प्रशांत कुलकर्णी prashantcartoonist@gmail.com

सर्वसाधारणपणे शाळकरी किंवा लहान मुलांनी कुठं खेळावं? घरात, बागेत, मैदानात, घराच्या गॅलरीत, गच्चीत, अंगणात, मोकळ्या रस्त्यावर, चिंचोळ्या गल्लीत, शाळेच्या वर्गात.. वगैरे वगैरे कुठेही. पण चार्ल्सची गोष्टच वेगळी होती. त्याला दफनभूमीमध्ये वेळ घालवायला खूप आवडायचं! खूप वर्षांपूर्वी दफन केलेले लोक आता कसे दिसत असतील वगैरे कल्पना तो करायचा.. तासन् तास! एखाद्या निर्जन कोपऱ्यावरचं वर्षांनुवर्षे बंद असलेलं घर बघितलं की चार्ल्स हमखास त्या अंधाऱ्या घरात घुसून उगाचच ते अनोळखी घर धुंडाळत  बसायचा. सगळंच विचित्र! पण या विचित्र मुलाची चित्रकला चांगली होती. मात्र, त्याचे विषय फारच विचित्र होते. थोडे विक्षिप्तच म्हटलं तरी चालेल.

मोठा झाल्यावर त्याने चित्रकलेमध्ये एक वेगळाच प्रयोग केला. त्याने चक्क एक कुटुंब रेखाटलं. हे कुटुंब होतं भुतांचं. मोठं कुटुंब होतं. आई, बाबा, काका, दोन लहान मुलं, दोन नोकर.. आणि मुख्य म्हणजे गूढ भुताटकी असावी अशी वाटणारी भलीमोठी हवेली. उंच जाणारा जिना, अंधार, कोळीष्टकं, मोठय़ा, अंधार पाझरणाऱ्या खिडक्या, उंच, जुन्या पद्धतीचे दिवे, झुंबर.. प्रत्येक गोष्ट अगदी अँटिक वाटावी अशी. टेबल-खुच्र्या, पलंग, पेटारे, कपडे सगळे जुने. सगळ्या पात्रांचे विचित्र चेहरे, निर्थक भाव. खरं म्हणजे या वातावरणाची आणि या पात्रांची जरा भीतीच वाटावी असं चित्र! आणि मुख्य गोष्ट म्हणजे विनोद! तोही असाच एकदम भयंकर, विचित्र, विक्षिप्त आणि अंगावर येणारा!

उदाहरणार्थ- या घरामध्ये खिडकीतून बाहेरचं चांगलं दृश्य दिसावं म्हणून चक्क एक देखावा खिडकीला ठोकून बसवण्याचं काम सुरू आहे. हा नवा देखावा किंवा दृश्य दफनभूमीचं आहे.

एका चित्रातील गृहिणी शेजारी मावशींकडे जाऊन कपभर सायनाइड उसने मागते. किंवा या घरामध्ये एक पाहुणे राहायला येतात. त्यांना त्यांची खोली दाखवताना मालकीणबाई म्हणतात, ‘ही तुमची खोली. काही लागलं तर फक्त जोराने किंचाळा!’

ही आई आपल्या मुलांसाठी ख्रिसमसचं झाड आणते. (तेही अपेक्षेप्रमाणे अगदी वाळलेलं.) तिच्या  मुलांना आवडतील अशी खेळणी वगैरे तिने त्यावर लावलेली आहेत. उदा. शवपेटय़ा, बांधलेले मृतदेह, फाशी देणारं यंत्र वगैरे वगैरे. शहारा येईल असं हे चित्र.

चार्ल्स अ‍ॅडम्स (सही मात्र ते Chas Addams अशी करायचे.) यांनी निर्माण केलेलं हे कुटुंब आणि त्यावरची शेकडो व्यंगचित्रं आपल्याला जरी धक्कादायक किंवा नापसंत वाटली तरी अमेरिकेत त्यांचे चाहते खूप आहेत. ते इतके आहेत, की त्यांची याच नावाची एक कार्टून सीरिजसुद्धा निघाली होती. ‘अ‍ॅडम्स फॅमिली’ या नावाची! अनेक मुलांना ती आठवतही असेल.

चार्ल्स अ‍ॅडम्स (१९१२-१९८८) हे अमेरिकेतील गेल्या पिढीतील अत्यंत नावाजलेले व्यंगचित्रकार. पेन्सिल्विया विद्यापीठात ते जिथे शिकले तिथे एका फाइन आर्ट्स इमारतीवर त्यांच्या या ‘अ‍ॅडम्स फॅमिली’चं म्युरल केलं आहे, इतके ते लोकप्रिय आहेत. एका वाचनालयाच्या इमारतीवरही त्यांच्या व्यक्तिरेखांचं भित्तिशिल्प केलंय.

कॉलेज संपल्यानंतर त्यांना एका साप्ताहिकात नोकरी लागली. त्यात गुन्हेगारीविषयक वार्तापत्र असे. त्यावेळी मृतदेहांच्या फोटोंना टचअप् करण्याचं काम चार्ल्स करीत असत. अगदी आवडीने! पुढे त्यांची व्यंगचित्रं न्यू यॉर्कर, ऊफअहठ अठऊ दवअफळएफएऊ  इत्यादी नियतकालिकांतून येऊ लागली आणि उत्तम चित्रकलेमुळे त्यांना वाचकांची पसंती मिळू लागली. काळ्या शाईने केलेलं अप्रतिम रेखाटन, शेडिंग, कॉम्पोझिशन, फर्निचर, झुंबर, लाकडी फ्लोअरिंग इत्यादीचं तपशीलवार रेखाटन यामुळे त्यांची चित्रं आकर्षक तर दिसतातच; पण ती एखाद्या कृष्णधवल पेंटिंग्जसारखी वाटतात. आणि या चित्रांना पूरक असा डार्क ुमर- जो अमेरिकन वाचकांना मोहात पाडू लागला. हा ुमर फक्त ‘अ‍ॅडम्स फॅमिली’पुरता मर्यादित नव्हता, तर इतरही अनेक चित्रांतून तो व्यक्त व्हायचा.

उदाहरणार्थ, एका चित्रात वडील गळ्याला गळफास लावण्याच्या बेतात असताना अचानक त्यांचा लहान मुलगा येतो आणि म्हणतो, ‘‘छे, गळफासाची गाठ अशी बांधत नसतात!’’ दुसऱ्या एका चित्रात नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसलेला दाखवलाय. तेव्हा अचानक तिथे बायको येते आणि नवऱ्यावर ओरडते, ‘‘तुला एक काम नीट धड करता येत नाही!’’ दुसऱ्या एका चित्रात घरात हळूच घुसलेल्या एका भल्यामोठय़ा अजगराने नवऱ्याला गिळंकृत केलंय आणि तो गुदमरून गेलाय. बायकोचं तिकडे लक्ष नसल्यानं ती म्हणते, ‘‘जॉर्ज, जरा स्पष्ट बोल रे! नुसतं तोंडातल्या तोंडात बोलू नकोस!’’

अ‍ॅडम्स यांची चित्रकला अप्रतिमच होती. त्यांचा समकालीन व्यंगचित्रकार सोल स्टाइनबर्ग म्हणतो की, ‘अ‍ॅडम्स यांच्या चित्रांतील आधुनिक आर्किटेक्चर हे अत्यंत गंभीरपणे चितारलं गेलं आहे.. जे पूर्वी कधीही रेखाटलं गेलं नव्हतं.’ एकदा अ‍ॅडम्स यांना माशांबद्दल व्यंगचित्र काढायचं होतं तर त्यांनी कितीतरी तास मत्स्यालयामध्ये घालवले. खाऱ्या पाण्यातील मासे, गोडय़ा पाण्यातील मासे यांची तपशीलवार चित्रं काढली. त्याची खरंच फार आवश्यकता नव्हती. पण बारीकसारीक तपशिलाबद्दल ते दक्ष असायचे. सोबतच्या चित्रात त्यांनी घरगुती मत्स्यालयामध्ये इमारतींची पार्श्वभूमी दाखवली आहे. जणू काही मासे उडत आहेत असा विलक्षण भास त्यातून निर्माण होतो. एक प्रकारे सर्व महानगरं एक दिवस प्रलयात बुडणार आहेत असा संकेतच ते या चित्रातून देत आहेत असं वाटतं!

त्यांच्या घरी एक खरंखुरं पूर्ण आकाराचं लोखंडी चिलखत होतं. कधी कधी ते स्वत:च चिलखत घालून बसायचे. जणू काही केव्हाही हल्ला होऊ शकतो! आपली व्यंगचित्रं ही शक्यतो कॅप्शनलेस असावीत असा  त्यांचा कटाक्ष असायचा. त्यामुळे ज्या वेळी त्यांना चित्राखाली काही शब्द किंवा एखादं वाक्य लिहायची वेळ यायची तेव्हा ते जरा हिरमुसले व्हायचे.

पण अ‍ॅडम्स यांची खरोखरच छान आणि हसवणारीही बरीच व्यंगचित्रं आहेत. एका दफनभूमीत खड्डा  खोदण्याचं काम सुरू आहे. आणि हा आकाराने चांगलाच लांब असलेला खड्डा नेमका कुणासाठी, याबद्दल भीतीयुक्त आश्चर्य एकजण व्यक्त करतोय. तर त्याला खड्डे खोदणारा उत्तर देतोय, ‘‘छे, छे!! तसं काही नाही! पाण्याच्या पाइपलाइनचं काम सुरू आहे!’’

आदिमानव आणि त्याची गुहा आणि या गुहेतील त्याची चित्रं हे सगळं वीस-पंचवीस हजार वर्षांपूर्वीच संपलं, या समजुतीला धक्का देणारं त्यांचं हे सोबतचं चित्रही मजेदार आहे. (सर्व चित्रं ‘द वर्ल्ड ऑफ चार्ल्स अ‍ॅडम्स’ या संग्रहातून.)

तर असे हे गूढ चार्ल्स अ‍ॅडम्स! गूढ वातावरणात चित्रविचित्र कल्पना काळ्या शाईने तपशीलवार रेखाटत असताना त्यांच्या अवतीभोवती त्यांच्याच ‘अ‍ॅडम्स फॅमिली’तील पात्रांचा गराडा त्यांच्याकडे कुतूहलाने पाहतोय असं दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं.