक वादविषय आहे. कारण या दोन्हीचे अत्यंत कट्टर समर्थक आणि चिकित्सक आहेत. त्यामुळे अशा वादविषयात फारसे कोणी पडत

| July 7, 2013 12:03 pm

धम्मपद आणि गीता यांची तुलना हा एक वादविषय आहे.  कारण या दोन्हीचे अत्यंत कट्टर समर्थक आणि चिकित्सक आहेत. त्यामुळे अशा वादविषयात फारसे कोणी पडत नाहीत. ज्यांना समाजसंरचनेत मूलभूत फेरबदल करण्याची गरज वाटते असे ठरावीक लोक अशा प्रकारचा विचार करत असतात. अशांपकी एक म्हणजे अविनाश सहस्रबुद्धे. मानवी व्यवहार धर्माच्या मार्फत होतो. विशेषत: भारतीय समाजाचा मानवी व्यवहार धर्म या घटकामधून सहजपणे घडत जातो. त्यामुळे समाजाच्या संबंधांत फेरबदल करणे किंवा समाजात परिवर्तन करणे सहज-सोपे व्हावे म्हणून धर्माचा मार्ग समाजसुधारकांकडून स्वीकारला गेलेला दिसतो. यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, म. गांधी, विठ्ठल रामजी शिंदे ही आधुनिक भारतातील काही उदाहरणे आहेत. भारतीय समाजातील ही एक कसदार परंपरा आहे. या परंपरेकडे वळणारे ‘धम्मपद आणि गीता’ हे छोटेखानी पुस्तक आहे. याचे लेखक धम्माचे अभ्यासक आहेत. त्यांनी याआधी धम्मासंदर्भात लेखन केलेले आहे. याशिवाय ते ग्रंथउपासकही आहेत. त्यामुळे या पुस्तकाचा पोत संशोधनाकडे झुकलेला आहे.
भगवान बुद्ध आणि योगेश्वर श्रीकृष्ण, धम्मपदाचे अंतरंग, भगवद्गीतेचे अंतरंग व धम्मपद, भगवद्गीता- एक तौलनिक दृष्टिक्षेप अशा चार प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागले गेले आहे. ‘भगवान बुद्ध आणि योगेश्वर श्रीकृष्ण’ या प्रकरणात समाजातील या प्रतीकांच्या विविध प्रतिमांचा त्यांनी आढावा घेतला आहे. भगवान बुद्ध हे दैवतीकरणापासून अलिप्त होते. पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांपासून अलिप्त होते. शिवाय भगवान बुद्धाची ऐतिहासिकता वादातीत आहे, तर कृष्णाची प्रतीके अनेक आहेत. गोपाल कृष्ण किंवा वासुदेव कृष्ण अशी कृष्णाची मिथके आहेत, हे सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले आहे. याबरोबरच वासुदेव कृष्णाची दैवीकरण घडल्याची प्रक्रिया नोंदवली आहे. श्रीकृष्ण हे राजयोगी, तर भगवान बुद्ध हे ज्ञानयोगी आहेत असा फरक ते करतात. भोग व योग यांचा समन्वय एकाच्या ठायी, तर जीवनातील दुखमुक्तीचा विचार बुद्धाच्या ठायी असल्याची चर्चा त्यांनी केली आहे.
दुसरे प्रकरण ‘धम्मपदाचे अंतरंग’ यावर आधारलेले आहे, तर तिसरे प्रकरण ‘भगवद्गीतेचे अंतरंग’ यावर आधारलेले आहे. या दोन्ही प्रकरणांत स्वतंत्रपणे मांडणी केलेली आहे. त्यामुळे ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यावी लागतात. या दोन्ही प्रकरणांची विवेचन शैली साधी व सोपी आहे. या दोन्हींचा आशय संशोधनात्मक स्वरूपाचा आहे. अभ्यास करणाऱ्या समूहाला हे पुस्तक सहज समजेल असे आहे. सर्वसामान्य लोकांना आशय समजण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी विशेष प्रयत्न केले होते. सर्वसामान्यांच्या पातळीवर जाऊन सर्वसामान्यांच्या भाषेत त्यांनी ऊहापोह केला होता. तसे करण्यास लेखकाला संधी होती.
‘धम्मपद आणि भगवतगीता- एक तौलनिक दृष्टिक्षेप’ हे चौथे प्रकरण तौलनिक अभ्यासपद्धतीवर आधारलेले आहे. तौलनिक विश्लेषणातून लेखक सरतेशेवटी धम्मपद आणि भगवद्गीता यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात. शंकराचार्य, ज्ञानेश्वर किंवा श्री अरिवद यांची उदाहरणे पुराव्यादाखल देत समन्वयाचा मुद्दा शेवटच्या प्रकरणात लेखक ठळकपणे मांडतात. गीतेत अनेक तत्त्वप्रणाली एकत्र आल्या आहेत. त्यामध्ये धम्मपदातील तत्त्वप्रणाली आणण्याचा उपक्रम नावीन्यपूर्ण आहे. हितसंबंधांतील संघर्ष व समन्वय या दोन गोष्टी मानवी जीवनात घडत असतात. तडजोडी, वाटाघाटी, संमती, करारमदार, दोन विचारांतील साम्य हा एक जीवन जगण्याचा प्रवाह आहे. तो लेखक सहजपणे उलगडत जातात. समन्वयाबरोबर समाजात संघर्षांचा उलटा प्रवाह असतो. हिंदू धर्माशी संघर्ष करत जैन, बौद्ध, लिंगायत व शीख असे विविध धर्म स्थापन झाले. त्यामुळे हिंदू आणि जैन, बौद्ध, लिंगायत व शीख यांचे नाते एका पातळीवर शत्रूभावी आहे. या संदर्भामध्ये बौद्ध धर्मातील संदर्भाचा उल्लेख लेखकाने केलेला आहे. मात्र, त्यांचा रोख समन्वयावर केंद्रित झाला आहे.
धर्माचा पोत शोषणमुक्तीचा असावा, असा प्रयत्न सुधारक करतात. म. गांधी, न्या. रानडे यांनी शोषणमुक्तीचा विचार मांडला होता, अशा प्रकारचा एक धागा यात व्यक्त झाला आहे. सामाजिक विषमतेच्या मुद्दय़ावर आधारीत या पुस्तकात गीतेच्या तुलनेत धम्मपदाला लेखक प्रथम स्थान देतात. शिवाय गीतेचे दोन भाग करतात. त्यापकी गीतेतील उपयुक्त भागाचे विवेचन करतात. अहिंसा हा धम्मपदातील महत्त्वाचा मार्ग आहे, हेही नोंदवतात. मात्र, अिहसेचे स्वरूप नेमके कोणते आहे, हा मुद्दा फार व्यापक आहे. कारण म. गांधी बुद्धाच्या परंपरेतील अिहसा स्वीकारतात. त्या अिहसेचे स्वरूप सकारात्मक होते. त्याची चर्चा अपेक्षित होती.
हिंदू धर्मासंदर्भात विवेचनांचे विविध प्रवाह आहेत. विषमताप्रधान हिंदू धर्म म्हणून त्यांची चिकित्सा केली जाते. या संदर्भातील म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दोन उदाहरणे आधुनिक आहेत. हिंदू धर्माचे समर्थन केले जाते तेव्हा जातीय विषमतेचे समर्थन केले जाते. यामुळे हा वादविषय स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुभाव या मूल्यांशी जाऊन भिडतो. या आधुनिक मूल्यांच्या संदर्भात धम्मपद आणि गीता यांची चर्चा होते. या कसोटीवर आधारीत हे पुस्तक विषमतेची सविस्तर चिकित्सा करत नाही, परंतु विषमतेला विरोध मात्र करते. यामुळे या पुस्तकाचा प्रवास हा विषमतेमधून बाहेर पडण्याचा दिसतो. हिंदू धर्माचे समर्थन  सनातनी पद्धतीने हे पुस्तक करत नाही. या पुस्तकात उदारमतवादी भूमिका घेतलेली दिसते. त्यात मानवतावादाचे मध्यवर्ती सूत्र आहे. हिंदू धर्माची चिकित्सा करणारे आणि सनातनी हिंदू या दोन्ही प्रवाहांच्या मध्यभागी असलेले वाचक या पुस्तकाचे खरे वाचक ठरतील. हिंदू धर्माची परखड चिकित्सा करणारे आणि सनातनी हिंदू यांच्या दृष्टीने या पुस्तकामध्ये मर्यादा दिसतील. तथापि मानवी जीवनावर धर्म या घटकाचा मोठा प्रभाव आहे. तसेच नियंत्रणदेखील आहे. यासंबंधामध्ये फेरबदल करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे. समाजाचा सामाजिक व्यवहार समजून घेणे आणि त्यात परिवर्तन करण्यामध्ये रस असलेल्या समूहास हे पुस्तक उपयुक्त ठरावे. पुस्तकाची भाषाशैली सरळ आहे. तिला शास्त्रीयपणा आणि संशोधनाची बाजू आहे. विषय अवघड असूनही सुट्टा सुट्टा करून समजून देण्याचा लेखकाने स्तुत्य प्रयत्न केला आहे.
‘धम्मपद आणि गीता’ – अविनाश सहस्रबुद्धे, शब्द पब्लिकेशन, मुंबई, पृष्ठे- १३६, मूल्य- १५० रुपये.
प्रा. प्रकाश रा. पवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 12:03 pm

Web Title: book review dhammapad ani gita
टॅग : Samiksha
Next Stories
1 ओळख उपेक्षित ऐतिहासिक वारशाची!
2 एकवचनी, एकबाणी
3 पण लक्षात कोण घेतो?
Just Now!
X