कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

सदाभौ, तुम्चं पत्र गावलं, वाचलं आन् फाईलमंदी वेवस्थितशीर टोचलं बी. टपालकीची येगळी फाईलच क्येली हाई बगा आमी. न्यूज च्यानलवालं कंदी कंदी ‘फाईल फोटू’ दावत्यात, त्येचा मतलब आम्च्या आजून बी ध्येनात आल्येला न्हाई. आम्चं इंग्लिशविंग्लिश वाईच कमजोर दिलवालं हाई. मंजी आमी विंग्लिश देधडक बेधडक बोल्तू, पर कमजोर दिलवाल्यास्नी झ्येपत न्हाई. परवा सुभान्यासंगट वाईच वाजलं आम्चं. लई गुस्सा आल्ता. अशा टायमाला विंग्लिशमंदी त्वांड उचकटायचं ठावं हाये आमास्नी. शिटीवाल्यान्ची ही श्टाईल गावाकडं बी झिरपत झिरपत आली हाई सदाभौ. आईच्यान्.. आमी बी त्येच क्येलं. चावडीम्होरं सुभान्याची गचांडी पकडली. ‘वॉट यू डू, डू..’ तुला काय करायचं आसंल ते करून घ्ये. कुनाच्या बापाला भीत न्हाई म्या.. येवढंच म्हनायचं हुतं आमास्नी. सुभान्याला काय बी कळ्ळं नसनार. ग्यारंटी हुती. संगट मास्तर हुते. गावात नव्यानं उगडलेल्या शीबीएश्शी शाळेचं टायवालं इद्यार्थी हुते. कुनाला बी उमगंना. येज्युकेशनची ल्येवल जीमिनीखालच्या पान्यासारकी लई खाली जावून ऱ्हायलीया सदाभौ. आवं, परसंग काय, आपून कसं वागतुया? कुनाला भानच न्हाई. आम्च्या गुश्श्याला रद्दीचा बी भाव न्हाई. समदे लोग दात उच्कटून हासून ऱ्हायलेय ना भौ. त्येन्ला विंग्लिश उमगंना, ो काय आम्चा फाल्ट न्हाई. कामन म्यानच्या फिलिंग्जची कदर न्हाई आप्ल्या राज्यामंदी.

हे आसं होवून ऱ्हायलंय बगा. तुम्च्यावानी आमी बी वाईच भटक गये थे. कुटं होतु आपुन? आटीवलं. टपालकीची फाईल. आम्ची ही फाईल आमी जपून ठय़ेवनार हाई. आजून दोनसे वर्सानी गावाकडं ड्रीनीज लाईनसाटी पहिल्यांदा खुदाई व्हईल तवा उत्खणनात ही फाईल उजेडात येयील बगा. इथल्ल्या परत्येक पत्राची किम्मत ऐतिहासिक दस्ताऐवजापेक्सा जास्त होवून ऱ्हायलीय सदाभौ. आरं, हाय काय आन् न्हाय काय!

अवगड हाई. ह्यो पसारा मंजी दोन सग्या, सीधासाध्या दोस्तांची दिल की बात. उद्याकडं नजर लावून आजचा दिस ढकलायचा. आजच्यापरीस कालचा दिस बरा हुता.. आसं ऊसासे सोडायचे. कान्दा पुन्यांदा रडवून ऱ्हायलाय ना भौ- यापल्याड गॉसिप न्हाई. सनसनाटी कायबी न्हाई. गावाकडं न्हाईतर शिटीमंदी कामन म्यानचं जगनं े हररोज मरणच. कल बी, आज बी और कल बी. त्येच्यामंदी कुनाला बी इन्टरेश्ट न्हाई. तेची कुनाला काय दक्कल? तुमी बिनघोर ऱ्हावा. त्येच्यापाई काय बी ब्रेकिंग हुनार न्हाई. तेच्यावर कंचीबी शिरीयल टीआरपीचं भरघोस पीक काढनार न्हाई. दोनसे वर्सानी आम्चं खापरपनतू ती फाईल उगडून बगील. या इश्टेटीचा भाव रद्दीचा हाई. आपला पणजाबी येडा आन् त्येचा ममईचा दोस्त बी.. ह्ये त्येला लगोलग समजंल. आपल्या दोस्तीचा इजहार करनारा त्यो ल्येटरपसारा! ही टपालकी दोनसे वर्सानी का हुईना, आखिरला रद्दीमंदीच जानार. पन गम न्हाई सदाभौ. आम्च्या वैनीसायेब, टाईमच्या कंपाऊंडवालपल्याड बगत्यात. दोस्तीची, प्रीमाची, पत्राची कीमत रद्दी.. ह्यो आम्च्या आत्म्याला दोनसे वर्सानी समजंल. वैनीसायेबास्नी ते आजच मालूम हाई. चालतंय की!

आम्चं आबासायेब हमेशा ‘आज’मंदी जगायचं. ‘आमच्या टायमाला..’ न्हाई बा. कंदी बी जुन्या आटवनी उगाळल्या न्हाईत. उद्या माजं कसं हुईल याची फिकीर न्हाई. त्ये हमेशा म्हनायचं, ‘‘ ‘आज’ला कंदी बी नाराज करू नगा. येक बी पल फुकाट जायला नगं. आज कष्टाच्या मस्तीत मस्त जगला की बास. त्यो उद्याची काळजी घेतु आपुआप. काल आटवायचा त्यो फकस्त हिशेबासाटी. माजं काय चुकलं? त्या चुका उद्याच्याला करनार न्हाई, आसं प्रामीश द्यायाचं. सोताच सोताला. े आत्मभान मंजीच काळभान. टाईम म्यानेजमेंट. ो खरा ईजय. े भान ज्याला गावंल त्यो खरा कलंदर. बाकी समदे क्यालेन्डर. कंच्या बी बाबा-बुवास्नी हात दाखवू नगंस. आपला हात जगन्नाथ. कष्टानं हातावर घट्टे पडले की भाग्यरेखा आपुआप दिसतीया..’’

सदाभौ, आमी कुनाला बी कंदी हात दाखीवला न्हाई. फकस्त आबासायेबान्ला फालो क्येलं. लई मंजी लई सुखात हाई. माज्याकडून जे बी हुन्यासारखं हाई त्ये मी करनारच. ज्या गोष्टी माज्या हातात न्हाई तेच्यासाटी नो खुशी, नो गम.. ोच आम्च्या सुखी जीवनाचा मंतर. हात न्हाई दाखीवला पर तुम्च्यासारक्या दिलदार दोस्तांच्या हातामंदी हात दिला फकस्त. येकदम नोकीयावानी. तुमी हाई साथीला, तो जिंदगी झिंगालाला.

उद्याचा उदो उदो. येवू द्या की उद्याला. पर त्येची तयारी आजपासून कराया पायजेल. सदाभौ, ईस्वेस्वराच्या खात्यातला श्येवटला हिशेब समजून घ्याया पायजेल. तिथं कंदी बी मिश्टेक हुत न्हाई. जी जी बिलं आपल्या नावावर फाडली ग्येली हाईत, ती चुकती केल्याबिगर सुटका न्हाई. समदं देनं इथंच फेडायचं हाई. नेकी कर और दर्या में डाल. अन्याव सहन करायचा न्हाई. चुकीच्या रस्त्यानं जायाचं न्हाई. जोडता न्हाई आलं तरीबी चालतंया, पर तोडायचं न्हाई. आपुन बरं आन् आपलं काम बरं. जमंल तसा समाजासाटी खारीचा वाटा उचलायचा. बस. मंग हिशेबामंदी गडबड न्हाई. गडी चालता फिरता ऱ्हायला पायजेल यंडपत्तुर. आपला वखत जाला की गिपचीप निगून जायाचं. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’.. कुनाबिगर कुनाचं कायबी अडत न्हाई आताशा. लोकान्ला तुम्ची याद आली नाय पायजेल. लोक तुमास्नी इसरले मंजी तुमी संतपदाला पोचलं.

आवं, कामाच्या लोकान्ला पब्लिक इसरून ऱ्हायलंय. डानलोकान्ला, मटकाकिंगला, खादाडखाउन्ला लोग हमेशा याद करत्यात. ऱ्हायलं. जवर दिल की धडकन् चालू हाई तवर सच्चाई की राह पें चलने का. शंतूरच्या आंटीवानी तुम्ची याद आमच्या दिलामंदी हमेशा जवाँ ऱ्हानार बगा.

येक ऱ्हायलंच की. उद्याची फिकीर करायची न्हाई. पर उद्याचा होमवर्क कराया पायजेल. आज मी हिथं हाई, पर उद्याच्याला मला कुटं जायाचं हाई, े ठावं पायजेल. हमेशा सौताला अपडय़ेट कराया पायजेल. नव्या टेक्नालाजीसंगट दोस्ती कराया पायजेल. काळाची पावलं वळखली पायजेल. जुन्याला इसरून चालनार न्हाई. त्येचा अनुभव मोटा. त्येचा उपेग करायला पायजेच. पर तेला कवटाळून जो उद्याकडं पाठ फीरवील त्यो आऊटडेटेड होवून ऱ्हायलाय भौ. संशोधन. रीशर्च अ‍ॅंड डेव्हलेपमेंट. देसी जुगाड. रीशर्च फकस्त ल्याबमंदी नगं, लाईफमंदी बी व्हाया पायजेल, तवाच डेव्हलेपमेंट हुती. परत्येकानं सोताची कप्याशिटी वळखली, कमजोरी आन् ताकद वळखली की काम जालंच वो. सौताला हमेशा तयार ठय़ेवलं पायजेल. गलती हुनारच. त्येच्यातून शिकत ग्येलं की इजय हुनारच. येखाद टायमाला ल्येट पन् थ्येट. मारल आफ दी श्टोरी काय सदाभौ? आजच्या घडीला काळाच्या ग्राऊंडवर हुभा ठाकला गडी, तरीबी डोळं उद्याच्या वाटंकडं लागल्येलं पायजेल.

फ्युचरमंदी शहेनशहा कौन? जगामंदी, देशामंदी, राज्यामंदी कुनाचं राज आसनार? जगाचं सोडा की वो.. आवं, आप्ल्या देशामंदी लोकशाही हाई सदाभौ. सवालच पदा हुत न्हाई. राज लोकान्चं हाई. त्यांचंच ऱ्हानार हमेशा. राज कायद्याचं हाई. जग जिक्कायची भासा बोलून ऱ्हायलो आपुन- पर सौताला न्हाई जिक्कलं तर हारच. शुरुवात सौतापासून. मानुसकीच्या समद्या शत्रूंपासून म्या दूर राहनार. देश पुडं जान्यासाठी हर पल मेहनत करनार. कायद्याचा मान ठय़ेवनार. कायदा हातात घेनार न्हाई. वेसनांपासून दूर ऱ्हानार. बस. दिसंबर आलाय सदाभौ. नव्या सालाची चला हवा येवू द्या. येवून ऱ्हायली ना भौ. ठरलं, नव्या सालाचं माजं क्यालेन्डर म्याच लिवनार. म्या सोताला जिक्कनार.. मग जगाला. नव्या साली माज्या क्यालेन्डरमंदी परत्येक दिवस सुखाचा, आनंदाचा. जगाच्या क्यालेन्डरमंदी बी परत्येक पानावर भारत देसाचा डंका वाजला पायजेल.

मेरा भारत महान. तवा प्ल्यानिंगच्या तयारीला लाग. कलंदर सदाभौ, आप्लं क्यालेन्डर आपुनच लिवा. आनेवाला पल जानेवाला हाईच. त्येच्यामंदी जिंदगीची मिसळ क्येली की लाइफ झिंगालाला.

सदाभौ, उद्यासाटी ब्येश्ट लक!

तुम्चा जिवाभावाचा दोस्त-

दादासाहेब गांवकर

kaukenagarwala@gmail.com