News Flash

पूर्व-प्राथमिक शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी..

पडसाद

(संग्रहित छायाचित्र)

पूर्व-प्राथमिक शिक्षणाच्या बळकटीकरणासाठी..

‘लोकरंग’ मधील (२६ जानेवारी) ‘निकड.. शाळा-पूर्व तयारीची’ हा स्मितीन ब्रीद यांचा लेख  वाचला. यातील ‘असर’चा पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबतचा अहवाल विचार करायला लावणारा आहे. ही चिंता दूर करण्यासाठी आपल्या राज्यात अंगणवाडय़ांसाठी ‘आकार’ नावाचा जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे तो बळकट करायला हवा.

गुजरातमध्ये गिजुभाई बधेकांनी बाल- शिक्षणाचा पाया रचला. महाराष्ट्रात ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांनी यासाठी प्रयत्न केले. या दोघींनी कोसबाडला कुरणशाळा, घंटाशाळा व अंगणातील शाळा (अंगणवाडी) निर्माण करून बालकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य दिले.

१९४० ते १९८० पावेतो अंगणवाडय़ांना सरकारी रूप आलेले नव्हते. त्यामुळे पाडे, वस्ती, गावे या ठिकाणी अंगणवाडय़ांद्वारे उत्तम काम सुरू होते. राज्यात अंगणवाडय़ांना सरकारी रूप आल्यानंतर मात्र अंगणवाडीतील शिक्षण हा भागच गायब झाला. गावोगावच्या अंगणवाडय़ांमधून आजमितीस विविध शासकीय योजना अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्या माध्यमातून राबवणे हाच शासनाचा मुख्य कार्यक्रम झाला. यात आरोग्य विभागाशी निगडित गरोदर महिलांची तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी, इ. कामांकडे अधिक लक्ष पुरवावे लागते. त्यामुळे ज्या उद्देशाने अंगणवाडय़ांची पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी सुरुवात झाली, त्यातील शिक्षण हा उद्देश बाजूलाच पडला. परिणामी २००० सालापासून खेडोपाडी भूछत्रासारखे पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या इंग्रजी शाळा सुरू झाल्या व याचा बालशिक्षणावर विपरीत परिणाम झाला. आज या समस्येवर मात करण्यासाठीच ‘आकार’ अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. मुलांच्या सृजनशक्तीचा व बालवयातील सभोवताली घडणाऱ्या क्रियाप्रतिक्रियांचा सहसंबंध लावण्याचा व याद्वारे मुलांच्या भावविश्वाचा ठाव घेण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमाद्वारे होईल. लहानमोठा परिचय, पेक्षा जास्त- पेक्षा कमी, सर्वात मोठा व सर्वात लहान, समूहाची तुलना करणारे विधान दिले असता प्रत्यक्ष समूह बनवता येणे, एक गुणधर्म वापरून वर्गीकरण करणे, वस्तूच्या आकाराप्रमाणे चढता-उतरता क्रम लावणे, एकास एक संगती, कलानुभव, तर काय होईल?, शांतीचा खेळ, चित्रपट्टय़ा वापरून पाहुणा ओळखणे, दिशा समजणे, उच्चार व वाचनाची सांगड, चेतना व्यायाम, बोटाच्या स्नायूंचा विकास व हस्त-नेत्र समन्वय, जोडय़ा लावणे, गोष्ट सांगणे, अनौपचारिक गप्पागोष्टी, शारीरिक खेळ, मुक्तखेळ या क्रियांचा समावेश यात करण्यात आलेला आहे. या घटकांमुळे मुलांच्या सर्वागीण विकासास चालना मिळते. मात्र हा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे करवून घेण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांना, मदतनीसांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यांच्यावरील इतर कामांचा ताण कमी करून त्यांना उत्तम प्रशिक्षण दिल्यास ‘आकार’ची अंमलबजावणी सहजसाध्य होईल.

– संतोष मुसळे, जालना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 4:06 am

Web Title: chaturang readers response letter abn 97
Next Stories
1 निकड..शाळा-पूर्व तयारीची!
2 ‘पूर्व-प्राथमिक’चेही कंत्राटीकरण?
3 हास्य आणि भाष्य : बाळासाहेबांची ‘जत्रा’