नटश्रेष्ठ मास्टर दत्ताराम- बापूंच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त ‘अभिनय मास्टर’ हे अरुण घाडीगावकर संपादित पुस्तक डिंपल पब्लिकेशनतर्फे १ मे रोजी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज यांनी या पुस्तकात लिहिलेला लेख.

एकवेळ धर्माची चौकट बदलेल, पण भीष्म बदलणार नाही – इति दत्ताराम.

 दत्तारामबापूंविषयी लिहिण्याइतपत मी मोठी नाही, पण त्यांच्याबरोबर काम केल्यानं त्यांचा सहवास लाभला. त्याविषयी थोडंसं लिहिण्याचा मी प्रयत्न केलाय.

सोलापूरला असताना नाटकाची थोडी तोंडओळख असताना ‘मा. दत्ताराम’ हे नाव कानी पडलं होतं. त्यावेळची सर्व व्यावसायिक नाटकं, उदा. ‘तो मी नव्हेच’, ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मत्स्यगंधा’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘दुरितांचे तिमिर जावो’ व छोटा गंधर्वाची संगीत नाटकं मी पाहिली होती. यातल्या कलाकारांसोबत पुढंमागं मी काम करीन हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. स्वप्न आणि सत्य यांत फरक असतो. पण माझ्याबाबतीत हे सत्यात साकार झालं.

 पणशीकर, चित्तरंजन कोल्हटकर, डॉ. घाणेकर, भालचंद्र पेंढारकर, आशा काळे आणि दत्तारामबापू यांच्यासोबत मी काम केलं. त्यांचा ‘रायगड’ पाहून मी हरखून गेले होते. ज्यावेळी ते प्रथम मला भेटले तेव्हा हेच का ते दत्तारामबापू, असा प्रश्न पडला. त्यांचा भीष्म ज्या तोऱ्यात एन्ट्री घेई ते मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांचा शिवाजी तर अप्रतिम! वास्तविक नटाला जे व्यक्तिमत्त्व लागतं ते बापूंना लाभलं नव्हतं! सावळा रंग, मध्यम उंची आणि थोडासा पिचका आवाज म्हणूया हवं तर! म्हणजे काही कलावंतांना भारदस्त आवाजाची देणगी असते, काहींना ईश्वरी देणगी असलेलं भारदस्त व्यक्तिमत्त्वही लाभतं. पण बापूंना हे काही लाभलं नव्हतं. मात्र रंगभूमीवरची अपार निष्ठा, साधी राहणी, भूमिकेचा अभिनयाच्या उंचीवर सखोल विचार आणि व्यवसायातला पारदर्शीपणा, प्रामाणिकपणा यांच्या जोरावर बापू अत्युच्च शिखरावर पोहोचले होते. आजच्या कलावंतांसारखे अध्र्या हळकुंडात पिवळे होऊन तोरा मिरवणारे बापू नव्हते. नेहमी जमिनीवरच पाय असलेले कलावंतच कुठल्याही काळात स्मरणात राहतात.

आज अगदी सर्व बुजुर्ग कलावंतांसोबत काम करून मी नवीन पिढीसोबतही वावरते तेव्हा बापूंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पणशीकरांनी सांगितलेली एक गोष्ट आवर्जून आपल्यालाही सांगावीशी वाटते. जेव्हा डॉ. घाणेकरांनंतर दत्तारामबापूंनी संभाजी केला, तेव्हा बापूंनी नाइट किती देणार, हा प्रश्न विचारला नव्हता. आजचे कलावंत सुपाऱ्या घेऊन, तद्दन सत्यनारायण असो की एखाद्या पक्षाची निवडणूक असो, पैशाशिवाय पाऊल उचलत नाहीत; तिथे बापूंसारखा कलावंत विरळाच. जेव्हा पणशीकरांनी पाकीट दिलं तेव्हा ‘एवढे पैसे मी पहिल्यांदाच पाहतोय’ असं बापू उद्गारले. दौऱ्यांत बसच्या जागेसाठी कधी अडवणूक नाही, हीरोगिरी नाही. हे मी स्वत: अनुभवलंय.

‘मत्स्यगंधा’ नाटकाच्या तालमीसाठी मी तीन-चार दिवस बापूंच्या वसईच्या घरी गेले होते. एका अतिशय देखण्या, सालंकृत, ठसठशीत कुंकू लावलेल्या माऊलीनं आमचं स्वागत केलं. त्या म्हणजे बापूंच्या सहधर्मचारिणी. बापूंना सकाळी सकाळी मासळी बाजारात जाऊन मासे आणण्याचा भारी शौक होता. मला बापूंनी सांगितलं, ‘‘फैयाजबाई, आमच्या इथं आला आहात. भरपूर मासे खा आणि भरपूर तालीम करा.’’ बापूंची शिकवणी तीन-चार दिवस चालली. खूप काही शिकायला मिळालं. जवळून अनुभवायला मिळालं. परशुराम सामंत आणि बापू या दोघांनी माझी तालीम घेतली. म्हणजे त्यावेळी या नाटकाचे किमान सातशे प्रयोग झाले होते. पण अगदी नवीन नाटकासारखी माझी तालीम घेतली. माझा हा शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न होता. पहिला प्रयोग झाला. ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेनं कुठेही कुचराई केली नाही. अगदी पत्रकारांनाही आमंत्रण होतं. पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल झाला.

दौऱ्यात बापू बसमध्ये खिडकीपाशी बसत. तसे ते थोडे मितभाषी. पान खाण्याचा षौक होता त्यांना. पांढरा लेंगा, सदरा आणि कापडी पिशवी. त्यात पान खाण्याचा सरंजाम असे. त्यांनी एक कानमंत्र दिला. तो आजही मी पाळते. त्यांनी मला सांगितलं होतं की, ‘बाई, तुम्ही गायिका आहात आणि गद्य नाटकही करता. तेव्हा प्रवासात बोलू नका. कानाला वारा लागू देऊ नका आणि मौन पाळा. ती ऊर्जा रात्रीच्या प्रयोगासाठी सांभाळून ठेवा’. मी आजही तो कानमंत्र विसरले नाही. कदाचित म्हणूनच माझ्या सहकलाकारांना वाटत असेल की, मी माणूसघाणी आहे, मी अबोल आहे. असो.

बापूंविषयी अनुभवलं ते लिहिलं.