News Flash

‘निर्मिती’.. रसिका, तुझ्याचसाठी!

निर्मिती.. सर्व रसिकांसाठी!’ या शीर्षकाचा अर्थ काय असावा, असा प्रश्न रसिकांना निश्चितच पडेल. पं. संजीव अभ्यंकर यांनी स्व-निर्मित अशा ५१ रचना (ज्यांत शास्त्रीय बंदिशी

| March 8, 2015 06:58 am

‘निर्मिती..  सर्व रसिकांसाठी!’ या शीर्षकाचा अर्थ काय असावा, असा प्रश्न रसिकांना निश्चितच पडेल. पं. संजीव अभ्यंकर यांनी स्व-निर्मित अशा ५१ रचना (ज्यांत शास्त्रीय बंदिशी आणि मराठी व हिंदी संतरचनांचा समावेश आहे.) अत्यंत व्यावसायिक दर्जाचे ध्वनिमुद्रण करून आपल्या संकेतस्थळावर- www.sanjeevabhyankar.com येथे रसिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. आठ तासांहून अधिक कालावधीचे हे ध्वनिमुद्रण ‘Free downloads’ स्वरूपात आहे. रसिकांनी त्याचा निखळ आनंद घ्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या या ‘निर्मिती’विषयी त्यांच्याच शब्दांत..
‘नि ल्ल
र्मती..  सर्व रसिकांसाठी!’ या शीर्षकाचा अर्थ काय असावा, असा प्रश्न रसिकांना निश्चितच पडला असेल. माझ्या स्व-निर्मित अशा ५१ रचना- ज्यात शास्त्रीय बंदिशी व मराठी आणि हिंदी संत रचनांचा समावेश आहे, त्या अत्यंत व्यावसायिक दर्जाचे ध्वनिमुद्रण करून माझ्या संकेतस्थळावर- म्हणजे Sky is the limit येथे समस्त रसिकांसाठी मी विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हे आठ तासांहून अधिक कालावधीचे ध्वनिमुद्रण ‘Free downloads’ अशा स्वरूपात आहे. रसिकांनी त्याचा निखळ आनंद घ्यावा. या निर्मितीविषयी थोडेसे..
ख्यालगायनाचा पिंड असलेल्या कोणत्याही गायकाचा नवनिर्मिती हा स्थायीभाव असायला हवा. नवनिर्मिती वेगवेगळ्या रूपांत होत असते. संपूर्णपणे ख्यालगायनाची मैफल गाजवू शकणारा कलाकार हा निर्मितीक्षम असावाच लागतो. एखाद्या रागाच्या स्वरांच्या चौकटीत रागभाव निर्माण करताना छोटय़ा छोटय़ा स्वराकृतींची असंख्य चित्रे निर्माण करण्याचा प्रयत्न तो सततच करीत असतो. या प्रकारच्या निर्मितीला ‘सतत घडणारी निर्मिती’ असे म्हणता येईल. ख्यालगायकाचे ते बलस्थान असायला हवे. ही निर्मिती अमर्याद असते. जोपर्यंत कलावंताच्या डोक्यात येणारा विचार आणि त्याचा गळा हे एकाच उंचीवर काम करत राहतात, तोपर्यंत ‘Sky is the limit’ अशी या निर्मितीची उंची असू शकते. ‘अजूनही माझा शोध चालूच आहे..’ असे जेव्हा एखादा ज्येष्ठ प्रतिभावान कलाकार म्हणतो तेव्हा त्याला हाच अर्थ अपेक्षित असतो.
ख्यालगायकासाठी नवनिर्मितीचे आणखी एक लोभस रूप म्हणजे रचना बांधणे. मग त्या शास्त्रीय रचना (बंदिशी) असोत वा रागदारीचा अर्थवाही वापर केलेल्या उपशास्त्रीय रचना असोत. मात्र, रचना बांधणे ही निराळी प्रतिभा आहे. अनुभवसंपन्नतेमुळे रचना बांधण्याची क्रिया जेव्हा सहजपणे घडते, त्यावेळी उत्स्फूर्तपणे घडलेली ती रचना अत्यंत परिणामकारक बनते. उत्स्फूर्तपणे सुचलेल्या रचनेला ‘पूर्णत्व’ देण्यासाठी मात्र खूप सूक्ष्म विचार करावा लागतो.  
मी गेल्या वीस वर्षांपासून अशा अनेक रचना बांधत आलेलो आहे. माझ्या स्वत:च्या गरजेनुसार या सर्व रचना बनत गेलेल्या आहेत. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या रचनांच्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा मला एक वेगळीच गरज निर्माण झाली, तेव्हा तेव्हा ठिणगी पडत गेली आणि या रचनांची निर्मिती झाली. उदाहरणादाखल हंसध्वनी, मधुकंस, भिन्नषड्ज, मेघ, चंद्रकंस इत्यादी राग मी माझ्या कार्यक्रमांतून अनेकदा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे राग म्हणून गातो. पहिल्या रागात विलंबित एकतालात आलापी करून झाल्यावर पुढच्या रागांमध्ये मांडणी गतिमान व्हावी म्हणून मला मध्य लयीतील बंदिशींची गरज निर्माण झाली. त्यातून या रागांमधील रूपक आणि झपतालातील बंदिशी तयार झाल्या. द्रुत बंदिशींमध्ये माझ्याकडे उपलब्ध असलेल्या रचनांपेक्षा जास्त द्रुत रचनांची मला गरज भासली म्हणून भिन्नषड्ज, हंसध्वनी, कलावती, जोगकंस, रागेश्री, बागेश्री, चंद्रकंस, वृंदावनी सारंग इत्यादी रागांमधील तराण्यांची आणि देस, मेघ, मियाँ की तोडी, मारूबिहाग इत्यादी रागांमधील द्रुत बंदिशींची निर्मिती झाली.
या सगळ्या रागांमध्ये अनेक पारंपरिक बंदिशी आहेत. पण प्रत्येक गायकाचा गळा व अंदाज वेगवेगळा असतो. गतिमानताही वेगवेगळी असते. त्या गळ्याच्या अंदाजाला आणि गतिमानतेला चपखलपणे शोभेल अशी बंदिश उपलब्ध असेलच असे नाही. ‘रेडीमेड’ कपडे आणि स्वत:च्या अंगकाठीप्रमाणे शिवून घेतलेले कपडे यांत जो फरक असतो, तोच उपलब्ध बंदिशी आणि स्वत:च्या गळ्याप्रमाणे व अपेक्षित अंदाजाप्रमाणे बांधलेल्या बंदिशींमध्ये असू शकतो याची जाणीव मला झाली व त्यातूनच मग माझ्या या रचनांची निर्मिती होत गेली. मैफली करत असताना निर्माण झालेल्या स्वरचित्रांच्या अनेक कल्पना मी या रचनांच्या रूपाने बांधण्याचा प्रयत्न केला. बागेश्री रागामध्ये पंचम स्वराचा वापर अनेकजण विविध प्रकारे करतात. मी एकदा गात असताना अचानक मी स्वत: आजवर न ऐकलेल्या अशा प्रकारे पंचमाचा वापर घडून गेला. ‘मैं तो तोरे चरन लागी गोपाल’ या बागेश्री रागातील बंदिशीमध्ये मी तो पंचम अंगभूत केला आहे. या बंदिशीची एक हृद्य आठवण आहे. माझी आई कै. डॉ. शोभा अभ्यंकर आज आपल्यात नाही. ती जायच्या एक महिना आधी मी तिला ही बागेश्रीतली माझी नवीन बंदिश ऐकवली. कॅन्सरमुळे अतिशय क्षीण झाल्यामुळे तिच्यात माझी बंदिश ऐकण्याची इच्छा व शक्ती अजिबात नव्हती. पण मी हट्टाने तिला बंदिश ऐकवली. मी गायला लागल्यावर जेव्हा हा ‘पंचम’ अनपेक्षितपणे उमटला, तेव्हा ‘वा!’ अशी उत्स्फूर्त दाद तिच्या तोंडून निघून गेली. आणि या बंदिशीवर यशाची मोहोर तत्क्षणीच उमटली. ही आठवण मी आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही.
मारूबिहाग रागात दोन मध्यमांचा वापर विशिष्ट पद्धतीने करतात. एका मैफलीत तार सप्तकातल्या शुद्ध मध्यमावरून सरळ मध्य सप्तकातल्या तीव्र मध्यमापर्यंत एक इतके अनपेक्षित वळण सापडले, की ते वळण बंदिशीत पेरण्याचा मोह मला अनवार झाला. भिन्न षड्जाच्या तराण्यामध्ये गुंफलेली गुणकली रागाची मूर्छना व मेघ रागातल्या ‘उमड घुमड घन गरजे’ या बंदिशीत भूप व मालकंस रागांच्या मूर्छनेचे आभास अशा अनेक स्वराकृती बंदिशींच्या रूपाने बंधनात अडकवता आल्या. रसिकांना या रचना व त्यांची मांडणी ऐकताना याचा अनुभव निश्चितपणे येईल व त्यातले सौंदर्य आनंद देऊन जाईल.  
उपशास्त्रीय रचनांना चाल लावणे ही एक आणखीनच निराळी प्रक्रिया. कारण या रचनांना चाल लावताना त्यात रागाचे नियम पाळण्याची अट अजिबात नसते. रागाधारित असे त्याचे स्वरूप असू शकते. शब्दातील भावार्थ गडद करून तो अत्यंत प्रभावीपणे कसा पोहोचवता येईल, हे अतिशय वेगळ्या प्रकारचे आव्हान रचनाकारासमोर असते. एखाद्या रागामध्ये ती रचना प्रवाही असताना एखादा अत्यंत ‘अर्थवाही’ असा त्या रागाबाहेरचा स्वर असो वा पूर्णपणे वेगळ्याच रागातील स्वरांचा समर्पक वापर असो; अनेक पद्धतीने या उपशास्त्रीय रचना फुलवता येतात. रचनाकाराची अनुभवसमृद्धी आणि प्रतिभा जेवढी अधिक, तेवढी त्याची दृष्टी व्यापक होत जाते. हा एक न संपणारा प्रवास आहे, याची जाणीव रचना बांधताना मला सततच होत आलेली आहे.
मी बांधलेल्या उपशास्त्रीय रचनांमध्ये जास्तकरून हिंदी व मराठी भक्तिरचनांचा समावेश आहे. कारण भक्तिरस हा माझ्या गाण्यातला स्थायीभाव आहे. संतरचना निवडताना आशयामध्ये आणि भाषाशैलीमध्ये विविधता यावी यावर माझा भर होता. त्यामुळे संत तुकाराम, नामदेव, मीराबाई, तुलसीदास, कबीर, एकनाथ, सूरदास, गुरू नानक अशा अनेक संतांच्या रचना मी निवडल्या. उदाहरणादाखल एकनाथ महाराजांचा पंढरीमाहात्म्य सांगणारा ‘ऐसे पंढरीचे स्थान’ हा अभंग, तुकाराम महाराजांचा स्वत:ची अनुभूती कथन करणारा ‘बोलावा विठ्ठल.. पहावा विठ्ठल’ हा अभंग, नात्यांमधले वास्तव उलगडणारे ‘जगत में झूठी देखी प्रीत’ हे गुरू नानकांचे पद, कबीरांचे ‘गुरूबिन कौन बतावे बाट’ हे गुरूमाहात्म्य सांगणारे पद, इत्यादी. प्रत्येक रचना ही वेगळी वाटते, कारण साठ-सत्तर रागांच्या छटा या निर्मितीमध्ये वापरल्या गेल्या आहेत. विविध तालांचा वापर मी यासाठी केला आहे. शब्दच चाल घेऊन आले, पण माझे समाधान होईपर्यंत ती चाल मी पूर्ण होऊ  दिली नाही. चाल बांधतानाची तळमळ मी यातून अनुभवली. आणि मनासारखी चाल बांधली गेल्यावर मिळणारे समाधानही अनुभवायला मिळाले.
‘The experiences at the top are comparable’ असे म्हणतात. संतरचनांचा अभ्यास करताना ही गोष्ट मला प्रकर्षांने जाणवली. ‘आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया’ असे म्हणताना संत तुकारामांना जेवढा आनंद झाला असेल, तेवढाच आनंद ‘मैं तो गिरीधर के घर जाऊँ ’ असे म्हणताना मीराबाईंना झाला असणार याची अनुभूती चाल बांधताना येत होती. अशा ५१ रचना अत्यंत व्यावसायिक दर्जाचे ध्वनिमुद्रण करून मूर्त स्वरूपात आणल्या. त्यातून आठ तासांहून अधिक कालावधीचे ध्वनिमुद्रण तयार झाले. जवळपास आठ महिने मी या ध्वनिमुद्रणाच्या कामात पूर्णपणे बुडून गेलेलो होतो.  
निर्मिती घडणे, ती मूर्त स्वरूपात येणे आणि ती रसिकांपर्यंत पोहोचणे असे तीन टप्पे महत्त्वाचे असतात. या तीनही टप्प्यांवरचा आनंद कलावंतासाठी मौल्यवान असतो. आजवर ख्यालगायनाच्या क्षेत्रातील अशा प्रकारची निर्मिती ‘पुस्तक व त्याबरोबर सी. डी.’ अशा स्वरूपात रसिकांसाठी उपलब्ध होत होती. मी मात्र अत्यंत नवीन मार्ग अवलंबिलेला आहे. माझ्या संकेतस्थळावर- म्हणजे www.sanjeevabhyankar.com येथे हे सर्व ध्वनिमुद्रण रसिकांसाठी मी विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. त्या बदल्यात रसिकांचे प्रेम व आशीर्वाद ही अमूल्य भेट मला अपेक्षित आहे.              
    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 6:58 am

Web Title: classical music
Next Stories
1 मराठी कादंबरीचे जनक
2 हौस
3 मराठी.. राष्ट्रीय संवेदन-भाषा!
Just Now!
X