22 September 2020

News Flash

जारी जारी ओ कारी बदरिया.

प्रत्येक वेळी गाणं छान बनण्यासाठी उच्च दर्जाचं काव्यमूल्य असलंच पाहिजे असं नाही, हे सिद्ध करणारी खूप गाणी अण्णांनी दिली. ‘मेरे पिया गए रंगून’च्या सुरुवातीला टेलिफोनची

| December 7, 2014 12:29 pm

प्रत्येक वेळी गाणं छान बनण्यासाठी उच्च दर्जाचं काव्यमूल्य असलंच पाहिजे असं नाही, हे सिद्ध करणारी खूप गाणी अण्णांनी दिली. ‘मेरे पिया गए रंगून’च्या सुरुवातीला टेलिफोनची िरग, ‘हॅलो, मं रंगून से बात कर रहा हूं’ हा संवाद म्हणजे पुढच्या काळातल्या अनेक ‘रिअ‍ॅलिस्टिक’, ‘संवादात्मक’ गाण्यांची प्रेरणाच.. ‘तुम बिन साजन जनवरी फरवरी बन गए मई और जून’ हे शब्द इतक्या चपखलपणे मीटरमध्ये बसतात आणि तो lok04शेवटचा ‘जून’ शब्द किंचित वर उडवणं.. या किंवा अशा गाण्यांना ‘बाजारू’ किंवा ‘स्वस्त’ म्हणणाऱ्या कित्येक ढुढ्ढाचार्याना असं गाणं बनवणं जन्मात जमलं असतं की नाही कोण जाणे. ‘अभिजात्य’ जिथे दाखवायचं तिथे जरूर दाखवावं; पण ज्या ठिकाणी फक्त धमाल, करमणूक हवी आहे तिथे तसंही गाणं, मेलडीसहित देता आलं पाहिजे, हा अण्णांचा आग्रह होता. आणि अशी अनेक गाणी देऊन हे तत्त्व त्यांनी सिद्ध केलं. अण्णांची ‘बलमा बडा नादान’ ते ‘इना मिना डिका’ ही रेंज म्हणूनच अवाक् करणारी आहे!
अंतर्बाह्य संवेदनशील असलेल्या या संगीतकाराचा स्वभाव, त्याचं अति हळवेपण त्याच्या चालींत प्रतििबबित झालंय. ‘बागेश्री’वर अण्णांचे विशेष प्रेम दिसून येतं. (‘राधा ना बोले’, ‘जाग दर्दे इश्क जाग’, ‘तुम क्या जानो’) तरी भीमपलास (‘ओ निर्दयी प्रीतम’, ‘मेरे मन का बावरा पंछी’), जौनपुरी (‘जब दिलको सताए गम’), भरवी (‘कैसे आऊं जमुना के तीर’), पहाडी (‘गया अंधेरा हुआ उजाला’), दरबारी कानडा (‘कितना हसीं है मौसम’) मालकंस (‘तू छुपी है कहाँ’), हेमंत (‘बलमा अनाडी मन भाए’), रागेश्री (‘मुहबत ऐसी धडकन है’) खमाज (‘आ दिल से दिल मिला ले’), पिलू (‘अपनी कहो कुछ मेरी सुनो’) अशा अनेक रागांच्या चौकटीचा सुरेख उपयोग करत अण्णांनी चाली बांधल्या. अण्णांचं संगीत समजून घेण्यासाठी कंपोझिशन म्हणजे नक्की काय, हे आधी जाणून घ्यायला हवं. ‘राग’ तुम्हाला काही फ्रेझेस किंवा स्वरमांडणी देतो. पण त्यापासून जेव्हा ‘चाल’ बनते, तेव्हा त्या स्वरमांडणीतून काही एक विशिष्ट ‘आकार’, रचना किंवा ‘शिल्प’ तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, तिथे संगीतकारांचं कौशल्य पणाला लागतं. अण्णांच्या संगीतात ‘मेलडी’ आहे म्हणजे नेमकं काय आहे? तर त्यांच्या रचना काही एक आकार घेऊन उमटतात. ‘मुहब्बत ऐसी धडकन है’सारखी रचना, ही रागेश्रीची स्वरमांडणी घेऊन येते. पण ‘वो समझायी नही जाती’ वर ‘समझायी’मधलं आर्जव ‘यी’ वर ‘सा’ पासून गंधारापर्यंत खेचलेल्या धवतापर्यंत खेचलेल्या मींडेमुळे समोर येतं. ‘नहीं जाती’वर पंचमापर्यंत जाऊन एक छान हरकत घेऊन गंधारावर थांबणं आणि ‘मुहब्बत ऐसी धडकन है’ ही ओळ अंतिमत: षड्जावर विसावणं.. यातून जो आकार जन्माला येतो तो म्हणजे मेलडी.. त्या ‘धडकन है’ वरचा षड्ज फार सुंदर ठाम स्टेटमेंट करणारा आहे. त्यात ‘प्रेम’, ‘मुहब्बत’ ही गोष्ट ‘मी’ अनुभवली, पण मला समजावून सांगता नाही येणार.. नव्हे, ती समजावण्याची गोष्टच नव्हे. हा फील अचूक पकडला जातो. हवा दिसत नाही पण तिचं अस्तित्व जसं शंभर टक्के; तितकंच ‘मुहब्बत’ हीच ‘धडकन’ आहे हे शंभर टक्के खरं. याच गाण्यात पुढे ‘चले आओ, चले आओ.. तकाजा है निगाहोंका’ म्हणताना पुन्हा धवताची किमया. ‘चले आओऽऽ’ हा वरचा धवत, तेच आर्जव (तकाजा). आणि पंचमाला टाळून ते रिषभावर येणं. मग पुन्हा त्याच षड्जावर विसावणं. सगळंच विलोभनीय. तकाजा है. ही ओळ दुसऱ्या वेळी षड्जावर आल्यामुळे.. ‘किसीकी आरजू ऐसे तो ठुकराई नहीं जाती’ या ओळीला त्याच षडजाची सुरुवात किती सुंदर मिळाली! इथे हे कंपोझिशन पूर्ण झालं. याला म्हणतात अस्सल मेलडी. या गाण्याची सुरुवात ज्या शेराने होते-
इस इंतजारे शौक को जलवोंकी आस है
इक शमा जल रही है सो वो भी उदास है..
या ओळींना पंचमाचा सुंदर आधार आहे. ‘प’ आणि ‘सा’ यामध्ये तोललेला हा ‘शेर’ म्हणजे पुन्हा एक स्वतंत्र बंदिश नाही का? आणि ‘षड्ज पंचम भाव’ म्हणजे दुसरं काय? कारण या शेरानंतर ‘मुहब्बत’ हा शब्द षड्जावर सुरू होताना आतून जो अनिवर्चनीय आनंद होतो, तो यामुळेच ना! संगीत पचवलेली, प्रतिभाशाली व्यक्तीच हे करू शकते. नाहीतर सगळं व्याकरण कोळून पिऊन खरं संगीत लांबच राहतं अनेकदा. ज्यांना व्याकरणापलीकडे जाऊन संगीत अनुभवायचं, त्यांना अण्णांसारखाच गुरू हवा. नाहीतर पु. लं.नी ‘ते चौकोनी कुटुंब’मध्ये म्हटल्याप्रमाणे ‘मालतीबाईंच्या गाण्यात सर्व काही होतं, पण संगीत नव्हतं’ अशी अवस्था होते. ही जी काही भानगड आहे किंवा ‘ये माजरा’ क्या है? असा सवाल पडणाऱ्यांनी हे जरूर ऐकावं. बरेच गुंते सुटतील!
तसाच काहीसा प्रकार ‘जारी जारी ओ कारी बदरिया’च्या बाबतीत. मधात बुडवून काढलेली चाल. हा गोडवा असाच नाही येत. त्यामागे खूप विचार आहे. ‘जारी जारी’ हे शब्द ‘जारी जाऽऽरी’ असे येतात. त्या दुसऱ्या ‘जाऽऽरी’त सगळी गंमत आहे. ‘सा’वर तोललेली ही फ्रेझ.. त्या धवतावर ते आर्जव किती मधाळपणे गुंफलंय. lr07नंतर ‘मत बरसो री मेरी नगरिया’मध्ये, ‘बरसो’चा तो झोल ऐका. पंचमाला झुलवत झुलवत गायलेलं ‘बरसोऽऽरी मेऽऽरी नगरिया’ ही ओळ. एक विलक्षण समा बांधून जाते आणि बरोब्बर ‘परदेस गए है सांवरिया’मध्ये ‘परदेस’ शब्दावरच अचूक खाडकन शुद्ध गंधार लागतो, की बाण काळजातच घुसतो थेट!
‘जारी जारी ओ कारी बदरिया
मत बरसो री मेरी नगरिया..’
हा फक्त संवाद होता. ‘परदेस गए है सावरिया’ हे खरं ‘कारण’ आहे, इथे काहीतरी वेगळं घडलं, हे तो शुद्ध गंधार सांगून जातो. साध्या काव्याला चालीमुळे वैभव प्राप्त होतं ते असं. या गाण्यात ‘जईयो’ ‘कहिया’ हे िहदी लोकभाषेतले इतके गोड शब्द येतात आणि ‘कहियो छम छम रोए, अखियां ना सोए’मध्ये ‘छम छम’ हा शब्द किती रुमझुमणारा. या गाण्यात अंतऱ्याच्या शेवटची ओळ स्वतंत्र तऱ्हेने बांधत आपल्या बुद्धीची श्रीमंती तर अण्णा दाखवतातच. ‘हाय तक तक ये सूनी डगरिया’ ही ओळ कोमल निषादापासून खाली षड्जावर येता येता तबल्याचा ठेका मस्त डौल सांभाळत ध्रुवपदावर येतो. दोन्ही गंधारांची मजा घ्यायची तर ती याच गाण्यात.. एखाद्याने ‘परदेस गए है’चीच चाल त्या ओळीला लावण्याचा सोपा मार्ग निवडला असता. पण ते ‘अण्णा’ असल्याने ही ओळ वेगळी बांधली गेलीय. हे ‘आझाद’मधलं गाणं. ‘आझाद’ची गाणी एका रात्रीत बांधली गेली आहेत यावर विश्वास कसा बसावा? पण हे सत्य आहे.
उत्कृष्ट मेलडीमध्ये, अर्थानुसार त्या चालीची दिशा बदलते. शास्त्रीय संगीतात रागाच्या बढतीमध्ये बंदिशीचा मुखडा.. बंदिशीचा एकूण ढाचा, तिचा ‘रोख’ याला जेवढे महत्त्व आहे, त्याहून जास्त महत्त्व भावसंगीतात आहे. कारण शब्दानुसार ती चाल ऊध्र्व किंवा अधोवदना असणं. याला खूप महत्त्व आहे. अण्णांच्या बहुतेक
करुणरसप्रधान चाली या अधोवदना आहेत. बघा- ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए..’ ही चाल, ‘तुम क्या जानोऽऽऽ’ म्हणत पुन्हा खाली वळते. ‘कटते है दुख मे ये दिन’ म्हणताना ‘कटते है’ हे शब्दसुद्धा खालीच वळतात. या अधोवदना स्वरावली त्या गाण्याचं कारुण्य अधिक गडद करतात.
अण्णांच्या आणखी काही सुंदर मेलडीजची जादू अनुभवूया..
धीरे से आजा री अखियन में
(राजेन्द्र कृष्ण, अलबेला)
याहून सुंदर ‘लोरी’ न झाली, न होणार! पाळण्यावर झोके दिल्यासारखी, आईच्या ममतेने भारलेली चाल. संपूर्ण सुरावटीला आईचा मऊसूत साडीच्या पदराचा स्पर्शगंध आहे. मग पडद्यावर नातं काही का असेना, ती आतडय़ाची माया, वात्सल्य या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच! ‘धीरे सेऽऽ’ हे शब्दच किती हळुवार थोपटत येतात आणि मधल्या आलापाला बिलगून येणारं व्हायोलीन खालच्या गंधारापर्यंत जातं. ते खूपच सुंदर. त्या गंधारानंतर मध्यातला गंधार ‘लेकर सुहाने सपनों की कलियाँ’ या ओळी घेऊन येतो. दुसऱ्या वेळी सपनों की कलियाँची चाल किंचित बदलून परस्पर झोका खात ‘आके बसादे पलको की गलियों’वर अलगद जाऊन पोचते. यात सगळ्यात ना कुठेही धक्का, ना खटका, (झोपमोड होऊ नये म्हणून?) मऊशार दुलई लपेटून गाढ झोपी जायला भाग पाडणारं हे गाणं. मला पुन्हा पु. लं.च्या ‘सात वारांच्या कहाणी’तल्या आजीच्या ‘बाळगोळी’ची आठवण येतेय. हे रसायनच विलक्षण. ही गुंगी त्या वात्सल्याची. सगळ्या चिंता त्या आईच्या पदरात टाकून निष्पापपणे झोपणाऱ्या बाळासारखं सुरक्षित वाटायला लागतं, अशी निष्पाप चाल. निरागस शब्द. आजच्या आपल्या प्रचंड धावपळीत कुणी आपल्याला देईल का? ‘हसता है चंदा भी िनदियन में..’ म्हणताना अगदी नवजात अर्भकसुद्धा खुदकन हसतं. (आपला पूर्वजन्म आठवून?) तसं आपणही खुदकन हसावं.. खूप लहान होऊन या गाण्याच्या कुशीत शिरून गाढ झोपी जावं. वयाने कितीही वाढलात तरी या गाण्यात तुम्हाला लहान बाळ बनवण्याची विलक्षण ताकद आहे. ‘अखियन, गलियन, बगियन, िनदीयन’ असे सुंदर नादमय शब्द आणि ती दैवी चाल.
मुहब्बत ही न जो समझे
(नूर लखनवी, परछाई)
मुहब्बत ही न जो समझे,
वो जालिम प्यार क्या जाने?
निकलती दिल के तारोंसे
जो है झनकार क्या जाने?
मुहब्बत अजाण आहे. खेळकर आहे. त्यात आकर्षण आहे. चंचलता आहे. पण ही जखम, हा दंश झाल्याशिवाय ‘प्रेम’ नावाच्या एका अद्भुत, अतिशय समंजस भावनेची जाणीव कशी व्हावी? नायिका म्हणते, ‘माफ किजिए, मैंने कभी मुहब्बत नही की!’ त्यावर तो म्हणतो, ‘मुहब्बत की नहीं जाती, हो जाती है.. काश आपको हो जाए..’ त्याशिवाय तुला हा दर्द कसा समजावा? ‘उसे तो कत्ल करना और तडपाना ही आता है. गला किसका कटा, क्यूं कटा, तलवार क्या जाने!’ मुहब्बत ही नाचरी, चंचल आहे तर ‘प्यार’ हे खोल.. समंजस, चिरस्थायी. ज्याला मुहब्बतच समजली नाही, अशा जालीम मनुष्याला प्रेम कसं समजावं? मुहब्बत ‘काळीज’ हलवून सोडते, पण प्रेम ‘काळजी’ घेणारं असतं ना. जो या पहिल्या पायरीवरच अडखळला, तो पुढचा प्रीतसोपान कसा चढणार. किती वेगळा विचार, किती वेगळं गाणं. यात ‘दवा से फायदा होगा के होगा जहरे कातिल से’ हा अंतरा किती वेगळी चाल घेऊन येतो. स्वत: ‘बीमार’ असणाऱ्याला ‘दवा’ कशी कळावी?
करो फरियाद सर टकराओ
अपनी जान दे डालो
तडपते दिल की हालत
हुस्न की दीवार क्या जाने?
या तारुण्याच्या मस्तीला प्रेमाची व्याकूळता नाही समजू शकत. एका भावनेकडे बघण्याच्या दृष्टिकोनातच बदल घडवून आणणारं हे गाणं. तलतच्या मुलायम मखमली आवाजात एकेक शब्द हृदयातून आलेला.. ती ‘कळ’ उमटवणारा. ‘क्या बात है!’ एवढंच म्हणून शकतो आपण. मला या गाण्याचा शेवट.. ‘जानेऽऽ’ लांबवून केलाय, ती जागा प्रचंड आवडते.
महफिल में जल उठी शमा
(पी. एल. संतोषी, निराला)
‘हे गाणं न बघताच गेलात तर तिकिटाचे पसे परत,’ अशी या गाण्याची जाहिरात केली गेली होती. ‘महफिल में जल उठी शमा परवाने के लिए, प्रीत बनी है दुनिया में मर जाने के लिए’ हे कडवट सत्य अत्यंत ठसठशीतपणे मांडताना ‘प्रीत बनी है’ ही ओळ काही विशिष्ट जागा, खटके घेऊन येते. रेसानी, सानीध, नीधप हे ते तीन तुकडे असे काही टोकदारपणे खटकन येतात, की तो अनुभवातून आलेला काहीसा कडवटपणा जाणवल्याशिवाय राहात नाही. एरवी गोलाईंनी शब्दांना स्वरात गोंजारणारी अण्णांची शैली या खटक्यांमध्ये तीव्र होते. शेवटी प्रेमाची परिणती सर्व प्रकारच्या मृत्यूतच!. प्रेम मरणार.. मी मरणार.. हे सगळंच जाणार लयाला.. हा विचार त्यातून ठळक होतो. त्यात कुठे ‘हलायला’ जागा नाही. जे आहे ते असं आहे. एवढंच आहे. तुम्ही असहाय आहात. ध्रुवपदात दुसऱ्या वेळी एक शार्प फ्लूट सुरू होते ती तर केवळ अप्रतिम.. यात ‘परवाने के लियेऽऽ हा उद्वेग.. उमाळा.. एका ‘लिये’ या शब्दात जीव ओतून गाणाऱ्या लताबाई आणि अशी ‘जागा’ निर्माण करणारे अण्णा. कुठल्या मातीतून निर्माण झाले हे कलाकार? ‘पत्थर दिल है सुननेवाले, कहने वाला आँख का पानी’चा ‘पानी’ शब्द टपकन अश्रूसारखाच ओघळतो. कारण पुढच्याच ओळीत ‘आंसू आए आंखोमे गिर जाने के लिए’ ही खंत आहे. अश्रूंची परिणती मातीतच मिसळण्यात होणार. त्या एका ‘पानी’ शब्दावर फिदा होतो आपण. पुन्हा पुन्हा ऐकावा हा शब्द. आणि आपलाही एक अश्रू बहाल करावा या निर्मितीसाठी.. या प्रतिभेसाठी.. त्या गायकीसाठी.. कारण अन्य कशातच याची ‘किंमत’ होऊ शकत नाही..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2014 12:29 pm

Web Title: c ramchandra evergreen music composers
Next Stories
1 ‘आना मेरी जान संडे के संडे..’
2 हमने देखी हैं इन आँखों की..
3 कहीं दीप जले कहीं दिल..
Just Now!
X