प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

गेल्या शतकात मानवाने ज्या असंख्य अतक्र्य कल्पना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्यक्षात उतरवल्या, त्यांत यानातून पृथ्वीकक्षेबाहेर जाऊन इतर ग्रहांचा शोध घेणं किंवा उपग्रह सोडून पृथ्वीवर लक्ष ठेवणं या कल्पनांना अग्रक्रम द्यावा लागेल. एका प्रचंड ऊर्जेचा स्फोट करून अवकाशयान आकाशात उडवणं, ते कितीतरी दिवस विशिष्ट कक्षेत फिरत ठेवणं, त्याद्वारे अवकाशातील इतर ग्रहांचा शोध घेणं आणि नंतर यानातील अंतराळवीरांसह सुखरूपपणे पृथ्वीवर येणं.. या साऱ्या प्रकारांत विलक्षण अद्भुतता ठासून भरलेली आहे. या सगळ्या व्यापांत आणखीन एक कल्पना मानवाच्या मनात दडून बसली आहे, ती म्हणजे इतर ग्रहांचा शोध घेताना त्या ग्रहांवर जीवसृष्टी आहे का, याचाही तपास करणं! अर्थात या सर्व कल्पना (की सत्य?) जगभराच्या व्यंगचित्रकारांसाठी उत्तम कच्चा माल ठरलेल्या आहेत. याच विषयावर ‘आऊट टू लॉन्च’ हे एक छोटेखानी पुस्तक आहे. त्यातील काही चित्रांचा आस्वाद घेता येईल.

एखाद्या ग्रहावर पहिलं पाऊल ठेवणारा माणूस म्हणून त्या अंतराळवीराचं साहजिकच प्रचंड कौतुक होतं. हे कौतुक त्याच यानातील दुसऱ्या अंतराळवीराच्या वाटय़ाला येणं शक्यच नसतं. ही संधी दवडायची नसल्याने एका अंतराळवीराचे पाय व्यंगचित्रकाराने नेमके टिपले आहेत. (यामुळे या अंतराळवीरांचे पायही मातीचेच आहेत हे व्यंगचित्रकाराने स्पष्ट केलं आहे!)

बऱ्याच वेळेला घराच्या किल्ल्या आतमध्ये आणि घरातले दोघेही किल्लीविना बाहेर अशी परिस्थिती आपण अनेकदा अनुभवतो. पण अंतराळवीरांच्या बाबतीत हे अवकाशात घडलं तर..? असा प्रश्न व्यंगचित्रकाराला पडला आहे. कारण तिथे ‘चाबीवाला’ मिळणंही अशक्यच!

साधारणपणे प्रशासनाला नेमकं कोंडीत पकडून संपावर जायचं आणि आपल्या मागण्या व्यवस्थापनाकडून मान्य करून घ्यायच्या असा जगभरातल्या कामगार-कर्मचाऱ्यांचा शिरस्ता असतो. त्याचप्रमाणे एक अंतराळवीरही अवकाशयानातून प्रवास करत असताना मधेच यानातून बाहेर येऊन ‘मी आत्तापासून संपावर गेलोय’ अशी घोषणा करतोय आणि पेन्शनमध्ये ३० टक्के  वाढ, कामाच्या स्वरूपाबद्दलच्या अटी वगैरे वगैरे मागण्या सादर करतोय असंही एका व्यंगचित्रकाराने रेखाटलं आहे. ही कल्पना ट्रेड युनियनच्या मानसिकतेवर भाष्य करणारी आहे.

सर्वसाधारण प्रवासात एखाद्याचं एखादं वाक्य खूप नॉर्मल वाटतं. उदाहरणार्थ- ‘मी अमेरिकेच्या बाहेर कधी गेलो नाही.’ पण हेच वाक्य जेव्हा एखादा माणूस अवकाशयानात बसून म्हणतो तेव्हा त्यातील विलक्षण विसंगती आपल्याला चटकन् जाणवते. हेच व्यंगचित्रकाराचं खरं कौशल्य आहे. (‘न्यू यॉर्कर’चे व्यंगचित्रकार बर्नी टोबे)

अंतराळात जाऊन एखाद्या ग्रहावर उतरण्याचं स्वप्न वैज्ञानिकांनी प्रत्यक्षात उतरवल्यानंतर ‘मलाही अंतराळवीर व्हायचंय’ असं एक नवीन स्वप्न अनेक सामान्यजनांना पडू लागलं. त्याचा परिणाम म्हणजे सोबतचं व्यंगचित्र (‘न्यू यॉर्कर’- १९६८, ब्रूस पेट्टी). इथे अनेकांची पुढील अंतराळ मोहिमांसाठीची तयारी सुरू झालेली दिसते. उदाहरणार्थ, ‘प्लुटो १९८४’, ‘मंगळ १९७६’ वगैरे वगैरे. आपल्याकडे जसं वयाच्या दुसऱ्या वर्षीच मुलांना लवकरात लवकर यंत्र बनवण्याच्या कारखान्यात घालण्याची स्पर्धा असते, त्याप्रमाणे ही एक आईदेखील आपल्या मुलाने ‘ज्युपिटर १९९१’ या मोहिमेत सहभागी व्हावं हे आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत आहे.

एखादं यान चंद्रावर किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रहावर पोहोचलं तर तिथे काय परिस्थिती असेल याबद्दल शेकडो शक्यता असतात. अर्थातच त्या सर्व शक्यता या पृथ्वीवरच्या आपल्या नेहमीच्या जीवनाशी समांतर जाणाऱ्या असणार, हे उघड आहे. ओसाड अशा ग्रहावर यान उतरवल्यानंतर अंतराळवीरांना पहिला धक्का बसतो. कारण यानातून बाहेर पडल्यानंतर त्या ग्रहावरचा स्थानिक प्राणी त्यांच्याकडून दंड वसूल करतोय. कारण यान ‘नो पार्किंग उतरवलंय!!

एका चित्रात आकाशातल्या ‘पृथ्वी’ ग्रहाकडे पाहून एक परग्रहवासी नवकवी मित्राला म्हणतोय, ‘‘मला एक कविता सुचली आहे! ‘पृथ्वी’ या शब्दाला एखादं यमक सुचव ना!!’’

साधारणपणे पृथ्वीवर जे देश इतर प्रदेशांवर आक्रमण करायचे त्यावेळी प्रथम स्थानिकांशी युद्ध, नंतर त्यांचं शिरकाण आणि त्यानंतर मग त्या उरलेल्या अत्यल्प अशा स्थानिक लोकांसाठी दया म्हणून आरक्षण किंवा एखादा छोटा भूप्रदेश किंवा राज्य जाहीर करणं- हा परिपाठ!! त्याप्रमाणेच या अज्ञात ग्रहावरचे स्थानिक लोकही अमेरिकेने या ग्रहावर झेंडा लावल्यानंतर म्हणताहेत, ‘‘आता आम्हाला स्वत:चं एखादं राज्य मिळेल ना?’’ युरोप-अमेरिकेच्या आक्रमक इतिहासावर हे सणसणीत चाबूक भाष्य आहे.

अगदी अलीकडे आपली मंगळ मोहीम जोरात सुरू असताना त्या सुमारास जगभरातले वैज्ञानिक मंगळावर पाणी आहे का, या प्रश्नावर चर्चा करीत होते. त्याचवेळी भारताच्या काही भागांत भीषण पाणीटंचाई  होती. ही विसंगती व्यंगचित्रकाराच्या नजरेतून निसटणं अवघडच. त्यावर माझ्या एका पॉकेट कार्टूनमधले एक त्रस्त नागरिक म्हणताहेत, ‘‘मंगळावर जीवसृष्टी असणारच. कारण तिथे पाणी नाही असं काही वैज्ञानिकांचं मत आहे!! ’’

मंगळावर समजा जीवसृष्टी असलीच तर ती कशी असेल आणि काय विचार करत असेल, या कल्पनेवर एक मालिका दिवाळी अंकासाठी केली होती. त्यातली ही काही उदाहरणं.. त्यातल्या काही लोकांना पृथ्वीवर अणुयुद्ध होऊन अवकाशात पृथ्वीचे अक्षरश: दोन तुकडे झालेले दिसतात. त्यावेळी ते म्हणतात, ‘‘स्वतंत्र राज्य किंवा स्वतंत्र देश नव्हे, तर स्वतंत्र ग्रह पाहिजे, ही मागणी तिथल्या अतिरेक्यांनी अखेरीस पूर्ण केलेली दिसतेय!’’

या ग्रहावरच्या शास्त्रज्ञांना पृथ्वीवरचा एक दगड सापडतो. त्याचं शास्त्रीय विश्लेषण केल्यानंतर ते म्हणतात की, ‘‘या संशोधनातून असं दिसतं की, पृथ्वीवर प्रचंड प्रदूषण आहे! याचाच अर्थ तिथे जीवसृष्टी असणारच!!’’

तिथले प्रेमी जीवही जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये ‘पृथ्वी’ ग्रह आला तरी त्याला न जुमानता लग्न करण्याएवढे पुरोगामी असतात. पण अखेरीस जेव्हा खरोखरच मानव मंगळावर मोठय़ा संख्येने जाईल तेव्हा तिथल्या स्थानिकांना कोणती भीती वाटू शकेल, हे या सोबतच्या चित्रात रेखाटलं आहे. त्याला आधार अर्थातच पृथ्वीवरच्या अर्थलोलुप संस्कृतीचा आहे.