ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांच्या लेखनाशी व त्यातील ताकदीशी मराठी वाचक सुपरिचित आहेच, त्यामुळे त्याविषयी काही बोलावे असे नाही. त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारे ‘सौरभ’ हे त्यांचे पुस्तक आहे. यात त्यांनी अनेक लेखकव विचारवंतांचा परिचय करून दिलेला आहे. रूढ अर्थाने ही पुस्तक परीक्षणे नाहीत, तर त्या- त्या व्यक्तीचे आयुष्य, त्यांचे काम आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ असे या एकूण लेखनाचे सूत्र आहे.
अशा २३ व्यक्तींविषयी तळवलकर आपल्याला या पुस्तकातून कथन करतात. त्यात इंदिरा गांधी व रामानंद चतर्जी हे भारतीय, उमर खय्याम हे इराणी, ओरहान पामुक हे तुर्की आणि चेकॉव्ह व ग्रॉसमन हे रशियन लेखक आदींचा समावेश आहे. बाकी सर्व इंग्लिश वा अमेरिकन आहेत. ही नावे नि:संशय बुद्धिवाद्यांना आकृष्ट करणारी आहेत. या सगळ्यांचे चरित्र, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांची वैशिष्टय़े एकसाथ एकाच पुस्तकात वाचावयास मिळत असल्यामुळे हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे. यातील लेखांवरून वाचकांनी आपल्या आवडीनिवडी व सवडीनुसार ठरवावे, की कुठल्या लेखकाचे कुठले पुस्तक वाचायला घ्यायचे. या अर्थानेही या पुस्तकाला संदर्भमूल्य आहे.
या महनीय व्यक्तींचा परिचय करून देणारे हे पुस्तक वाचणे अतिशय आनंददायी आहे. यातील अनेक लेखकांची काही पुस्तके आपण वाचलेली असतात. आपल्याला ते लेखक आवडलेलेही असतात. परंतु त्याची काही पुस्तके सुटलेली असतात. यातील लेखांमधून त्या पुस्तकांविषयी व त्यांत महत्त्वाचे काय आहे, तेही कळते. इंदिरा गांधी यांच्यावर पुपुल जयकर व उषा सेठ यांची पुस्तके वाचलेली असली तरी तळवलकरांच्या लेखात इंदिरा गांधींचे आणखीन अज्ञात पैलू ते आपल्यासमोर आणतात. आपल्याला वाटायला लागते की, त्यांचे हे गुण राजकारणामुळे झाकोळले हे कितपत योग्य आहे? रामानंद चतर्जीविषयीही असेच आत्मीयतेने त्यांनी लिहिले आहे. हा लेख वाचताना सतत वाटत राहते की, त्याकाळी माणसे अशीच विशाल दृष्टिकोनाची असत आणि म्हणूनच लेखकांना ‘मॉडर्न रिव्ह्यू’मध्ये लिहायला वा कोलकाता विद्यापीठात शिकवायला बोलावताना चतर्जी वा आशुतोष मुखर्जीनी बंगाली-मराठी-तामीळ असे भेद केले नाहीत. त्यांच्या या दृष्टिकोनाचा फायदा ते नियतकालिक वाचणाऱ्याला अथवा त्या विद्यापीठात शिकणाऱ्यांना झाला.
एका लेखात गट्रर्ंड बेल या विलक्षण स्त्रीविषयी माहिती मिळते. ही एकेकाळी मध्य आशियातील किंगमेकर स्त्री. तळवळकर तिला ‘निर्भय’ म्हणतात. अल् खातुन याचा अर्थ ‘द लेडी’! या अल् खातुनविषयी आपल्याला जास्त जाणून घ्यायला आवडेल. त्यासाठी काय वाचायला हवे, हेही या लेखातून लक्षात येते. मार्क ट्वेन भारतात आले असता त्यांनी नवीनच इंग्रजी शिकलेल्या लोकांच्या भाषेचा नमुना दिला आहे. उदहारणार्थ- My eyes have come. When they go I shall resume my duty… वगैरे नमुने माहीत असतात. परंतु ट्वेनने दिलेला नमुना प्रथम वाचताना अवाक् करून जातो. यातले दोन लेख हे लेखक स्वत:च्या देशांच्या सीमा पार करून कसा जागतिक होतो याचे उत्तम उदाहरण आहेत. जॉर्ज ऑर्वेल व वासिली ग्रॉसमन हे ते दोन लेखक. ऑर्वेलच्या जन्मशताब्दीनिमित्त बरेच लिखाण प्रसिद्ध झाले. या सर्व लिखाणाचा तळवलकरांनी एकत्रित आढावा घेतला आहे. ऑर्वेल लिहितो, ‘‘आपण बुद्धिमंत होण्याची खटपट करण्याचे कारण नाही; पण आपण आपली बुद्धी शाबूत ठेवून चालले पाहिजे. सूज्ञपणा दाखवून वागले पाहिजे आणि तसे कोणासही करता येते.’’ त्यावर तळवलकर लिहितात, ‘‘म्हणूनच असे म्हणता येईल की, त्याने मनाच्या वा बुद्धीच्या जगातील लोकशाही जागृत केली.’’ तसेच त्याचे भाषेच्या वापरावरील विचारही मननीय आहेत. तो उगाच अमेरिकन इंग्रजी वा बोजड फ्रेंच शब्द वापरण्याच्या विरुद्ध होता. त्याच्या मते, त्याने सांस्कृतिक भेसळ होते. परंतु आपल्या भाषेत समर्पक शब्द नसेल तर तो दुसऱ्या भाषेतून घेण्यास त्याचा विरोध नव्हता. त्याचे इंग्लंड व इंग्रजी भाषा यांवर प्रेम होते. त्याचबरोबर तो स्वत:ला देशभक्त म्हणवतो, ‘परंतु मी राष्ट्रवादी नाही’ असेही तो म्हणतो.
वासिली ग्रॉसमन हा सोव्हिएत लेखक आपल्याला फारसा माहिती नाही, कारण त्याने सोव्हिएत सरकारचा रोष ओढवून घेतल्याने तो देशात फारसा छापला गेला नाही आणि त्याचे लिखाण बाहेरही प्रसिद्ध झाले नाही. आत्ता आत्ता त्याची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. या लेखकाने दुसरे महायुद्ध वार्ताहर म्हणून खूप जवळून पाहिले. त्याची काही निरीक्षणे मार्मिक आहेत. उदा. सामान्य माणूस सहजासहजी दुसऱ्याला जीवे मारायला तयार होत नाही, परंतु खूप काळ केलेला सततचा प्रचार त्याला खुनी बनवतो. हे त्याने ज्यू तसेच शेतकरी कुलाक वर्गाबद्दल म्हटले आहे. त्याने सांगितलेले हे सार्वकालिक सत्य म्हणावे लागेल.
 असे विविध लेखक व त्यांच्यावरील लेख ‘सौरभ’मध्ये आहेत. हे पुस्तक तळवलकरांनी ज्या पुस्तकांनी त्यांना आनंद दिला त्यांच्या कर्त्यांना अर्पण केले आहे. ज्यांना हे विचार जाणून घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक आवश्यक ठरावे.
‘सौरभ’- गोविंद तळवलकर, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे, पृष्ठे – २२६, किंमत – २५० रुपये.